महाराष्ट्रात मध्यमवर्गीयांच्या किडक्या चाळीव जगण्यात ज्या काही लेखकांनी, कलाकारांनी प्रसन्नतेचा शिडकावा केला त्यातील शन्ना हे एक अग्रणी. प्रसन्नता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तसेच लेखनाचाही स्थायीभाव होता. शन्नांचे मोठेपण हे की ती प्रसन्नता त्यांनी आजन्म राखली.
काही व्यक्ती वर्ण, रंगरूपाच्या बरोबरीने जन्मत:च एक प्रसन्नता घेऊन येतात. शन्ना हे अशांपैकी. प्रसन्नता अशी अंगभूत, त्वचेलाच चिकटलेली असली की ती परिधान करावी लागत नाही की बुरख्याप्रमाणे कधी काढून ठेवावी लागत नाही. शन्नांची प्रसन्नता अशी होती. कायम त्यांच्यासमवेत असणारी. अशी माणसे कोठेही गेली की आसमंत प्रसन्न करतात आणि त्यासाठी त्यांना जराही परिश्रम करावे लागत नाहीत. शन्ना हे मूर्तिमंत असे होते. कायम हसरा चेहरा, कपाळावर मधे मधे येणारी केसांची चुकार बट, वेळपरत्वे ती मागे सारायची लकब, काही प्रश्नार्थक असेल तर तोंडाचा होणारा चंबू आणि चेहऱ्यावर लहान मुलाची असते ती उत्सुकता आणि तोंडातील १२०/३००ने आलेले रसाळपण अशा शन्नांना पाहणे हे समोरच्याला आपोआप प्रसन्न करणारे असे. लेखक म्हणून मिळालेली प्रसिद्धी शन्ना हे मोराने पिसारा मिरवावा तितक्या सहजतेने न मिरवता वागवत. हे त्यांचे वैशिष्टय़. त्यामुळे समोरचा त्यांच्याशी संवाद साधताना निवांत होत असे आणि आपण खरोखरच त्यांचे मित्र आहोत असे त्याला वाटायला लागत असे. महाराष्ट्रात मध्यमवर्गीयांच्या किडक्या चाळीव जगण्यात ज्या काही लेखकांनी, कलाकारांनी प्रसन्नतेचा शिडकावा केला त्यातील शन्ना हे एक अग्रणी. चाळीत चातुर्मास पाळणाऱ्या देशपांडे वा आपटय़ांच्या घरांतील तरुण पोरासाठी शेजारच्या राणे वा जाधव यांच्या घरात रविवारी दुपारी तांबडय़ालाल रश्शाची वाटी काढून ठेवणे वा एखादय़ाच्या घरी कार्य आहे म्हणून शेजारच्यांनी दोन खणी संसारातील एक खोली कार्यघरातील पाहुण्यांसाठी रिकामी करणे म्हणजे शेजारधर्म अशी सोपी व्याख्या होती तो हा काळ. त्या वेळी अद्याप दूरदर्शनचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे रात्री घराघरांतील आकाशवाणीवर टेकाडेभाऊजी आणि मीनावहिनी यांची वाट पाहिली जात असे, तो हा काळ. त्या काळी आकाशवाणीवरील श्रुतिका या आजच्या सासू-सुनांच्या निर्बुद्ध मालिकांपेक्षा जास्त कलात्मक असायच्या. त्यातील बरेचसे लेखन हे शन्नांचे असे. सत्तरीच्या दशकात आणि पुढे नव्वदीपर्यंत महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण या आणि अशा लेखकांनी केली. दलित चळवळींचा आणि त्यामुळे लेखकांचा अंगार अजून फुलायचा होता. वि. स. खांडेकरांचे सांस्कृतिक आणि संस्कारी वजन अनेकांना झेपत नव्हते. त्यांच्या लेखनातील सदासर्वकाळची सात्त्विकता जगण्याच्या धबडग्यात हरवून चालली होती आणि तसाच ना. सी. फडके यांचा प्रणयदेखील पुस्तकी वाटू लागला होता. नवकथेचे उद्गाते असलेले अरविंद गोखले वगैरे लेखक मंडळी अंदाज बांधता येतील इतकी ओळखीची वाटू लागली होती. दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे आदींचे वैचारिक लेखन पेलत नव्हते आणि त्याच वेळी योगिनी जोगळेकर, ज्योत्स्ना देवधर अशा लेखिकांनी प्राधान्याने गृहिणी वर्गाला आपलेसे करून टाकले होते. त्या काळात शन्नांची कथा आणि कादंबरी एका प्रफुल्लित चेहऱ्याने मराठी समाजासमोर आली. शन्नांचे मोठेपण हे की ती प्रसन्नता त्यांनी आजन्म राखली. तारुण्यसुलभ वा चाळिशीपर्यंतच्या लेखनात प्रसन्नता आढळणारा लेखक आणि त्याचे वाङ्मय हे पुढे वयानुसार आणि त्याबरोबरीने येणाऱ्या मधुमेह, रक्तदाब आदी व्याधींनुसार काहीसे किरकिरे होत जाते. या वृद्ध किरकिरेपणाने शन्नांना कधीच स्पर्श केला नाही.
शन्नांनी कथालेखन सुरू केले तो काळ मराठी लघुकथांचा बहर ओसरत चालल्याचा होता. या नवकथाकारांच्या प्रभावामुळे मराठीत अनेक नवे लेखक कथालेखन लोकप्रिय करीत होते. मध्यमवर्गाला आवडणाऱ्यांतले असे दोन म्हणजे शन्ना आणि वपु काळे. त्या काळात पु.ल. देशपांडे नावाचे गारूड मराठी मनाला भुरळ घालू लागले होते. व्यंकटेश आणि गदि हे माडगूळकर बंधू आपल्या अभ्रष्ट मराठीने वाचकांसमोर नवीनच जग उभे करीत होते. चिं. त्र्यं. खानोलकर आणि जयवंत दळवी वगैरे मानवी मनोविकाराचे दडपून टाकणारे वास्तव चित्र वाचकांच्या मनात रंगवत होते. सिनेमाच्या आघाडीवर राजा परांजपे, राम गबाले आदी समृद्ध वाङ्मयाचे चित्ररूप मांडत होते. नाटकाच्या क्षेत्रात बालगंधर्व चांगलेच उतरणीला लागलेले होते आणि ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा आदींच्या सात्त्विक काळाची दिवेलागण होत होती. अशा काळात शन्ना हे वेगळ्याच बाजाची कथा-कादंबरी घेऊन वाचकांसमोर आले. मराठी संस्कृतीचा लघुरूपीय रेनेसाँ म्हणता येईल असा तो काळ. इतके सगळे मातब्बर असताना आपले वेगळे स्थान तयार करण्यासाठी आपल्या कलाकृतीत खरोखरच वेगळेपण आणि कस असणे आवश्यक होते. शन्नांच्या लिखाणात तो होता. मग ती त्यांची एका साध्या कारकुनाचे आत्मचरित्र असणारी ‘दिवसेंदिवस’ नावाची आगळी कादंबरी असो वा ‘शहाणी सकाळ’ नावाची अतिप्रसन्न कथा. शन्नांनी हे असे वेगळे लिखाण सादर करताना नवीन आकारही हाताळला. त्यांची ‘दिवसेंदिवस’ ही कादंबरी हे त्याचे उदाहरण. दैनंदिनीच्या रूपाने, म्हणजे एका दिवसाला एक पान, मग कधी त्यावर चारच ओळी.. अशा स्वरूपात लिहिली गेलेली ती कादंबरी भलतीच लोकप्रिय झाली होती. प्रसंगोपात तयार होणारा घरगुती तणाव समजूतदारपणातून मिटतो आणि अशुभ वाटणारी रात्र दुसऱ्या दिवशी सकाळी शहाणी सकाळ बनून समोर येते या अवास्तव न वाटणाऱ्या वास्तवाने वाचक सुखावून जात. किंबहुना हे असेच असायला हवे, व्हायला हवे असे त्या वाचकाला वाटत असे. हे वाचकांचे वाटून घेणे शन्नांना बरोबर समजले होते. त्यामुळे कोणतीही उपदेशाची मात्रा न देता वा चमत्कृतीचा आधार न घेता शन्ना लिहीत आणि लोकांना ते आवडे. एका अर्थाने त्या काळचे जगणे सोपे होते आणि जगण्यातील सोपेपणाचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात पडत असे. गावातील देऊळ जरी अनेकांच्या पाहण्यात असले तरी त्याचे नदीच्या पात्रातील प्रतिबिंब पाहणे हा वेगळाच आनंद असतो. तो आनंद शन्नांच्या लिखाणातून मिळे. त्यांची जत्रा, तिन्हीसांजा, पाऊस, ऊनसावल्या अशी अनेक पुस्तके वाचकप्रिय ठरली ती त्यामुळेच.
शन्नांच्या लिखाणातील गुण म्हणजे त्यातील कमालीचे वेल्हाळपण. त्यांची प्रत्येक कथा ही वाचतानादेखील कथन केल्यासारखीच वाटते ती यामुळे. अशा लेखकाकडून उत्तम नाटय़संहिता लिहिल्या गेल्या नसत्या तरच नवल. मराठी रंगभूमीवरील काही उत्तम नाटय़संकल्पना शन्नांच्या नावावर आहेत. गुंतता हृदय हे, धुक्यात हरवली वाट, वर्षांव, रंगसावल्या, गहिरे रंग, गुलाम, हवा अंधारा कवडसा आदी उत्तम नाटय़कृती शन्नांनी दिल्या. आपण स्वत: उत्तम लेखक असतानाही इतरांच्या वाङ्मयाचे नाटय़रूपांतर करण्यात शन्नांना कधीही कमीपणा वाटला नाही. त्याचमुळे जयवंत दळवी वा पु. भा. भावे आदींच्या उत्तम कलाकृती त्यांनी रंगभूमीवर आणल्या. एक काव्याचा प्रांत सोडला तर शन्नांनी अन्यत्र विपुल मुशाफिरी केली. लोकसत्तातील ‘शन्ना डे’ व ‘ओली-सुकी’ या त्यांच्या सदरांनी वर्तमानपत्रीय लेखनातील लोकप्रियतेचा मानदंड तयार झाला होता.
लेखक ही त्या त्या काळाची निर्मिती असते. काळाच्या पुस्तकाचे पान उलटले गेले की नवे कलाकार नव्या पानाचे मानकरी असतात. मागील पानांवरील मानकऱ्यांनी नव्या पानावर येण्याचा हट्ट धरायचा नसतो. हे शन्नांना उमगले होते. त्यामुळे ते अलीकडे कोणत्याही मंचावर जात उगाच आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करीत नसत. हे ज्याला कळते तो सदाफुलीसारखा सदाप्रसन्न राहू शकतो. शन्ना असे सदाप्रसन्न राहिले आणि त्याच प्रसन्नतेत तेल संपल्यावर निरंजन विझावे तितक्या सहजपणे अस्तित्व संपवून गेले. आनंदसंप्रदायाच्या या अधिपतीस लोकसत्ताचे अभिवादन.
अग्रलेख : आनंदसंप्रदायाचे अधिपती..
महाराष्ट्रात मध्यमवर्गीयांच्या किडक्या चाळीव जगण्यात ज्या काही लेखकांनी, कलाकारांनी प्रसन्नतेचा शिडकावा केला त्यातील शन्ना हे एक अग्रणी.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-09-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta homage to marathi writer shankar narayan navare