जागतिक जलदिन २२ मार्चला साजरा झाला. आपला देश गरीब राहणार की श्रीमंत होणार हे पाण्यावर अवलंबून आहे. जल व्यवस्थापन म्हणजे केवळ धरणे बांधून पाइपलाइन्स शहरांपर्यंत नेणे व पाण्याचा फ्लश सोडून घरातील घाण बाहेर घालवणे एवढा मर्यादित अर्थ नाही. जलव्यवस्थापन याचा अर्थ समाज व पाणी यांच्यातील संबंध प्रस्थापित करून पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत पटवून देणे होय, त्यासाठी पाण्याचा वापर अधिक काळजीपूर्वक करण्याचा शहाणपणा आपल्या अंगी आला पाहिजे. अन्यथा सर्वाना पुरवता येईल एवढे पाणीच राहणार नाही.
जल व्यवस्थापन म्हणजे समाज व त्याची पाणी वापरण्याची क्षमता वाढविणे किंबहुना ते वाटून घेण्याची क्षमता तयार करणारे तंत्रज्ञान निर्माण करणे होय. त्यामुळे गतकाळापासून धडे घेऊन आपण पाणी वापरात शहाणपण दाखवले पाहिजे. १९९० मध्ये विज्ञान व पर्यावरण केंद्राने डाइंग विज्डम-राइज, फॉल अँड पोटेन्शियल ऑफ इंडियाज ट्रॅडिशनल वॉटर सिस्टीम्स नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात पाण्यासारखी अमूल्य संपत्ती साठवण्याच्या व वाचवण्याच्या अनेक पद्धतींची नोंद घेतली गेली आहे. विविध परिसंस्थांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जलव्यवस्थापन करण्याच्या कल्पनांची नोंदही त्यात घेतली आहे. या जल व्यवस्थापनात शीत-वाळवंटातील हिमनद्यांच्या पाण्याचे वाटप ते ईशान्येकडील भागात बांबूच्या मदतीने केल्या जाणाऱ्या ठिबक सिंचन पद्धतींचा समावेश आहे.
भारताच्या उष्ण वाळवंटात, कुंडी हे अतिशय साधे साठवण-तंत्रज्ञान वापरून जलव्यवस्थापनाचा मोठा परिणाम साधला आहे. कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या जमिनीच्या तुकडय़ावर तेथे पावसाच्या पाण्याचे संधारण करण्यात आले आहे. हे पाणी मग उतारावरून विहिरीत जाऊन साठेल अशी व्यवस्था केली आहे. पाण्याचे अंकगणित सोपे आहे, जर पाऊस एकंदर १०० मि.मी पडला आणि ते सर्व पाणी साठवले तर एक हेक्टर जमिनीवर १० लाख लिटर पाणी साठवता येते. देशात काही ठिकाणी पुराच्या पाण्याचे संधारण करण्यात आले आहे.
वेगळ्या शब्दांत सांगायचे तर लोक जास्त पाणी असताना सुखात जगण्यास शिकले आहेत; तसेच टंचाई असताना त्यातून कसे मार्ग काढायचे हेही शिकले आहेत. आपल्या देशात वर्षांला ८७६० तासांपैकी केवळ १०० तास पाऊस पडतो. एका ढगफुटीतही एवढा पाऊस पडू शकतो हेही लोकांना माहीत आहे. पावसाचे पाणी साठवून ते उर्वरित वर्षभर भूजल साठय़ात मुरवणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी जेव्हा व जिथे पडेल तिथे साठवणे. जमिनीवर किंवा जमिनीच्या खाली ते साठेल अशा रीतीने व्यवस्था करणे गरजेचे आहे.
पूर्वीच्या जलपरंपरांचा आजच्या व उद्याच्या शहरी भारताशी निकटचा संबंध आहे. आज आपली शहरे खूप लांबून पाणी मिळवतात. दिल्लीला गंगेचे पाणी टिहरी धरणातून मिळते. बंगळुरूला पाणी मिळण्यासाठी कावेरी-४ प्रकल्प उभारला जात आहे. त्यासाठी पाणी १०० कि.मी.पर्यंत खेचत आणावे लागेल. चेन्नईचे पाणी कृष्णा नदीतून २०० कि.मी.चा प्रवास करून येईल. हैदराबादला मांजिराचे पाणी मिळेल. शहरी-औद्योगिक पट्टय़ाच पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. पण त्यांनी त्यांची जलसाधने वाढवण्याकडे दुर्लक्ष केले. पाणी साठवण्याचे व त्याचा कमी वापर करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. जलप्रक्रिया प्रकल्पांअभावी पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याची हाव पुरवणे जड जात आहे. शहरी भागात भूजल पातळी घटत आहे, कारण बोअरच्या विहिरी खोदण्याचे प्रमाण वाढत आहे. नगरपालिका पुरेसे पाणी देऊ शकत नाहीत त्यामुळे बोअर विहिरी खोदल्या जातात व भूजलाचा उपसा केला जातो त्यामुळे त्याची पातळी कमी झाली आहे, अशा प्रकारे पाण्याची टंचाई वाढतेच आहे. पण खरी शोकांतिका वेगळीच आहे; ती म्हणजे जेव्हा पाऊस पडत नाही, तेव्हा शहरातील लोक गळा काढतात. जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा पूर आला म्हणून रडत बसतात.
भारतात आधुनिक काळात शहरांना पावसाच्या पाण्याचे महत्त्व समजून देण्याची गरज आहे. पावसाच्या पाण्याची साठवणूक म्हणजे पर्जन्य जलसंधारण प्रत्येक घरात व वसाहतीत तर झालेच पाहिजे. परंतु आता पुन्हा शहरांनजीक तरी जलटाक्या तळी बांधणे गरजेचे आहे. जवळपास प्रत्येक शहरात अशा टाक्या होत्या, ज्या पूरस्थितीत पाणी साठवून भूजलाचे पुनर्भरण करीत असत पण शहर नियोजकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी जमिनीपलीकडे दृष्टी नेली नाही. पाणी साठवण्यासाठी जमीन राखून ठेवली नाही. आज या टाक्यांच्या रूपातील जलसाठे अतिक्रमित आहेत, काहींची गटारे बनली आहेत, काहींमध्ये कचरा भरला आहे, काहींमध्ये पाणी भरले पण ते निष्काळजीपणाने वाहून जात आहे अशी दयनीय अवस्था आहे. शहरांना त्यांच्या जीवनवाहिन्यांचा विसर पडला आहे. पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाची कदर करण्याचे आपण विसरलो आहोत.
बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारद यांना पाणी साठवण्याचे, जलसंधारणाचे प्रशिक्षण दिले जात नाही. पाणी ही टाकाऊ बाब आहे व लवकरात लवकर त्याचा निचरा कसा होईल यावर त्यांचा भर असतो. भारताच्या शहरी भागात चांगले पाणी वाहून नेण्याच्या मार्गिका एकतर बंद पडल्या आहेत किंवा त्यात गटारांचे पाणी मिसळले आहे. काही ठिकाणी पावसाच्या पाण्याला वाटच करून दिलेली नाही. भारतातील संपूर्ण पिढीलाच पाण्याचे महत्त्व पटवून देण्याची वेळ आली आहे. आपलेच पूर्वीचे शहाणपण आपण किती पटकन विसरत चाललो आहोत हे दुर्भाग्यपूर्ण आहे.
जल व्यवस्थापनासाठी समाजाला निसर्गाबरोबर राहण्याचे ज्ञान पुन्हा करून घ्यावे लागेल. जेव्हा असे ज्ञानपिपासू लोक व अभिनव कल्पनांचे निर्माते असलेले लोक एकमेकांशी पाण्याच्या साठवणुकीविषयी, त्याच्या महत्त्वाविषयी विचारांचे आदान-प्रदान करून एक नवे विज्ञान व नवी कला तयार करतील, तो खरा सुदिन म्हणावा लागेल.
या दिशेने काम केले तर पुढील जलदिनाला पुन्हा त्याच त्याच पाणीटंचाई व इतर समस्यांवर विलाप करत बसण्याची वेळ येणार नाही तर पाण्याच्या थेंबाच्या जादूने पुढचा जलदिन आनंदात साजरा होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लेखिका दिल्लीतील सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायरन्मेंटच्या (विज्ञान व पर्यावरण केंद्र) महासंचालक आहेत.

 

लेखिका दिल्लीतील सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायरन्मेंटच्या (विज्ञान व पर्यावरण केंद्र) महासंचालक आहेत.