‘फायटोप्लॅटनने जुहूचा समुद्रकिनारा निळाभोर’ ही बातमी (२१ जाने.) वाचली. हा नवीन प्रकार नसून आपल्याकडे यावर फार संशोधन झाले आहे. मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. प यांनी या विषयावर पीएच.डी. केली आहे.  Vibrio harveyi हा जिवाणूचा प्रकार आहे. तो आपल्याकडील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर सापडतो. रत्नागिरीमध्ये शिकत असताना आम्ही अनेकदा रात्री हा प्रकार पाहायला जात असू. कोळंबी संवर्धन करणाऱ्यांसाठी हा जिवाणू अपायकारक असून अन्य सागरी जीवांना त्याचा फारसा धोका नसतो.
– मुरारी भालेकर

दिलखुलास मुलाखत
‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिनप्रसंगी ‘खुर्चीपलीकडचे मुख्यमंत्री’ या कार्यक्रमात घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत खरोखर अप्रतिम होती. एक उत्तम निर्मिती पाहायला मिळाली. जितेंद्र जोशी यांनी एखाद्या कसलेल्या पत्रकार किंवा मुलाखतकाराप्रमाणे कार्यक्रमात जान आणली. आपले मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असोत, पण एक जमिनीवर पाय असलेला माणूस मुख्यमंत्री आहे याचा आनंद आणि समाधान वाटलं.
तरुण वर्गात फडणवीस यांची बरीच क्रेझ आहे. प्रत्येक तरुणाने आदर्श ठेवावा असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. आज माध्यमे आक्रमक नसून आक्रस्ताळी बनली आहेत. या पाश्र्वभूमीवर ‘खुर्चीपलीकडचे मुख्यमंत्री’ पाहून मन खूश झाले. काही तरी सकारात्मक ऐकल्याचे समाधान वाटले.
– आदित्य बोकारे, नागपूर

