मग पालकांनी नक्की काय करायचे?

राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू होण्यासंदर्भातले वृत्त (२६ नोव्हें.) वाचले. शाळा पूर्ववत सुरू झाल्या पाहिजेत हे मान्य आहे. परंतु करोनाच्या तिसऱ्या लाटेचा १३ राज्यांना धोका असल्याचे केंद्र सरकार म्हणते व  त्यासाठी संबंधित राज्यांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना करते. राज्याच्या टास्क फोर्सने व तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला असेल तर केंद्र सरकारच्या या ताज्या इशाऱ्याचे काय? एकमेकांना छेद देणारी अशी वृत्ते येत असतील तर पालकांनी नक्की काय करायचे? या सगळ्यामुळे लहान मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय लहानग्यांना शाळेत पाठवणे धाडसाचे ठरेल असेच ठामपणे म्हणणे क्रमप्राप्त ठरते.

– उदय दिघे, विलेपार्ले (मुंबई)

कोण म्हणतो बुलेट ट्रेन फायद्याची नाही?

‘बुलेट ट्रेनचा पांढरा हत्ती…’ हा पृथ्वीराज चव्हाण यांचा लेख आणि त्यासंबंधीच्या वाचक प्रतिक्रिया वाचल्या.  सद्य:परिस्थितीत वाहतुकीसाठी रेल्वेसेवा सर्वाधिक स्वस्त आणि जलद मानली जाते. भारतातील जुने आणि सर्वाधिक वापराचे रेल्वेमार्ग, त्यावरील पूल, स्थानके ब्रिटिश राजवटीतील आहेत. या रेल्वेमार्गांनी वाटेवरची अनेक शहरे, भाग जोडले गेले आहेत. बुलेट ट्रेनच्या मार्गांमुळेही असे औद्योगिक प्रदेश, ठाणे, वसई-विरार, पालघर-बोईसरसारखी शहरे मुंबई तसेच सुरत, वडोदरा, अहमदाबादशी थेट जोडली जाणार आहेत. निव्वळ पालघर-डहाणू हा सीमावर्ती प्रदेश असल्याने येथील वाहतूक सुविधांचा फायदा गुजरात राज्यातील जनतेलासुद्धा होईल, पुढे जाऊन त्यांची संख्या वाढेल म्हणून लोकलसेवा सुरू करण्यातही पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्वाने दुर्लक्ष केले होते. केंद्रीय प्रकल्प वगळता राज्य शासनातर्फे पालघर जिल्ह्यात नवीन योजना राबविण्यात आल्या नाहीत, असा इतिहास आहे. आतासुद्धा केंद्रातर्फे सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या व्यवहार्यतेबाबत फायदे आणि तोटे अशा दोन्ही बाजूंनी विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा महाराष्ट्र-गुजरात, राज्य-केंद्र यांच्या कुरघोडीच्या लढाईत नवीन प्रकल्प रखडत राहतील.

– नकुल संजय चुरी, विरार

बुलेट ट्रेन ही निष्कारण मारलेली उंच उडी

‘अखंड विकसनशील’ हा लेख (२० नोव्हेंबर) गिरीश कुबेर यांचा वाचला. सदर लेखात बुलेट ट्रेनला सुचवला गेलेला पर्याय अतिशय योग्य वाटतो. त्याची अनेक कारणे देता येतील. १) भारतासारखा देश ही अशी सशाच्या पळण्याची गती (आत्ता तरी) आत्मसात करू शकत नाही. २) बुलेट ट्रेन ही व्यवस्था स्वीकारणे म्हणजे प्रगतीची शिडी चढत असता मधल्या अनेक पायऱ्या वगळून मारलेली (निष्फळ) उंच उडी ठरते. ३) या मधल्या पायऱ्या म्हणजे जनतेस दारिद्र्य रेषेच्या वरती आणणे, खेडोपाडीच्या सुखसुविधा, जनतेस किमान मूलभूत सुविधा (अर्थात मोफत नव्हेच). यात दोन महत्त्वाची व अति आवश्यक क्षेत्रे म्हणजे आरोग्य व शिक्षण. ४) बुलेट ट्रेनपायी होणारा एकचतुर्थांश पैसा या दोन क्षेत्रांकडे वळवला गेला तरी देशाचे चित्र पालटू शकेल. ५) चकाचक रुळांवरून धावणारी चकाचक बुलेट ट्रेन आणि तिच्या किनाऱ्यालगत असणारी झोपडपट्टी, दरिद्रता, भोवताली वावरणारी विकल बच्चे कंपनी हे दृश्य खचितच सुखावह नाही. ६) भारतासारख्या विकसनशील देशास बुलेट ट्रेन ही सुविधा सद्य परिस्थितीत तरी अनावश्यक वाटते. ७) संपूर्णपणे परदेशी तंत्र व तंत्रज्ञावर विसंबून असलेला हा पांढरा हत्ती पोसावाच कशासाठी?

