अमृतांशू नेरुरकर
फायरफॉक्सच्या निर्मितीत सुरुवातीपासूनच सुरक्षा आणि वापर सुलभता यावर लक्ष देण्यात आल्यामुळे नोव्हेंबर २००४ मध्ये जेव्हा फायरफॉक्सची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली तेव्हा लोकांच्या त्यावर अक्षरश: उडय़ा पडल्या. पहिल्या नऊ महिन्यांत तब्बल ६ कोटी वेळा फायरफॉक्सला डाऊनलोड करण्यात आलं..
१९९८ मध्ये नेटस्केप नॅविगेटरला ओपन सोर्स बनविण्यासाठी सुरू झालेला ‘मोझिला’ प्रकल्प पहिल्या काही महिन्यांच्या उत्साहवर्धक सुरुवातीनंतर दिशाहीन पद्धतीने भरकटत चालला होता. १९९९ मध्ये अमेरिका ऑनलाइन (एओएल) या कंपनीने नेटस्केपला विकत घेतल्यानंतर या प्रकल्पामधल्या तंत्रज्ञांच्या सहभागाला अजूनच ओहोटी लागली होती. २००२ पर्यंत तर या प्रकल्पाचं, तसंच नेटस्केप नॅविगेटरचं भवितव्य काही ठीक दिसत नव्हतं.
याच वेळेला नेटस्केपमध्ये काम करणारे तीन तंत्रज्ञ या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत होते. या तिघा तंत्रज्ञांची नावं होती डेव्ह हयात, जो ह्य़ूविट आणि ब्लेक रॉस! डेव्ह हयात हा नेटस्केपमधील प्रमुख तंत्रज्ञांपैकी एक होता, तर प्रोग्रामर जो ह्य़ूविट व नेटस्केपमध्ये इंटर्नशिप करत असलेला १७ वर्षांचा संगणकशास्त्राचा विद्यार्थी ब्लेक रॉस हे त्याच्या हाताखाली काम करत होते.
काही आठवडय़ांच्या विचारमंथनानंतर, या तिघांना नेटस्केपच्या ओपन सोर्स प्रकल्पाला मिळालेल्या मर्यादित यशामागची काही ठोस कारणं प्रकर्षांने जाणवली. सर्वप्रथम त्यांच्या हे ध्यानात आलं की, ओपन सोर्स असूनदेखील नेटस्केपचा मोझिला प्रकल्प खऱ्या अर्थाने ‘ओपन सोर्स’ (म्हणजेच लोकसहभागाचा) झालाच नाही. तो सदैव नेटस्केप कंपनीचाच प्रकल्प राहिला. नेटस्केपला जरी प्रकल्पात ओपन सोर्स समुदायांचा सक्रिय सहभाग अपेक्षित होता तरीही प्रकल्पाबाबतीतले सर्व निर्णय घेण्याचा अधिकार तिने मुख्यत्वे कंपनीमधल्या तंत्रज्ञांपुरताच मर्यादित ठेवला होता. यामुळे बरेच कंपनीबाह्य़ तंत्रज्ञ या प्रकल्पात सहयोग देण्याबाबत साशंक होते.
या प्रकल्पाच्या मर्यादित यशामागचा अजून एक कळीचा मुद्दा या तिघांना जाणवला तो म्हणजे ओपन सोर्स स्वरूपातल्या नेटस्केप नॅविगेटरसाठी ठरविण्यात आलेली लायसन्सिंग पद्धती! नेटस्केपने सुरुवातीलाच स्टॉलमनची जीपीएल पद्धती व्यावहारिक कारणांसाठी मोझिला प्रकल्पासाठी रद्दबातल ठरवली होती. नेटस्केपच्या ब्राऊझरमध्ये काही प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर घटकांचा उपयोग झाला होता, ज्यांची मालकी नेटस्केपकडे नव्हती. त्यांचे नेटस्केपने केवळ वापरण्याचे लायसन्स घेतले होते, ज्यामुळे त्यांचा सोर्स कोड खुला करणं नेटस्केपला शक्य नव्हतं. जीपीएल पद्धतीमध्ये प्रणालीमधल्या सर्व भागांचा सोर्स कोड खुलं करण्याचं बंधन असल्यामुळे जीपीएल लायसन्स नेटस्केपसाठी वापरणं निव्वळ अशक्य होतं.
