पाकिस्तान त्याच्या निर्मितीपासूनच स्वत:च्या जनतेला फसवत आला आहे आणि त्यासोबत अमेरिकेलाही. याचा अंदाज आता या दोघांनाही आला आहे, तरी त्यांचे भ्रमाचे भोपळे फुटायला तयार नाहीत. याचा सविस्तर ऊहापोह या पुस्तकात लेखकाने सज्जड पुराव्यानिशी केला आहे.
‘मॅग्निफिसंट डिल्यूशन्स’ हे पाकिस्तान व अमेरिकेच्या संबंधांवर भाष्य करणारे अतिशय माहितीपूर्ण व वाचनीय पुस्तक आहे! या संबंधांना ‘भ्रमाचा भोपळा’ असे लेखक हुसेन हक्कानी म्हणतात. हा भोपळा त्यांनी बऱ्यापैकी धमाकेदारपणे फोडला आहे. १९४७ पासून अमेरिका-पाकिस्तान संबंधांचा हा कागदपत्रांच्या साह्य़ाने घेतलेला आढावा आहे.
या पुस्तकात आपल्याला माहीत असलेली बाब म्हणजे, पाकिस्तान अस्तित्वात येत असताना अनेकांना- उदा. प्रसिद्ध विचारवंत मॉरगॅनथ यांना- इतर अनेक गोष्टींकडे, जसे भाषा, संस्कृती, आहार, विहार वगैरेंकडे दुर्लक्ष करून फक्त धर्मावर आधारित देश कसा काय तर धरून राहील- हा प्रश्न पडत होता. कारण हक्कानींनी उद्धृत केले आहे की, मुस्लीम लीगचे पुढारी ख्वाजा निजामुद्दीन, जे पुढे पाकिस्तानचे दुसरे गव्हर्नर जनरल झाले, त्यांना एका ब्रिटिश शासकाने पाकिस्तान म्हणजे त्यांना काय अभिप्रेत आहे हे विचारल्यावर ते म्हणाले की, त्यांना माहीत नाही व मुस्लीम लीगमध्येही कुणाला माहीत असेल असे वाटत नाही. आयेशा जलाल या दुसऱ्या इतिहास संशोधिकेनेही, जिनांवरच्या चरित्रात हेच म्हटले आहे. ‘फॉल्स स्टार्ट’ (‘चुकीची सुरुवात’) या पहिल्या प्रकरणात अनेक उदाहरणे देऊन त्यांनी हेच सिद्ध केले आहे की, पाकिस्तानची सुरुवात चुकीच्या पायावर झाली. यात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारताचे वागणे पण गोंधळ वाढवायला साहाय्यकारी ठरले. यासाठी त्यांनी उदाहरणे वगैरे दिलेली नाहीत.  आपल्या दृष्टीने महत्त्वाचे हे आहे की, तेव्हापासून आजतागायत भारताला फाळणी मंजूर नाही व भारत संधी मिळताच पाकिस्तानला नष्ट करेल या भीतीने ग्रासले आहे. तो हे कारण जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी अमेरिकेपुढे सतत करत आला आहे. तसेच त्यांना हीही जाणीव होती की इंग्रजांच्या कुटील राजनीतीमुळे खान अब्दुल गफारखान- ज्यांना फाळणी मंजूर नव्हती ते -भारतात अडकून पडले व डय़ुरंट रेषेमुळे विभागलेले पठाण एकत्र येऊ शकले नाहीत. पठाणांच्या पुढाऱ्यांना अखंड हिंदुस्तान वा स्वतंत्र पख्तुनिस्तान हवा होता. त्यामुळे त्यांना अफगाणिस्तान व भारताचे चांगले संबंध खुपत होते. त्याचीही त्यांना भीती वाटत होती. त्यांचे म्हणणे असे की त्यांना इतक्या मोठय़ा व अत्यानुधिक सैन्याची, भारत व पाकिस्तान या दोघांशी लढण्यासाठी गरज आहे. पुढे भारताने अलिप्ततावादी धोरण स्वीकारले. त्याचा पुरेपूर फायदा पाकिस्तानने, आम्हीच तुमचे खरे मित्र, आम्ही कम्युनिझमशी लढू, म्हणत उठवला. तिसरे कारण म्हणजे पाकिस्तान नेहमीच स्वत:ला भारताच्या समान मानत आला व त्याला त्याचे सैन्य भारताएवढेच हवे असायचे. त्याचबरोबर मदत व लष्करी साह्य़ मागायचे पण आम्ही गरीब आहोत म्हणून जास्तीत जास्त फुकट मिळवायचे व त्याच वेळी आपल्या जनतेला याविषयी खरे काहीच सांगायचे नाही. उलट प्रसारमाध्यमांमध्ये अमेरिकेविरुद्ध व भारताविरुद्ध जनमत धगधगत राहील याची काळजी घ्यायची. या थापेबाजीला अमेरिका कशी बळी पडत आली याचे आपल्याला आश्चर्य वाटत राहते.
केनेडीच्या काळात कोमेर लिहीत होते की, पाकिस्तानसाठी भारत नेहमीच समस्या राहणार आहे. पण आपण भारतासारख्या आकाराने मोठय़ा देशाला आपले म्हटले पाहिजे. दुबळ्या मित्र देशापेक्षा तटस्थ देश केव्हाही जास्त चांगला. परंतु सोव्हिएत युनियनचा बागुलबुवा अमेरिकेला तेवढाच दिसत होता, जेवढा पाकिस्तानला भारत व अफगाणिस्तानचा.
लेखक म्हणतो की याचाच फायदा पुढे पाकिस्तानने घेतला. एका प्रकरणात लेखक दाखवून देतो की, पाकिस्तानच्या सततच्या मागणीला कंटाळून व भारताला पाण्यात पाहणाऱ्या निक्सनच्या निवृत्तीनंतर पाकिस्तानविषयी सहानुभूती बाळगणाऱ्यांची संख्या कमी झाली होती. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे निक्सन-किसिंजर जोडगोळीला ढाक्यातील अमेरिकन कॉन्सुलर, वार्ताहर जीव तोडून सांगत होते, लिहीत होते की, जे चालले आहे तो वंशसंहार आहे, परंतु ते मख्ख राहिले. कारण चीनशी संबंध साधण्यासाठी त्यांना पाकिस्तानची मदत होणार होती. भारताशी झालेल्या युद्धातील प्रत्येक पराजयानंतर पाकिस्तानने कायमच दुसऱ्यावर दोष ढकलायचा प्रयत्न केला. १९७१ सालचा पराजयही असाच त्यांनी अमेरिका त्यांच्या बाजूने युद्धात उतरली नाही म्हणून असे कारण देऊन करून पाहिला. लेखक म्हणतो की, भारताशी सतत बरोबरी करणे वेडेपणाचे आहे हे अमेरिकन मुत्सद्दय़ांना कळत होते पण तसे त्यांनी पाकिस्तानला स्पष्टपणे कधीच सांगितले नाही. आता मात्र त्यांनी पाकिस्तानने जास्त मदतीची मागणी केली की कुत्सितपणे ‘मग आता भारताला हरवणार का?’ असे विचारायला सुरुवात केली. भारताने १९७१ मध्ये जिंकलेले भूभाग सोडून आपल्याला पाकिस्तान नष्ट करण्यात काडीचे स्वारस्य नसल्याचे दाखवून दिले होतेच. अफगाणिस्तानमधून चालणारी पख्तुनिस्तानची चळवळ निष्प्रभ झाली होती, तरीही पाकिस्तानला त्याचे खरे अथवा काल्पनिक भय वाटत होते. त्या वेळी अफगाणिस्तानात नूर महमद तरक्कींनी मोठय़ा प्रमाणावर जमीनसुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला. १९७३ पासून स्त्रीशिक्षणाचा कार्यक्रम राबवला जातच होता. अफगाण समाज मात्र अजूनही मध्ययुगीन मानसिकतेतच होता. या नव्या सुधारणेमुळे नाराज झालेले लोक पाकिस्तानने हाताशी धरले व मुजाहिदीन म्हणून अफगाणिस्तानात पाठवायला सुरुवात केली. लेखकाच्या म्हणण्यानुसार एकटय़ा पाकिस्तानने सोव्हिएत संघाला डिवचून त्याला अफगाणिस्तानात शिरणे भाग पाडले. याबाबत अमेरिका सर्वस्वी निष्पाप होती, यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण जाते. कारण तीव्रता कमी झाली असली तरी शीतयुद्ध अजून संपले नव्हते. डिसेंबर १९७९ला सोव्हिएत सैन्याची चढाई होण्यापूर्वी जुलै १९७९ला कार्टरनी मुजाहिदीनला छुपी मदत म्हणून ५० लाख डॉलर्स पास केले होते व सहा महिन्यांत ते खर्चही झाले होते. एकदा सोव्हिएत संघ अफगाणिस्तानात शिरल्यावर मात्र देता दोहोकरांनी अशी स्थिती अमेरिकेची झाली आणि पाकिस्तानवर पैशांची बरसात होऊ लागली. त्यानंतरचे परिणाम म्हणजे अल कायदा, जैश मोहम्मद, ओसामा बिन लादेन वगैरे. ते आपल्याला माहीत आहेच.
९१ नंतर परिस्थिती बदलली. असे काहीतरी होईल असा इशारा व्लादिमीर पुतिन अमेरिकेला देत होते. परंतु हक्कानींच्या मते अमेरिकेने ते फारसे गांभीर्याने घेतले नाही. जेव्हा हाच इशारा पुतिन यांनी पुन:पुन्हा दिला तेव्हा त्यावर थोडाफार विचार झाला. तरीही काय घडू शकेल याचा अंदाज अमेरिकेला शेवटपर्यंत येऊ शकला नाही. १९९१मध्ये सोव्हिएत युनियनची शकले झाली. उपग्रहांमुळे कुठल्याही देशांवर नजर ठेवणे सोपे झाले. लेखक म्हणतो तरीही पाकिस्तान बदलायला तयार नाही. अमेरिकेला व स्वत:च्या जनतेला फसवणे चालू आहे. पाकिस्तानच्या भूमीवर लादेनला अमेरिकेने ठार केल्यावरही स्वत:च्या जनतेला आणि अमेरिकेला फसवण्याचा प्रयत्न सुरूच आहे. लेखकाला आश्चर्य या गोष्टीचे वाटते की पाकिस्तानी लोक जगभरात हिंडतात. तरीही समाज बदलत का नाही? आणि ही बनवाबनवी अमेरिकानं कशी चालू दिली?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅग्निफिसंट डिल्यूशन्स -पाकिस्तान, द युनायटेड
अ‍ॅण्ड अ‍ॅन एपिक हिस्टरी ऑफ मिसअंडरस्टॅण्डिंग :
हुसेन हक्कानी,
पब्लिक अफेअर्स, न्यूयॉर्क,
पाने : ४१३, किंमत : ७९९ रुपये.

मॅग्निफिसंट डिल्यूशन्स -पाकिस्तान, द युनायटेड
अ‍ॅण्ड अ‍ॅन एपिक हिस्टरी ऑफ मिसअंडरस्टॅण्डिंग :
हुसेन हक्कानी,
पब्लिक अफेअर्स, न्यूयॉर्क,
पाने : ४१३, किंमत : ७९९ रुपये.