बाजारपेठेवर हुकमत न मिळवताच तिला शरण जाणे हे कफल्लकतेची हमी देणारे असते. मॅगीच्या निमित्ताने हे दिसून आले..
नवमध्यमवर्गीय घराघरांतील कुलदीपक आणि दीपिकांच्या आनंदाचे आणि त्यांच्या मातोश्रींच्या पाककलानिपुणतेचे निधान असलेल्या मॅगीनामक खाद्यपदार्थावर बंदीचे फतवे निघू लागल्याने आधीच मंदीने ग्रासलेल्या या वर्गाचे जगणे हराम झाले आहे. मॅगीच नसेल तर आपापल्या मुलाबाळांना दोन जेवणांच्या मधल्या पाच वा सहा न्याहाऱ्यांचे काय करायचे याची चिंता या वर्गातील मातांना लागून राहिली असून जागोजागच्या स्पा आणि पार्लरांमध्ये यावर उपाय काय यावर फेशियल चर्चा रंगू लागल्या आहेत. मॅगी हे नेस्ले या बहुराष्ट्रीय बलाढय़ कंपनीचे उत्पादन. तिचे मुख्यालय आल्प्स कुशीतील स्वित्र्झलड या देशातील. या कंपनीच्या चॉकलेट आणि अन्य उत्पादनांनी इतके दिवस या वर्गाची तोंडे गोड झालेली. त्यात ही कंपनी म्हणजे घराघरांतील एमबीएउत्सुकांना खुणावणारी. तेव्हा या कंपनीकडून हे पाप होईलच कसे यावर या महिलांच्या टायधारी पतिराजांकडून तावातावाने खंडनाचे प्रयत्न होऊ लागले आहेत. या मॅगीत मोनोसोडियम ग्लुटामेट ऊर्फ अजिनोमोटो नावाचा रासायनिक पदार्थ आणि अतिरिक्त प्रमाणात शिसे आदींचे प्रमाण आढळल्याचे उत्तर प्रदेश राज्यातील अन्न निरीक्षकाचे म्हणणे आहे. या निरीक्षकाने दैनंदिन कर्तव्याचा भाग म्हणून बाराबंकी नामक महानगरातील दुकानांतून हे मॅगीचे नमुने तपासासाठी गोळा केले. सरकारी प्रयोगशाळांत त्याचे पृथक्करण केले असता हे विषारी घटक त्यात आढळले. मुदलात उत्तर प्रदेश हे राज्य काही अन्न वा कोणत्याच घटकाच्या शुद्धतेच्या आग्रहासाठी ओळखले जाते असे नाही. किंबहुना या महान भारतवर्षांतील जे काही कलंकित, अशुद्ध आणि अप्रामाणिक ते ते या वा बिहार आदी राज्यांशी जोडले गेले आहे. त्यात पुन्हा या राज्यांतील बकाल शहरांच्या धूळभरल्या रस्त्यांवरून पकोडा, जिलबी आदी पदार्थ ज्या किळसवाण्या पद्धतीने विकले जातात त्यातून त्यांच्या शुद्धतेचा विचारसुद्धा त्या सरकारच्या मनात कधी आल्याचे इतिहासातदेखील ऐकिवात नाही. तेव्हा अचानक मॅगीच्या शुद्धाशुद्धतेची उठाठेव या सरकारास का करावीशी वाटली, असा प्रश्न जे जे उत्तर प्रदेशास जाणतात त्यांच्या मनात आल्यावाचून राहणार नाही. या सरकारला कायद्याची इतकी चाड की नुसत्या मॅगीवर बंदी आणून त्याचे समाधान झाले नाही. या मॅगीची जाहिरात करणारे थोर कलाकार अमिताभ बच्चन आणि आपले रिकामटेकडेपण झाकण्यासाठी काहीही करणारी माधुरी दीक्षित यांच्यावरही कारवाई करण्याची तयारी त्या सरकारने चालवली आहे. या कलाकारांच्यामुळे मॅगीचा प्रसार होण्यास मदत झाली म्हणून म्हणे त्यांच्यावर कारवाई. हे बच्चन एके काळी उत्तर प्रदेशचे सदिच्छादूत होते आणि राज्याचे नेतृत्व ज्यांच्या हाती आहे त्या यादव परिवाराचे घटक होते. पुढे त्यांचे फाटले. तेव्हा यानिमित्ताने बच्चन यांचे जुने हिशेब चुकते करावेत असे वाटले नसेलच असे नाही. परंतु एकटय़ा बच्चन यांच्यावरच कारवाई करणे बरे दिसले नसते म्हणून दीक्षितबाईंनाही त्यात सरकारने ओढले असणार. माधुरीबाईंचे तेवढेच भले. यानिमित्ताने तेवढेच नाव प्रकाशात. असो. यामागील प्रमुख मुद्दा हा की मॅगी या पदार्थात खरोखरच घातक पदार्थ आहेत का, हा. हा पदार्थ जगात अन्यत्रही विकला जातो. त्या देशांतही असाच प्रकार होत असेल का? त्यातही युरोप, अमेरिका आदी विकसित देशांतील मॅगी आणि भारतासारख्या तिसऱ्या दरिद्री जगातील मॅगी यांच्या दर्जात फरक असेल का?
या प्रश्नांचे उत्तर निश्चितच होकारार्थी आहे. याचे कारण आपली व्यवस्था आणि तिच्याकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष. तिसऱ्या जगातील देशांना मानवी आयुष्याचे मोल नसते, असा इतिहास आणि वर्तमान आहे. त्यामुळे औषधांच्या चाचण्या असोत की घातक अन्नपदार्थ असो. भारतासारखे देश या बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्रयोगांसाठी नेहमीच आवडतात. ज्या देशात जगाने बंदी घातलेले डीडीटीसारखे अतिघातक कीटकनाशक अजूनही सहजपणे वापरले जाते, त्या देशास अन्नपदार्थाच्या सुरक्षेविषयी बोलण्याचा अधिकार आहे काय? रशियासारखा देश ज्या देशात तयार झालेली द्राक्षे दर्जाशून्यतेच्या कारणाने परत पाठवतो, त्या देशाच्या अन्नसुरक्षेविषयी काय बोलावे? तमाम भारतीय जे आंबे चोखून चोखून खाण्यात अतीव आनंद मानतात, त्या देशातील आंब्यांना युरोपच्या किनाऱ्यावरदेखील उतरवू दिले जात नाही, त्या देशातील रसायन शुद्धता काय असेल? मॅगीवर एकापाठोपाठ एकेक राज्य बंदी घालत असताना आलेली आणखी एक बातमी लक्षणीय ठरेल. वैमानिकाच्या हाती स्वतंत्रपणे विमान द्यावयाचे असेल तर त्यास किमान २०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव हवा, असे नियम सांगतो. परंतु वैमानिकांचे प्रशिक्षण देणाऱ्या आपल्या संस्था इतक्या कर्तृत्ववान की अवघ्या ३५ तास विमानोड्डाणाच्या अनुभवानंतर त्या नवशिक्या वैमानिकांना विमाने चालवण्याचे परवाने देतात, असे पाहणी अहवालात आढळले आहे. हे ज्या समाजात घडते त्या समाजाच्या व्यवस्थांवर बरे बोलता येईल असा एक तरी मुद्दा असेल काय? आपल्या देशाने रिक्षा वा टॅक्सी चालवण्याच्या बनावट परवान्यांचा अनुभव वारंवार घेतला आहे. परंतु वैमानिकांचे परवानेही बनावट निघतात, त्या देशातील नागरिकांच्या कर्मास काय म्हणावे? नेस्लेचे हे मॅगी प्रकरण उजेडात आल्यानंतर देशातील अनेकांच्या स्वदेशी भावना जागृत होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नवराष्ट्रवादाने भारलेला हा वर्ग बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांवर बंदी घाला, अशी आचरट मागणी करू लागेल. तसे करणे सोपे असते आणि आपल्यासाठी तर सांस्कृतिकदृष्टय़ा सोयीचेही ठरते. आपल्या दोषांसाठी अन्यांना आणि त्यातही परकीयांना, जबाबदार धरण्यासारखा सोयीस्कर मार्ग अन्य कोणता नाही. युगानुयुगे याच मार्गाने आपण वाटचाल करीत असल्यामुळे आपणास त्याची सवयदेखील आहे. तेव्हा आताही तसेच होण्याची शक्यता जास्त. परंतु या मार्गाचा त्याग करण्याची वेळ आता आली आहे.
याचे कारण दोष आपल्यात आहे, मॅगी वा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या धोरणांत नाही. हा दोष दूर करावयाचा असेल तर सर्वोत्तमाची भूक समाजात निर्माण करावी लागते. ती करावयाची असेल तर चटकदार घोषणांच्या पलीकडे जाण्याची तयारी लागते. ती आपल्यात आणि आपल्या नेतृत्वात आहे काय, हा प्रश्न यानिमित्ताने विचारी जनांनी स्वत:स विचारून पहावा. जेआरडी टाटा म्हणत, अतिउत्तमाची आस धरलीत तरच हातून काही चांगले होईल. तुमचे उद्दिष्टच चांगले काही करावे असे असेल तर तुमच्या हातून बरेदेखील काही घडणार नाही. म्हणजे माधुरी दीक्षित व्हायचे हेच जर उद्दिष्ट असेल तर सई ताम्हणकरदेखील होता येत नाही, हा त्याचा अर्थ. आपल्या समाजाचे हे असे झाले आहे. असा समाज मग निर्बुद्धपणे बाजारपेठेच्या मागे जातो. सधन हा जर बाजारपेठपतित झाला तर ते एक वेळ क्षम्य. परंतु खिशात चवली नाही आणि बाजारपेठीय बलास जर समाज बळी पडत असेल तर ते धोक्याचे लक्ष. हा धोक्याचा घंटानाद गेली काही वष्रे आपल्याकडे होत असून त्याकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. याची उदाहरणे पदोपदी दिसतात. ‘आत’ काही नसले तरी चालेल पण चटपटीतपणा महत्त्वाचा असे मानून आपल्या पोराबाळांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालणारे आणि मॅगी देण्यात आपल्या पालकत्वाची कृतकृत्यता शोधणारे हे दोन्ही एकाच लायकीचे. तेव्हा दोष द्यायचा झाल्यास तो बाजारपेठीय ताकदींना शरण जाणाऱ्यांना द्यायला हवा. बाजारपेठेवर हुकमत न मिळवताच बाजारपेठ शरण जाणे हे कफल्लकतेची हमी देणारे असते. मॅगीच्या निमित्ताने हे दिसून आले. आज आपण नेस्लेस दोष दिला. उद्या अन्य कोणी. ही मालिका खंडित करावयाची असेल तर आधी या समाजाने आपला मॅगीमग्नतेचा मानसिक आजार ओळखायला हवा. तरच उपचार आणि सुधारणा शक्य होतील. अन्यथा ही मॅगीमग्न समाजाची लक्षणे तशीच राहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा