आणखी सहा महिन्यांनी देश स्वतंत्र होऊन उणीपुरी सत्तर वष्रे पुरी होतील. सत्तर वर्षांनंतरही आमची मानसिकता अजून इंग्रजांचे गुलाम असल्यासारखी असल्याचा एक प्रसंग सोमवारी अनुभवण्यास मिळाला. इंग्रजांच्या हॉटेलात एका भारतीयाला प्रवेश नाकारल्याने ज्या ताजमहाल हॉटेलची निर्मिती सर दोराबजी टाटांनी केली त्या हॉटेलातील हा प्रसंग. बँकिंग उद्योगात क्रांती ठरावी, अशी एक सेवा रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या हस्ते व नंदन नीलेकणी हे प्रमुख पाहुणे असलेल्या समारंभात राष्ट्राला अपर्ण केली गेली. या समारंभासाठी किमान दोन डझन राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापकीय संचालक कार्यकारी संचालक उपस्थित होते. मुंबईच्या दौऱ्यावर असलेले इंग्लंडचे शाही जोडपे याच हॉटेलात मुक्कामाला होते. हॉटेलच्या आजूबाजूला असलेली सुरक्षाव्यवस्था जास्तच कडक होती. जिन्यावर येणाऱ्या व्यक्तींची छबी वरच्या मजल्यावरून जिन्याच्या दोन्ही अंगांनी प्रेक्षक आपल्या मोबाइलमध्ये कैद करण्याच्या तयारीत होते. कदाचित गव्हर्नर राजन यांचे आगमन थोडय़ाच वेळेत होणार असल्याने हे घडत असावे असे वाटले. परंतु भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला. ही सर्व लगबग शाही दाम्पत्याची छबी टिपण्यासाठी होती. हॉटेलातील देशी व परदेशी पाहुण्यात जणू स्पर्धा लागली होती. इतक्याच गव्हर्नर राजन यांचे आगमन व शाही जोडप्याने हॉटेल सोडणे एकाच वेळी घडले. गव्हर्नर राजन जिन्यावरून वर येणार इतक्यात सुरक्षारक्षकाने त्यांना अडवले व जिना बंद असल्याचे सांगून दुसऱ्या रस्त्याने जाण्यास सांगितले. हॉटेलचा कर्मचाऱ्यांचा लवाजमा, साध्या वेशातील पोलीस हे शाही जोडप्यास निरोप देण्यास दरवाजापर्यंत आले असताना राजन यांची कोंडी झाली. रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरचे पद हे राज शिष्टाचारात केंद्रीय सचिव दर्जाचे पद आहे, याचा उपस्थितांना कदाचित विसर पडला असावा. शाही जोडपे निघून गेल्यावर राजन यांना दुसऱ्या रस्त्याने समारंभास्थळी आणण्यात आले. अतिथी देवो भव हे मान्य करूनही गव्हर्नरांचा योग्य मान न राखला गेल्याने मन विषण्ण झाले. इंग्रज देश सोडून सत्तर वर्षांनंतर आमची मानसिकता ही स्वत:ला गुलाम समजण्याची वृत्तीची कशी याचा ऊहापोह करण्याची वेळ आली आहे. व हीच वृत्ती राहिली तर आपला देश २०२० पर्यंत महासत्ता होण्याच्या नुसत्या तोंडाच्या वाफा दवडणार का हाही प्रश्न पडला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा