अमृतांशू नेरुरकर
८०च्या दशकापर्यंत आयबीएमच्या हार्डवेअरवर अन्य कोणत्याही सॉफ्टवेअर प्रणाली चालत नसत. असं असताना तिने ओपन सोर्सला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय अभूतपूर्व असाच होता..
१९९८ साल हे ओपन सोर्स व्यवस्थेच्या इतिहासात एक ‘माइलस्टोन इयर’ म्हणून ओळखलं जातं. ओपन सोर्स व्यवस्था जी तोवर तंत्रज्ञांचा फावला वेळातला छंद म्हणून परिघाबाहेर कार्यरत होती, ती या वर्षांनंतर मुख्य धारेत स्थिरावायला लागली व व्यावसायिक कारणांसाठी अधिकाधिक वापरली जाऊ लागली. १९९८ साली सर्वप्रथम या व्यवस्थेचे अधिकृतपणे नामकरण झाले व जगभरात पसरलेल्या आणि लिनक्ससारख्या प्रकल्पांत आपले भरीव योगदान देणाऱ्या गटांना स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळाली. त्याचबरोबर व्यावसायिक आस्थापनांमधल्या ओपन सोर्सच्या प्रसारासाठी हे ‘ब्रॅण्डिंग’ पुष्कळ उपयोगी ठरलं.
दुसरं म्हणजे, मागील लेखात वर्णिल्याप्रमाणे, याच वर्षी नेटस्केपने आपल्या प्रोप्रायटरी वेब ब्राऊझरला संपूर्णपणे ओपन सोर्स अवतारात नव्याने वितरित केलं. आपलं प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर व्यावसायिकपणे विकून त्याच्या रॉयल्टी शुल्कातून महसूल कमावणाऱ्या कंपनीने ते सॉफ्टवेअर ओपन सोर्स करण्याची ही पहिलीच वेळ होती. ओपन सोर्स व्यवस्थेचं यश नव्याने अधोरेखित करणारी अशी ही घटना असल्यामुळे तिने संपूर्ण संगणक विश्वाचं लक्ष वेधून घेतलं.
१९९८ सालातच घडलेली तिसरी घटना म्हणजे संगणकक्षेत्रातील आद्यपुरुष असं ज्याचं यथार्थपणे वर्णन करता येईल अशा बलाढय़ आयबीएमने, नेटस्केपच्या ओपन सोर्स जाहीरनाम्याचा बरोबर पाच महिन्यांनी, २२ जून १९९८ रोजी, ओपन सोर्स अपॅची वेब सव्र्हर प्रकल्पाला आपला पाठिंबा जाहीर केला. खरं तर पूर्वापारपासून आयबीएमचा दृष्टिकोन हा प्रोप्रायटरीच होता. एवढंच नव्हे, तर ८०च्या दशकापर्यंत आयबीएमच्या हार्डवेअरवर आयबीएम सोडून दुसऱ्या कोणत्याही सॉफ्टवेअर प्रणाली चालत नसत. असं असताना तिने ओपन सोर्सला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय अभूतपूर्व असाच होता.
नेटस्केपप्रमाणेच आयबीएमनेदेखील हा निर्णय काही तडकाफडकी घेतलेला नव्हता. त्यास गेल्या काही वर्षांत संगणक विश्वात घडलेल्या अनेक घटनांची पाश्र्वभूमी होती. ८०च्या दशकापर्यंत संगणक क्षेत्रातील महासत्ता असलेल्या आयबीएमला सॉफ्टवेअर युगाचा अदमास व्यवस्थित घेता आला नाही व ९०च्या दशकात मायक्रोसॉफ्टच्या रेटय़ापुढे कंपनीची अनेक आघाडय़ांवर पीछेहाट व्हायला लागली.
आयबीएमचा डेस्कटॉप पीसी, सव्र्हरचे हार्डवेअर तसेच मेनफ्रेम बनविण्याचा व्यवसाय अजूनही तेजीत होता, पण सॉफ्टवेअर क्षेत्रात तिला स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणे अवघड जात होते. इंटरनेट युगाची सुरुवात झाली असल्याने विविध संकेतस्थळांची निर्मिती होत होती व त्यासाठी वेब सव्र्हर सॉफ्टवेअरला चांगलीच मागणी होती.
