शैक्षणिक क्षेत्र अद्याप धोरणांच्या फेऱ्यात
‘शिक्षणाचा भागाकार’ हा अन्वयार्थ (१ सप्टेंबर) वाचला. महाराष्ट्रातील मागील काँग्रेस आघाडीचे सरकार आणि सध्याचे भाजप सरकार यांच्यात एक दुर्दैवी साम्य आहे ते म्हणजे शैक्षणिक धोरणांची अप्रगल्भता. आता आणखी एका नवीन सिद्धांतानुसार विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित शिक्षकांची संख्या निश्चित करण्याचा सरकारचा मानस आहे. विकासाच्या अन्य क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची प्रगती समाधानकारक असली तरी आपले शैक्षणिक क्षेत्र मात्र अद्यापही सरकारी धोरणांच्या फेऱ्यात अडकून पडलेले आहे. राज्य शासनाचे गेल्या काही वर्षांतील शैक्षणिक निर्णय पाहिले तर त्यांचे वर्णन ‘भीक नको पण कुत्रे आवर’ असेच करता येईल.
याचे मुख्य कारण म्हणजे शैक्षणिक धोरणांची आखणी करताना महाराष्ट्रात बरेचदा ‘आधी कळस मग पाया’ हे तत्त्व वापरले जाते. आजही कित्येक वस्तीशाळांमध्ये संगणक संच आहेत पण शाळेला वीजजोडणी मात्र नाही. अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशांसाठी कोणती परीक्षा असावी हे निश्चित करणयासाठी जर सरकार तीन-तीन वर्षांचा अवधी घेत असेल, तर यातच शैक्षणिक धोरणकर्त्यांचे मागासलेपण लक्षात यावे.
या सगळ्यात होरपळ होते ती मात्र विद्यार्थी आणि पालकांची. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. आता योग्य आणि वास्तववादी उपाययोजनांच्या साह्य़ाने विद्यार्थ्यांची आणि पर्यायाने महाराष्ट्राची अधोगती थांबवणे यातच देशाचे ‘सौख्य’ सामावले आहे.
किरण बाबासाहेब रणसिंग, नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा