‘महाराष्ट्र भाजपमध्ये ब्राह्मण नेतृत्व अडगळीत’ हा वृत्तान्त (लोकसत्ता – ३१ मे) वाचला. राजकारणात ब्राह्मण कार्यकर्ता हा बहुधा अभ्यासू, अल्पसंतुष्ट, कर्तृत्ववान आणि प्रामाणिक असतो. त्याचा हा गुण त्याच्यासाठी शापसुद्धा ठरतो, कारण व्यावसायिक राजकारण्यांना हा गतिरोधक वाटतो. राजकीय संघटनेत कुठल्याही विचाराचा – मग तो कॉम्रेड असो किंवा समाजवादी अथवा काँग्रेसी ब्राह्मण असो – ब्राह्मणेतर त्याला भाजपचा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समजतात, आणि तसे ठरविण्यासाठी सुप्तपणे धडपड करीत असतात. त्यामुळे पक्ष नेतृत्वात फक्त गरजेपुरती त्याची किंमत असते.
काँग्रेसचा इतिहास पाहिल्यास काँग्रेस शिखरावर शाश्वत पदस्थ करण्याकरिता ब्राह्मणांचा पुढाकार आणि त्यानंतर काँग्रेसमधून ब्राह्मणांची होत असलेली हळूहळू गच्छंती १९७० दशकापर्यंत दिसते. परिणामी संपूर्ण देशात काँग्रेसमध्ये बोटांवर मोजण्याएवढे ब्राह्मण नेतृत्व शिल्लक राहिले. देशातून काँग्रेस नामशेष होत असताना काँग्रेसची जागा भाजप घेत असल्याने, भाजपमध्ये हीच परिस्थिती आगामी काळात निर्माण होणार आहे. सत्तेच्या राजकारणात ‘व्होट बँके’ला किंमत असते. जी ब्राह्मणांजवळ नाही. वैचारिकता केवळ बोलायची असते. जी ब्राह्मणांजवळ भरभरून आहे. वृत्तांतमध्ये भाजपमधील ब्राह्मण शिलेदारांचा उल्लेख आहे. परंतु संघाच्या प्रत्येक शाखेत नम्र व अभ्यासू तसेच तेवढाच कट्टर कार्यकर्ता हा ब्राह्मणच असतो. ग्रामीण महाराष्ट्रात अनेक ब्राह्मणांनी भाजपकरिता खस्ता खाल्ल्या. परंतु पक्षाने त्यांची आजपर्यंत कधीही दखलसुद्धा घेतलेली नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यात गेल्यावर आढळेल की, तेथील भाजप शाखेच्या मूळ प्रवर्तकात किमान एक ब्राह्मण होताच. हे महत्त्व हळूहळू ओसरले, सत्ता टिकवायची तर वेगाने ओसरतच जाणार.
त्यामुळे ब्राह्मण युवकांनी वेळीच जागृत होऊन डोक्यातील हिंदूत्वाची हवा काढून टाकावी, ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ हा ब्राह्मणांचा मंत्र असल्याच्या – सुसंस्कृतपणा प्रचाराच्या ठेकेदारीला तिलांजली देऊन आर्थिक सक्षमतेकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. वर्तमान राजकारणात एक तर संख्या हवी अथवा पैसा हवा. संख्यावाढीसाठीसुद्धा पैसा हवा. त्यामुळे पैसा सदाचारी मार्गाने कमविणे कधीही उत्तम. ब्राह्मणांनी वर्तमानात जगणे शिकले पाहिजे.
– सचिन कुळकर्णी , मंगरूळपीर (जि. वाशीम)
संघातील ब्राह्मण ‘गरज सरो..’ स्थितीत?
‘महाराष्ट्र भाजपमध्ये ब्राह्मण नेतृत्व अडगळीत’ ही बातमी (लोकसत्ता – ३१ मे) वाचली. याचा अर्थ स्पष्ट आहे की या पक्षाने २०२४ ची निवडणूक ब्राह्मणेतर समाजाला प्राध्यान्य देऊन लढवून बहुमतात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार ब्राह्मण नेतृत्वाने करणे गरजेचे आहे.
त्यातही, रा. स्व. संघाने हा विचार करणे अधिकच गरजेचे आहे कारण ही संस्था आजही ९० टक्के ब्राह्मणी समजली जाते. मात्र सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले आहे की ब्राह्मण मतदान नगण्यच असते. म्हणजे हा समाज काय तर ‘गरज सरो वैद्य मरो’ अशा स्थितीत आला आहे काय, यावर विचार करण्यात यावा.
– राम देशपांडे, नवी मुंबई
तोवर ‘आयडीबीआय’ निर्गुतवणूक मृगजळच
‘लक्ष्यपूर्तीची तूट’ हा अग्रलेख (३१ मे) वाचला. परदेशात मेळावे घेऊन गुंतवणूकदार शोधण्याचा हा काही पहिला प्रयत्न नाही. २०१५ पासून आयडीबीआय व्यवस्थापनाच्या पातळीवर असे प्रयत्न सुरू होतेच. आता सरकारने पुढाकार घेतला आहे हाच काय तो फरक. मुळात आयडीबीआयवर ही वेळ आली यात मोठा दोष तत्कालीन सरकारचा आहे.
देशाचा औद्योगिक विकास साधण्यासाठी ही बँक स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे या बँकेने हजारो कोटींची औद्योगिक कर्जे दिली होती ती सरकारी भांडवलाच्या जोरावर. सरकारला हे ओझे पेलवेनासे झाल्यावर या बँकेला इतर व्यापारी बँकांच्या पंक्तीत बसवण्यात आले. इतर बँकांसारखीच उद्दिष्टे या बँकेसाठी ठरवण्यात आली. पहिली काही वर्षे सूट दिली तरी अग्रक्रम क्षेत्राचे ४० टक्क्यांचे उद्दिष्ट गाठणे या बँकेसाठी शिवधनुष्य उचलण्याएवढे अवघड होते, कारण दीर्घ मुदतीच्या कोटय़वधी रुपयांच्या कर्जाचे प्रमाण प्रचंड होते. तरीही रिझव्र्ह बँकेच्या दबावाखाली अग्रक्रम क्षेत्राचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेकडो कोटींची कर्जे अक्षरश: वाटण्यात आली. यात नियमबाह्य कर्जे दिली गेली, कारण अशी कर्जे देण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान वा तज्ज्ञता यांचा बँकेकडे अभावच होता, असे आता म्हणावे लागते. २००७ ते २०१४ या काळात अशा कर्जाची खैरात केली गेली. यात राजकीय हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणात असणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हीच कर्जे व इतर औद्योगिक कर्जे मुख्यत: बुडीत खाती गेली (आयडीबीआय बँकेने कर्जे हेतुत: बुडवणाऱ्या ३२४ जणांची यादी ३० एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध केली असून ती https://www.idbibank.in/pdf/WillfulDefaulters.xlsx या दुव्यावर मिळेल, तीत विजय मल्ल्या यांचे नाव २९ वे आहे).
ही कर्जे निर्लेखित करता करता बँक काही वर्षे सलग तोटय़ात होती. आता बँक परत कात टाकून नफा मिळवू लागली आहे. सरकारचे नियंत्रण कमी करून पूर्णत: व्यावसायिक पद्धतीने बँक चालवण्याचे स्वातंत्र्य दिल्यास ती सक्षम होऊ शकेल व गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकेल. अन्यथा या बँकेचे निर्गुतवणुकीकरण हे सरकारसाठी मृगजळच ठरेल यात शंका नाही.
– रघुनंदन भागवत, पुणे
मोदींच्या प्रभावाने भारावलेली जनता!
‘अष्टावधानी कारकीर्द’ हा डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचा, पंतप्रधान मोदी यांच्या आठ वर्षांतील फक्त आठ उपक्रमांचा घेतलेला मागोवा वाचला. खरे म्हणजे मोदींच्या कार्यशैलीच्या करिष्म्याविषयी वाचायला मिळेल हे अपेक्षित होते. कारण ‘एखादी गोष्ट करायची ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत, त्यांची धोके पत्करायची तयारी असते, कोणत्याही गोष्टीत त्यांचे वैयक्तिक हितसंबंध अजिबात नसतात,’ हे डॉ. सहस्रबुद्धे यांनीच मांडलेले पंतप्रधान मोदींविषयींचे मत (‘लोकप्रभा’- जून २०१७) शंभर टक्के पटत चालले आहे.
हिंदूत्व व विकास यांची तारेवरची कसरत त्यांना सांभाळणे जमते का, हे बघायचे आहे. मोदींच्या प्रभावाने भारावलेली जनता गेल्या आठ वर्षांत प्रथमच निदर्शनास येते. अर्थकारण, समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक जीवन ढवळून निघत असताना भाजपचा प्रभाव कायम आहे कारण मार्केटिंग तंत्र, इव्हेंट तंत्र, मीडिया व्यवस्थापनाचे तंत्र आणि यात जनतेला सहभागी करून घेण्याची हातोटी! त्यातच विरोधकांचा कमालीचा कमकुवतपणा.. त्यामुळे, विरोधाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे मोदींना सहज शक्य होत आहे.
– श्रीनिवास स. डोंगरे, दादर (मुंबई)
र. धों. कर्वेही पुरुषप्रधान संस्कृतीचे पाईक?
पुण्यात ३० मे रोजी ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’च्या वतीने र. धों. कर्वे यांच्याविषयीच्या संकेतस्थळाचे विमोचन झाल्याचे वृत्त वाचले. या निमित्ताने ‘समाजस्वास्थ्य’चे अंक उपलब्ध होत आहेत, ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. काळाच्या पुढे विचार करणारा विचारवंत म्हणून कर्वे यांचे योगदान आपण विसरू शकत नाही. पण मला राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते म्हणजे लैंगिक स्वातंत्र्याचा जयघोष करत त्यांनी मुखपृष्ठावर बिनदिक्कतपणे नग्न स्त्रियांची चित्रे छापली, पण लैंगिक सुखाचा हक्क स्त्रियांनासुद्धा आहे, असे म्हणणारे कर्वे नग्न पुरुषांची चित्रे मुखपृष्ठावर छापायला का कचरले? स्त्रियांना आपले वाचक करून घेण्याची नामी संधी त्यांना घेता आली असती. का तेही पुरुषप्रधान संस्कृतीचे पाईक होते?
– गार्गी बनहट्टी, दादर (मुंबई)
मुली फक्त स्वयंपाक करण्यासाठी नाहीत!
‘यूपीएससीत मुली अव्वल!’ ही बातमी (३१ मे) वाचली. मुली नेहमीच आपले कर्तृत्व सिद्ध करत आल्या आहेत. त्या कर्तृत्ववान आहेत, यात वादच नाही. आजची ही बातमी वाचून काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना उद्देशून ‘जा घरी जाऊन स्वयंपाक करा,’ असे म्हटल्याची आठवण झाली. आता दिवस बदलताहेत, त्यामुळे महिलांबद्दल बोलताना विचार करावा. नंतर दिलगिरी व्यक्त केली तरी त्यास अर्थ उरत नाही.
– राजाराम चव्हाण, कल्याण
मृत्यूची अफवा माओंबद्दलही होती..
‘रशियाचे सर्वेसर्वा एकाधिकारशहा व्लादिमिर पुतिन यांचा रक्ताच्या कर्करोगाने मृत्यू’ झाल्याचे वृत्त ‘एम आय ६’ या ब्रिटिश सैनिकी गुप्तचर संस्थेने पसरविलेले आहे. त्यांच्या मते, सध्या जे पुतिन म्हणून दाखविले जात आहेत तो प्रत्यक्षात एक समरूपी तोतया आहे!’ अशा अर्थाची बातमी ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर वाचली. या संदर्भात आठवण होते ती काही वर्षांपूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेची.
त्या वेळेस चीनचे पक्षप्रमुख माओ झे डाँग हे म्हणे केव्हाच ‘मृत’ झालेले होते, आणि त्यांच्याऐवजी अभ्यागतांची भेट घेणारे हे त्यांचे तोतये होते, अशी अफवा जगभर पसरली होती. परंतु याला माओंना तीन वेळा भेटणारे एकमेव पाश्चात्त्य पत्रकार एडगर स्नो यांच्याकडून मात्र काही दुजोरा मिळाला नव्हता. पुढे, हे एडगर स्नो जेव्हा गंभीररीत्या आजारी पडले तेव्हा माओंनी त्यांच्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक डॉक्टरांचे एक पथक उपचारांसाठी पाठवले! स्नो यांच्या स्मृती जपणाऱ्या ‘एडगरस्नोफाउंडेशन.ऑर्ग’ या संकेतस्थळावरही हा उल्लेख आहे.
– अरुण मालणकर, कालिना (मुंबई)