सिंचन घोटाळय़ाच्या तपासासाठी ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना झाली. तिने दिलेला अहवाल सरकारने जाहीर केला नसला, तरीदेखील सरकारने अधांतरी काय लटकत ठेवले आहे, हे लोकांना कळणारच. राज्यपालांची नापसंती यासंदर्भात पुरेशी बोलकी आहे..
सिंचनाच्या संदर्भात गेल्या आठवडय़ातील दोन महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या आहेत. राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेल्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे समितीचा अहवाल सरकारला सादर झाला. दुसरी तितकीच महत्त्वाची घटना म्हणजे सिंचनाच्या मुद्दय़ावर राज्य सरकारने सरळसरळ राज्याचे घटनात्मक प्रमुख असलेल्या राज्यपालांनाच ठेंगा दाखविला. आपल्या आदेशाचे पालन होत नसल्याबद्दल राज्यपालांना तीव्र नापसंती व्यक्त करावी लागली. सरकार दाद देत नसल्याने शेवटी राज्यपालांना शासनाची खरडपट्टी काढावी लागली. चितळे समितीचा अहवाल सरकारने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेला नसल्याने सध्या तरी कळते-समजते या पातळीवरच या अहवालावर भाष्य करण्यात येत आहे. पण सिंचन खात्यात राज्यकर्त्यांनी जो काही घोळ घातला तो लक्षात घेता कोणतीही समिती सारे काही आलबेल असल्याच निर्वाळा देण्याची सुतराम शक्यता नाही. ‘आदर्श’ चौकशी अहवालात थेट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर ठेवण्यात आला, तसा ठपका उपमुख्यमंत्री वा तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार वा विद्यमान मंत्री सुनील तटकरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे का, याबाबत उत्सुकता आहे. समितीचे प्रमुख चितळे यांनी सूचित केल्याप्रमाणे कोणाच्या विरुद्ध थेट असा ठपका ठेवण्यात आलेला नाही. म्हणजेच अशोक चव्हाण जसे अडकले तसे अजित पवार सिंचन घोटाळ्यात अडचणीत येणार नाहीत, असा अंदाज आहे. चौकशी समितीने जलसंपदा खात्याची कार्यपद्धती, प्रकल्पांच्या किमती फुगविणे, सुधारित प्रशासकीय मान्यता देताना झालेला घोळ यावरून जलसंपदा खात्यावर ताशेरे ओढले आहेत. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यानंतर पंतप्रधान पॅकेज जाहीर करण्यात आले. या पॅकेजमधील कामे करताना सिंचन वाढण्यापेक्षा राज्यकर्ते व नेत्यांचेच भले झाले, मग सिंचन घोटाळ्यावरून आरोप सुरू झाले तेव्हा नैतिकतेच्या मुद्दय़ावर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यातून बाहेर पडेपर्यंत सरकारमध्ये असणार नाही, असे जाहीर केले होते. पण चौकशी समिती स्थापन होण्यापूर्वीच अजित पवार सरकारमध्ये परतले. चौकशी समितीने ठपका ठेवला वा नाही, हे अधिकृतपणे अद्याप जाहीर झालेले नसले तरी अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीला बट्टा लागलाच. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या यशानंतर मुख्यमंत्रिपदासाठी वेगाने सुरू झालेल्या अजितदादांच्या घोडदौडीला सिंचन घोटाळ्यामुळे लगाम बसला. उच्चपदस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समितीने खात्याच्या कार्यपद्धतीबरोबरच प्रकल्पांच्या किमती वाढविण्यात आल्याची बाब गंभीर असल्याचे नमूद केले आहे. खात्यात गोंधळ, आर्थिक गैरव्यवस्थापन वा बेशिस्त असते तेव्हा त्या खात्याचे प्रमुख असलेल्या मंत्र्याला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. सिंचन खात्यात सुधारणांसाठी चितळे समितीने काही उपाय सुचविले आहेत. हे बदल राज्यकर्त्यांच्या पचनी पडण्याची शक्यता मात्र दिसत नाही.
सिंचनाबाबत राज्यकर्त्यांना कोणाचेच बंधन नको आहे. राज्यपालांना काय द्यायचे ते निर्देश देऊ देत, आम्ही आमच्या कलानेच घेणार ही राज्यकर्त्यांची भूमिका पक्की आहे. सुमारे ७० हजार कोटी खर्च करून गेल्या दहा वर्षांत सिंचनाचे नक्की क्षेत्र किती वाढले हा राज्यात वादाचा मुद्दा ठरला आहे. मग पैसे गेले कोठे, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. राज्यकर्ते-अधिकारी-ठेकेदार यांच्या अभद्र युतीने जेवढे ओरबाडता येईल तेवढे ओरबाडले. चितळे समितीकडे चौकशीचे काम सोपविताना जबाबदारी निश्चित करण्याचे कलम कार्यकक्षेत होते. या घोटाळ्याला अधिकाऱ्यांबरोबरच नेतेमंडळीही तेवढेच जबाबदार आहेत. प्रकल्पांच्या खर्चात २०० ते ४०० टक्क्यांपर्यंत वाढ दाखविण्यात आली. पाच-दहा अधिकाऱ्यांना घरी बसवून सिंचनावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकाण्याचा प्रयत्न केला जाईल. एरवी विदर्भात बदली झाल्यावर ती टाळण्याचा जलसंपदा खात्यात अभियंत्यांकडून प्रयत्न व्हायचा. पण पंतप्रधान व राज्य पॅकेजचे पैसे आल्यावर अभियंत्यांना अचानक विदर्भाचे प्रेम का आले, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सरकारमध्ये अनेक अहवाल येतात आणि ते बासनात जातात. ‘आदर्श’ चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर सरकारने अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून दिले. चितळे समितीच्या अहवालाचीही हीच गत होता कामा नये. कारण सिंचनाचे मुरलेले ‘पाणी’ गेले कोठे हे सत्य बाहेर आले पाहिजे. अन्यथा आणखी एक चौकशी अहवाल सरकारला सादर झाला एवढय़ावरच थांबता कामा नये.
सिंचनाचे ‘पाणी’ मुरले कुठे?
सिंचन घोटाळय़ाच्या तपासासाठी ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-03-2014 at 12:53 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhav chitale panel submits report on irrigation scam to maharashtra govt