नाही ऐसो जनम् बारंबार! श्रीसद्गुरूही मनुष्य रूपात आहेत आणि मलाही माणसाचा जन्म लाभला आहेच, त्यातही मोठी गोष्ट अशी की त्यांची भेटही झाली आहे आणि त्यांच्या सहवासाचाही लाभ झाला आहे. असा जन्म वारंवार मिळत नाही! श्रीगोंदवलेकर महाराजांनी देह ठेवला तेव्हा ब्रह्मानंदबुवा पुतण्याला म्हणाले, ‘दोन आण्यांत परब्रह्म पहाता येत होतं रे!’ म्हणजे गोंदवल्याला दोन आण्यांत जाता येत होतं आणि देवांनाही दुर्लभ असा श्रीमहाराजांचा संग प्राप्त करून घेता येत होता. नाही ऐसो जनम् बारंबार! स्वामी स्वरूपानंद यांचा सहवास पावसमध्ये ज्यांना लाभला, शिर्डीत जे साईबाबांबरोबर होते, गजाननमहाराजांबरोबर जे शेगावी राहात होते, गोंदवल्यास जे श्रीगोंदवलेकर महाराजांबरोबर राहात होते, त्यांच्या भाग्याचा हेवा आज आपल्याला वाटतोच ना? असा जन्म मिळणं खरंच दुर्लभ आहे, असंही आपल्याला वाटतंच ना? त्यांच्या सहवासाचं मोल कळो किंवा न कळो, त्या सहवासाचा ठसा उमटतोच. ज्यांना त्या सहवासाचं खरं मोल कळत नाही त्यांना एक धोका असतो तो असा की अशा लोकांना आध्यात्मिक भाषा चांगली बोलता येते, महाराजांजवळ असल्याचाही एक अहंकार मनात घर करतो, अनेकदा भौतिक सोयी आणि कायमचा लोकांचा मानही मिळतो, निर्भयतेचा लाभ होतो पण त्यातून दुसऱ्याशी बेपर्वाईची वागणूकही होऊ शकते. ज्यांना महाराजांबरोबर राहतो, एवढय़ानं आपण कुणी मोठे झालो नाही, हे कळतं आणि आपल्या या परमभाग्याचं ज्यांचं भान कधी लोपत नाही ते या सहवासानं संस्कारित होतात. उदारता, करुणा, सहज व निर्हेतुक प्रेम यांचा हा अमीट संस्कार असतो. सद्गुरूंच्या संस्कारशील सहवासातून अवघ्या घराला कसा निवांतपणा लाभतो आणि कशी निर्भयता, निश्िंचती लाभते, हे स्वामींची कृपा लाभलेले देसाई कुटुंब, गोंदवलेकर महाराजांची कृपा लाभलेलं केतकर कुटुंब अशा काही उदाहरणांवरून सहज उमगेल. जगातल्या आणि रक्ताच्या नात्यात स्वार्थप्रेरित दृष्टी असते, याचा उल्लेख आपण गेल्या आठवडय़ातच केला. पण जेव्हा एखादं घर किंवा साधकांचा गोतावळा हा सद्गुरूकेंद्रित होतो, सद्गुरू हेच सर्व साधकांच्या गोतावळ्याचं केंद्रस्थान बनतात तेव्हा गुरूप्रेमाच्या एकाच नात्यात सर्वचजण गुंफले जातात. विखुरलेली फुलं एकाच दोऱ्यात ओवावीत आणि त्या हारातल्या प्रत्येक फुलाचं वेगळेपण न जाणवता संपूर्ण हारानंच मन मोहून घ्यावं आणि त्यानं मनाला प्रसन्नता वाटावी, तशी सद्गुरूच्या छत्राखाली नांदणारी विविध आर्थिक, सामाजिक स्तरातली मंडळी एका हाराप्रमाणेच एकसंध, प्रसन्न भासतात. गुरुबंधुत्वाचं नातं जगातल्या सर्व नात्यांपेक्षा अधिक चिवट असतं. कारण सर्वाचा आधार, सर्वाचं लक्ष्य, सर्वाच्या प्रेमाचा स्रोत एक सद्गुरूच असतो. जोवर या एकाकडचं लक्ष ढळत नाही तोवर ही नाती अभंगच राहातात. प्रपंच तापानं तापलेला जीव अशा सद्गुरूमय घरात काही क्षणापुरता जरी गेला तरी त्याच्या मनाला मोठा निवांतपणा मिळतो. याच जगात निर्हेतुक, निस्वार्थ आणि उदात्त संस्कारांना जपणारं घरही आहे, हा अनुभव अत्यंत प्रेरक असतो.

Story img Loader