समाजातील चांगल्या बदलांना काळी किनारही असते.पब्लिक इंटलेक्चुअल ती लक्षात आणून देतो व आपल्याला सावध करतो.’पब्लिक इंटलेक्चुअल’ ही संकल्पना आपल्याला फारशी परिचित नाही. विद्यापीठात मौलिक संशोधन करीत असताना समाज आणि सरकार व अन्य संस्था यांच्यातील परस्परसंबंध उलगडून दाखवीत जनतेला जागरूक करण्याचे काम पब्लिक इंटलेक्चुअल करतो. विद्यापीठीय मौलिक संशोधनाची परंपरा आपल्याकडे नाही आणि बौद्धिक विश्लेषणाचा कंटाळा असणाऱ्यांची संख्या भरपूर असल्याने असे ‘समाजाचे बुद्धिवादी’ आपल्यात फारसे दिसत नाहीत. मात्र पाश्चात्त्य देशांत अशा बुद्धिवाद्यांची परंपरा आहे. अशा बुद्धिवाद्यांचा संशोधन व समाज यांच्याशी जिवंत संबंध असतो. एडवर्ड सैद यांनी म्हटल्याप्रमाणे मानवी स्वातंत्र्य व ज्ञान विस्तारत नेणे हे सार्वजनिक बुद्धिवाद्याचे मुख्य काम असते. तो समाजात असला तरी समाजापासून थोडे अंतर राखून असतो आणि समाजातील स्थितिशीलता नष्ट करणे हे तो कर्तव्य समजतो. एडवर्ड सैद हे पब्लिक इंटलेक्चुअलमध्ये गणले जात. नोआम चॉम्स्की, रिचर्ड डॉकिन्स, अमर्त्य सेन, नील फग्र्युसन, सॅम्युअल हटिंग्टन अशी अन्य काही नावे आहेत. दुर्गाबाई भागवत व मे. पुं. रेगे यांना आपल्याकडचे पब्लिक इंटलेक्चुअल म्हणता आले असते. आता त्या तोडीचा कोणी नाही.
बल्गेरियाचे इव्हान क्रास्टेव्ह हे असे पब्लिक इंटलेक्चुअल आहेत. युरोपातील प्रथम श्रेणीच्या बुद्धिवाद्यांमध्ये त्यांची गणना होते. ‘सेंटर फॉर लिबरल स्ट्रॅटेजीज’चे ते संचालक आहेत. ‘द अॅन्टीअमेरिकन सेंच्युरी’ हे पुस्तक व ‘पॉलिटिक्स ऑफ अॅन्टी-करप्शन’ हे निबंध गाजले होते. लोकशाही व समाजातील बदल हे त्यांचे अभ्यासाचे विषय. सार्वजनिक बुद्धिवादी हा समाजातील स्थैर्य बिघडविणारा असला तरी त्याची दृष्टी नकारात्मक नसते. सातत्याने कोरडे ओढीत तो समाजाला सिनिकल बनवीत नाही. समाजात घडणाऱ्या बदलातील चांगलेपणा तो हेरतो. त्याचे स्वागतही करतो. मात्र त्याच वेळी चांगल्या घटनांमागोमाग अलगद व छुपेपणे येणाऱ्या वाईट प्रवाहांबाबत तो समाजाला जागरूक करतो. जे बरोबर वाटते, तेथे थोडे चुकलेलेही असू शकते, हे तो दाखवून देतो. चांगले व वाईट एकाच वेळी हेरण्याच्या बुद्धीच्या समतोलामुळे त्याची एक मर्मदृष्टी तयार होते. या मर्मदृष्टीतून जे चित्र समोर येते, त्यातून आपल्यासारख्या सामान्य माणसाची समज आपोआप वाढते.
लोकशाहीबद्दलची आपली समज क्रास्टेव्ह याच पद्धतीने वाढवितात. गेल्या चाळीस वर्षांतील पाच महत्त्वाची स्थित्यंतरे ते प्रथम दाखवितात आणि त्यांचे लोकशाही व्यवस्थेवर होणारे परिणाम विशद करतात. याचबरोबर पारदर्शकता व सातत्य या सर्वमान्य गुणांची एक नकारात्मक बाजूही समोर आणतात. ते फर्डे वक्ते नाहीत व जोरकस युक्तिवादही करीत नाहीत. मात्र सर्वमान्य गोष्टींची पलीकडील बाजू दाखविण्याची त्यांची खुबी अभ्यासकांचे लक्ष वेधून घेते.
१९६८ ते ७० या काळात पाश्चात्त्य देशांत घडलेली सांस्कृतिक व सामाजिक घुसळण हे क्रास्टेव्ह यांच्या मते पहिले महत्त्वाचे स्थित्यंतर होते. मानवी हक्कांच्या चळवळीने तेथून मूळ धरले. व्यक्तीला महत्त्व आले. मतभेद उघड व्यक्त करणे, प्रस्थापित व प्रचलित रीतिरिवाजांशी फारकत घेणे, विद्रोही होणे हे प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले. यातून समाजात चेतना आली. प्रस्थापितांचा पाया हलला. ही एक चांगली गोष्ट होती.
त्यापाठोपाठ ८०च्या दशकात मार्केट रिव्होल्यूशन आले. हे दुसरे चांगले स्थित्यंतर. या बाजारक्रांतीमुळे लोकांचे राहणीमान बदलले. त्यांच्यासमोर जगण्याचे असंख्य पर्याय एकाच वेळी खुले झाले. याचबरोबर सरकारला सर्व काही समजते, सरकार म्हणते तेच बरोबर ही समजूत संपली. सरकारी दृष्टिकोनाच्या सावटातून लोक मुक्त झाले.
पाठोपाठ साम्यवादी सत्तेचा अंत झाला. हे तिसरे स्थित्यंतर. शीतयुद्ध संपुष्टात आले. जागतिक अर्थव्यवस्था निर्माण झाली. देशांमधील भिंती उद्ध्वस्त झाल्या.
चौथे स्थित्यंतर म्हणजे इंटरनेट. लोकव्यवहारांमध्ये, माणसामाणसातील संवादामध्ये या तंत्रज्ञानाने अद्भुत क्रांती केली. इतकेच नाही, तर राज्यकर्त्यांची झोप उडविली. जगाकडे व राज्यकर्त्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन इंटरनेटने बदलून टाकला. अण्णा हजारे आंदोलनात आपण याचा अनुभव घेतलाच आहे.
मेंदूच्या कार्यपद्धतीवर होणारे मूलगामी संशोधन हे पाचवे स्थित्यंतर. यामुळे माणसाच्या क्षमता व मर्यादा यांची अधिक जाण येऊ लागली. माणसाचे वर्तन, त्याची निर्णय घेण्याची प्रक्रिया याची अधिक ओळख या संशोधनातून येत आहे. या संशोधनाचे जसे वैद्यकीय फायदे आहेत तसेच आर्थिक, सामाजिक व राजकीय परिणामही आहेत.
या बदलांचे आपण स्वागत केले कारण ते चांगलेच होते. पण आता क्रास्टेव्ह त्यांची काळी बाजूही आपल्यासमोर आणतात आणि मग आपण अस्वस्थ होतो.
१९६८च्या स्थित्यंतराने मानवाच्या व्यक्तिमत्त्वाला प्रतिष्ठा दिली, पण त्याच वेळी जगण्याचे सामूहिक प्रयोजन माणूस घालवून बसला. घटस्फोट वाढले. कुटुंबाप्रमाणेच राष्ट्र, समाज, वर्ग अशा सामूहिक संकल्पनांपासूनही माणूस विभक्त होऊ लागला. महत्त्वाकांक्षा सर्वोच्च स्तरावर गेली आणि यामुळे संस्थात्मक जीवन मोडकळीस आले. ‘मला काय मिळणार’ या प्रश्नाला अग्रक्रम मिळाला आणि त्यामुळे राजकारणापासून बँकांपर्यंतच्या सर्वच संस्थांमधील सामूहिक व सार्वजनिक ध्येय संपुष्टात आणले. अशा व्यक्तिनिष्ठ वर्तणुकीचे निलाजरे प्रदर्शन आज आपण ठायीठायी अनुभवत आहोत.
१९७०पर्यंत लोकशाहीच्या फैलावाबरोबर समाजातील असमानता कमी होत होती, पण मार्केट रिव्होल्यूशनने हे चित्र उलटे केले. कुटुंब, संस्था, समाज यांच्यापेक्षा ‘मी’ महत्त्वाचा ही वृत्ती ६८नंतर बलवान होत गेली आणि समाजातील असमानता वेगाने वाढत गेली. श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेले. पण ती श्रीमंती सर्व थरांपर्यंत पाझरली नाही. हुकूमशाही देशांत असते तशी असमानता आता लोकशाही देशांत दिसते. भारत त्याला अपवाद नाही.
शीतयुद्धाच्या समाप्तीचा एक वेगळाच परिणाम क्रास्टेव्ह दाखवितात. या बदलामुळे समाजातील राज्यकर्त्यां व श्रीमंत वर्गावरील सर्वसामान्य लोकांचा धाक उडाला. ते लोकभावनेची पर्वा करीत नाहीसे झाले. शीतयुद्ध सुरू होते तोपर्यंत रशियासारखी क्रांती होईल ही भीती असे. यामुळे कष्टकरी वर्गाला समजून घेण्याची वृत्ती होती. रशियामुळे अमेरिकेतील कामगारांचे जीवनमान खूपच सुधारले. पण रशिया कोसळला, युरोप मुक्त झाला व कष्टकरी वर्गाचे वजनही संपले. कामगार चळवळ कमकुवत होत गेली. शीतयुद्धापूर्वी गरिबांचे व मध्यमवर्गाचे राहणीमान उत्तम नसले तरी त्यांच्या आवाजाला महत्त्व होते. आता राहणीमान सुधारले, पण मध्यमवर्गाचा आवाज बसला. आज कामगार, गरीब, मध्यमवर्ग यांचे उत्पन्न वाढले असले तरी श्रीमंत व राज्यकर्त्यांपुढे तो अधिकाधिक दुबळा ठरत आहे.
‘लोक सरकार बदलू शकतात, पण लोक धोरणे बदलू शकत नाहीत’, असे वास्तववादी विधान क्रास्टेव्ह करतात. मतदान करून सरकार बदलण्याचे सामथ्र्य भारतातील बहुसंख्यांना नक्कीच आहे, पण सरकारची धोरणे बदलण्याचे सामथ्र्य आपल्याला आहे का, याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा.
इंटरनेट क्रांतीचे आपण भरभरून कौतुक करतो, पण याच इंटरनेटने ‘एको चेंबर्स’ जन्माला घातली आहेत. नेटवर संपर्क वाढतो, पण निरनिराळ्या विचारांचे, दृष्टिकोनांचे, मतांचे आदानप्रदान होत नाही. उलट प्रत्येकजण आपल्याच गटात राहून आपल्याच मताचे प्रतिध्वनी ऐकत असतो. संवाद वाढलेला नाही. उलट एकारलेपणा वाढला आहे. अस्मिता कमी झालेल्या नाहीत, उलट परजून उठल्या आहेत. राजकीय विद्वेष वाढलेला आहे. इंटरनेटवरील आपल्या राजकारणाची चर्चा पाहिली की हे वास्तव झटकन लक्षात येते.
मेंदूच्या संशोधनामुळे माणसाच्या वागण्यामागची कारणे समजली व माणसाला कसे वाकवायचे हेही राजकीय व आर्थिक सूत्रधारांना कळले. आपल्याला हव्या तशा भावना चेतवून ते समाजाला खेळवू लागले. अर्थात मेंदूबद्दल फारशी माहिती नसतानाही हा खेळ सफाईने खेळणारे खेळगडी देशात व महाराष्ट्रात आहेत.
या सर्व काळ्या बाजूचा एकत्रित परिणाम म्हणजे सर्व संस्थांबद्दल आणि लोकशाहीबद्दल आपल्याला अविश्वास वाटू लागला आहे. म्हणून पारदर्शकता व सातत्य याचा आग्रह सर्वत्र धरला जातो. केवळ राजकारण नव्हे तर समाजातील कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक व्यवहाराचा आधार आज विश्वास नसून अविश्वास हा आहे. अविश्वासाची ही भावना सफाईने ‘मॅनेज’ करून त्याला विश्वासाचा मुलामा देणे हे यशाचे सूत्र झाले. रशियात पूर्वी सत्ताधाऱ्यांचे जनतेवर लक्ष होते, आता जगातील बहुसंख्य देशांत जनतेचे सत्ताधाऱ्यांवर आहे. त्या वेळी सत्ताधाऱ्यांचा जनतेवर अविश्वास होता, आता जनतेचा सत्ताधाऱ्यांवर आहे. शेवटी लोकशाही ही परस्परांवरील अविश्वासाचा खेळ ठरत आहे.
अविश्वासामुळे प्रत्येक बारीकसारीक घटनेची, विधानाची नोंद ठेवली जाते. तंत्रज्ञानामुळे हे सहज शक्य आहे, आणि मग सत्ताधाऱ्यांकडे सातत्याचा आग्रह धरला जातो. ‘तुम्ही तेव्हा असे म्हणाला होता, मग आज असे कसे म्हणता.’ या पठडीतील प्रश्न प्रत्येक चॅनेलवर त्वेषाने विचारला जातो. पण यामुळे कोणालाही भूमिका बदलणे अशक्य होऊन जाते. आपल्याच पूर्वीच्या वक्तव्यात माणूस अडकून पडतो. खऱ्याखुऱ्या लोकशाहीला हे मारक आहे, असे क्रास्टेव्ह यांना मनापासून वाटते. कारण तार्किक युक्तिवाद, चर्चा व संवादातून मनोभूमिका बदलत जाणे आणि अशा बदलांचे स्वागत करणे म्हणजेच लोकशाही. लोकशाहीच्या या मुख्य तत्त्वालाच पारदर्शकता व सातत्याच्या हट्टाग्रहामुळे नख लागते. या दोन्ही चांगल्या गुणांचा आत्यंतिक आग्रह अंतिमत: माणसाच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणतो. स्वातंत्र्य संपले की लोकशाही उरत नाही.
म्हणून जे बरोबर वाटते, ते थोडे चुकलेलेही असू शकते हे लक्षात घ्या, असे क्रास्टेव्ह सांगतात.
जगाबरोबर भारताच्या सध्याच्या परिस्थितीला हे वर्णन तंतोतंत लागू पडते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा