राज्यामध्ये दुष्काळाचे भीषण संकट असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी पाण्याचा अपव्यय करणे पूर्णत: चुकीचे आहे. खेळाच्या एका मदानाला साधारण ४० लाख लिटर पाणी लागते. अनेक जिल्ह्य़ांत आठ-पंधरा दिवसांतून एकदाच नळाचे पाणी मिळत आहे. अशा परिस्थितीत याच पाण्यात कित्येक लोकांची तहान भागू शकते. दुष्काळात पाण्याशी ‘खेळ’ कशाला?
आयपीएल सामने जास्त महत्त्वाचे आहेत की माणसे जगवणे? आयपीएल हे मनोरंजनासाठी आहे तर पाणी हे जीवन आहे, जीवनापेक्षा मनोरंजन महत्त्वाचे आहे का? आयपीएलला विरोध नाही, पण लोकांना पाणी मिळणे जास्त महत्त्वाचे आहे. आयपीएलचे सामने मुबलक पाणी असलेल्या राज्यांत घ्यावेत वा त्याचे वेळापत्रक बदलून ते मुबलक पाणी असताना भरवावेत. आयपीएलमधून सरकारला पसा मिळतोय म्हणून ते बघ्याची भूमिका घेताना दिसतात. आयपीएलमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांच्या तिकिटातून जेवढा पसा येईल त्यातील ४० टक्के दुष्काळग्रस्तांना द्यावा. म्हणजे दुष्काळी भागातील लोकांना मदतसुद्धा मिळेल आणि क्रिकेटवेडय़ा लोकांचे मनोरंजनसुद्धा होईल.
– अशोक बाळकृष्ण हासे, सागांव, डोंबिवली (पूर्व)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

ही घराणेशाहीच ना?
महानंदच्या अध्यक्षपदी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी यांची निवड झाल्याची बातमी (८ एप्रिल) वाचली. विरोधी पक्षात असताना भाजप नेते कॉँग्रेस नेत्यांविरुद्ध घराणेशाहीबद्दल बोंब ठोकायचे. मग आता तुम्ही सत्तेत आल्यावर तुम्हाला त्याची लागण झाली असे म्हणायचे काय? मंदाकिनी खडसे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याचे वाचनात नाही. दुग्ध व्यवसायाबद्दल त्यांना कितपत ज्ञान आहे हे माहीत नाही. अर्थात सध्या सर्वपक्षीय राजकारणात तशी पात्रता आवश्यक असते असे सत्ताधारी मानतही नाहीत. या नेमणुकीचा असाही अर्थ होतो की, भाजपमध्ये अनेक वष्रे सामाजिक व राजकीय क्षेत्रात योगदान दिलेले कोणीही कार्यकत्रे पात्र नव्हते, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना घराणेशाहीचा आसरा घ्यावा लागला.
– सुधीर ब. देशपांडे, विलेपाल्रे (मुंबई)

 

 

परदेशी संघाला पाठिंबा असू शकत नाही?
‘अंगाशी येईल..’ हा अग्रलेख (८ एप्रिल) वाचला. संपादकांच्या म्हणण्यानुसार काही काश्मिरींनी भारताच्या पराभवाचे स्वागत केले आणि तो मूर्खपणा असून देशाच्या संघाचे अहित चिंतने म्हणजे देशाचे अहित चिंतने अशी सरळ भावना व्यक्त केली आहे. ही टोकाची भावना आहे किंवा कट्टर राष्ट्रवादी जे विचार सध्या हवेत निर्माण झाले आहेत त्याचाच परिणाम अशा भावना निर्माण होण्यावर झाला आहे असे वाटते. क्रिकेट हा खेळ आहे आणि त्यात कुणाचा जय वा पराजय अटळ आहे. आता आपल्या देशाचा संघ पराजित व्हावा अशी कोणाची भावना असेल तर त्यास केवळ विघ्नसंतोषी भावना समजणे ठीक, पण ती भावना लगेच देशविरोधी ठरते काय? वेगवेगळ्या देशांचे संघ वा त्यातील चमकदार खेळाडू आपल्या कामगिरीने लोकांची मने जिंकून घेतात. त्यातून क्रिकेट रसिक त्यांना उत्स्फूर्त दाद देतात. वेस्ट इंडिजचा संघ ज्या प्रकारे खेळला त्याला दाद मिळणे साहजिकच. डिव्हिलिअर्स मदानात येतो तेव्हा जास्त दाद भारतीयांकडूनच मिळवून जातो. ऑस्ट्रेलिया संघाचेही २००० ते २००७ या काळात भारतीय चाहते काय कमी होते? तोच संघ जिंकावा किंवा जिंकणारच अशी किती तरी भारतीयांची भावना असायची. कारण अशी भावना त्या संघाच्या सांघिक कामगिरी व त्यातील वैयक्तिक खेळाडूंच्या कामगिरीने निर्माण झालेली असते. उद्या एखाद्या पुण्याच्या किंवा मुंबईच्या राहिवाशाने आयपीएल सामन्यात बेंगळुरूच्या संघाचे समर्थन केले तर तो महाराष्ट्रविरोधी झाला आणि त्याने मग कर्नाटक राज्याचे रहिवासी व्हावे असा युक्तिवाद तुम्ही करणार काय?
– हृषीकेश संजय कुलकर्णी, राहुरी, जि. अहमदनगर</strong>