– विद्या पवार, मुंबई

नंतर दया दाखवली जाणार नाही कशावरून?

 ‘शक्ती मिल बलात्कार’ प्रकरणातील तीन गुन्हेगारांना सत्र न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे उच्च न्यायालयाने मरेपर्यंत कारावासात रूपांतर केल्याची बातमी (२६ नोव्हेंबर) वाचली. एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडतो की काही वर्षांनी दुसरे एखादे न्यायालय अजून दयाबुद्धी दाखवून या अट्टल गुन्हेगारांना पॅरोल किंवा फर्लो मंजूर करणार नाही कशावरून?  कै. नयना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना सत्र न्यायालयाने सुनाविलेल्या, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेल्या फाशीची शिक्षेचे, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतरही मुंबई उच्च न्यायालयाने केवळ अंमलबजावणीत उशीर झाला या कारणास्तव जन्मठेपेत रूपांतरित केल्याचे उदाहरण आहेच.

– नरेंद्र थत्ते, पुणे</p>

लोकसंख्या कमी झाली तरी आरोग्य चांगले हवे

‘अशक्त रोगी नासका’ हा अग्रलेख (२६ नोव्हेंबर) वास्तवदर्शी आणि परखड आहे. आपल्या देशाची लोकसंख्या १३८ कोटी इतकी प्रचंड आहे. त्यामानाने संसाधने तुटपुंजी आहेत. दु:खात सुख इतकेच की राष्ट्रीय जननदर २.० झाल्याने ही लोकसंख्या स्थिरावण्याची चिन्हे आहेत. परंतु नागरिकांचे आरोग्य हा चिंतेचा विषय आहे. कुपोषण, अशक्तपणा, रक्तक्षयग्रस्तपणा, स्थूलत्व, व्याधीग्रस्त अशी अनारोग्याची असंख्य लक्षणे नागरिकांत आढळतात. आरोग्यव्यवस्था समाधानकारक नाही. गेल्या दोन वर्षांत करोना विषाणूच्या प्रसारामुळे आरोग्यव्यवस्थेचे पितळ उघडे पडले. तरुणांचा देश ‘डेमोग्राफिक डिव्हिडण्ड’ देतो पण त्यासाठी हे तरुण धडधाकट हवेत, त्यांना चांगले शिक्षण आणि उत्पादक रोजगार हवा तर ते देशाच्या संपत्तीत भर घालू शकतात.

– डॉ. विकास इनामदार, पुणे 

नेमक्या कोणत्या तत्त्वज्ञानाने जीवन धन्य होते?

‘एक होता मोक्षमुल्लर’ हा लेख (२६ नोव्हेंबर) वाचून माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या वाचकाला काही प्रश्न पडले. एक म्हणजे या लेखामध्ये बौद्ध त्रिपिटक ग्रंथाचा दाखला देण्याची काय गरज होती ते समजले नाही. दुसरे म्हणजे लेख हा बौद्ध साहित्यावर आहे की संस्कृत साहित्यावर ते ध्यानात आले नाही. तिसरी गोष्ट म्हणजे लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे ज्याला आपले पृथ्वीवरील जीवन धन्य करायचे आहे किंवा ज्याला शाश्वत शांती हवी आहे, त्याला भारतीय तत्त्वज्ञानाकडेच वळावे लागेल. पण भारतातील नेमक्या कोणत्या तत्त्वज्ञानाने जीवन धन्य होते आणि मानवाला शाश्वत शांती मिळेल ते स्पष्ट केलेले नाही (ते कोणत्याही पाश्चात्त्य लेखकाने म्हटले असले तरी).

    या कारणांनी, हा एकूण लेख मला संभ्रमात टाकणारा आहे.

– आकाश सुरेश वानखडे, खामगाव (बुलडाणा)

Story img Loader