‘बदलता महाराष्ट्र’मधल्या ‘समता की समरसता’ या विषयावरील परिसंवादाच्या वार्ताकनामधली काही विधानं (लोकसत्ता, १७ सप्टेंबर) वाचली.
रा.स्व.संघ समता मानतो आणि समता, समानता टिकवण्यासाठी आणि स्थिर होण्यासाठी समरसता हवी असं संघ मानतो असं भिकूजी इदाते म्हणतात. पुढे ते म्हणतात की समरसता ही कल्पना संपूर्ण समाजाला कवेत घेणारी आणि वंचितांना न्याय देणारी आहे.
परंतु ‘समरसता यात्रे’संबंधीची पूर्वी केलेली निवेदनं पाहिल्यानंतर खालील गोष्टी लक्षात येतात.
१) या यात्रेसंबंधीच्या निवेदनांत फक्त हिंदू समाजाचा विचार केलेला आहे. त्यामुळे ‘संपूर्ण समाजा’ला हे लागू होत नाही. कारण संपूर्ण समाजात मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी, शीख, बौद्ध असेही जनसमूह येतात याची आठवण करून देणं आवश्यक आहे. यांपकी बौद्ध आणि शीख हे ‘आपलेच’ आहेत असं संघाला कितीही वाटत असलं तरी त्याला हे दोन्ही जनसमूह सरसकट मान्य करतील असं नाही. या दोहोंखेरीज इतरांचा विचार करण्याचं कारण नाही असं संघाला वाटत असावं.
२) याला पूरक गोष्ट म्हणजे ज्या महापुरुषांची आणि महास्त्रियांची यादी या यात्रेकरूंनी दिली आहे, त्यांच्यात इतर धर्मीयांच्या समाजसुधारकांना स्थान नाही. अर्थात, ‘आमचं म्हणणं फक्त हिंदूंपुरतं सीमित आहे,’ असं जर त्यांना म्हणायचं असेल तर गोष्ट वेगळी. पण मग त्यांचा ‘संपूर्ण समाज’ म्हणजे हिंदू समाज आहे असा याचा अर्थ होतो.
३) ज्या हिंदू महापुरुषांची नावं यात्रेकरूंच्या यादीत आहेत, त्यात डॉ. हेडगेवार आणि सावरकर यांचीही नावं आहेत. यांपकी हेडगेवारांच्या विचारातील एक प्रभाव डॉ. मुंजेंच्याकरवी आलेल्या इटलियन फॅसिझमचा होता, आणि िहदुत्वाच्या मुद्दय़ावरच हेडगेवारांचे राष्ट्रीय काँग्रेसशी मतभेद झाले होते. दुसरीकडे सावरकरांचे विचारसुद्धा फॅसिझम आणि नाझी विचारसरणीला अनुकूल होते असं दिसतं.
सावरकरांचा ‘ज्वलंत’ मुस्लीमविरोध त्यांच्या लेखनात पानापानावर स्पष्ट दिसून येतो. जर जर्मनीला आपल्या देशासाठी नाझीवाद; तसंच इटलीला फॅसिझम योग्य वाटत असेल तर त्या त्या देशांच्या गरजांप्रमाणे त्या देशांना आपापली शासन व्यवस्था निवडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे आपण िहदूंनी या देशांबद्दल अढी बाळगण्याचं कारण नाही, असे विचार सावरकरांनी ऑगस्ट १९३८ मध्ये पुण्यात एका जाहीर सभेत मांडले होते.
हिटलरला ज्यूंबद्दल वाटणारी द्वेषभावना सावरकरांना माहीत नव्हती असं मानता येत नाही. ज्यू विरोधाला जर्मनीत १९३० च्या अगोदरपासून सुरुवात झाली होती. परंतु, इस्रायलच्या झायनवादी राजवटीविषयी त्यांच्या तोंडून कायम प्रशंसोद्गारच येत असतात. पॅलेस्टाइनच्या भूमीवर ज्यूंचा कसा हक्क आहे आणि अरब हे तिथे आलेले उपरे कसे आहेत हे सावरकर आपल्याला हिरिरीने पटवून द्यायचा प्रयत्न करतात.
सावरकरांची समता ही फक्त हिंदूंपुरती मर्यादित होती, असं त्यांच्या विविध कृतींतून दिसतं. अशा व्यक्तींचा आपण समाजसुधारकांच्या यादीत समावेश करू शकतो काय हा एक मूलभूत प्रश्न आहे. अशा विचारसरणीत ‘समता’ किती आहे याचं मूल्यमापन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे.
तरीही, अशा व्यक्तींचा समाजसुधारकांच्या यादीत समावेश करून ते लोकांच्या पचनी पाडणं हा उद्योग समरसता मंच गेली कित्येक र्वष करत आहे. त्याचा आंधळेपणाने स्वीकार न करता त्यांना प्रश्न विचारत राहणं ही एक उत्तम सामाजिक कृती आहे.
समता, न्याय, मानवता, बंधुभाव, शांतता या सगळ्या विशिष्ट समूहांच्यापेक्षा अधिक उंचीवरून पाहण्याच्या गोष्टी आहेत आणि त्यात जातिनिष्ठ / धर्माधिष्ठित / राष्ट्राधिष्ठित वा तत्सम संघटना हे महत्त्वाचे अडथळे आहेत. विशिष्ट समूहांना इतरांपेक्षा वरचा दर्जा प्रदान करणाऱ्या असमानतेच्या चौकटीत सामाजिक पुरोगामित्वाचं सोंग आणण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो हास्यास्पद ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा