बेकायदा इमारतींना सरसकट संरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. याचा सरळ अर्थ कायद्याची अंमलबजावणी करणे शक्य होत नसल्यास ते कायदेच गुंडाळा असा होतो. हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने उल्हासनगरमध्ये अनधिकृत इमारती दंडात्मक कारवाई करून नियमित करण्याबाबत दिलेल्या सवलतीचा लाभ किती इमारतीधारकांनी घेतला त्याची आकडेवारी जाहीर करावयास हवी होती. माझ्या माहितीप्रमाणे अशा इमारतींची संख्या हातांच्या बोटावर मोजण्यापलीकडे जाणार नाही. आतासुद्धा त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे. जर अशा प्रकारे बांधकामे नियमित केली जाणार असतील तर यापूर्वी तोडलेल्या इमारतींमधून बेघर झालेल्या नागरिकांची नुकसानभरपाई कशी आणि कोण करून देणार?
याबाबत खरे तर न्यायालयाने खंबीर भूमिका घेणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे प्रत्येक वेळेस अनधिकृत बांधकामांची पाठराखण होणार असेल तर अधिकृत इमारतींमध्ये घर घेण्यासाठी कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन आयुष्यभर तो फेडत बसणारे सामान्य नागरिक मूर्खच म्हणायला हवेत. त्यापेक्षा सरकारने बांधकामाविषयी असलेले सर्व कायदे रद्द करून, नगरविकास विभाग बंद करून कोणालाही कुठेही हवे तसे बांधकाम करण्याची मुभा द्यावी.
– महेंद्र शं. पाटील, ठाणे
अध्यात्माचा सोयीनुसार वापर
‘यमुनाजळी खेळू खेळ..’ हे शनिवारचे संपादकीय (१२ मार्च) वाचले. मुखवटा गळून पडल्यावर विद्रूप चेहऱ्याचे होणारे दर्शन आध्यात्मिक दिवाळखोरीचा काळा डोह अधिक गडद करणारच. शिवाय याला आपल्या दुर्दैवाने अलीकडे एक परंपरा आहे असेच दिसते. अन्यथा रामलीला मदानावरून स्त्री वेशात पलायन करून स्वत:चा जीव वाचवणारे ‘बाबा’ व स्त्रियांच्या तक्रारीवरून तुरुंगात खितपत पडलेले ‘बापू’ हे विदारक वास्तव समोर येते ना! याच वेळी ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे’ असे ललकारून सांगणारे व छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेल्या नजराण्याचा अव्हेर करणारे संत फार नाही केवळ तीनशे वर्षांपूर्वीचे, याचे प्रकर्षांने स्मरण करून द्यावेसे वाटते; पण ‘विश्वविजया’साठी सुरू असलेल्या ‘संस्कृती महोत्सवाच्या वैश्विक हलकल्लोळात’ या असल्या दाखल्यांची कोण तमा बाळगतो? उद्दाम संतवचनाद्वारे अवघ्या विश्वाला अध्यात्माचा प्रकाश देण्याचा दावा करणारेही स्वत: किती घनघोर अंधकारात असू शकतात व ‘अंधेनव नीयमाना यथान्धा’ या न्यायाने अध्यात्माचा सोयीनुसार वापर करणारे उठवळ, त्यात राजकारणीही आले.. एकमेकांचा कसा उदोउदो करतात हे आपल्याला पाहायला मिळाले, हेही नसे थोडके!
– रवींद्र परेतकर

