विश्वासार्हतेला तडा गेल्यास सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करणे हे राजकारण्यांसाठी मोठे आव्हान असते. त्यांच्या कृती आणि उक्ती यात फरक असता कामा नये, पण राजकारण्यांना त्याचे काही देणेघेणे नसते. ‘सूरक्षेत्र’ या संगीत क्षेत्रातील रिअ‍ॅलिटी कार्यक्रमावरून असाच अनुभव येत आहे. पाकिस्तानी गायकांचा या कार्यक्रमात समावेश असल्याने मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला विरोध केला व प्रक्षेपण बंद पाडण्याचा इशारा दिला.
सांस्कृतिक क्षेत्रात सेन्सॉरशिप असावी की नाही यावरून दोन मतप्रवाह आहेत. राजकीय पक्ष विविध क्षेत्रांमध्ये आपला अजेंडा राबवीत असतात. आपल्या समाजात पाकिस्तानचा तिरस्कार करणारा मोठा वर्ग आहे. पाकिस्तानी गायकांच्या विरोधात राज ठाकरे यांनी भूमिका घेताच सर्वसामान्यांमध्ये त्याची चांगली प्रतिक्रिया उमटली होती. रझा अकादमीच्या मोर्चाच्या वेळी झालेला दंगा, पोलिसांना झालेली मारहाण याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढून राज ठाकरे यांनी वातावरणनिर्मिती केली होती. मात्र, ‘सूरक्षेत्र’ कार्यक्रम प्रसारित होणाऱ्या वाहिनीचे अधिकारी राज ठाकरे यांना भेटले आणि मनसेचा या कार्यक्रमाला असलेला विरोध मावळला. यापुढे पाकिस्तानी गायकांचा समावेश केला जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले असले तरी यापूर्वी चित्रीकरण झालेले कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहेत. म्हणजेच पाकिस्तानी गायकांचे कार्यक्रम प्रसारित होण्यात काहीच आडकाठी येणार नाही. नेतेमंडळींनी बंद पाडण्याचे इशारे द्यायचे आणि संबंधित ‘भेटले’ की माघार घ्यायची हे काही नवे नाही. राज ज्या शिवसेनेच्या मुशीतून तयार होऊन बाहेर पडले त्या शिवसेनेचा अनुभवही तसाच आहे. शिशिर शिंदे हे शिवसेनेत असताना त्यांनी ऑक्टोबर १९९१ मध्ये पाकिस्तानी संघाबरोबर सामना होऊ नये म्हणून वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडली होती. त्यानंतर शिवसेनेचे फक्त ‘इशारे पे इशारे’च अनुभवाला मिळाले. दोन वर्षांपूर्वी शाहरुख खानच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाच्या विरोधात शिवसेनेने बळ एकवटले होते. एक-दोन दिवस विरोध केला, पण पुढे सारे शांत झाले. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांवर हल्ले झाल्याच्या निषेधार्थ आयपीएल सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंना खेळू दिले जाणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला, पण राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार ‘मातोश्री’वर जाऊन भेटल्यावर शिवसेनेचा विरोध मावळला. अलीकडेच राज ठाकरे यांनी टोलच्या विरोधात आंदोलन छेडले. टोल ठेकेदारांच्या लुटीच्या विरोधात कोणीतरी आवाज उठवत असल्याबद्दल चांगली प्रतिक्रिया येऊ लागली. ठेकेदारांकडून वाहनचालकांची लूट केली जात असल्याने टोल भरू नका, असा आदेश राज ठाकरे यांनी दिला.  मनसे हा विषय ताणून धरेल असे वाटत होते. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर चार-आठ दिवस टोल नाक्यांवर झाकाझाकी झाली, पण मनसेचा टोल विरोध आता तेवढा तीव्र राहिलेला दिसत नाही. नेतेमंडळी आपल्या शब्दावर ठाम राहात नाहीत म्हणूनच सर्वसामान्यांत त्यांच्याविरोधात संतापाची भावना आहे. अशा वेळी सामान्य जनतेला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे उजवे वाटतात. राज ठाकरे यांच्याबद्दल तरुण वर्गात आकर्षण आहे. त्यांचे विचार तरुणांबरोबरच सर्वसामान्य मराठी जनांना भावतात. महाराष्ट्राची सत्ता संपादन करण्याचे राज ठाकरे यांचे ध्येय आहे. नुसते भावनेच्या आहारी जाऊन चालणार नाही, तर राज ठाकरे यांना शब्दावर पक्के राहावे लागेल. घूमजावाची मालिका सुरू झाल्यास राज ठाकरेही त्याच मार्गाने.. असे बोलले जाईल. हे त्यांच्यासाठी नक्कीच प्रतिकूल ठरेल.

Story img Loader