बर्कलेमध्ये बीएसडी प्रकल्पाचं नेतृत्व तेव्हा कीथ बॉस्टिक हा संगणक अभियंता करत होता. त्याच्या चाणाक्ष बुद्धीला हे उमगलं होतं की पुनर्लेखनाचं काम फक्त बर्कलेपुरतं मर्यादित ठेवलं तर ते पूर्ण करायला एखादं दशक तरी लागेल. म्हणूनच त्याने अनेकांशी सल्लामसलत करून युनिक्सच्या पुनर्बाधणीसाठी नावीन्यपूर्ण अशी व्यवस्था तयार केली..
ओपन सोर्स व्यवस्थेत अभिप्रेत असलेल्या सहयोगाचा प्रारंभ जरी युनिक्सपासून झाला असला तरीही ओपन युगाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने बीएसडी (बर्कले सॉफ्टवेअर डिस्ट्रिब्युशन) पासून झाली असंच म्हणायला लागेल. आणि एका परीने यासाठीही कारणीभूत ठरली एटीअँडटी कंपनी व तिने घेतलेला एक निर्णय! १९७८ मध्ये बिल जॉयने वितरित केलेल्या बीएसडी आज्ञावलींच्या संचाला अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली व तिच्या वापरकर्त्यां समुदायांकडून सूचना व सुधारणांचा ओघ बिल जॉयकडे यायला सुरुवात झाली. ७८ सालच्या उत्तरार्धातच मग बिल जॉयने बीएसडीची एक नवी सुधारित आवृत्ती प्रकाशित केली (ज्याला त्याने २बीएसडी असं नाव दिलं). यात तंत्रज्ञांच्या बऱ्याचशा सूचनांचा त्याने अंतर्भाव केला होता. या आवृत्तीच्या किमान ७५ प्रती त्याने जगभरात वितरित केल्या होत्या.
असं असलं तरीही १९७९ सालापर्यंत बीएसडी ही पास्कल आज्ञावली व तिच्याशी संलग्न अशा साधनांची सरमिसळ होती. त्यात कोणत्याही ऑपरेटिंग प्रणालीचा अंतर्भाव नव्हता. जून १९७९ नंतर मात्र हे चित्र संपूर्णपणे पालटलं व बीएसडी खऱ्या अर्थाने उत्क्रांत व्हायला लागली.
त्या महिन्यात बेल लॅब्सने युनिक्सची नवी कोरी सातवी आवृत्ती प्रसिद्ध केली. तिच्यात पुष्कळ नवीन तांत्रिक वैशिष्टय़े अगदी ठासून भरलेली असली तरी मागील सहाव्या आवृत्तीच्या तुलनेत तिची कार्यक्षमता बरीच कमी होती. त्याचबरोबर तिच्यात एक मोठी तांत्रिक मर्यादा होती, ती म्हणजे पीडीपी लघुसंगणकांव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या संगणक संचांवर काम करण्यासाठी ती सक्षम नव्हती.
युनिक्सच्या लोकप्रियतेमुळे आता विविध वापरकर्त्यांना ही प्रणाली स्वत:पाशी असलेल्या संगणकांवर वापरायची होती. त्या काळात पीडीपी लघुसंगणकांबरोबरीने आयबीएम, मोटोरोला व अॅपल यांचे संगणक संच प्रचलित होते. त्याचबरोबर डीईसी कंपनीच्या श्रेष्ठ दर्जाच्या व तांत्रिकदृष्टय़ा अतिप्रगत अशा वॅक्स लघुसंगणकाचेही बाजारात आगमन झाले होते.
युनिक्सला या सर्व प्रकारच्या संगणकांच्या हार्डवेअरवर वापरण्यायोग्य बनविण्यासाठी युनिक्सच्या आज्ञावलींमध्ये यथायोग्य बदल करणं गरजेचं होतं, ज्यामुळे ती या संगणकांच्या गाभ्यात असलेल्या मायक्रोप्रोसेसर व इतर हार्डवेअरवर विनाव्यत्यय काम करू शकेल. संगणकीय भाषेत याला पोर्टिंग (Porting) असं म्हटलं जातं.
युनिक्सच्या सातव्या आवृत्तीतल्या वर उल्लेखलेल्या तांत्रिक मर्यादा दूर करण्यासाठी व तिचे पीडीपीव्यतिरिक्त इतर संगणकीय हार्डवेअर प्रणालींवर पोर्टिग करण्यासाठी बर्कलेमध्ये बिल जॉय व त्याचे सहाध्यायी लगेचच कामाला लागले. युनिक्सचे लोण आता फक्त बर्कलेपुरते मर्यादित राहिले नव्हते. विविध विद्यापीठांतील संगणक तंत्रज्ञ व संगणकशास्त्राचे विद्यार्थीदेखील या कामासाठी योगदान देत होते आणि त्याचबरोबर त्यांनी केलेल्या सुधारणांची इतर युनिक्स समुदायांबरोबर देवाणघेवाण करत होते. अखेरीस या सर्व युनिक्स समुदायांच्या अथक व निरंतर प्रयत्नांमुळे १९७९ सालच्या अंतापर्यंत युनिक्स ही इंटेल मायक्रोप्रोसेसर चकतींवर बनवलेल्या आयबीएम पीसीसदृश संगणकांवर व त्याचबरोबर डीईसीच्या वॅक्स लघुसंगणकांवर विनासायास वापरता येऊ लागली.
जगभरात युनिक्सच्या मागणीने एवढे टोक गाठले होते की बिल जॉयने लगेचच युनिक्सची ही सुधारित आवृत्ती (तिच्या सोर्स कोडसकट) त्याच्या बीएसडी आज्ञावली संचासोबत वितरित करण्यास सुरुवात केली; ज्याचं त्याने ३बीएसडी (3BSD – बीएसडीची तिसरी आवृत्ती) असं नामकरण केलं. ३बीएसडीवर जगभरातल्या युनिक्स वापरकर्त्यांच्या अक्षरश: उडय़ा पडल्या कारण युनिक्स प्रणालीचा अंतर्भाव असलेला ३बीएसडी हा सर्वार्थाने एक परिपूर्ण सॉफ्टवेअर संच होता.
युनिक्सच्या दिवसागणिक वाढणाऱ्या लोकप्रियतेमुळे एटीअँडटीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला हे उमगू लागलं होतं की युनिक्सचं महत्त्व हे केवळ संशोधनापुरतं मर्यादित नाहीए, तर तिला एक भरीव व्यावसायिक मूल्य आहे. पण अशा परिस्थितीतही मागील लेखात उल्लेखलेल्या न्यायालयीन आदेशामुळे एटीअँडटी युनिक्सची बाजारात विक्री करून महसूल कमावू शकत नव्हती.
ही परिस्थिती १९८२ मध्ये बदलली. कोर्टाने आधीचा आदेश रद्द ठरवत एटीअँडटीला सॉफ्टवेअर क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी पूर्ण मुभा दिली. एटीअँडटीने कोर्टाचा हा निकाल शिरसावंद्य मानून लगेचच युनिक्सच्या लायसन्सिंग अटींमध्ये आमूलाग्र बदल केले. तोपर्यंत केवळ काही शे डॉलरमध्ये मिळणाऱ्या युनिक्सची किंमत १९८३ नंतर काही लाख डॉलरच्या घरात गेली. आयबीएमसारख्या कंपनींसाठी ही किंमत एक वेळ परवडण्यासारखी असली तरीही विविध विद्यापीठांतल्या संशोधन विभागांच्याही आवाक्याबाहेर होती.
याहीपुढे जाऊन एटीअँडटीने युनिक्सवर कॉपीराइटची बंधने आणून सोर्स कोड वितरित करणं बंद केलं. युनिक्स वापरकर्त्यांसाठी हा एक जबरदस्त दणका होता. इतके दिवस मुक्तपणे मिळणारा सोर्स कोड मिळणं आता दुरापास्त झालं होतं. थोडक्यात एटीअँडटीने एका ‘ओपन’ प्रणालीला ‘प्रोप्रायटरी’ बनवून टाकलं होतं.
