अफझल गुरूला राजकीयदृष्टय़ा सोयीच्या वेळी फासावर लटकावले म्हणजे मोठी कामगिरी केली असे काँग्रेसजनांनी मानण्याची गरज नाही आणि अफझल गुरूची फाशी हेच राष्ट्रासमोरचे उद्दिष्ट आहे असा ताठरपणा विरोधकांनी दाखवल्याने आता विरोधकांच्या कंपूत एकदम रितेपण आले असल्यास ते नैसर्गिक समजायला हवे.
कोणाचाही मृत्यू साजरा करणे हा असंस्कृतपणाच. दहशतवाद्याचादेखील. त्यामुळे कसाब असो वा अफझल गुरू, त्यांना फासावर लटकावल्यानंतर राजकीय पक्षांनी, नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवणे वा फटाके फोडून आनंद साजरा करणे हे केवळ त्यांच्यातील प्रौढतेचा अभावच दाखवते असे नाही, तर राजकीय समजाचा अभावदेखील अधोरेखित करते. अमेरिकी गुप्तहेर यंत्रणेच्या सूत्रधारांनी जेव्हा यशस्वीपणे ओसामा बिन लादेन याचा माग काढून पाकिस्तानातील अबोताबाद येथे त्यास टिपले, तेव्हा त्यांना ओसामाच्या मरणाचा उत्सव साजरा करावा असे वाटले नाही. या मोहीम सूत्रधाराची जेव्हा खात्री झाली की मारला गेला तो ओसामाच होता, तेव्हा त्याला रडू आवरले नाही. याउलट वागणे होते काही कनिष्ठ अमेरिकी सैनिकांचे. अफगाणिस्तान वा इराक, जेथे जेथे अमेरिकी सैनिकांनी कथित शत्रुपक्षाकडील दहशतवाद्यांना ठार केले तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर हे अमेरिकी सैनिक हे विजयोन्मादात होते आणि त्यांचे वागणे हे असंस्कृतपणाचेच निदर्शक होते. त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यावर इस्लामी जगातील वातावरण अधिकच अमेरिकेविरोधात गेले. गेल्याच महिन्यात पाकिस्तानी जवानांनी भारतीय सैनिकास ठार मारून त्याच्या देहाची विटंबना केली, त्यामागेदेखील हीच असंस्कृत मानसिकता होती. तेव्हा कसाब वा अफझल गुरू यांना फाशी देणे हा कायद्याच्या अंमलबजावणीचा भाग जरी असला तरी ती फाशी साजरी करणे अयोग्य आहे. त्यामुळे अफझल गुरूच्या फाशीनंतर काहींना विजयक्षण साजरा करावा असे वाटत असेल तर ते असंस्कृतपणाच्याच जवळ जाणारे आहे. अलीकडच्या काळात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने अशा असंस्कृत उत्सवप्रेमींसाठी दोन संधी दिल्या. पहिल्यांदा अजमल कसाब या पाकिस्तानी दहशतवाद्यास फासावर लटकावून आणि आता अफझल गुरू यास अल्लाघरी पाठवून. ज्यांनी या दोघांच्या मरणाचे पेढे वाटले त्यांना या दोघांच्या कृत्यांमागील फरकदेखील समजावून घ्यावासा वाटला नाही, हे दुर्दैव.
२६/११ चा वेडा आणि नृशंस नरसंहार आणि संसदेवरचा ११ डिसेंबर २००१ चा हल्ला या दोन भिन्न घटना आहेत. या दोन्ही घटनांमागील प्रेरणांना पाकिस्तानातून फूस होती. हा त्यातील एकमेव समान धागा. २६/११ चा मुंबईतील हल्ला हा पाकिस्तानी नागरिकांकडूनच झाला होता, तर संसदेवरील हल्लेखोर हे भारतीय होते. गेल्या महिन्यात फासावर लटकलेला कसाब हा पाकिस्तानी होता, तर अफझल गुरू भारतीय. त्यामुळेच या दोघांच्या प्रेरणा भिन्न होत्या. त्यांचा विचार करताना आपल्याच एका प्रदेशातील एखाद्यास देशाविरोधात युद्ध का पुकारावेसे वाटले, याचाही विचार व्हायला हवा. तो केल्यास या दहशतवादामागील भावनांची जाणीव होईल. कोणताही दहशतवाद जन्माला येतो आणि फोफावतो तो प्रस्थापित व्यवस्था स्थानिक भावनांचा आदर करण्यास कमी पडल्यावर. अमेरिका आणि अन्य पाश्चात्त्य देश इस्लामी मूलतत्त्ववादाविरोधात कंठरव करीत असतात, पण त्यांनाही या वास्तवाची जाणीव आताच होऊ लागली आहे. याआधीचे अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी हुच्चपणाने सर्वच इस्लामींना दहशतवादी ठरवण्याचा अगोचरपणा केला; परंतु त्यामागील प्रेरणांचा विचार करण्याचे बौद्धिक कष्ट त्यांनी कधी घेतले नाहीत. कदाचित त्यांच्या तो कुवतीचा प्रश्न असावा; परंतु त्यांनी दहशतवादामागील प्रेरणांचा विचार केला असता तर त्यांनाही हेच जाणवले असते की, या दहशतवादामागे आहे तो व्यवस्थेविरोधातील असंतोष. ज्या भूभागांतील नैसर्गिक साधनसंपत्तीवर अमेरिका आणि पाश्चात्त्य जगाच्या प्रगतीचा डोलारा उभा आहे तो प्रदेश मात्र किमान प्रगतीपासूनदेखील वंचितच ठेवला जात असेल तर अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांविरोधात तेथे नाराजी असणारच हे समजून घ्यायला हवे. पुढारलेल्या देशांच्या प्रगतीमागे आहे पश्चिम आशियायी देशांतील वाळवंटात दडलेले तेल. या तेलाने विकासाला इंधन दिले, पण जेथून ते मिळाले त्या प्रदेशातील जनतेसाठी विकास हे मृगजळच राहिले. परिणामी त्या परिसरातील नागरिकांच्या मनातील नाराजीने हिंसक रूप घेतले आणि पाश्चात्त्य जग त्यास दहशतवाद म्हणू लागले. धर्माचा शिरकाव यात नंतर झाला. इस्रायल आणि पॅलेस्टाइन याबाबतही हेच म्हणता येईल. पॅलेस्टिनींना राग याचा आहे की, अमेरिका इस्लामी देशांतून नैसर्गिक साधनसंपत्ती शोषून घेते आणि त्यातलाच काही वाटा इस्रायलला आपल्याच विरोधात कारवाईसाठी पुरवते. या मायभूमिहीन पॅलेस्टिनींची परवड त्यामुळे संपतच नाही. दहशतवाद जन्माला येतो तो या अस्वस्थांच्या वाढत्या गर्दीतून. पाकिस्तानला हवी आहे ती ही अस्वस्थता. जम्मू काश्मीरचा प्रश्न पॅलेस्टिनच्या धर्तीवर धगधगता ठेवण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न असून त्या प्रयत्नांना हाणून पाडणे हे आपले कर्तव्य असायला हवे. याचे कारण असे की, पाकिस्तानसाठी जम्मू काश्मीरची फारकत ही वाहती जखम असून भारताला या मुद्दय़ावर धडा शिकवणे हा एककलमी कार्यक्रम त्या देशाचा असतो. पाकिस्तानातील एकाही राजकारण्यास जम्मू काश्मीरचा प्रश्न सोडून देणे परवडणारे नाही. खेरीज पाकिस्तानात या प्रश्नात जसे राजकीय हितसंबंध गुंतले आहेत तसेच लष्करीही. हा प्रश्न सतत खदखदता ठेवून लष्कराची शस्त्रसज्जता वाढवण्याचा आभास निर्माण करायचा, त्यासाठी अधिकाधिक आर्थिक तरतूद करून घ्यायची आणि राष्ट्रप्रेमाच्या नावावर स्वत:चे भले करायचे हा पाकिस्तानी लष्कराचा कार्यक्रम आहे. ज्येष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचा या सगळ्यांत थेट हात आहे आणि मिळेल त्या मार्गाने हा प्रश्न चिघळवत ठेवणे हे त्यांच्यासाठी आवश्यक कर्तव्य आहे. भारत-पाकिस्तान प्रेमगीते गाणारे भोजनभाऊ त्याकडे दुर्लक्ष करतात आणि राजकारणी अनावश्यक त्वेषाने हा प्रश्न धगधगत ठेवतात.
हे वास्तव आहे. त्यामुळे ते लक्षात घेऊन अफझल गुरूला फाशी दिले म्हणजे काही मोठी कामगिरी केली असे काँग्रेसजनांनी मानण्याची गरज नाही आणि विरोधकांनी समस्त राष्ट्रवादाची भावना त्याच्या फाशीभोवती जिवंत ठेवण्याचीही गरज नाही. त्याला जिवंत ठेवण्याचे आणि राजकीयदृष्टय़ा सोयीच्या वेळी फासावर लटकावण्याचे राजकारण काँग्रेसजनांनी केले आणि त्याला फाशी देणे हेच एकमेव राष्ट्रासमोरचे उद्दिष्ट आहे असा ताठरपणा विरोधकांनी दाखवला. तेव्हा अफझल गुरूच्या फाशीनंतर विरोधकांच्या कंपूत एकदम रितेपण आले असल्यास ते नैसर्गिक समजायला हवे. एखाद्या दहशतवादय़ास फाशी न देणे वा देणे हा देशातील दोन मुख्य राजकीय पक्षांचा प्रमुख मुद्दा असेल तर ते राजकारण प्रौढतेच्या पातळीवर अद्याप पोहोचायचे आहे, असेच मानायला हवे. यातील मोठा दोष हा काँग्रेसच्या पदरात घालायला हवा. याचे कारण असे की, अफझल गुरूच्या गुन्हय़ावर सर्व पातळ्यांवर शिक्कामोर्तब होऊनही त्या पक्षाने केवळ राजकीय कारणांसाठी हा प्रश्न आणि अफझल गुरू या दोघांना जिवंत ठेवले. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला आणि अन्यांचा या फाशीस विरोध होता. आताही काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद आदींनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही, हे सूचक म्हणावयास हवे. आम्ही कायद्याचे पालन केले, असे काँग्रेसजन आता सांगत आहेत. परंतु मुद्दा हा आहे की, ते इतके दिवस का गेले नाही. तसे ते केले असते तर तो प्रश्न चिघळला नसता, परंतु महत्त्वाचे प्रश्न मिटवण्याऐवजी ते चिघळवत ठेवण्याचे आणि दोन्ही बाजूंनी राजकीय फायदा उठवण्याचे काँग्रेसजनांचे कौशल्य वादातीत आहे. ते आताही दिसून आले.
तेव्हा फाशीच्याच नव्हे तर सर्वच महत्त्वाच्या प्रश्नांना बसलेला राजकारणाचा फास आधी सुटायला हवा. योग्य वेळी फास आवळण्याइतकेच राजकारणाचा फास सोडवणे हेदेखील महत्त्वाचे आहे. त्याची आज जास्त गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा