विसाव्या शतकाच्या अखेरीस व एकविसाव्या शतकातील पहिली पाच-सात वर्षे लिनक्स व ओपन सोर्सला नामोहरम करण्याचा निष्फळ प्रयत्न मायक्रोसॉफ्टने केला. मात्र एखाद्या प्रतिस्पर्धी कंपनीचा पाडाव करणे व ओपन सोर्स व्यवस्थेचा पाडाव करणे यात मूलभूत फरक आहे, हे नंतर मायक्रोसॉफ्टच्या ध्यानात आले.

गेल्याच महिन्यात, ४ जूनला मायक्रोसॉफ्टचा सध्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेलाने केलेल्या एका घोषणेने संगणक (विशेषकरून ओपन सोर्स विश्वात) एकच खळबळ उडवून दिली. त्या दिवशी मायक्रोसॉफ्टने गिटहब (GitHub) रिपॉजिटरी या ओपन सोर्स प्रकल्पांच्या सोर्स कोडचे व्यवस्थापन करणाऱ्या व ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या विविध आवृत्त्यांचे सुसूत्रीकरण करणाऱ्या जगातल्या सर्वात मोठय़ा सेवापुरवठादाराला तब्बल ७५० कोटी अमेरिकन डॉलर्सना विकत घेण्याचा  मनसुबा जाहीर केला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

ओपन सोर्स व्यवस्थेच्या दृष्टीने गिटहब रिपॉजिटरीला विशेष महत्त्व आहे, कारण आजच्या घडीला गिटहबमध्ये ८ कोटी ओपन सोर्स प्रकल्पांचे सोर्स कोड सुरक्षित आहेत व त्यात जगभरातल्या जवळपास अडीच कोटी प्रोग्रामर्सचा सक्रिय सहभाग आहे. मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयामुळे त्यांना या प्रकल्पांमध्ये व ते बनविणाऱ्या तंत्रज्ञांपर्यंत थेट प्रवेश मिळणार आहे. या घटनेच्या जवळपास दीड वर्ष आधी, नोव्हेंबर २०१६ मध्ये असाच एक धक्का मायक्रोसॉफ्टने ओपन सोर्स विश्वाला दिला जेव्हा तिने ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या व ओपन सोर्ससाठी कार्यरत असणाऱ्या जगातल्या सर्वात मोठय़ा व प्रभावी संस्थेशी – लिनक्स फाऊंडेशनशी – संलग्न होण्याचा आपला इरादा जाहीर केला.

एके काळच्या आपल्या कट्टर शत्रूला अशा प्रकारे खुला पािठबा देण्याचा मायक्रोसॉफ्टचा निर्णय अनेकांच्या पचनी पडला नव्हता.  बऱ्याच जणांच्या मनात मायक्रोसॉफ्टच्या अशा कृतींमुळे शंकेची पाल चुकचुकली होती की, हा केवळ मत्रीचा देखावा तर नसेल आणि मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयांमागे लिनक्सला संपवण्याचा छुपा हेतू तर नसेल.  मायक्रोसॉफ्टच्या आपल्या प्रतिस्पध्र्याचा येनकेनप्रकारेण पाडाव करण्याच्या नावलौकिकामुळे अशी कुशंका येणे काहीसे रास्त असले तरीही सद्य:स्थितीतल्या विविध घटकांचा सारासारविचार केला तर ही भीती अनाठायी वाटते.

सर्वप्रथम मायक्रोसॉफ्टचं ओपन सोर्सबद्दलचं प्रेम हे काही गेल्या एखाद दोन वर्षांत उत्पन्न झालेलं नाहीए. विसाव्या शतकाची अखेरची दोन-तीन व एकविसाव्या शतकातील पहिली पाच-सात वर्षे लिनक्स व ओपन सोर्सला नामोहरम करण्याचा निष्फळ प्रयत्न केल्यानंतर मायक्रोसॉफ्टला हे ध्यानात येऊ लागले होते की, एखाद्या प्रतिस्पर्धी कंपनीचा पाडाव करणे व ओपन सोर्स व्यवस्थेचा पाडाव करणे यात काही मूलभूत फरक आहेत.

एक तर ओपन सोर्स ही कंपनी नाहीए; त्यामुळे प्रतिस्पर्धी कंपनीला नेस्तनाबूत करण्याचे ‘कॉर्पोरेट’ डावपेच इथे चालणार नाहीत. ओपन सोर्स ही सॉफ्टवेअरनिर्मितीची केवळ एक प्रक्रिया आहे, त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर प्रकल्पांचे व्यवस्थापन कार्यक्षमपणे करण्याची एक भिन्न व्यवस्था आहे. या व्यवस्थेतले सहभागी सदस्य हे जगभरात सर्वदूर पसरले आहेत व सॉफ्टवेअरसोबत त्याचा सोर्स कोड मिळणे हा वापरकर्त्यांचा मूलभूत अधिकार आहे या वैचारिक बांधिलकीशी सर्व जण जोडले गेले आहेत. यामुळेच ओपन सोर्स व्यवस्था किंवा लिनक्ससारख्या कोणत्याही ओपन सोर्स प्रकल्पाशी  वैरत्वाचे नाते ठेवण्याने, त्या प्रकल्पाचे विशेष नुकसान होणारे नव्हते. उलट मायक्रोसॉफ्टची प्रतिमा ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणारी कंपनी’ म्हणून डागाळण्याचीच शक्यता अधिक होती.

मायक्रोसॉफ्टने ओपन सोर्स व्यवस्थेबरोबर घेतलेली सामंजस्याची भूमिका हे मायक्रोसॉफ्टला उशिरा सुचलेलं शहाणपण ठरलं नसतं, जर मायक्रोसॉफ्टने आपल्या एका तंत्रज्ञाच्या १९९८ सालीच केलेल्या या संदर्भातल्या शिफारसींना केराची टोपली दाखवली नसती. विनोद वल्लोपिल्लील या मायक्रोसॉफ्टमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असणाऱ्या भारतीयाने मायक्रोसॉफ्टच्या ओपन सोर्सला कडव्या विरोध करण्याच्या भूमिकेमुळे कंपनीवर होऊ शकणाऱ्या भल्याबुऱ्या परिणामांचे नि:पक्षपाती व परखड विश्लेषण ऑगस्ट १९९८ मध्येच केले होते.

त्याने मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळास सादर केलेल्या गोपनीय अहवालात (जो पुढे ‘हॅलोविन डॉक्युमेंट्स’ म्हणून प्रसिद्ध झाला) संभाव्य धोक्यांची जाणीव करून दिली होती. ओपन सोर्स सॉफ्टवेअरनिर्मितीच्या प्रक्रियेचे फायदे विशद करतानाच, मायक्रोसॉफ्टने लिनक्स अथवा ओपन सोर्स व्यवस्थेच्या विरोधात जाण्याच्या धोरणापेक्षा, त्याच्या सोबत जाण्याचे धोरण हे दीर्घकालीन फायद्याचे ठरेल असे त्याने ठासून प्रतिपादन केले होते.

मायक्रोसॉफ्टला जसजसं ओपन सोर्स सॉफ्टवेअरला नमवणं जड जाऊ लागलं होतं तसं तिने ओपन सोर्सशी समांतर असे काही प्रयोग करून पहिले; पण त्यात म्हणावं तसं यश त्यांना प्राप्त झालं नाही. त्यातला एक प्रयोग म्हणजे ‘कोडप्लेक्स’ नावाचा प्रकल्प! यात मायक्रोसॉफ्टने काही छोटय़ा आकाराची उपयुक्त सॉफ्टवेअर त्यांच्या सोर्स कोडसकट या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली होती. पण यात अशी मेख होती की ही सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्टच्याच मुख्य धारेतल्या व्यावसायिक सॉफ्टवेअरवर (जसं विण्डोज, ऑफिस वगैरे) चालायची; ज्यांचा सोर्स कोड मायक्रोसॉफ्टकडे सुरक्षित होता.

दुसरा महत्त्वाचा प्रयोग होता ‘शेअर्ड सोर्स’ लायसिन्सग पद्धती! यात मायक्रोसॉफ्ट आपल्या काही सॉफ्टवेअर प्रणालींचा (उदा. सी-शार्प या प्रोग्राम लिहिण्याच्या भाषेचा) सोर्स कोड टप्प्याटप्प्याने खुला करणार होती. ओपन सोर्स पद्धतीशी साधर्म्य असलं तरी ही पद्धती वापरकर्त्यांवर पुष्कळ बंधनं लादणारी होती. उदाहरणार्थ, यात त्या सॉफ्टवेअरमध्ये केलेल्या सुधारणांच्या व्यावसायिक वापरावर मनाई होती; एवढंच नव्हे तर अशा सुधारित सॉफ्टवेअरचे पुनर्वितरणही मायक्रोसॉफ्टच्या परवानगीशिवाय शक्य नव्हते. यामुळेच शेअर्ड सोर्स पद्धतीला व्यापक स्तरावर मान्यता व तंत्रज्ञांचा सहभाग मिळू शकला नाही.

