१६ मार्च रोजी राज्यसभेने आधी लोकसभेकडून पारित झालेल्या आधार बिलात पाच सुधारणा करीत विधेयक मंजूर करून लोकसभेकडे परत पाठविले. काही तासांच्या आत लोकसभेने मात्र राज्यसभेने केलेल्या दुरुस्त्या फेटाळून लावत मूळ स्वरूपातील पारित केलेले बिल पुन्हा पास केले. सरकारनेही मखलाशी करत हे विधेयक वित्त बिल म्हणून सादर केले होते. वित्त बिलास राज्यसभा नामंजूर करू शकत नाही. त्यांना सुधारणाही करता येत नाहीत. ते फक्त सुधारणा करण्यासंबंधी लोकसभेला सूचना करू शकतात. या प्रकरणात सरकार व विरोधक या दोघांनीही यानिमित्ताने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना सरकारचा तांत्रिक पराभव केल्याचे समाधान मिळाले असले तरी वरिष्ठ सभागृहाच्या सार्थकतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे व सदनाच्या लौकिकास कमीपणा आला आहे. या अनुषंगाने राज्यसभेचे पहिले अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन् यांनी १६ मे १९५२ रोजी राज्यसभेत भाषणादरम्यान केलेल्या मौलिक उपदेशाची आठवण करून देणे गरजेचे आहे असे वाटते.
त्यांनी असे प्रतिपादन केले की, ‘हे सदन सरकार बनवू शकत नाही आणि पाडूही शकत नाही असे सर्वमान्य मत आहे. यास्तव हे सदन अनावश्यक आहे. पुनर्विचार करण्याच्या काही जबाबदाऱ्या हे सदन चांगल्या प्रकारे पार पाडू शकते. संसद ही केवळ कायदे करण्याची जागा नसून ते विचारमंथनाचेही ठिकाण आहे. विचारमंथनाच्या दृष्टीने आपण काही मोलाची कामगिरी बजावतो की नाही हे आता आपल्यावर अवलंबून आहे. घाईने कायदे करण्यात येऊ नयेत यासाठी दुसरे सदन कसे आवश्यक आहे हे देशाच्या जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न करणे आपल्या हाती आहे. आपल्या समोर आलेल्या विधेयकांची चर्चा वस्तुनिष्ठपणे व भावनेच्या आहारी न जाता करायला हवी. (संदर्भ- भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा, ले.- माधव गोडबोले, पृ.- २००).
घटना समितीने दुसरे सदन प्रशासनासाठी लोढणे होऊ शकते का? अशी भीती व्यक्त केली होती. घटनाकारांनी राज्याच्या हिताचे रक्षण करण्यास्तव राज्यसभेचा विचार केला होता. भारताची घटना पूर्णपणे संघराज्यासारखी नसली तरी राज्याच्या हितांचे रक्षण व्हावे यासाठीच वरिष्ठ सदनाची निर्मिती केली होती. सध्या राज्यसभेचे कामकाज ज्या पद्धतीने सुरू आहे त्यावरून घटनाकारांना अभिप्रेत असलेली उद्दिष्टपूर्ती होत आहे का? याबाबत शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. सदन चालविण्याचा रोजचा खर्च सहा ते सात कोटी आहे असे सांगितले जाते. यामुळे वरिष्ठ सदनाचा उपयोग एकमेकांवर कुरघोडी करण्यात व हिशोब चुकते करण्यात होत असेल तर अशा सदनाच्या सार्थकतेविषयी गंभीर विचारमंथन होणे आवश्यक आहे असे वाटते.
– सतीश भा. मराठे, नागपूर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा