‘अ‍ॅन अ‍ॅक्टर शुड बी अ‍ॅन अ‍ॅथलीट फिलॉसॉफर’ असं नाटय़गुरू स्तानिस्लावस्कीनं अभिनेत्याविषयी म्हटलं आहे. पण आजकाल ‘अ‍ॅथलीट अ‍ॅक्टर’ भरपूर आणि ‘फिलॉसॉफर’ कमी, अशी परिस्थिती दिसते. याला नसीरुद्दीन शहा हा हिंदी चित्रपटसृष्टीत गेली ३०-४० वर्षे काम करणारा तगडा अभिनेता सणसणीत म्हणावा असा अपवाद आहे. ‘नसीरुद्दीन शहा हा भारतातला सर्वात मोठा अभिनेता आहे’ असे कौतुकाद्गार प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी काढले आहेत. ‘निशांत’पासून लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘फाइंडिंग फॅनी’पर्यंत अनेकविध चित्रपटांतून अतिशय वैविध्यपूर्ण भूमिका नसीरुद्दीन यांनी केल्या आहेत. ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘स्पर्श’, ‘आक्रोश’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूं आता है’ या चित्रपटांतील त्यांचा अभिनय आजही अनेकांच्या स्मरणात असेल.
नसीरुद्दीन यांच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे की, त्यांनी ‘अँड देन वन डे’ या नावाने आपले आत्मचरित्र लिहिले असून लवकरच त्याचे प्रकाशन होणार आहे. नसरुद्दीन यांनी आपले आत्मचरित्र लिहावे यासाठी प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी पाठपुरावा केला. एवढेच नव्हे तर त्यासाठी मदतही केली. आणि हो, त्यांनी स्वत: लिहिले आहे. त्यासाठी कुणाची मदत घेतली नाही की कुणी त्यांच्यासाठी लेखनाचे कामही केलेले नाही.
हिंदी चित्रपटसृष्टीचं जग हे कमालीचं बेगडी आणि कचकडय़ाचं आहे. नसीरुद्दीन याच सृष्टीत सच्चेपणाने काम करतात. अभिनेता, साहाय्यक अभिनेता, चरित्र अभिनेता अशा विविध प्रकारच्या भूमिका आपल्या कसदार आणि दमदार अभिनयाने ते सशक्तपणे साकारतात. पण केवळ हिंदी चित्रपटातल्या भूमिकावर नसीरुद्दीन यांच्यामधला कलावंत जगू शकत नाही, जगत नाही. त्यांचे (आणि त्यांच्या पत्नी व मुलांचेही) पहिले प्रेम हे नाटक आहे. त्यामुळे ते शेक्सपिअरपासून मंटोपर्यंत अनेकांची नाटकंही करत असतात. त्यासाठी भारतभर प्रवास करतात.
तो सर्व प्रवास नसीरुद्दीन यांनी आता शब्दबद्ध केला आहे. त्यांच्या या आत्मचरित्रातून एका तत्त्वज्ञ अभिनेत्याची जडणघडण जाणून घेता येते. आत्मचरित्र हे स्वत:चंच चरित्र असतं आणि ते पुरेशी तटस्थता ठेवून लिहायचं असतं, त्याचा उत्तम प्रत्यय या आत्मचरित्रातून येतो.

Story img Loader