मायक्रोसॉफ्टचा ओपन सोर्स व्यवस्थेशी जुळवून घेण्याच्या व गेल्या ५-७ वर्षांत तिला पािठबा देण्याच्या भूमिकेस अजून एक महत्त्वाचा घटक कारणीभूत ठरला. मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळातल्या अनेक धुरिणांनी कंपनीच्या कामकाजामधला सक्रिय सहभाग २१व्या शतकाच्या पहिल्या दशकाखेरीस विविध कारणांमुळे कमी केला व कंपनीची धुरा ताज्या दमाच्या नेतृत्वाकडे आली. बिल गेट्सने पत्नीबरोबर सुरू केलेल्या बिल अ‍ॅण्ड मेिलडा गेट्स फाऊंडेशन या संस्थेसाठी अधिक वेळ देता यावा म्हणून मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदाचा राजीनामा २००८ सालीचा दिला होता. ओपन सोर्सचा कट्टर विरोधक स्टीव्ह बामरदेखील २०१४च्या सुरुवातीला कंपनीच्या सीईओ पदावरून निवृत्त झाला.

नवनिर्वाचित सीईओ सत्या नाडेला व त्याने नियुक्त केलेले विविध विभागप्रमुख ओपन सोर्स विरोधक नव्हते. त्यातल्या काहींनी तर मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू होण्यापूर्वी ओपन सोर्स प्रकल्पांत आपले योगदानही दिले होते. गिटहबच्या खरेदी व्यवहाराच्या वेळेला सत्या नाडेलाने केलेले प्रतिपादन मायक्रोसॉफ्टच्या बदलत्या मानसिकतेचे द्योतक आहे. तो म्हणाला – ‘डिजिटल युगात संगणक तंत्रज्ञ व प्रोग्रामर्सच्या समुदायांची सांघिक ताकद व विचारांच्या देवाणघेवाणीतून केलेले सहयोगात्मक कार्यच सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणूनच गिटहबच्या समन्वयकाची भूमिका घेताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.’ समुदाय, सहयोग, देवाणघेवाण या मायक्रोसॉफ्टच्या शब्दकोशात सहसा न आढळणाऱ्या शब्दांचा उपयोग व स्वत:ला गिटहबच्या समन्वयकाची घेतलेली भूमिका मायक्रोसॉफ्टच्या ओपन सोर्स प्रतिचा बदललेला दृष्टिकोन अधोरेखित करते.

मायक्रोसॉफ्टने हे ओळखलं होतं की पुढे येणाऱ्या डिजिटल युगामध्ये डेस्कटॉप पीसीचं महत्त्व लयाला जाऊन, वैयक्तिक अथवा व्यावसायिक वापराच्या सॉफ्टवेअर प्रणाली व त्या ज्यावर प्रक्रिया करतात तो डेटा हा ‘क्लाऊड’वर प्रस्थापित होणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या स्वत:च्या ‘अझुर’ (Azure) या क्लाऊड कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाला अधिकाधिक ग्राहकांनी आपलंसं करण्यासाठी, अझुर हे लिनक्सवर चालणं गरजेचं होतं, कारण क्लाऊड कॉम्प्युटिंग तंत्रज्ञान हे डेटा सेन्टरमधल्या सव्‍‌र्हरवर चालते व या सव्‍‌र्हरवर बहुतेक वेळेला लिनक्स ऑपरेटिंग प्रणालीच विराजमान झालेली असते. मायक्रोसॉफ्टच्या लिनक्ससोबत चालण्याच्या व लिनक्स फाऊंडेशनला बिनशर्त पाठिंबा देण्यामागे बदलत्या डिजिटल तंत्रज्ञानाचीही पाश्र्वभूमी आहे.

असो. लिनक्स अनेक स्तरांवर अशा प्रकारे यशस्वी होत असूनसुद्धा तिचा विनियोग मुख्यत्वेकरून सव्‍‌र्हर हार्डवेअर संचांपुरताच सीमित होता. लिनक्सला सर्वात पहिल्यांदा वैयक्तिक वापरासाठी डेस्कटॉप पीसीवर लोकप्रिय करण्याचे श्रेय हे उबुंटू लिनक्सला जाते. या प्रकल्पाबद्दल व त्याचा प्रणेता मार्क शटलवर्थबद्दल आपण पुढील लेखात जाणून घेऊ.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. amrutaunshu@gmail.com