 

 

प्रस्तावित भाडेकरू कायद्याचे स्वागत!
केंद्र सरकार सर्व राज्यांसाठी प्रारूप भाडेकरू कायदा आणणार असल्याचे वृत्त (लोकसत्ता, ४ एप्रिल) वाचले. त्यात प्रथमच घरमालकांचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यात आला आहे. मालकाने एकदा जागा भाडय़ाने दिली की ती गेलीच- ज्याला दिली तोच मालक होऊन बसायचा- अशी परिस्थिती यापूर्वीच्या १९४८च्या भाडेकरू कायद्यामुळे निर्माण झाली होती. पण आता या प्रस्तावित कायद्यानुसार भाडेकरूला बाजारभावाप्रमाणे भाडे द्यावे लागेल. दोन महिने भाडे न दिल्यास भाडेकरूला बाहेर काढून जागा मोकळी करून घेण्याचे अधिकारही मालकाला मिळणार आहेत. म्हणजे आता भाडेकरूला ‘पझेशन इज नाईन्टी परसेंट ओनरशिप’चा आनंद उपभोगता येणार नाही. या कायद्यान्वये प्रकरण कोर्टात गेल्यास शहर व दिवाणी न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ पडून कालापव्यय होणार नाही. कारण यासाठी स्वतंत्र ‘भाडेकरू न्यायालय व प्राधिकरण’ असणार आहे. भाडेकरू जुन्या जागेला कुलूप लावून स्वत: नवीन जागा घेऊन अन्यत्र राहतोय हे दृश्य यापुढे दिसणार नाही. मात्र याच वेळी या प्रस्तावित कायद्यामुळे घरमालकांना मिळू शकणारा न्याय राज्य सरकारच्या कुठल्याही संबंधित कायद्यामुळे झाकोळला जाता कामा नये, याची आधीच दक्षता घेणे आवश्यक आहे.
– दिलीप व. कुलकर्णी, पुणे</strong>

 

 

‘बावाबावा’ गोरखचिंच!
कुतूहल सदरामधील गोरखचिंचेबद्दल लिहिलेली माहिती (६ एप्रिल) आवडली. त्याबद्दल एक माहिती हवी आहे. या झाडाचा बुंधा आणि खोड सुरुवातीची काही वष्रे हिरव्या रंगाचे असते का? नंतर ते राखाडी होते का? केनयामध्ये या झाडाला बावाबावा असे गमतीदार नाव ऐकायला आले. आम्ही तेथे जुल महिन्यात हे वृक्ष पाहिले तेव्हा त्यांना पाने अजिबात नव्हती. जणू वठलेला वृक्ष असावा अशी त्यांची अवस्था होती. इंदूरजवळ मांडवगडला (मांडू ) पूर्ण वाढ झालेली उंच आणि जाड बुंध्याची ही झाडे खूप दिसतात. आपल्याकडे सातारा जिल्ह्य़ातील वाईजवळील मेणवली गावातील कृष्णा नदीच्या घाटावर एक प्राचीन म्हणावा असा गोरखचिंचेचा वृक्ष दिसतो. नाना फडणवीसांच्या वाडय़ाजवळ असलेले अतिप्रचंड जाड बुंध्याचे हे विचित्र झाड लक्ष वेधून घेते. स्थानिक नागरिकही पर्यटकांना हे झाड अवश्य दाखवितात.
– डॉ. कैलास कमोद, नाशिक

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers letters