आध्यात्मिक तोल डळमळीत
कोटय़वधी रुपये खर्च करून आर्ट ऑफ लििव्हग संस्थेने आपला वर्धापन दिवस विश्व सांस्कृतिक महोत्सव रूपात साजरा केला; परंतु या महोत्सवाचे यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात आयोजन करून या क्षेत्रातील नसर्गिक संपत्ती धोक्यात आल्याने महोत्सव आयोजक संस्थेला जेव्हा हरित लवादाने पाच कोटी रुपयांचा दंड केला तेव्हा, ‘तुरुंगात जाईन, पण दंड अजिबात देणार नाही’ अशी आध्यात्मिक (उद्दाम) धमकी श्री श्री रविशंकर यांनी दिली. ही घटना वास्तवतेला धरून असेल तर ते आध्यात्मिक विचारांशी सुसंगत नाही, किंबहुना आध्यात्मिक गुरू उद्दामपणे वागतात, भारतात न्यायसंस्थेला तुच्छ मानले जाते या भावनेने अन्य आध्यात्मिक समजल्या जाणाऱ्या संस्था व या महोत्सवात सामील झालेल्या परदेशी प्रतिनिधी यांना भारतीय आध्यात्मिक शिकवणीविषयी चुकीचा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– डॉ. श्रीकांत परळकर, दादर (मुंबई)

व्ही. शांताराम यांचे कार्य गौरवास्पद
‘डॉक्टर तुम्हीसुद्धा!’ हे पत्र (लोकमानस, १२ मार्च) वाचले. पत्रलेखिका शुभा परांजपे यांनी नामांकित कलातपस्वी व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शन तत्सम कला प्रावीण्याविषयी व्यक्त केलेल्या मतांबद्दल नवल वाटले. डॉ. श्रीराम लागू यांना कोणाबद्दल आदर वाटावा हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. व्ही. शांताराम यांचे दिग्दर्शन पत्रलेखिकेस उच्च न वाटण्याचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे; पण त्याबद्दल डॉक्टरांना असे जाहीरपणे विचारणे म्हणजे जरा अति वाटले. व्ही. शांताराम यांचे दिग्दर्शन बाळबोध म्हणून केलेला उल्लेख हास्यास्पद वाटतो. व्ही. शांताराम यांची थोरवी किंवा मराठी चित्रपट क्षेत्रातील त्यांचे योगदान नक्कीच गौरवास्पद व देशाला/महाराष्ट्राला भूषणावह आहे. व्ही. शांताराम यांची यत्ता फार वरची नव्हती, असे केलेले विधान वाचून परांजपेबाईंनी स्वत:ची यत्ता दाखवून दिली, एवढे मात्र खरे.
– संदीप पेंढरकर

संतापजनक टिप्पणी
‘डॉक्टर तुम्हीसुद्धा!’ या पत्रातील (लोकमानस, १२ मार्च) व्ही. शांताराम यांच्याविषयीची टिप्पणी अत्यंत हास्यापद आणि संतापजनक वाटली. त्यांच्या चित्रपटांमध्ये कलात्मकता आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख मेळ असायचा. ‘नवरंग’ हे त्याचे उत्तम उदाहरण. दिग्दर्शक म्हणून सामाजिक विषयांबरोबरच शांताराम हे कॅमेऱ्यासाठी ट्रॉली वापरणारे पहिले दिग्दर्शक होते.मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी पहिलावाहिला रंगीत चित्रपट ‘सरंध्री’ (१९३३) दिला. बॅक प्रोजेक्शनचा वापर करणारे ते पहिले दिग्दर्शक होते. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शहरातून एका महिला वाचकाकडून अशी टिप्पणी येणे यासारखे दुसरे दुर्दैव नाही.
– प्राजक्ता एकबोटे, मुंबई</strong>

डॉ. लागू यांचे वक्तव्य आश्चर्यजनक
डॉ. श्रीराम लागू यांचे स्व. व्ही. शांताराम यांच्यावरील नुकतेच केलेले भाष्य व त्यावरील शुभा परांजपे यांची प्रतिक्रिया (लोकमानस, १२ मार्च) वाचली. डॉ. लागू यांना स्व. व्ही. शांताराम पाया पडण्यायोग्य वाटावेत याबद्दल कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही, परंतु व्ही. शांताराम  चित्रपट याबाबत डॉ. लागू यांनी त्यांच्या ‘लमाण’ या आत्मचरित्रात जे लिहिले आहे त्याच्याशी त्यांचे आताचे वक्तव्य पूर्ण विसंगत आहे. त्यात लिहिल्याप्रमाणे शांतारामबापूंचे पुत्र व अनंत माने हे डॉ. लागू यांना  काम करण्यासाठी आपणहून विचारावयास आले होते व डॉ. लागूंनी आपल्या बऱ्याच अटी (संहिता आधी वाचणार, सलग काम करणार नाही इ.) त्यांच्याकडून मान्य करवून घेऊन चित्रपट स्वीकारला होता. आपणहून चित्रपटात काम द्या, असे डॉ. लागूंनी म्हटल्याचे वा व्ही. शांतारामांची व त्यांची आधी मुलाखत झाल्याचा कुठलाही उल्लेख ‘लमाण’मध्ये नाही.  चित्रपटाचा दर्जा, व्ही. शांताराम यांचे दिग्दर्शन याविषयीची ‘लमाण’मध्ये मांडलेली डॉ. लागूंची मते ही फारशी सकारात्मक नाहीत. या पाश्र्वभूमीवर डॉ. लागूंचे अलीकडचे वक्तव्य आश्चर्यजनक वाटते.
– राजेंद्र करंबेळकर, पुणे</strong>

आधार कार्डासाठी कॅमेरे तरी चांगले वापरा!
आधार कार्डाला वैधानिक दर्जा मिळाला, हे वाचून (लोकसत्ता, १२ मार्च) समाधान वाटले. आधार कार्ड काढते वेळी, जन्मतारखेचा पुरावा मागितला होता आणि तो पडताळूनही बघितला होता. तशी नोंदही आधार कार्ड घेण्यासाठी केलेल्या अर्जावर केली आहे; पण आधार कार्डावर जन्मतारीख लिहिलेली नाही. म्हणून जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधार कार्ड चालत नाही. दुसरा पुरावा द्यावा लागतो. आधार कार्डावरील फोटोसाठी चांगले कॅमेरे वापरावयास हवे होते. कार्डावरचा फोटो, आपण यांना पाहिलंत का? या प्रकारातील वाटतो. आपण अणुबॉम्बची चाचणी घेतली, मंगळयान पाठविले, पण आधार कार्डासारखा महत्त्वाचा दस्तावेज नीट तऱ्हेने करता आला नाही याची खंत वाटते. यापुढे तरी आधार कार्ड बनवताना चांगले कॅमेरे वापरावेत.
– गजानन वामनाचार्य, घाटकोपर (मुंबई)

विजय मल्या यांनी हेही जाहीर करावे
उद्योगपती विजय मल्या यांनी प्रसारमाध्यमांवर केलेल्या टीकेबाबत एक बातमी वाचनात आली. यात त्यांनी प्रसार माध्यमांतील अनेक प्रमुख व्यक्तींना आपल्या औदार्याचा लाभ झाला असल्याचे आणि त्याचे कागदोपत्री पुरावे असल्याचे गुपित पुन्हा नव्याने जाहीर केले. प्रसार माध्यमातील व्यक्तीबरोबरच ज्या विविध बँकांचे प्रमुख, वित्तीय संस्थांचे अधिकारी, सत्ताधारी आणि अन्य राजकीय मंडळी, आयकर, सीबीआय आदी विविध खात्यांतील कोणत्या लोकांना आपल्या औदार्याचा लाभ झाला तेही मल्या यांनी जाहीर करावे. म्हणजे मग त्यांच्यावर बजावण्यात आलेली लुक आऊट नोटीस का दुर्लक्षित करण्यात आली हेही सर्वसामान्यांना समजेल. आज सर्वच क्षेत्रांमध्ये उपकृतता ही चलनी नाण्यासारखी वापरली जाते. या वापरात सत्यशोधन करणे हे अवघड होऊन बसते आणि हाच सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे.
– रविराज गंधे, गोरेगाव (मुंबई)

Story img Loader