शेवटी बऱ्याच विचारविनिमयानंतर नेटस्केपने एक मध्यममार्ग निवडला आणि नेटस्केप नॅविगेटरच्या सोर्स कोडला दोन भागांत व दोन लायसन्सिंग पद्धतीत विभागलं – एक म्हणजे मोझिला पब्लिक लायसन्स, जो बऱ्याच अंशी जीपीएलची कॉपी होता. ही पद्धती नेटस्केप तिच्या मालकीच्या सोर्स कोडवर लावणार होती जो मोझिला प्रकल्पाद्वारे संपूर्णपणे ओपन सोर्स पद्धतीने उपलब्ध राहणार होता. दुसरी लायसन्सिंग पद्धती म्हणजे नेटस्केप पब्लिक लायसन्स. या पद्धतीमधल्या सोर्स कोडला ओपन सोर्स करण्याचं कोणतंही बंधन नेटस्केपवर नव्हतं व कंपनी तो प्रोप्रायटरी पद्धतीने वितरित करू शकत होती.
नेटस्केपने यात अजून एक मेख मारून ठेवली होती. नेटस्केपच्या ओपन सोर्स स्वरूपाच्या कोडमध्ये समुदायांतर्फे केल्या गेलेल्या सुधारणा दोन वर्षांसाठी व्यावसायिकपणे व प्रोप्रायटरी पद्धतीनेदेखील वितरित करण्याची मुभा नेटस्केपने स्वत:ला देऊन ठेवली होती. आपली चार वर्षांची मेहनत जर आपण ओपन सोर्स पद्धतीने उपलब्ध करून द्यायला तयार असू, तर समुदायाने केलेल्या कामाचा उपयोग करून घेण्याचा अधिकार दोन वर्षांसाठी तरी आमच्याकडे असावा अशी कारणमीमांसा नेटस्केपने यासाठी दिली होती. अशा गुंतागुंतीच्या लायसन्सिंग पद्धतीमुळे अनेक तंत्रज्ञ या प्रकल्पापासून चार हात दूरच राहिले होते.
हयात, ह्य़ूविट आणि रॉस यांचं असं स्पष्ट मत बनलं की, ओपन सोर्सचा अवलंब करण्यामागे नेटस्केपचा एक छुपा स्वार्थ असल्यामुळे असेल कदाचित, पण नेटस्केपला ओपन सोर्सच्या तत्त्वांशी वर उल्लेखल्याप्रमाणे काही प्रमाणात प्रतारणा करावी लागली आणि या सर्वाचं पर्यवसान प्रकल्पाला मिळालेल्या सामान्य स्वरूपाच्या यशामध्ये झालं. दुसऱ्या बाजूला कार्यक्षमता व सुरक्षेच्या दृष्टीने इंटरनेट एक्सप्लोररमध्ये असलेल्या मर्यादासुद्धा या तिघांनी ओळखल्या होत्या. केवळ विण्डोजबरोबर एकत्रितपणे व मोफत वितरित होत असल्यामुळे इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राऊझर विश्वाचा अनभिषिक्त सम्राट बनला होता हे त्यांनी जाणलं होतं.
या सर्व विश्लेषणातून आलेल्या शहाणपणाचा पुरेपूर उपयोग करण्याचं या त्रिकुटानं ठरवलं व २००२च्या मध्यावर मोझिला प्रकल्पातल्या सोर्स कोडवर आधारलेल्या अशा नव्या ओपन सोर्स ब्राऊझर प्रकल्पाची त्यांनी घोषणा केली. या ब्राऊझरचं नाव ठेवलं होतं – ‘फिनिक्स’! मृतावस्थेत असलेल्या नेटस्केप नॅविगेटरच्या राखेतून विजयी उसळी घेऊन वर येण्याची महत्त्वाकांक्षा या प्रकल्पामधून ठेवली असल्यामुळे, या तिघांनी आपल्या ब्राऊझरचं नाव ‘फिनिक्स’ ठेवलं असावं; पण या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या फिनिक्स टेक्नॉलॉजीज या कंपनीबरोबर ट्रेडमार्कसंदर्भात काही समस्या पुढे उद्भवू नयेत म्हणून या ब्राऊझरचं नाव बदलून ‘फायरबर्ड’ असं ठेवण्यात आलं. दुर्दैवाने हे नावदेखील फार काळ टिकलं नाही. अखेरीस बऱ्याच विचारविनिमयानंतर, फेब्रुवारी २००४ मध्ये या ब्राऊझरला ‘फायरफॉक्स’ हे नाव ठेवण्यात आलं, जे आजतागायत टिकून राहिलं आहे.
हयात, ह्य़ूविट आणि रॉस यांनी आपल्या फायरफॉक्स प्रकल्पाला जरी मोझिला प्रकल्पाचाच एक भाग म्हणून सुरू केले होते तरीही या प्रकल्पात नेटस्केपच्या तुलनेत काही मूलभूत फरक होते. या तिघांनी आपले लक्ष फक्त ब्राऊझरवर केंद्रित केल्यामुळे, मोझिला फायरफॉक्स प्रकल्पाला त्यांनी केवळ ब्राऊझरपुरतेच सीमित ठेवले होते. नेटस्केप कम्युनिकेटरप्रमाणे तो ब्राऊझरसकट इतर अनेक सॉफ्टवेअर्सचा संच नव्हता. दुसरं म्हणजे हा प्रकल्प संपूर्णपणे ओपन सोर्स होता ज्यामुळे प्रकल्पाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे कोणत्याही कंपनीकडे नसून प्रकल्प व्यवस्थापन समितीकडे होते. त्याचबरोबर याची लायसन्सिंग पद्धतसुद्धा अत्यंत सुटसुटीत होती. या कारणांमुळे फायरफॉक्सला ओपन सोर्स समुदायांचे भरीव योगदान मिळाले.
२००४ सालापर्यंत इंटरनेट एक्सप्लोररला कोणीच तगडा प्रतिस्पर्धी उरला नसल्याने मायक्रोसॉफ्टमध्येदेखील इंटरनेट एक्सप्लोररच्या प्रकल्प व्यवस्थापनात एक प्रकारचे वैचारिक साचलेपण आले होते. त्यामुळेच इंटरनेट एक्सप्लोररच्या सहाव्या आवृत्तीत (जी २००४ सालात प्रचलित होती.) आधीच्या आवृत्तींपेक्षा फारशी नवी वैशिष्टय़े अथवा सुविधा देण्यात आल्या नव्हत्या. फायरफॉक्सच्या निर्मितीत सुरुवातीपासूनच सुरक्षा आणि वापर सुलभता या दोन्हींवर लक्ष देण्यात आल्यामुळे नोव्हेंबर २००४ मध्ये जेव्हा फायरफॉक्सची पहिली अधिकृत आवृत्ती प्रसिद्ध झाली तेव्हा लोकांच्या त्यावर अक्षरश: उडय़ा पडल्या. पहिल्या नऊ महिन्यांत तब्बल ६ कोटी वेळा फायरफॉक्सला डाऊनलोड करण्यात आलं, जो एक प्रकारचा विक्रमच आहे. अनेक नवीनतम सुविधा (जसे केवळ एकच ब्राऊझर विण्डो उघडून व त्यात विविध टॅब्सचा वापर करून केलेलं ब्राऊझिंग किंवा स्पेलिंग तपासणारे साधन इत्यादी) फायरफॉक्समध्ये प्रथमच देण्यात आल्या होत्या. तसंच अनेक तांत्रिक परीक्षणांमध्ये फायरफॉक्स हा इंटरनेट ब्राऊझिंगचा वेग, सायबर सुरक्षा यांसारख्या निकषांवर इंटरनेट एक्सप्लोररच्या तुलनेत पुष्कळ उजवा ठरला होता.
२००५ मध्ये फायरफॉक्सच्या उत्कर्षांला आणि इंटरनेट एक्सप्लोररच्या अधोगतीला एकदमच सुरुवात झाली. २००९ मध्ये जेव्हा फायरफॉक्सचा बाजार हिस्सा हा ३२ टक्केपर्यंत वाढला होता, तेव्हा इंटरनेट एक्सप्लोररचा बाजार हिस्सा ९५ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत घसरला होता. २०१० नंतर आलेल्या गुगल क्रोमपुढे फायरफॉक्सचा प्रभाव थोडा कमी झाला असला तरी आजही फायरफॉक्स हा क्रोमनंतर सर्वाधिक वापरला जाणारा दुसऱ्या क्रमांकाचा ब्राऊझर म्हणून ओळख टिकवून आहे. मायक्रोसॉफ्टसारख्या मातब्बर कंपनीच्या ब्राऊझरला एका अत्यंत मर्यादित संसाधनं असणाऱ्या व मुख्यत्वेकरून जगभरातल्या समुदायांच्या सहयोगावर अवलंबून असणाऱ्या ओपन सोर्स ब्राऊझरने दिलेली यशस्वी झुंज खरोखरच कौतुकास्पद आहे.
असो. नेटस्केपप्रमाणेच संगणकक्षेत्रातल्या एके काळच्या अनभिषिक्त सम्राटाने ओपन सोर्सला साथ देण्याची भूमिका घेतली. ही कंपनी म्हणजे दस्तुरखुद्द आयबीएम! आयबीएमच्या या निर्णयामागची भूमिका व त्यात त्यांना आलेल्या यशापयशाचा लेखाजोखा आपण पुढील लेखात घेऊ.
लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. amrutaunshu@gmail.com