अमृतांशू नेरुरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्ञानकोश निर्मिती, संशोधनपर लेखन असलेल्यानियतकालिकांचं प्रकाशन, जैवविज्ञान व औषध निर्माण यांसारख्या क्षेत्रांबरोबर इतरही काही क्षेत्रांत ओपन सोर्स तत्त्वांवर आधारित प्रयोग केले गेले.

२००१ साल हे ओपन सोर्स व्यवस्थेच्या विस्तारणाऱ्या क्षितिजासंदर्भातलं एक ‘माइलस्टोन’ वर्ष म्हणून ओळखलं जातं. या वर्षी मुक्त स्वरूपातल्या ज्ञाननिर्मितीच्या तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांची मुहूर्तमेढ स्वतंत्रपणे रोवली गेली. पहिला म्हणजे डिजिटल स्वरूपातल्या ज्ञानकोशाची निर्मिती सहयोगात्मक पद्धतीने करणारा विकिपीडिया प्रकल्प, दुसरा म्हणजे संशोधनात्मक साहित्याला विनामूल्य व कॉपीराइटसारख्या बंधनांपासून संपूर्णत: मुक्त असा प्रवेश देणारा ‘ओपन अ‍ॅक्सेस’ प्रकल्प तर तिसरा म्हणजे कोणत्याही स्वरूपातल्या सर्जनशील कामाच्या बंधमुक्त वापर व पुनर्वितरणासाठी एक औपचारिक व्यवस्थेची पायाभरणी करणारा ‘क्रिएटिव्ह कॉमन्स’ प्रकल्प!

ओपन सोर्स सॉफ्टवेअर निर्मिती प्रक्रियेची तत्त्वं व संकल्पना मुक्त स्वरूपातल्या ज्ञानकोशाच्या निर्मितीसाठी चपखलपणे उपयोगात आणणारा एक प्रमुख आणि आत्यंतिक यशस्वी प्रकल्प म्हणून वादातीतपणे विकिपीडियाचं नाव घ्यावं लागेल. आज आंतरजालावर कोणत्याही विषयाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी गुगलनंतर विकिपीडियाचाच वापर केला जातो; किंबहुना एखाद्या विषयाचा गुगलवर शोध घेतला असता बऱ्याच वेळेला गुगलसुद्धा विकिपीडियाच्याच संकेतस्थळाचा पत्ता त्याचं उत्तर म्हणून देतो.

विसाव्या शतकाच्या अखेरीस इंटरनेट व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना विविध प्रकारची माहिती तसेच सेवा पुरवणाऱ्या संकेतस्थळांची निर्मिती वेगाने होत होती. डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित बिझनेस मॉडेल्सचा प्रभावी वापर करणारी नवउद्योजकांची पिढी उदयाला येत होती. जिमी वेल्स हा याच पिढीचा प्रतिनिधी होता. इंटरनेटवर अफाट माहिती साठवण्याची क्षमता आहे व ती अविरतपणे अद्ययावत ठेवली जाऊ  शकते, मग असे असताना एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकासारख्या छापील ज्ञानकोशांची गरजच काय, हा प्रश्न त्याला सतावत होता.

त्याच्या कल्पनेतला इंटरनेटवरचा ऑनलाइन ज्ञानकोश बनविण्यासाठी त्याने न्यूपीडिया या प्रकल्पाची सुरुवात केली. न्यूपीडिया प्रकल्पासाठी त्याने अशी प्रणाली विकसित केली ज्यामुळे ज्ञानकोश निर्मितीत सहभाग असणाऱ्या एका तज्ज्ञाच्या कामाचं दुसऱ्या तज्ज्ञाकडून पुनरावलोकन करणं (पीअर रिव्ह्यू) खूप सोपं झालं. पण यात एक अडचण अशी होती, अजूनही ज्ञानकोशाच्या निर्मितीचं काम त्या त्या विषयातली तज्ज्ञ मंडळीच करत होती. यामुळे ज्ञानकोशात नव्या लेखांची भर घालणे, विद्यमान लेखांमध्ये सुधारणा करणे वगैरेसारखी कामं अत्यंत कूर्मगतीने होत होती.

ही मर्यादा दूर करण्यासाठी व ज्ञानकोश निर्मितीचे काम गतिमान पद्धतीने करण्यासाठी जिमी वेल्सने त्या वेळेला न्यूपीडियाच्या संपादकाचं काम करणाऱ्या लॅरी सँगरबरोबर विविध उपायांची चाचपणी करण्यास सुरुवात केली. त्या काळात काही संकेतस्थळं आपल्या वेबसाइटमधला एक विभाग केवळ तिला भेट देणाऱ्या अभ्यागतांसाठी राखून ठेवत असत. त्यात तयार होणाऱ्या माहितीचं संपूर्ण व्यवस्थापन (निर्मितीपासून, संपादनापर्यंत) वेबसाइटला भेट देणारी मंडळीच करत असत. सहयोगात्मक पद्धतीने माहितीचे आदानप्रदान करण्याची ही ‘विकी’ पद्धत लोकप्रिय होत होती.

न्यूपीडिया प्रकल्पाला अधिक मुक्त, सहयोगात्मक, गतिमान व काही प्रमाणात अनौपचारिक बनविण्यासाठी सँगरला ही ‘विकी’ पद्धत सर्वार्थाने योग्य वाटली. त्याने ही कल्पना वेल्सच्या गळी उतरवली व एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला १० जानेवारी २००१ला न्यूपीडियामध्ये ‘विकी’ विभाग अंतर्भूत करण्यात आला. न्यूपीडियात काम करणाऱ्या सर्व वरिष्ठ तज्ज्ञ व संपादकांकडून या निर्णयाला कडाडून विरोध झाला. त्यामुळे केवळ पाचच दिवसांत, १५ जानेवारी २००१ला वेल्सने ‘विकिपीडिया’ या केवळ लोकसहभागाच्या माध्यमातून ज्ञानकोशाची निर्मिती करणाऱ्या स्वतंत्र प्रकल्पाचा शुभारंभ केला.

या प्रकल्पामध्ये विकिपीडियाला भेट देणाऱ्या कोणत्याही वाचकाला तेथे उपलब्ध असलेल्या माहितीत बदल करण्याचा अधिकार बहाल केला गेला होता. आणि हे सर्व त्याची जात, पात, वय, लिंग वा शैक्षणिक पात्रता न बघता! जन्मल्यानंतर केवळ ३ वर्षांच्या आत विकिपीडियाचा ज्ञानसाठा हा एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका आणि एनकार्टाच्या (जे त्या वेळचे जगातले सर्वात मोठे ज्ञानकोश होते) एकत्रित ज्ञानसाठय़ापेक्षा जास्त झाला. आज विकिपीडिया हा ३०१ भाषांमधल्या जवळपास ५ कोटी लेखांचा समावेश असलेला (ज्यात केवळ इंग्रजी भाषेत ५७ लाखांवर लेख उपलब्ध आहेत) जगातील एकमेव ज्ञानकोश आहे.

विकिपीडियाला समांतरपणे सुरू झालेली मुक्त ज्ञाननिर्मितीची ‘ओपन अ‍ॅक्सेस’ चळवळ कॉपीराइट नियमांच्या अधीन राहून शोधनिबंध प्रकाशित करणाऱ्या अकादमिक व संशोधन पत्रिकांच्या पारंपरिक पद्धतीला मुक्त स्वरूपातला एक समर्थ पर्याय म्हणून आज उदयास आली आहे. या पद्धतीने तयार होणारं साहित्य हे कोणत्याही रॉयल्टी शुल्काशिवाय डिजिटल स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध तर असतंच, पण त्याचबरोबर ही पद्धत आपल्या वाचकाला हे साहित्य वाचण्याचं, त्याची प्रत डाऊनलोड करण्याचं, त्याचं पुनरावलोकन तसेच वितरण करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य बहाल करते.

ज्ञान निर्मिती व संवर्धनाची ही मुक्त पद्धत अल्पावधीतच लोकप्रिय झाली व आपल्या साहित्याला मुक्त प्रवेश देणाऱ्या विविध जर्नल्सची एक रिपॉजिटरी तयार करण्याची निकड जाणवायला लागली. २००३ सालात अशा जगभरातल्या सर्व ओपन अ‍ॅक्सेस जर्नल्सची नोंद ठेवून त्यांना थेट प्रवेश देणाऱ्या डिरेक्टरी ऑफ ओपन अ‍ॅक्सेस जर्नल्स (डीओएजे) या मध्यवर्ती संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली. आज डीओएजे संकेतस्थळावर विविध देशांत डिजिटल स्वरूपात प्रकाशित होणाऱ्या अकरा हजारांच्या वर ओपन अ‍ॅक्सेस जर्नल्सची यादी समाविष्ट आहे, ज्यावरून या व्यवस्थेच्या उत्तरोत्तर वाढत असलेल्या लोकमान्यतेचा अदमास येऊ  शकेल.

२००१ सालीच सुरू झालेल्या क्रिएटिव्ह कॉमन्स प्रकल्पाची सुरुवात लॉरेन्स लेसिग या अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात कायदा शिकवणाऱ्या प्राध्यापकाने केली. पहिल्यापासूनच लेसिग ओपन सोर्स चळवळीचा, विशेषकरून स्टॉलमनच्या फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशनचा खंदा पुरस्कर्ता होता. कॉपीराइटचे नियम निर्मात्याच्या तसेच वापरकर्त्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीवर प्रचंड मर्यादा आणतात हे त्याचं ठाम मत होतं. कॉपीराइट नियमांमध्ये लवचीकता यावी या हेतूने त्याने हा प्रकल्प चालू केला.

खरं सांगायचं तर क्रिएटिव्ह कॉमन्स पद्धत कॉपीराइट नियमांच्या विरोधात नाहीए. ती पारंपरिक कॉपीराइट नियमांमुळे निर्मात्याला मिळणाऱ्या अधिकारांतले काही अधिकार वापरकर्त्यांच्या झोळीत टाकते. म्हणूनच कॉपीराइट पद्धतीत वापरलं जाणारं ‘सर्वाधिकार सुरक्षित’ (All Rights Reserved) हे कलम क्रिएटिव्ह कॉमन्स पद्धतीत ‘काही अधिकार सुरक्षित’ (Some Rights Reserved) असं बदललं आहे. क्रिएटिव्ह कॉमन्स पद्धतीत वापरकर्त्यांला कुठले अधिकार द्यायचे याचा निर्णय तो सर्जनशील दस्तऐवज बनवणारा निर्माता घेऊ  शकतो. मग त्यात त्याची नक्कल करून ती प्रत (व्यावसायिक किंवा गैरव्यावसायिक कारणांसाठी) वापरण्याचा, त्यात बदल वा सुधारणा करून पुनर्वितरण करण्याचा, मूळ निर्मितीसाठी वापरल्या गेलेल्या कॉपीराइटच्या किंवा लायसन्सिंगच्या शर्तीमध्ये बदल करण्याच्या अशा विविध अधिकारांपैकी काही निवडक अधिकार वापरकर्त्यांला बहाल करता येतात.

ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्थेप्रमाणेच क्रिएटिव्ह कॉमन्स प्रकल्पालाही आज एका चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध क्षेत्रांत निर्माण होणारा सर्जनशील दस्तऐवज आज क्रिएटिव्ह कॉमन्स पद्धतीने वितरित केला जातो. वर उल्लेखलेल्या विकिपीडिया व डीओएजे प्रकल्पात लिहिला जाणारा प्रत्येक लेख क्रिएटिव्ह कॉमन्स पद्धतीनेच वितरित होतो. त्याचबरोबर डिजिटल युगातील आघाडीची पोर्टल्स जसे यूटय़ूब (दृक्-श्राव्य साहित्य), फ्लिकर (छायाचित्र आणि इतर प्रतिमा), डिव्हायन्टआर्ट (कलात्मक दस्तऐवज), आज स्वत:कडे तयार होणारं साहित्य क्रिएटिव्ह कॉमन्स पद्धतीने वितरित करतात, यावरूनच या प्रकल्पाच्या व्यापकतेचा अंदाज येईल.

ज्ञानकोश निर्मिती, संशोधनपर लेखन असलेल्या नियतकालिकांचं प्रकाशन, जैवविज्ञान व औषध निर्माण यांसारख्या क्षेत्रांबरोबर इतरही काही क्षेत्रांत ओपन सोर्स तत्त्वांवर आधारित प्रयोग केले गेले. हार्वर्ड विद्यापीठाने सहयोगात्मक पद्धतीने कायदेशीर युक्तिवाद तयार करण्यासाठी सुरू केलेला ‘ओपन लॉ’ प्रकल्प, पेप्सी व कोकाकोलासारख्या शीतपेयांची ‘जेनरिक’ आवृत्ती तयार करण्यासाठी सुरू झालेला ‘ओपन कोला’ प्रकल्प किंवा सिटिझन जर्नलिजम या अभिनव संकल्पनेची पायाभरणी करणारा ‘ओहमायन्यूज’ प्रकल्प अशी या प्रयोगांची न संपणारी यादी बनवता येईल. असो. ओपन सोर्सच्या या विस्तारत चाललेल्या विश्वाची धावती भेट घेतल्यानंतर आजच्या डिजिटल परिवर्तनाच्या काळात ओपन सोर्सचे नेमके स्थान काय आहे त्याचे विश्लेषण आपण पुढील लेखात करू.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.

amrutaunshu@gmail.com