गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात प्लास्टिकबंदी लागू झाली. सुरुवातीचे काही दिवस त्याचा खूप गाजावाजा झाला. दुकानदार, फेरीवाले आदींनी प्लास्टिकच्या पिशव्या देणे बंद केले. ग्राहकदेखील कापडी पिशव्या घेऊन जाऊ लागले. पण आता प्लास्टिकबंदीला वर्ष उलटल्यावर बहुतांश ठिकाणी परिस्थिती जैसे थे होऊ लागली आहे. सर्वत्र प्लास्टिकच्या पिशव्या सर्रास दिल्या जातात. दूध डेअऱ्यांमध्येही प्लास्टिक पिशव्यांमध्ये दूध देणे सुरू आहे. पिशव्यांवर जर बंदी असेल तर या पिशव्या विक्रेत्यांकडे येतात कुठून? ग्राहक मागणी करत असल्याने आम्ही त्या देतो, असे विक्रेत्यांचे म्हणणे असते. दंडाची रक्कम भरावी लागू नये म्हणून काही काळ पिशव्यांचा वापर थांबवला होता. केवळ दंडासाठी म्हणून नव्हे, तर पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या स्वत:हूनच वापरू नये हे ग्राहकांना केव्हा समजणार? दंड आणि कडक कारवाई केल्याशिवाय हा वापर थांबणार नाही. त्यामुळे राज्य सरकार आणि महापालिकेने कठोर कारवाई सुरूच ठेवायला हवी.
– रघुनाथ कदम, कांदिवली (मुंबई)
व्याजदर कमी करण्याला मर्यादा
‘पत आणि मत’ या अग्रलेख वाचला. मागच्या पतधोरणाच्या वेळी पण रिझव्र्ह बँकेने व्याजदर ०.२५%ने कमी केले तरी १० वर्षांच्या सरकारी रोख्यांमध्ये फारसा फरक पडला नाही. याउलट सगळ्यात लक्षात घेण्याजोगी बाब ही आहे की, व्याजदर कमी होऊनही खासगी कंपन्यांचे रोखे आणि सरकारी रोखे यातला फरक वाढत आहे. याचा अर्थ सरळ आहे की, खासगी कंपन्यांना उद्योग विस्तारासाठी रोख्यांद्वारे पसा उभारणी करणे अधिकाधिक महाग होत आहे. या सगळ्यांमध्ये एनबीएफसी-पतपुरवठा करणाऱ्या बँकेत संस्थांचा पैसे उभारणीसाठीचा खर्च जास्त वाढला आहे . बँकांच्या बाबतीत जोपर्यंत ठेवींवरच्या व्याजाचे दर खाली येत नाही तोपर्यंत कर्जावरचे दर कमी होणं अशक्य आहे आणि ठेवींवरील दर कमी करणं बाजारातल्या स्पर्धेमुळे तितके सोपे नाही. दुसरे म्हणजे व्याजदर कमी करण्याला मर्यादा आहेत. मध्यवर्ती बँकेचा नॉमिनल टाग्रेटेड रेट (रेपोरेट) हा रिअल इंटरेस्ट रेट अधिक संभाव्य चलनवाढ यांनी मिळून बनतो. संभाव्य चलनवाढ ४% गृहीत धरली आहे. रिअल इंटरेस्ट रेट जर कमीत कमी १.५ असेल तर व्याजदर फारफार तर ५.५% (सध्याच्या ६% वरून) पर्यंत खाली आणता येतील.
– सुधीर कुळये, मुंबई
राजन यांच्याबद्दलची टिप्पणी अयोग्य
‘पत आणि मत’ या अग्रलेखात डॉ. रघुराम राजन यांच्याबद्दल केलेली टिप्पणी योग्य नाही आणि त्यांचे गव्हर्नर असतानाच्या कामाचे सरळ अवमूल्यन आणि अनादर आहे. त्यांनी पदावर असताना त्यांचे कर्तव्य केले आणि पद सोडल्यावर आपल्या विद्वत्तेचा उपयोग आणि आपल्या सेवा कोणाला द्यायचा हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक मामला आहे. हुकूमशाही अमलाखाली काम केल्यावर, त्याचा भविष्यातला भारतासाठी असलेला धोका टाळण्यासाठी एखादी योजना बनवायला जर ते काँग्रेसला मदत करत असतील तर ते अयोग्य नक्कीच नाही. पद सोडल्यानंतर त्यांचे हे कृत्य पदावर असताना जोडले जाणे हे मोदीसेना ज्या प्रकारे त्यांच्या विरोधकांना आधी काँग्रेसचे आणि नंतर ओघाने पाकिस्तानसमर्थक ठरवते, तसेच म्हणावे लागेल. हे त्यांची विद्वत्ता आणि पदाचे अवमूल्यन ठरते.
– मिलिंद जोशी, मुंबई
एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेत उल्लेख होताच..
‘एमपीएससी परीक्षेतील पर्याय नसलेले प्रश्न रद्द करण्याची मागणी’ ही बातमी (४ एप्रिल) वाचली. संयुक्त पूर्व परीक्षेत मराठी माध्यमातील प्रश्नांना पर्यायच देण्यात आले नव्हते, हा उमेदवारांचा आक्षेप आहे. एमपीएससीने आतापर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये दोन्ही भाषांमध्ये (मराठी/ इंग्रजी ) स्वतंत्ररीत्या प्रश्न/ पर्याय अधोरेखित केले होते. पण २४ मार्च रोजी झालेल्या परीक्षेमध्ये थोडा बदल जाणवला. ज्या आठ मराठी माध्यमातील प्रश्नांना पर्याय नाहीत त्या आठ प्रश्नांना आयोगाने दोन्ही भाषांतील प्रश्नांसाठी एकत्रित असे ‘पर्यायी उत्तरे/ answers options असे ठळकरीत्या नमूद केले आहे.
– राहुल धनवडे, लोणी (स.) आष्टी (बीड)
विधेयकाची प्रत फाडून कुणाचा आदर केला?
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, ‘मी हिंदू धर्मग्रंथांचे वाचन केले आहे. पण त्यात कुठे गुरूचा अपमान करा, असे सांगितल्याचे आढळले नाही. पंतप्रधान मोदींनी त्यांचे गुरू लालकृष्ण अडवाणींचा अपमान केला आहे.’ जेव्हा मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते त्या काळात संसदेने मंजूर केलेले विधेयक राहुल गांधी यांनी संसदेबाहेर काँग्रेस खासदारांच्या सभेत टराटरा फाडले होते व त्याबद्दलची आपली नापसंती व्यक्त केली होती. मला वाटते त्या वेळी आपल्या पक्षाच्या पंतप्रधानांना ते गुरुस्थानी मानत नसावेत किंवा त्यापूर्वी त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचे वाचन केले नसावे. गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी हिंदू धर्मग्रंथ वाचन चालू केले असावे. मोदी यांनी मात्र हिंदूंची सहिष्णुता शिकण्याची गरज आहे.
– माधव ल. बिवलकर, गिरगाव (मुंबई)
सुसंबद्ध स्मृतींची माळ जागवणारा संयोग
‘कुतूहल’ सदरातील ‘जुगारामागचे गणित’ हा लेख (४ एप्रिल) वाचताना सुप्रसिद्ध गेम थिअरीची आठवण होत होती. त्यातच व्यक्तिवेध सदरात ‘आबेल’ पुरस्कार मिळविणाऱ्या कॅरेन उलेनबेक यांची महती वाचायला मिळाली. विख्यात गणिती जॉन नॅश यांची आठवण होण्याकरता नंतर मेंदूला काहीच कष्ट घ्यावे लागले नाहीत. गेम थिअरीमधील जॉन नॅश यांचे योगदान वादातीत आहे. (गणितातील संशोधनासाठी) आबेल आणि (अर्थशास्त्रातील योगदानासाठी) नोबेल हे दोन्ही पुरस्कार मिळवणारे तर ते एकमेव संशोधक आहेत. जॉन नॅश यांच्याविषयीचे संदर्भ तपासत असताना त्यांचे एक प्रसिद्ध वचन आंतरजालावर आढळले. ‘‘Classes will dull your mind, destroy the potential for authentic creativity…’’ बुधवारच्या ‘मेंदूशी मत्री’मध्ये डॉ. श्रुती पानसे यांचाही रोख नेमका यावरच होता! अर्थाअर्थी एकमेकांशी संबंध नसणाऱ्या आणि तरीही सुसंबद्ध स्मृतींची माळ जागवणाऱ्या या संयोगाने मनाला आगळेच समाधान लाभले.
– मनीषा जोशी, कल्याण</strong>