मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नाचे बाशिंग गुडघ्याला बांधून पक्षात वावरणाऱ्या चारदोन नेत्यांच्या प्रायोजकत्वाखाली राज्यात सुरू झालेला नेतृत्वबदलाच्या वावडय़ांचा नाटय़प्रयोग अखेर साफ फसला. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव, पक्षांतर्गत नाराजीचे बुजगावणे आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका या पाश्र्वभूमीवर, या नाटकाला भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे चित्र निर्माण करण्याचे जोरदार प्रयत्न झाले. काही दिग्गज कलावंतांच्या भूमिकांमुळे हे नाटक रंगणार आणि नेतृत्वबदल होऊनच नाटकाचा पडदा पडणार असे भासविण्याचे प्रयत्नही सुरू झाले, पण पहिल्या अंकाचा पडदा उघडण्याआधी नाटकावरच पडदा पडला आणि काँग्रेस आघाडीत पुन्हा सामसूम पसरली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हटविले नाही, तर राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव अटळ आहे, अशी वावटळ निर्माण करून त्यावर स्वार होण्याचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या डोळ्यातही कधीपासूनच तरळू लागले होते. जागावाटपात मोठा वाटा मिळविण्याकरिता, सरकारमधून बाहेर पडण्याचा बागुलबुवा दाखवत दबावतंत्र नावाचा गुळगुळीत झालेला प्रयोगही राष्ट्रवादीने करून पाहिला. पण या वादातून यशाचा मार्ग सोपा होणार नाही हे वेळीच उमगल्याने तो डावही बारगळला. विधानसभेच्या आगामी निवडणुकीनंतर राज्यात एकहाती सत्ता असावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून अक्षरश: जिवाचे रान करीत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीतील पराजयाने पक्षाला राज्यातील आपली जागा कळून चुकली. आता अस्तित्वाची सारी लढाई महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानातूनच लढावी लागणार आहे. त्यामुळे, काँग्रेसमधील असंतुष्टांच्याच हातून पक्षाच्या शक्तिस्थळांवर प्रहार करण्यासाठी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल घडविण्याच्या पक्षांतर्गत हालचालींना बळ देणे गरजेचे होते. पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्याखेरीज काँग्रेसच्या महाराष्ट्रातील शक्तीला सुरुंग लावणे अवघड असल्याचे लक्षात येताच, मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांना पुढे करून नेतृत्वबदलाच्या मोहिमेला खतपाणी घालण्याचे प्रयत्नही सुरू झाले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा डाग धुऊन काढण्यासाठी अधिक सक्षम नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुका लढविल्या पाहिजेत आणि शरद पवार हेच एकमेव सक्षम नेते आहेत, असे भासविण्याचा प्रयत्नही सुरू झाला. महाराष्ट्रातील सत्ता हेच पक्षाच्या अस्तित्वाचे आशास्थान असल्याने, नेतृत्वबदलाच्या मोहिमांची खेळी कुठे सुरू झाली हे समजण्याएवढे शहाणपण काँग्रेसच्या नेतृत्वाकडे आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली मोहिमेतून स्पष्ट झाले. येत्या जेमतेम दोन महिन्यांत राज्यात नेतृत्वबदल करून कोणताही नेता जादूची कांडी फिरवू शकणार नाही, एवढी समज दिल्लीश्वरांनी दाखविली, असा कालपर्यंतच्या घडामोडीचा अर्थ काढावयास हरकत नाही. आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस आघाडीने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लढवाव्यात अशी काँग्रेस श्रेष्ठींची इच्छा असल्याचा दावा करून काँग्रेसमध्ये बुद्धिभेद करण्याचा एक प्रयत्नही फारसा यशस्वी ठरला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीभेटीत महाराष्ट्राच्या राजकारणाचे सारे पदर पक्षश्रेष्ठींसमोर उलगडून दाखविल्याने आता नेतृत्वबदलाच्या नाटय़ावर पडदा पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही मोहीम केवळ गाजराची पुंगी होती. ती वाजली असती, तर ठीकच होते, नाही तर मोडून खाण्यात राष्ट्रवादीचे काहीच नुकसान नव्हते. खरी पंचाईत आता पक्षातील असंतुष्टांची झाली. मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नांची बाशिंगे गुडघ्यावरून उतरवून हात चोळत बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, कारण ही संधी आता पुन्हा येईलच, याची खात्री राहिलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा