‘वृत्ती आणि पुनरावृत्ती’ हे शनिवारचे संपादकीय (२ एप्रिल) भारतीय क्रिकेटप्रेमींच्या तसेच भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापन व भारतीय क्रिकेट निवड समितीच्या विपरीत मानसिकतेची यथायोग्य चिरफाड करणारे आहे. ट्वेंटी-२० क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून सपाटून मार खाण्यापूर्वी आधीच्या चारही सामन्यांत भारतीय संघाची कामगिरी यथातथाच होती. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून हार पत्करल्यानंतर साखळीतील पाकिस्तान, बांगलादेश व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रत्येक सामन्यात अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत भारतीय संघ हरता हरता जिंकला. बांगलादेशसारख्या कच्च्या िलबूने तर तोंडचे पाणी पळवले होते. रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना हे तिघे तर संघात असूनसुद्धा नसल्यासारखे होते. धोनीची मदानावरची अगम्य रणनीती कधी कधी कामाला यायची; पण रोज दिवाळी नसते या न्यायाने उपांत्य फेरीत वेस्ट इंडिज संघाने जोरदार दणका देऊन भारतीय संघाचे पितळ उघडे पाडले. वास्तविक पाहता आपल्या देशात क्रिकेट हा खेळ नसून ‘धर्म’ असल्याने गुणवान खेळाडूंची कमतरता नाही. जगभरातील क्रिकेट खेळणाऱ्या मोजक्याच देशांत क्रिकेट हा खेळ पाच दिवसांचे कसोटी सामने, ५० षटकांचे एकदिवसीय सामने व २० षटकांचे ट्वेंटी-२० सामने अशा तीन प्रकारांत खेळला जातो. या तीनही प्रकारासाठी इतर देश खेळाडूंच्या गुणवत्तेप्रमाणे कर्णधारासहित आपला वेगवेगळा संघ निवडतात. आपल्याकडे मात्र अनेक खेळाडूंना संधीच दिली जात नाही. रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा हे खेळाडू सर्वच संघात असणार. त्यामुळे संघ व्यवस्थापनाच्या व निवड समितीच्या कार्यशैलीमुळे यापुढेही भारतीय क्रिकेट संघ काही चमत्कार करील असे वाटत नाही. खंत याची आहे की, घरच्या मदानावर खेळताना ट्वेंटी-२० क्रिकेट विश्वचषक जिंकण्याची हाती आलेली संधी भारतीय संघाने घालविली.
– प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा