लवकरच शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करू पाहणाऱ्या चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला नियोजित संशोधन केंद्र आणि इमारतीसाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज आहे. विविध विषयांवरील सुमारे ६३ हजार पुस्तके, दुर्मिळ हस्तलिखिते व पोथ्यांचा मौलिक संग्रह या ग्रंथालयात आहे.
२००५ च्या जुलमध्ये झालेल्या महाप्रलयाने ग्रंथालयाचे अपरिमित नुकसान झाले, पण त्यामुळे खचून न जाता कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथालयाचे विश्वस्त आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा एकवार ग्रंथालयाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कंबर कसली आहे आणि त्यासाठी काही भव्य योजना आखल्या आहेत. ‘अपरान्त संशोधन केंद्र’ स्थापन करण्याचा संस्थेचा मनोदय आहे. या संदर्भात संशोधन करू इच्छिणाऱ्या दोन व्यक्तींना शिष्यवृत्तीही देण्यात येणार आहे. या ग्रंथालयात दीडशे वर्षांहून अधिक जुन्या काळातील दुर्मिळ पुस्तके, वैशिष्टय़पूर्ण हस्तलिखिते आणि पोथ्याही आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे जतन न केल्यास काळाच्या ओघात हा खजिना नष्ट होणार आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान काहीसे खर्चिक असले तरी अपरिहार्य गरजेचे आहे.
कोकणी समाजसंस्कृतीची ठेव असलेल्या पुरातन कलात्मक वस्तूंचा संग्रह असलेलं कला दालन उभारण्याचीही योजना आहे. या उपक्रमांसाठी नवीन इमारत बांधण्याचा संकल्प विश्वस्त मंडळींनी सोडला असून त्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज आहे. वाचन संस्कृती आणि ग्रंथालय चळवळीवर प्रेम करणारे हजारो हात पुढे आले तरच ही समाजोपयोगी स्वप्ने साकार होतील. इच्छुकांनी लोकमान्य टिळक वाचन मंदिर या नावाने धनादेश काढावेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा