‘दुभंग दिलासा’ हा अग्रलेख (८ नोव्हें.) वाचला. अमेरिकन लोकप्रतिनिधिगृहाच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने बहुमतापर्यंत मारलेली मजल अध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी एक चपराक म्हणावी लागेल. जेमतेम दोन वर्षांच्या कालावधीतच ट्रम्प यांना तेथील जनता किती कंटाळली आहे याचे हा निकाल म्हणजे द्योतक म्हणावा लागेल.
सेनेट आणि लोकप्रतिनिधी सभागृह म्हणजे अमेरिकी अध्यक्षांच्या दोन नाकपुडय़ा आहेत. आता ट्रम्प यांची एक नाकपुडी बंद झाली आहे. त्यामुळे त्यांना बेधुंद निर्णयाचे श्वास घ्यायला नक्कीच अडचणी येतील. याबद्दल अमेरिकन जनतेचे आभारच मानले पाहिजेत. अनिर्बंध सत्ता उपभोगत असताना काही निर्बंध आपले आपणच घालून घ्यायचे असतात याचे भानच जणू ट्रम्प हरवून बसले आहेत असेच त्यांच्या एकंदर कारकीर्दीवरून दिसून येते. इराणवरील आर्थिक निर्बंध असो, ‘ओन्ली अमेरिकन्स’ असो की पर्यावरणविषयक आणि महिलांविषयीची मते असोत, ट्रम्प यांची भूमिका प्रतिगामी आणि आततायीपणाचीच आहे हे सिद्ध झाले आहे आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगावर दिसू लागले आहेत. पण केवळ ‘मी आणि माझे’ इतक्याच कोशात वावरणारे ट्रम्प यांना याबद्दल काहीही वाटेनासे झाले आहे, इतक्या परम असहिष्णू मर्यादेपर्यंत ते पोहोचले आहेत. म्हणूनच ट्रम्प यांची लोकप्रतिनिधी सभागृहातील पीछेहाट निश्चितच स्वागतार्ह आहे, असे म्हणावे लागेल.
– अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण</strong>
खेळात देशप्रेमाचे दाखले देणे समर्थनीय नाही..
आकाशाला गवसणी घालणारे कर्तृत्व विनयाच्या मखरेने शोभून दिसते हे विराट कोहली विसरलेला दिसतो. त्यामुळे प्रेक्षकातील क्रीडाप्रेमीने विराटपेक्षाही विदेशी क्रिकेटपटू आवडतात या विधानाने विराटचा तोल गेला आणि त्याने या प्रेक्षकाला चक्क परदेशी स्थलांतर करण्याचा सल्ला दिला. विराटचे हे स्वत:ला परिपूर्ण मानून सर्वश्रेष्ठ समजणे कोत्या मनोवृत्तीचे लक्षण समजायला हवे. परदेशी खेळाडू का आवडतात याचा खुलासा विचारून ती गुणवत्ता अंगी बाणवण्याचा मी प्रयत्न करीन असे समर्पक उत्तर कोहलीने दिले असते तर शोभून दिसले असते. विरोधी मतप्रदर्शन करणाऱ्याला देश सोडायला सांगणे फॅसिझम झाला आणि हे सांगण्याचा अधिकार विराटला कोणी दिला? विराट स्वत:ला कोण समजू लागला आहे? बरे, विराटचे विदेशीप्रेम त्याने मातृभूमी सोडून परदेशी जाऊन लग्न केल्याने जगजाहीर झाले आहे. असे असताना देशप्रेमाचे दाखले आणि तेही खेळात देणे अजिबात समर्थनीय नाही.
– नितीन गांगल, रसायनी
पुलंच्या दातृत्वगुणाचे अनुकरण करावे
८ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. पुलंनी वैचारिक लेख, प्रवासवर्णने, नाटक, संगीत, अभिनय, काव्यवाचन, वक्तृत्व इत्यादींद्वारे आम्हा सर्वाची सांस्कृतिक आयुष्ये श्रीमंत केली. आजही त्यांची विविध प्रकारची निर्मिती निखळ आनंद देत आहे. गुणी माणसाला सर्वात मोहवून टाकणारा गुण म्हणजे त्यांचा दानशूरपणा होय! त्यांच्या अप्रकाशित साहित्याप्रमाणेच (लोकसत्ता, ८ नोव्हें.) त्यांची दानशूरता प्रसिद्धीविन्मुख होती. देव-देव न करणाऱ्या पुल आणि सुनीताबाई या उभयतांनी आयुष्यभर मानवसेवा करणाऱ्या संस्थांना भरभरून मदत केली. यात रक्तपेढी, अनाथालय, कुष्ठरोग निवारण, व्यसनमुक्ती, आदिवासी कल्याण, स्त्रीसबलीकरण करणाऱ्या संस्था येतात. यानिमित्ताने तमाम चाहत्यांनी पुलंच्या कलाकृतींचा आस्वाद घेताना त्यांच्यातल्या श्रेष्ठ अशा दातृत्वगुणाचे अनुकरण करावे.
– गोविंद काजरोळकर, पुणे</strong>
शहरांची नावे बदलण्यापेक्षा विकासावर भर द्या
अहमदाबादचे नाव बदलून ‘कर्णावटी’ करणार असल्याचे वृत्त (८ नोव्हें.) वाचले. तिकडे उत्तर प्रदेशात आदित्यनाथांनी शहरांची नावे बदलण्याचा धडाका लावलेला आहे. अर्धशतकापूर्वी देवादिकांची नावे मुलांना ठेवली जात, उदा. गणेश, शंकर, श्रीकृष्ण वगैरे; परंतु ही नावे असणारी मंडळी आपापल्या घराण्याच्या वकुबानुसार निपजत. तेव्हा नावे बदलल्याने काहीही साध्य होत नाही. ती शहरे तशीच राहणार. शहरांची नुसतीच नावे बदलणार की तिथली जुनी शिल्पे, वास्तू उद्ध्वस्त करून नवीन काही घडवण्याचा संकल्प आहे, याची काही घोषणा झाल्याचे ऐकिवात नाही. तसा काही इरादा असल्यास अरबांशी अथवा तालिबान्यांशीच तुलना होऊ शकते. बारशात वेळ व पैसा वाया घालवण्यापेक्षा शहरांच्या सर्वागीण विकासावर भर दिल्यास त्याचा देशाला फायदा होईल.
– शैलेश न. पुरोहित, मुलुंड (मुंबई)
मराठीच्या स्वतंत्र धाटणीकडे लक्ष हवेच!
‘मराठी शब्दरचनेकडे दुर्लक्ष नको’ हे पत्र (लोकमानस, ५ नोव्हें.) वाचले. पत्रलेखकाच्या मताशी पूर्णत: सहमत आहे. मागील काही वर्षांपासून मराठी लिहिताना व बोलताना हिंदी धाटणीची शब्द व वाक्यरचना, हिंदीतील विभक्ती, क्रियापदे यांचा सर्रास वापर केला जात आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास ‘नेतृत्वाखाली’ याऐवजी ‘नेतृत्वात’ , ‘-ला विरोध करणे’ याऐवजी ‘-चा विरोध करणे’, ‘पंतप्रधान’, ‘अर्थमंत्री’ यांसाठी अनुक्रमे प्रधानमंत्री व वित्तमंत्री, लोकसभा व विधानसभेचे ‘सभापती’ याऐवजी ‘अध्यक्ष’, इंग्रजीतील ‘सीनिअर सिटिझन’ साठी ‘ज्येष्ठ नागरिक’ऐवजी ‘वरिष्ठ नागरिक’.. ही यादी खरे तर लांबतच जाईल. मराठीमध्ये अशा प्रकारे िहदीची भेसळ वाढत गेल्यास कालांतराने मराठीला स्वतंत्र अस्तित्वच उरणार नाही. हा धोका वेळीच ओळखून प्रसारमाध्यमांपासून ते सर्वसामान्य मराठी जनांपर्यंत सर्वानी मराठीचा वापर करताना मराठीतील योग्य शब्दांचा वा पर्यायांचा वापर करण्याची काळजी घ्यावी, असे सुचवावेसे वाटते.
– योगेश कुलकर्णी, कुळगाव-बदलापूर (ठाणे)