युनिक्स वापरकर्त्यांसाठी आता बीएसडीशिवाय पर्याय नव्हता. जर एटीअँडटीच्या युनिक्स लायसन्सिंगच्या अटी स्वामित्व हक्काचं एक टोक होत्या तर बीएसडी लायसन्सिंगच्या अटी या खऱ्या अर्थाने ‘ओपन सोर्स’ म्हणाव्या अशा होत्या. सोर्स कोड हाताशी असल्याने बीएसडीच्या वापरकर्त्यांला त्यातील आज्ञावलींमध्ये हवे तसे बदल अथवा सुधारणा करायला संपूर्ण परवानगी होती. एवढंच नव्हे तर सुधारित आज्ञावलीचं पुनर्वितरण करण्यासही कसलीच आडकाठी नव्हती.
१९८२ नंतर मात्र बीएसडी संचातील युनिक्सच्या आवृत्तीचा वापर करण्यामध्ये एक मोठी अडचण निर्माण झाली होती. बीएसडीमध्ये अंतर्भूत असलेल्या युनिक्स आज्ञावलींच्या बऱ्याचशा सोर्स कोडवर एटीअँडटीचा मालकी हक्क होता. जर तो सोर्स कोड वितरित करायचा असेल किंवा त्यात बदल करायचा असेल तर एटीअँडटीची परवानगी आवश्यक होती. १९८२ पर्यंत यात काही अडचण नव्हती, कारण एटीअँडटी स्वत:च सोर्स कोड मुक्तपणे वितरित करत होती. त्यानंतर मात्र वर एटीअँडटीने युनिक्सचे ‘प्रोप्रायटरी’करण केल्यानंतर हे शक्य नव्हते.
बीएसडीच्या वाढीसाठी ही एक इष्टापत्ती होती. जर युनिक्स मुक्तपणे वापरायचं असेल तर आधी तिच्या आज्ञावलींचं ‘शुद्धीकरण’ करणं जरुरी होतं; त्यासाठी एटीअँडटीच्या मालकीच्या आज्ञावलींचं पुनर्लेखन करण्याची गरज होती. हे एक प्रचंड मोठे, जिकिरीचे व वेळकाढू काम होते, ज्यासाठी अनेक तंत्रज्ञ व आज्ञावलीकारांची गरज होती.
बर्कलेमध्ये बीएसडी प्रकल्पाचं नेतृत्व तेव्हा कीथ बॉस्टिक हा निष्णात संगणक अभियंता करत होता. त्याच्या चाणाक्ष बुद्धीला हे उमगलं होतं की पुनर्लेखनाचं काम फक्त बर्कलेपुरतं मर्यादित ठेवलं तर ते पूर्ण करायला एखादं दशक तरी लागेल. म्हणूनच त्याने बिल जॉय, चक हॅले वगैरे मंडळींशी सल्लामसलत करून युनिक्सच्या पुनर्बाधणीसाठी एक नावीन्यपूर्ण अशी सार्वजनिक व्यवस्था तयार केली; ज्यात इंटरनेटच्या मदतीने जगभरातील तंत्रज्ञ व आज्ञावलीकारांना ऐच्छिक सहयोग देता येऊ शकेल. सॉफ्टवेअरच्या इतिहासात प्रथमच अधिकृतपणे सहयोगाचं विकेंद्रीकरण होत होतं.
८०च्या दशकात इंटरनेट बाल्यावस्थेत असताना व दळणवळणाच्या वेगास तांत्रिक मर्यादा असूनही या ‘ओपन’ व्यवस्थेने युनिक्स पुनर्लेखनाचं जटिल काम जगभरातल्या जवळपास ४०० तंत्रज्ञांच्या मदतीने केवळ १८ महिन्यांत पुरं केलं! तंत्रज्ञानाचा तसेच व्यवस्थापनाचा हा एक चमत्कारच म्हणायला पाहिजे. ‘ओपन’ युगाला आता अधिकृतपणे प्रारंभ झाला होता. सॉफ्टवेअरमधल्या याच ओपन व्यवस्थेची पक्की पायाभरणी करण्याचं व त्याला एक तात्त्विक बैठक देण्याचं काम रिचर्ड स्टॉलमन या काहीशा विक्षिप्त स्वभावाच्या पण तल्लख बुद्धिमत्तेच्या धोरणी माणसानं केलं.
अमृतांशू नेरुरकर
या विलक्षण माणसाचा व त्याच्या कार्याचा वेध आपण पुढील लेखात घेणार आहोत.
लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. amrutaunshu@gmail.com