चैतन्य चिंतन
तेव्हा आपलं खरं प्रेम केवळ स्वतवरच आहे. आपलं प्रपंचातील माणसांवरही जे प्रेम आहे तेसुद्धा ‘मी’केंद्रितच आहे. ‘मी’वर आधारितच आहे. आपला ‘मी’ सुखावतो, आपल्या ‘मी’ला आधारवत वाटतं म्हणून आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तींचं असणं आवडतं आणि आपल्या ‘मी’चा आधार गमावल्याच्या दुखामुळे आपल्या आवडत्या व्यक्तींचं नसणं वा कायमचं जाणं आपल्याला शोकमग्न करतं. तेव्हा आपलं खरं प्रेम भ्रामक ‘मी’वरच आहे आणि तिथे प्रेमही आहे आणि भ्रमही आहे म्हणूनच त्याची शंका नाही. श्रीमहाराजांच्या ज्या तीन बोधवचनांचा मागोवा आपण घेत आहोत त्यातलं दुसरं वाक्य म्हणजे, ‘ज्या गोष्टीचे अतिशय प्रेम असते तेथे मन एकाग्र होते. आपण एकाग्रतेचा विचार करतो. पण तो विचारच एकाग्रता बिघडवतो’ आता या वाक्याचे सरळ दोन भाग आहेत. ‘ज्या गोष्टीचे अतिशय प्रेम असते तेथे मन एकाग्र होते’ हा वाक्याचा पूर्वार्ध आहे. उत्तरार्ध दिसतो तितका सोपा नाही. तो फार गूढ आहे. पण पूर्वार्धच जाणून घेताना आधी आपलं आपल्यावर जे प्रेम आहे त्याचा खरेपणाही तपासून पाहावा लागेल. आपलं भ्रामक ‘मी’वर आणि दृश्यात प्रपंचरूपानं त्यानं जो पसारा निर्माण केला आहे त्यावर प्रेम आहे, असं आपण म्हणतो. पण हे खरं प्रेम नव्हेच. जिथे प्रेम आहे तिथे तृप्ती असलीच पाहिजे. आपण स्वतबद्दल, स्वतच्या परिस्थितीबद्दल आणि प्रपंचाबद्दल कधीच तृप्त नसतो. त्यामुळे ते प्रेमही खरं, निरपेक्ष नाही. मग ज्यायोगे एकाग्रता सहज होते असं खरं प्रेम काहीतरी वेगळंच असलं पाहिजे. श्रीगोंदवलेकर महाराज तर एकाग्रतेला शेवटची पायरी मानतात. श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, ‘‘सगळी वृत्ती नाहीशी झाल्यावर ध्यान लागते. एकाग्र होणे ही शेवटची पायरी आहे. आमची एकाग्रता प्रपंचातही कोठेच नाही.’’ (बोधवचने/ अनु. २१३) समजा दोन व्यक्तींचं प्रेम आहे. ते प्रेम पूर्णत्वास कधी जातं? जेव्हा दोघेही प्रेमरूपच होऊन जातात. प्रेम हा सहजस्वभाव होतो तेव्हा. जेव्हा स्वतचं वेगळेपण जोपासणाऱ्या वृत्ती मावळतील तेव्हाच अशी स्थिती होऊ शकते. ‘मी’पणाचं भान सांभाळायचा आधार असलेल्या या वृत्तीच मावळल्या की ज्यावर प्रेम आहे त्याचंच ध्यान मात्र होणार. ते ध्यान म्हणजे ध्यास. ते झालं की मग कुठे एकाग्रता येणार. पण अशी स्थिती आमची प्रपंचातही नाही आणि म्हणूनच प्रपंचातही एकाग्रता नाही. साधं उदाहरण घ्या. प्रपंचातलं कोणतंही काम करायचं ठरवलं तरी किती उलटसुलट विचार मनात थैमान घालतात. त्या कृतीच्या फळाबाबत मनात किती शंकाही असतात. तेव्हा प्रपंचातही आपण व्यग्र आहोत पण एकाग्र नाही. व्यग्रता म्हणजे एकाग्रता नव्हे. प्रपंचातही आपण एकाग्र नाही कारण वास्तविक जो ‘मी’ आहे त्याचंच भान नसल्याने सर्वच दिशा चुकली आहे. आता या वाक्याचा उत्तरार्ध आहे – ‘आपण एकाग्रतेचा विचार करतो. पण तो विचारच एकाग्रता बिघडवतो’ याचा अर्थ काय असावा?
१६. प्रेमभ्रम
तेव्हा आपलं खरं प्रेम केवळ स्वतवरच आहे. आपलं प्रपंचातील माणसांवरही जे प्रेम आहे तेसुद्धा ‘मी’केंद्रितच आहे. ‘मी’वर आधारितच आहे. आपला ‘मी’ सुखावतो, आपल्या ‘मी’ला आधारवत वाटतं म्हणून आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तींचं
First published on: 22-01-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love phantom