‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या समाजविषयक परिसंवादातील वाद हे जसे कोणाला जिंकण्यासाठी नव्हते, तसेच ते कोणाला हरविण्यासाठीही नव्हते. त्या समग्र चर्चेचा हेतूच मुळात विषयाच्या मुळाशी जाऊन तो समजून घेणे हा होता. त्या दृष्टीने तेथे सगळेच विद्यार्थी होते. अशा चर्चेतून प्रबोधनाची पायवाट रुंदावण्याच्या आशा पालवतात, त्या विचार कधी वाया जात नाहीत या दृढ विश्वासामुळे..
चर्चा म्हणजे चॅनेली शेरेबाजी आणि वाद म्हणजे मुद्दय़ांऐवजी गुद्दे अशा आजच्या गढूळरंगी वातावरणात नीटस गांभीर्याने एखाद्या विषयाची मांडणी व्हावी, त्याबाबतची मते आणि मतांतरे समोर यावीत आणि त्यातून काही तत्त्वबोध व्हावा, अशा प्रकारचे व्यासपीठ निर्माण व्हावे या हेतूने लोकसत्ताने ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमास प्रारंभ केला. त्यास आता एक वर्ष होत आले. या उपक्रमाचा दुसराही एक हेतू होता. महाराष्ट्रात गेल्या साठ-पासष्ट वर्षांत काय झाले असा प्रचारी प्रश्न नेहमीच आपल्या कानी पडतो. त्या प्रश्नातच ‘काहीच नाही’ हे उत्तर अध्याहृत असते. परंतु खरोखरच अशी परिस्थिती आहे का? कोणी कितीही डोळे झाकून घेतले तरी महाराष्ट्र बदलला आहे आणि बदलतो आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मुळात बदल ही निरंतर आणि स्थायी प्रक्रिया असल्याने बदल झाले यात तसे आश्चर्य वाटण्याचेही काही कारण नाही. येथे महत्त्वाचे असते ती बदलांची दिशा. ती पुरोगामी आहे की अधोगामी हे अधूनमधून जाणून घेणे गरजेचे असते. ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाचा हाही एक हेतू होता. या दृष्टीने आतापर्यंत शिक्षण, उद्योग, शेती अशा काही महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन करण्यात आले. त्याचाच पुढचा भाग पुण्यामध्ये झाला. सामाजिक चळवळींचा बदलता चेहरा या विषयावर पुण्यामध्ये सलग दोन दिवस चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रांत कार्यरत असणारे अनेक मातब्बर या चर्चासत्रांत सहभागी झाले. तेथे काय झाले, कोणते विचार मांडले गेले हे महत्त्वाचे आहेच. त्याच्या बातम्या लोकसत्तामध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेतच. याशिवाय येत्या रविवारीही त्याचा सविस्तर वृत्तान्त प्रसिद्ध करण्यात येणार असून, लवकरच या चर्चेची संकलनात्मक पुस्तिकाही प्रकाशित करण्यात येणार आहे. पण याचबरोबर या चर्चा ज्या पद्धतीने झाल्या तेही महत्त्वाचे आहे.
भारतीय परंपरेत वादविवादांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय तत्त्वज्ञानाच्या आणि दर्शनांच्या विकासाला वादविवादांनीच हातभार लावला. हा उदारमतवादाचा इतिहास आहे. अभिमानाने डोक्यावर घ्याव्या अशा सहिष्णु रीतींचा इतिहास आहे. पण इतिहासापासून काही शिकायचेच नाही किंवा इतिहासाचा वापर करायचा तो वर्तमानातील क्षुद्र हेतूंसाठीच हे अनेकांनी पक्के ठरविले असल्याने वादसभा नामक प्रकारच आता हद्दपार झाला आहे. जेथे वाद होतात त्याला व्यासपीठ म्हणण्याऐवजी आखाडा म्हणावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी खरे तर माध्यमांची जबाबदारी मोठी होती. परंतु या माध्यमांनी, त्यातही दृक् श्राव्य माध्यमांनी तुमची खुशी हाच आमचा सौदा अशी बाजारू भूमिका घेतली आणि मनोरंजन हाच आमचा मूल्यविवेक असे नि:संकोच कोडगेपणाने जाहीर केले म्हटल्यावर गंभीर चर्चाना वावच उरला नाही. अनेक मुद्रित माध्यमांनीही हाच कित्ता गिरविला. या माध्यमांना जणू वाचकसंख्येची खायखाय सुटली. त्या भरात वाचकांचा अनुनय एवढय़ा थराला गेला की मुद्रित माध्यमांची पाने आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांचे पडदे यांतील फरक ओळखणेही कठीण होऊन बसले. जे पडद्यावर तेच पानांवर. या परिस्थितीत वाचकांच्या बुद्धिमत्तेचा आपण अपमान करीत आहोत याचेही भान सुटले. याला अपवाद अर्थातच लोकसत्ताचा. लोकसत्ताने मनोरंजनाला कधीही नकार दिला नाही. ते नाकारले तर अवघे जगणेच कोरडे ठणठणीत होईल. पण लोकसत्ताने केवळ वाचकरंजन हेच ध्येय असेही मानले नाही. सकस आणि चौरस वैचारिक खाद्य देताना, प्रसंगी कटू काढाही देऊन समाजाची मनप्रकृती सुदृढ करण्यासाठी झटणे हे आद्य मराठी वृत्तपत्रांचे धोरण. तोच वारसा लोकसत्ताने उचलला, जपला. बदलता महाराष्ट्र या व्यासपीठावरून सामाजिक चळवळींच्या बदलत्या चेहऱ्याचा वेध घेण्याचा प्रयत्न हा त्या वारशाचाच भाग होता.
महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहिली तर एक बाब लख्खपणे लक्षात येते, ती म्हणजे येथील सामाजिक वातावरण कमालीचे बदलले आहे आणि कोणत्याही सुधारणावादी चळवळी अशक्य व्हाव्यात याची कारणे या सामाजिक बदलांतही आहेत. धर्म, जात, पंथ यांच्या अस्मिता एकीकडे अधिकाधिक किरटय़ा आणि एकारलेल्या बनत चालल्या आहेत. हिंदूू, मुस्लीम, ख्रिश्चन अशा सर्वच धर्मात धर्मगुरूंचा दहशतवाद वाढला असून, त्यांना विरोध करणाऱ्यांना मारून टाकण्यापर्यंत त्यांची मजल जात आहे हे वास्तव या परिषदेत मांडण्यात आले. त्यावरून सर्वच धर्म आज बदलांच्या कोणत्या टप्प्यांवर आहेत याचे भान यावे. दुसरीकडे या वास्तवाला वळण लावण्याचे काम करणाऱ्या सामाजिक चळवळींचे मोठय़ा प्रमाणावर एनजीओकरण झाले आहे. त्या पलीकडे सुरू असलेल्या चळवळी एखाद्या मुद्दय़ापुरत्या, प्रश्नापुरत्या लढताना दिसत आहेत. त्यांचे व्यापकत्व हरवले आहे. वैचारिक पातळीवर तर आणखीच वेगळी गत. धर्मसुधारणांबाबतचा शब्द काढणेही येथे धाडसाचे ठरू लागले आहे. या परिस्थितीत या दोन दिवसांच्या परिषदेमध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा, धर्मसुधारणा, वारकरी संप्रदाय, जातीअंताचे उपाय, समता आणि समरसता, सामाजिक मुद्दय़ांचा राजकारणावरील परिणाम अशा सहा विषयांवर विचारमंथन करण्यात आले. हे सर्व विषय तसे वादाचे. माणसे बोलता बोलता हातघाईवर कधी येतील याचा भरवसा नसलेले. तरीही, त्यावर सखोल आणि वादविवादांचे सर्व संकेत पाळून या परिषदेत चर्चा झाली. एकाच वेळी व्यासपीठावर डाव्या, उजव्या आणि त्याहून वेगळ्या विचारसरणीचे वक्ते बसले आहेत. त्यांचे प्रतिपादन समोरचे श्रोते शांततेने ऐकत आहेत. आपल्या शंका आणि प्रश्न विचारून विषयाला अधिक टोक देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सर्व चित्रच मोठे मनोहारी होते. अनेकांना तर ते पाहून भारतीय परंपरेतील वादसभेचीच आठवण झाली. पण येथील वाद हे जसे कोणाला जिंकण्यासाठी नव्हते, तसेच ते कोणाला हरविण्यासाठीही नव्हते. त्या समग्र चर्चेचा हेतूच मुळात विषयाच्या मुळाशी जाऊन तो समजून घेणे हा होता. त्या दृष्टीने तेथे सगळेच विद्यार्थी होते. आणि म्हणूनच श्रद्धा-अंधश्रद्धेवरील चर्चेत अंधश्रद्धाच काय, पण देवावरील श्रद्धासुद्धा नाकारा, असा लोकायत दर्शनाशी जवळीक साधणारा पुकारा झाला म्हणून कोणाला भावनाविकाराचा झटका आला नाही की जातीअंताचा मार्ग कोणता? या चर्चेत आरक्षणातून जातिभेद पसरतो असे मत मांडण्यात आले म्हणून कोणाच्या डाव्या कुशीत कळ आली नाही. महाराष्ट्रातील वारकरी चळवळीची एक ओळख धार्मिक सुधारणावादी चळवळ अशीही दिली जाते. परंतु या चळवळीवर जातीअंताचा हेतू आरोपित करू नका. तो जातीअंताचा नव्हे, तर जातीजातींतील विद्वेष कमी करण्याचा लढा होता, असे ठाम आणि परखड विवेचन वारकरी चळवळीवरील परिसंवादात करण्यात आले, तेव्हाही केवळ नवा काही अर्थ उलगडल्याचा बौद्धिक आनंद झाला. याचे कारण या प्रतिपादनांमागील हेतू स्वच्छ होता. त्या-त्या प्रश्नाचे कंगोरे तपासण्याचा होता. हे सर्व लोकसत्ताच्या व्यासपीठावरून झाले ही खरोखरच किमान आजच्या काळात तरी मिरवावी अशी बाब आहे.
आता प्रश्न असा की या चर्चेचे पुढे काय होणार? चर्चा झाली. इकडून तिकडे वारे गेले आणि सारे संपले, असे तर होणार नाही ना? ही एक सावध शंका म्हणून ठीक आहे. परंतु विचार कधीही वाया जात नसतात, यावर लोकसत्ताचा विश्वास आहे. बातम्यांच्या, लेखांच्या, पुस्तिकेच्या, इंटरनेटच्या माध्यमातून हे विचार लाखो लोकांपर्यंत पोहोचणारच आहेत. त्यात समाजातील विचारी व्यक्ती आहेत तसेच निर्णय प्रक्रियेतील अधिकारी, नेते हेही आहेत. एखादे विचारबीज यात कुठे ना कुठे रुजून येणारच आहे. यातून प्रबोधनाची पायवाट थोडी जरी रुंदावली तरी असे उपक्रम सुफळ संपूर्ण झाले असे म्हणता येईल.
प्रबोधनाची पायवाट..
‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या समाजविषयक परिसंवादातील वाद हे जसे कोणाला जिंकण्यासाठी नव्हते, तसेच ते कोणाला हरविण्यासाठीही नव्हते.
First published on: 18-09-2014 at 04:08 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta badalta maharashtra path to renaissance