भारतीय संगीतात वाद्यसंगीताचे एक स्वतंत्र आणि समृद्ध असे दालन आहे. वाद्यांमधून अभिजात संगीताचा संपन्न अनुभव देऊ शकणाऱ्या प्रतिभासंपन्न कलावंतांची खाणच भारतात गेल्या काही शतकांमध्ये निर्माण होत आलेली आहे. भारतीय संगीताच्या अभिव्यक्तीसाठीच्या वाद्यांबरोबरच परदेशातून आलेल्या रीड ऑर्गन (पायपेटी) किंवा हार्मोनिअम या वाद्यांनी भारतीय संगीतात गेल्या दोन शतकांच्या काळात भरीव कामगिरी केली आहे.
ब्रिटिश राजवटीत आलेल्या या वाद्यांचे भारतीयीकरण करून त्यांना आपल्या संगीतात इतक्या सहजपणे मिसळवून टाकण्याची किमया येथील कलावंतांनी अशी काही करून दाखवली, की परदेशीयांना हे वाद्य आपलेच आहे काय, अशी शंका यावी. पंडित मनोहर चिमोटे हे असे एक अव्वल दर्जाचे हार्मोनियम वादक होते. हार्मोनियम या मूळ वाद्याची जवळीक अॅकॉर्डियन, ऑर्गन या वाद्यांशी असली, तरीही तिची निर्मिती भारतीय संगीतासाठी नव्हती. चिमोटे यांनी पन्नास वर्षांपूर्वी तिला भारतीय रुपडे चढवले आणि तिला येथील संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले. हार्मोनियमचे आगमन होण्यापूर्वीच्या काळात गायनाची संगत करण्यासाठी सारंगी हे तंतुवाद्य उपयोगात येत असे. वादकांच्या कर्तृत्वाने हार्मोनियमने गायनाच्या साथीचे वाद्य म्हणून प्रवेश केला आणि आता ते वाद्य भारतीय संगीताच्या मैफलीतील एक अविभाज्य घटक बनले आहे. पंडित चिमोटे यांनी परदेशी बनावटीच्या स्वर निर्माण करणाऱ्या स्वरपट्टय़ांवर भारतीय स्वरांचे केलेले आरोपण फारच यशस्वी झाले. गंधार हा स्वर भारतीय संगीतातील एक स्वयंभू स्वर समजला जातो. गंधाराच्या स्वरावर आधारित त्यांनी तयार केलेल्या हार्मोनियमचे नावही आपोआप ‘संवादिनी’ असे झाले आणि मग ती भारतीयच होऊन गेली. चिमोटे यांचा जन्म नागपूरचा आणि कर्मभूमी मुंबई. लहानपणी पंडित भीष्मदेव वेदी या प्रख्यात वादकाकडून त्यांनी हार्मोनियम वादनाचे धडे घेतले आणि मग त्यावर स्वप्रतिभेने नवनवीन प्रयोग केले. भारतातील अनेक दिग्गज कलावंतांबरोबर त्यांनी मैफलींमध्ये साथ केली होती. जेव्हा हे वाद्य स्वतंत्रपणे संगीत निर्माण करू शकते असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला, तेव्हा त्यांनी साथ करणे बंद केले आणि त्यानंतर केवळ स्वतंत्रपणे संवादिनीचे एकलवादन करण्यासाठीच आपले आयुष्य व्यतीत केले. मैफलीत गायकाच्या बाजूला असणारे हे वाद्य तिच्या मध्यभागी आणण्याचे श्रेय पंडित चिमोटे यांना द्यायला हवे. भारतातल्या सगळ्या संगीत महोत्सवात त्यांच्या संवादिनी वादनाने रसिकांची वाहवा मिळवली. ‘सूरमणी’, राज्य शासनाचा पुरस्कार, आदर्श संगीत शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. त्यांनी विद्यादानाचे जे मोठे कार्य केले, त्यामुळे अनेक युवक संवादिनी वादनाकडे वळू लागले. व्हायोलिन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते. त्यांच्या निधनाने संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने झळाळणाऱ्या एका विद्वान कलावंताचा अस्त झाला आहे.
पं. मनोहर चिमोटे
भारतीय संगीतात वाद्यसंगीताचे एक स्वतंत्र आणि समृद्ध असे दालन आहे. वाद्यांमधून अभिजात संगीताचा संपन्न अनुभव देऊ शकणाऱ्या प्रतिभासंपन्न कलावंतांची खाणच भारतात गेल्या काही शतकांमध्ये निर्माण होत आलेली आहे. भारतीय संगीताच्या अभिव्यक्तीसाठीच्या वाद्यांबरोबरच परदेशातून आलेल्या रीड ऑर्गन (पायपेटी) किंवा हार्मोनिअम या वाद्यांनी भारतीय संगीतात गेल्या दोन शतकांच्या काळात भरीव कामगिरी केली आहे.
आणखी वाचा
First published on: 10-09-2012 at 04:07 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vaikti vedh vaikti vedh pandit manohar chimote indian music harmonium