‘सी सॅट’ प्रश्नपत्रिका पात्रतेसाठी असावी ही एमपीएससीसंदर्भातील बातमी (१ नोव्हें.) वाचली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्यांपकी ही एक मागणी आहे. सामान्य ज्ञान अगदीच सामान्य असतानाही अभियांत्रिकीचे विद्यार्थी फक्त सी सॅट या पेपर क्र. २ मध्ये जवळपास पकीच्या पकी गुण पाडून गुणवत्ता यादी वाढवून ठेवतात. जरी हा विषय पूर्वपरीक्षेसाठी असला आणि मुख्य परीक्षेकरिता सामान्य ज्ञानाचा कस लागत असला तरी केवळ सी सॅट या विषयामुळे इतर शाखेतील विद्यार्थ्यांवर (बाकीच्या विषयांचे ज्ञान आणि सखोल अभ्यास असूनही) अन्याय होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांतल्या निकालावरून पाहिले असता अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात गुणवत्ता यादीत दिसून येतात. एकाच विषयाला महत्त्व देऊन विद्यार्थ्यांकडील बाकीच्या ज्ञानास दुर्लक्षित करण्यासारखे आहे. त्यामुळे यास स्पर्धा म्हणणे म्हणजे अप्रस्तुतच वाटते.
– विशाल भोसले, कोल्हापूर</strong>
एमपीएससी उमेदवारांची मागणी असमर्थनीय
‘सी सॅट प्रश्नपत्रिका पात्रतेसाठीच असावी’ अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केल्याची बातमी वाचली. पण मुळात ही मागणीच चुकीची आहे, कारण राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी ‘सी सॅट’ हा पेपर २०० गुणांसाठी असतो. त्यामध्ये क्लिष्ट प्रश्न फक्त ७५-८० गुणांचे असतात अन् ते दहावी-बारावी स्तरावरील असतात. ते फक्त अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनाच सुटतात हे म्हणणे खूपच चुकीचे आहे. तसेच या परीक्षेमध्ये जे उतारे असतात ते मराठीतूनही असतात आणि ते उलट अभियांत्रिकीच्या मुलांपेक्षा इतर कला किंवा तत्सम शाखेच्या विद्यार्थ्यांना लवकर सुटू शकतात. मग ही मागणी नक्कीच चुकीची ठरते. मुळात पूर्वपरीक्षा ही सर्वागीण अभ्यासाची चाचणी परीक्षा असून ती केवळ पात्रतेसाठी असणे योग्य नाही. त्यामुळे यामध्ये सर्वच शाखेच्या विद्यार्थ्यांचा खरा कस लागत असतो. म्हणून विद्यार्थ्यांची पात्रतेसाठीची मागणी चुकीचीच वाटते. त्यापेक्षा सध्या जसे आहे तेच योग्य आहे.
– अंकुश चंद्रकांत गाढवे, राक्षसवाडी, ता.कर्जत (अहमदनगर)
चुकीच्या रूढी, परंपरांची पाठराखण होणे दुर्दैवीच
प्रा. सुखदेव थोरात यांचा ‘शबरीमला – धार्मिक सुधारणांसाठी धडे’ हा लेख (२ नोव्हें.) वाचला. ज्या देशात जुन्या रूढी, परंपरा या आधुनिक लोकशाही न्यायव्यवस्थेपेक्षा वरचढ ठरू पाहतात तो देश किंवा ते राज्य अधोगतीला लागण्याचे संकेत ठरतात. वास्तविक शबरीमला हे मंदिर अशा राज्यात आहे (केरळ) जे राज्य भारतातील सर्वात शिक्षित राज्य आहे. अशाच ठिकाणाहून जर जुन्या आणि चुकीच्या परंपरांची पाठराखण होत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे आणि अशा धार्मिक गोष्टींच्या विषयांवर आपली राजकारणाची पोळी भाजून घेणे ही जणू आपल्या भारतीय राजकारणाची ऐतिहासिक परंपराच आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा दुर्लक्षित असलेल्या स्त्रियांच्या हक्कांसाठीचा एक ऐतिहासिक निर्णय आहे; परंतु धर्माच्या चक्रव्यूहात अडकलेल्या स्त्री जातीने स्वत:हून या निर्णयाचा विरोध करणे म्हणजे स्वत:च स्वत:चा अनादर केल्यासारखे आहे. म्हणून समस्त स्त्री जातीने शबरीमला मंदिराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा स्वीकार करून त्याचे समर्थन करणे गरजेचे आहे.