मोदींचा खरा चेहरा हिंदुत्वाचाच
अमित शहा यांची भाजपचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याच्या निमित्ताने ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या २१ जानेवारीच्या अंकात ‘अमित शहा सेट टू स्टार्ट फुल टर्म अ‍ॅज बीजेपी चीफ संडे’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तात सुरुवातीलाच म्हटले आहे की, विकास आणि हिंदुत्व ही मोदींच्या राजकीय कार्यक्रमातील महत्त्वाची कलमे आहेत. मला वाटते की, मोदींना वैचारिक पातळीवर सेक्युलॅरिझमच्या मुद्दय़ावरून प्रखर विरोध का होतो हे यावरून स्पष्ट व्हावे. भारतीय राज्यघटनेचा गाभा ‘निधर्मी राष्ट्रवाद’ हा आहे, तर हिंदुत्वाच्या विचारसरणीचा आत्मा ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ आहे. भारताच्या जडणघडणीच्या दृष्टीने हा मुद्दा अत्यंत मूलगामी असून त्याकडे तथाकथित विकासाच्या नावाखाली दुर्लक्ष करणे, हे आपल्यासाठी सतत डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानच्या उदाहरणावरून भविष्यात भलतेच धोकादायक ठरू शकते, याचे भान आपण ठेवायला हवे.
भारतीय राजकारणाच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, भाजप व शिवसेनेचा अपवादवगळता इतर कुठल्याही पक्षाला सांस्कृतिक राष्ट्रवादाची व पर्यायाने ‘राष्ट्रा’ची संकल्पना मान्य नाही. सबब, जोपर्यंत मोदी निसंदिग्धपणे व जाहीरपणे सांस्कृतिक राष्ट्रवादाची संकल्पना नाकारत नाहीत, तोपर्यंत त्यांना प्रखर विरोध होतच राहणार व खुद्द भारतीय राज्यघटनेच्या अंगाने विचार करता तसेच व्हायला हवे. सतत ‘विकास, विकास’ म्हणत मोदी असे भासविण्याचा प्रयत्न करतात की, आतापर्यंत भारत जणू मागास राहिलेला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, भारत जर मागास राहिलेला असेल तर तो वैचारिक दृष्टीने आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांना अभिप्रेत असलेला विवेकवाद व जीवनासंबंधीचा वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यात देवभोळेपणा व अंधश्रद्धेला अजिबात स्थान नाही, त्यापासून आपला समाज आज तुटलेला आहे. संस्कृती, परंपरा, पावित्र्य यांचे हितसंबंधीयांकडून जाणीवपूर्वक इतके स्तोम माजविले जात आहे की, राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या मूलभूत संकल्पनांचा समाजाला विसर पडावा. आणि या दृष्टीने कोणी प्रयत्न केला की, धर्माचे स्वयंघोषित हिंदुत्ववादी ठेकेदार त्याला धर्मद्रोही ठरवणार. विशेष म्हणजे राज्यघटनेशी बांधिलकी असल्याची शपथ घेऊन पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या मोदींना या बाबतीत काहीही देणे-घेणे नाही. अन्यथा विज्ञान परिषदेत गणपतीची सोंड हा वैदिक काळात आपल्याकडे प्लॅस्टिक सर्जरी होत असल्याचा पुरावा आहे, असे तद्दन भंपक विधान त्यांनी केले नसते. तसेही ठोकून द्यायचे हा मोदींचा स्वभावविशेष आहेच. अगदी ताजे उदाहरण म्हणजे ब्रॉडगेज रेल्वे व वीजनिर्मितीच्या अनुषंगाने आसाममधील जाहीर सभेत त्या राज्याच्या सरकारला अतिउत्साहाच्या भरात कानपिचक्या देण्याच्या नादात मोदींनी केलेली बेफाम विधाने. सबब, मोदींसारखा नखशिखान्त संघप्रचारक जोपर्यंत पंतप्रधानपदी आहे, तोपर्यंत त्याला प्रखर विरोध होणारच.
– संजय चिटणीस, मुंबई<br />
इरावतीबाईंचे विचार दीपस्तंभासारखे!
सध्या प्रा. शेषराव मोरे यांच्या लेखावरील आणि डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या विचारावरील चर्चा तसेच काही काळापूर्वी भालचंद्र नेमाडेप्रेरित देशीवाद चर्चा हे सर्व वाचत असताना इरावती कर्वे लिखित ‘आमची संस्कृती’ या पुस्तकाची आठवण झाली. देशमुख आणि कंपनीने १९६० मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले होते. त्यांचे विचार व संशोधनात्मक अभ्यास, जो १९५६ मध्ये मांडलेला होता त्यात आणि आजच्या परिस्थितीत काडीचाही बदल झालेला नाही, एवढे आम्ही विचारांनी गोठून गेलेले आहोत हे जाणवले. इरावतीबाई ६० ते १०० वष्रे विचारांनी आम्हा सर्वाच्या पुढे होत्याच. त्यांच्या लिखाणात त्यांचे समकालीन डॉ. आंबेडकर किंवा फुले दाम्पत्य यांचा उल्लेख नाही; परंतु आगरकरांबद्दलचे आदरणीय उल्लेख येताना दिसतात. असो. तरीही त्या विचाराने आज दीपस्तंभच ठरतात.
– रंजन र. ई. जोशी, ठाणे<br />
ही होरपळ कधी संपणार?
पाकमध्ये दहशतवाद्यांनी यावेळी विद्यापीठाला लक्ष्य केले. दहशतवादाशी सामना करण्यासाठी पाकिस्तान सज्ज असल्याचे तेथील लष्कर व नेते सांगत असतात. पण त्यांच्या दृष्टीने काही दहशतवादी चांगले तर काही वाईट आहेत. मग दुसरे काय होणार? खरे तर दहशतवाद्यांमध्ये असा भेदभाव करताच येत नाही. भारतद्वेषातूनच पाकिस्तान दहशतवादाला पोसत असून ते असा भेद न करता दहशतवादावर प्रभावी कारवाई करतील तेव्हाच तेथील लोकांची होरपळ थांबेल.
– संदीप संसारे, ठाणे

Story img Loader