१९९८ मध्ये फक्त तीनच वेब सव्र्हर प्रचलित होते – नेटस्केपचा नेटसाइट कम्युनिकेशन सव्र्हर, मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट इन्फर्मेशन सव्र्हर आणि सर्वाधिक बाजारहिस्सा असलेला अपॅची वेब सव्र्हर! आयबीएमसुद्धा या उभरत्या क्षेत्रात जम बसवू पाहत होती व याचसाठी तिने आपलं वेबस्पिअर (WebSphere) नावाचं सॉफ्टवेअर बाजारात दाखल केलं होतं.
दुर्दैवाने, आयबीएमला म्हणावं तेवढं यश या व्यवसायात मिळत नव्हतं. वेबस्पिअरचा बाजारहिस्सा हा एक टक्क्यापेक्षाही कमी होता. अशा चाचपडणाऱ्या परिस्थितीतून कंपनीला बाहेर काढण्यासाठी आयबीएमच्या संचालक मंडळाने जेम्स बॅरी या निष्णात कूटनीतितज्ज्ञाला पाचारण केले. आयबीएममध्ये दीर्घकाळ काम केल्यामुळे बॅरीला तिच्या शक्तिस्थळांची तसेच कमजोरीची चांगलीच जाणीव होती. वेबस्पिअर प्रकल्प व्यवस्थापन समितीबरोबर झालेल्या चर्चाअंती तो हे उमजून चुकला होता की, वेबस्पिअर पॅकेजमधला वेब सव्र्हर वर उल्लेखलेल्या तीनही वेब सव्र्हर सॉफ्टवेअरपेक्षा तांत्रिकदृष्टय़ा कमजोर आहे.
आयबीएमचा अजस्र आकार, एखादा निर्णय घेण्यासाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या मंजुऱ्या, यामुळे एखाद्या नव्या वेब सव्र्हरच्या निर्मितीला प्रचंड कालावधी लागला असता. वेळ आधीच आयबीएमच्या हातून निसटून चालला होता, त्यामुळे हा पर्याय कुचकामी होता. अखेरीस कंपनीतल्या अनेकांबरोबर विचारविनिमय केल्यानंतर बॅरी या निर्णयाप्रत आला की स्वत:ची नवी विहीर खणत बसण्यापेक्षा सहयोगाची भूमिका घेऊन, वेब सव्र्हर मार्केटमधल्या तीनपैकी एका कंपनीबरोबर भागीदारी करणं हे या घडीला आयबीएमसाठी सर्वात सयुक्तिक आहे.
लगेचच आयबीएमने नेटस्केप कंपनीला विकत घेण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली. पण नेटस्केपच्या संचालक मंडळाबरोबरच्या चर्चेत अनेक मुद्दय़ांवर दोन्ही कंपन्यांच्या सदस्यांचे मतभेद झाले व वाटाघाटी फिस्कटल्या. नेटस्केपबरोबरचा प्रयत्न विफल ठरल्याने, आयबीएमने मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी करण्याचा प्रयत्न करून बघितला. एके काळी याच आयबीएमने मायक्रोसॉफ्टला तिच्या उमेदवारीच्या काळात हात दिला होता व त्यानंतरच मायक्रोसॉफ्टची सॉफ्टवेअर क्षेत्रातील घोडदौड जोमाने सुरू झाली होती. पण आता भूमिका बदलल्या होत्या. आयबीएम आता याचकाच्या भूमिकेत होती. मायक्रोसॉफ्टला आयबीएमच्या सुप्त शक्तीची चांगलीच जाण असल्याने तिने आयबीएमपासून दोन हात लांब राहण्याचा निर्णय घेतला व आयबीएमच्या भागीदारीच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली.
आता आयबीएमसमोर अपॅची वेब सव्र्हरचा एकच पर्याय शिल्लक होता. पण यात दोन प्रमुख अडचणी होत्या. एक म्हणजे आयबीएमची मानसिकता अजूनही ओपन सोर्सबद्दल तितकीशी अनुकूल नव्हती. म्हणूनच बॅरीला आधी कंपनीच्या उच्चपदस्थांचं मन वळवावं लागणार होतं. दुसरी बाह्य़ अडचण म्हणजे अपॅची ही कंपनी नव्हती, तर तो एक समविचारी तंत्रज्ञांचा प्रकल्प व्यवस्थापन करणारा गट होता. त्यामुळे ही भागीदारी कशा प्रकारची असेल हे बॅरीला स्पष्ट होत नव्हतं.
खरं सांगायचं तर अपॅची वेब सव्र्हरच्या लायसन्सिंगच्या अटी इतक्या खुल्या स्वरूपाच्या होत्या की, आयबीएमला अपॅचीबरोबर भागीदारी करण्याची गरजच नव्हती. अपॅचीच्या सोर्स कोड घेऊन, त्यात जुजबी सुधारणा करून आयबीएमला ते सॉफ्टवेअर स्वत:च्या नावाने वितरित करण्याची संपूर्ण मुभा होती. फक्त वितरित करण्याच्या वेळेला आयबीएमला हे स्पष्ट करावं लागलं असतं की ते सॉफ्टवेअर अपॅचीवर आधारित आहे.
पण बॅरीला हा पर्याय व्यक्तिश: रुचला नाही. असं केल्याने आयबीएम ही अपॅची प्रकल्पात सहयोग देणाऱ्या मोठय़ा समुदायापासून दूर जाईल अशी रास्त भीती त्याला वाटत होती. अखेरीस १९९८च्या वसंत ऋतूत बॅरीने अपॅची प्रकल्पाचा संचालक ब्रायन बेलेनडॉर्फची रीतसर भेट घेऊन आयबीएमची भागीदारीची इच्छा व्यक्त केली.
बेलेनडॉर्फला आयबीएमसोबत भागीदारी करण्याचे अनेक फायदे दिसत होते. पण आयबीएमचा बलाढय़ आकार बघता, आयबीएम केव्हाही अपॅची व्यवस्थापनावर वरचढ झाली असती व प्रकल्पाची दिशा स्वत:च्या फायद्या-तोटय़ाचा विचार करून ठरवायला लागली असती अशी चिंता प्रामुख्याने बेलेनडॉर्फला सतावत होती; ज्यात बऱ्याच प्रमाणात तथ्य होते.
पण बॅरीने आपली चिकाटी सोडली नाही. आयबीएमच्या संचालक मंडळास विश्वासात घेऊन त्याने बेलेनडॉर्फच्या सर्व शंकाकुशंकांचं निरसन केलं. प्रथमत: त्याने हे स्पष्ट केले की, आयबीएम ही प्रकल्प व्यवस्थापन समितीमधली केवळ एक सभासद असेल व तिला कोणताही विशेषाधिकार नसेल. तसेच आयबीएमच्या तंत्रज्ञांकडून प्रकल्पाला मिळालेले योगदान १०० टक्के ओपन सोर्स स्वरूपातच असेल. आयबीएमच्या निष्णात तंत्रज्ञांचा प्रकल्पामधला सहभाग, अपॅचीसाठी आयबीएमकडून व्यावसायिकपणे उपलब्ध होत असलेला तांत्रिक सपोर्ट, ज्यामुळे अधिकाधिक व्यावसायिक आस्थापनांची अपॅचीला मिळू शकणारी पसंती व अपॅचीच्या बाजार हिश्शामध्ये होऊ शकणारी भरघोस वाढ अशा विविध फायद्यांचे तपशीलवार स्पष्टीकरण देऊन बॅरीने आपली संयुक्त भागीदारीची योजना अपॅची व्यवस्थापन समितीच्या गळी उतरवली व आयबीएमच्या ओपन सोर्सबरोबरच्या मैत्रीपूर्ण अध्यायाचा श्रीगणेशा झाला.
आयबीएम केवळ अपॅचीबरोबरच्या भागीदारीवरच संतुष्ट राहिली नाही. पुढील काळात तिने आपल्या शक्तिशाली एस/३९० या मेनफ्रेम संगणकाला लिनक्सशी सुसंगत बनवला. थोडय़ाच कालावधीत आयबीएमच्या सर्व प्रकारच्या सव्र्हर हार्डवेअरवर लिनक्स चालायला लागली आणि २१व्या शतकाच्या सुरुवातीला आयबीएमने ओपन सोर्स सॉफ्टवेअर हे आपल्या व्यावसायिक धोरणाचा अविभाज्य घटक आहे असं अधिकृतरीत्या जाहीर केलं.
लिनक्स व ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्थेच्या यशाचा सर्वाधिक परिणाम मायक्रोसॉफ्टवर झाला. सुरुवातीला दुर्लक्षिलेल्या या व्यवस्थेची चांगलीच दखल मायक्रोसॉफ्टला घ्यावी लागली, एवढंच नव्हे तर पुढील काळात कडवा संघर्षदेखील करावा लागला. एका प्रस्थापिताच्या कडव्या विरोधाच्या कहाणीचा लेखाजोखा आपण पुढील लेखात घेऊ.
लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. amrutaunshu@gmail.com