– राहुल आनंदा शेलार, मालेगाव (नाशिक)
हा तर जनतेला मूर्ख बनवण्याचा उद्योग
विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने जायकवाडीत पाणी सोडण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले गेले. विखे पाटील व इतर साखरसम्राट जनतेला मूर्ख बनवू पाहत आहेत. एकीकडे मराठवाडय़ात दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी मंत्र्यांना घेराव घालतात आणि दुसरीकडे जायकवाडीसाठीच्या पाण्याला विरोध करणे ही दुटप्पी भूमिका लोकांना वेडय़ात काढणारी आहे!
– सौरभ किशोर भालेराव, बोरसर, ता.वैजापूर (औरंगाबाद)
पटेलांचा वारसा सांगण्याचा नतिक अधिकार नाही
‘सरदार’ हे संपादकीय (१ नोव्हें.) वाचले. संघ आणि भाजप यांच्याकडे स्वातंत्र्यलढय़ाचा किंवा समाजसुधारकांच्या वारशाची वानवा आहे. ती अडचण दूर करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी खटाटोप केले. आधुनिकतेचे पुरस्कत्रे स्वामी विवेकानंद, कट्टर साम्यवादी भगतसिंह, जगाला ‘अिहसेचा’ मंत्र देणारे महात्मा गांधी, मनुस्मृती जाळणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ‘आमचेच’ असे दर्शविण्यासाठी केविलवाणे प्रयत्न केले. सरदार पटेल हे त्या शृंखलेतील दीर्घकाळ जोपासलेले उदाहरण. जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी, त्रिपुरामध्ये आणि काही उत्तरपूर्व राज्यांमध्ये फुटीरतावादी शक्तींसोबत सत्तास्थापनेचा प्रयत्न करणाऱ्यांना सरदारांच्या पटेलांचा वारसा सांगण्याचा नतिक अधिकार नाही. पंडित नेहरूंना बेदखल करण्यासाठी सरदारांविषयी ममत्व. दलितांच्या मतासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले दर्शविणे. सरदार पटेलांचा जगातील सर्वात उंच पुतळा त्यांच्या कार्याला आणि व्यक्तिमत्त्वाला साजेशा असला तरी त्याचा उभारणीमागील हेतू मात्र खुजा वाटतो.
– अॅड. वसंत नलावडे, सातारा</strong>
इतिहास बदलण्याचा आत्मविश्वास!
‘सरदार’ हे संपादकीय (१ नोव्हें.) वाचल्यावर मनात संभ्रम निर्माण झाला की, भाजप खरेच सर्वधर्मसमभाव बाळगणारा, धर्मनिरपेक्ष व टीका-सहिष्णू वगरे होत चाललाय की काय? कारण भाजपच्या धुरीणांनी सरदार पटेल यांचा २९८९ कोटी रुपये खर्चून जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याआधी संपादकीयात वर्णिलेला इतिहास नक्कीच वाचला असणार. मग फाळणीची कल्पना सर्वप्रथम मान्य करणाऱ्या, भारतीय मुसलमानांचे धार्मिक अधिकार मान्य करणाऱ्या, गांधीहत्येने व्याकूळ होणाऱ्या आणि हिंदू महासभा व रा. स्व. संघावर बंदी घालणाऱ्या सरदार पटेलांचा पुतळा उभारताना त्यांना या इतिहासाचा विसर पडला, की भारताचा इतिहास आपण सहजी बदलू शकू असा त्यांना जबरदस्त आत्मविश्वास आहे. तसे असेल तर त्यांच्या आत्मविश्वासाला दाद द्यायला हवी.
– शुभदा निखाग्रे, गोरेगाव (मुंबई)