राज ठाकरे यांच्या १२ फेब्रुवारीच्या कोल्हापूरच्या सभेला जमलेली तोबा गर्दी पाहून बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कच्या सभेची आठवण आली. पण या ठिकाणी ‘राउडी राठोड’ आणि ‘दबंग’ सारख्या चित्रपटांच्या पहिल्या शोला शोभेल अशी तुडुंब गर्दी आणि अर्थात हुल्लडबाजीही झाली. कदाचित राजना असे अपेक्षितच असावे. कारण यावेळी त्यांनी अश्लाघ्य, अरेरावी आणि धमकीयुक्त या सर्व विशेषणांना शोभेसे ‘मनसे स्ट्रइल’ भाषण केले. उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या ‘टाळीची’ खिल्ली उडविताना अगदी शरीर संबंधांचा दाखला देण्यापासून ते चक्क गृहमंत्री आर. आर. पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करण्याची धमकी देण्यापर्यंत बोलताना राज कोल्हापुरातली अनपेक्षित गर्दी पाहून वाहवत गेल्यासारखे वाटले. अन्यथा त्यांनी कोल्हापूरसारख्या ठिकाणी उसाचा ‘ऊ’ ही न काढता परप्रांतीयांचा गौण मुद्दा उचलला नसता. एका बाजूला शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज स्मारकांवरून काँग्रेस सरकार लोकांची दिशाभूल करते आणि मूळ प्रश्नांना बगल देते असे म्हणत दुसऱ्या बाजूला कोल्हापूरकरांची मने जिंकण्यासाठी महालक्ष्मी मंदिराला एक हजार कोटी देण्याची मागणी करायची, अशी विसंगतीही राज यांनी या ठिकाणी दाखविली. साताऱ्याजवळच्या एका बिहारी तरुणाने अल्पवयीन मुलीवर केलेला बलात्कार बोलून दाखविला. पण जातीच्या नावाखाली विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात वाढत चाललेल्या दलित अत्याचाराविरुद्ध सोयीस्करपणे चकारही काढला नाही.
राज यांची सगळी भाषणे सर्वच्या सर्व मराठी वाहिन्या संपूर्णपणे थेट आणि तेही विनाजाहिरात दाखवितात. याबद्दलचे गौडबंगाल काहीही असो. परंतु आपले भाषण महाराष्ट्राला घराघरांत जात आहे आणि त्यामुळेच कोणत्या महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्याचा संदेश आपण भाषणांतून देत आहोत याचे भानही राज ठेवत नसावेत याचे आश्चर्य वाटते. मुंबईत पोलिसांच्या समर्थनार्थ सभा केल्यामुळे आता यापुढे पोलीसही ‘आपलेच’ आहेत अशा थाटात ते मनसे कार्यकर्त्यांना कायदा हातात घेण्याचे खुलेआम आवाहन करताना दिसतात.
‘राउडी राठोड’ आणि ‘दबंग’सारखे चित्रपट जसे ‘बघा आणि विसरून जा’ या प्रकारात मोडतात तसेच राज यांचे भाषण ‘ऐका आणि विसरून जा’सारखे होऊ नये याची दक्षता त्यांनी वेळीच घेणे आवश्यक आहे. कुठे त्यांचे मनसे स्थापनेनंतर केलेले ‘मराठी कोण’ यासारखे अंगावर शहारे आणणारे भाषण तर कुठे आजकालची अर्वाच्य भाषा. अत्यंत दिमाखात हवेत झेप घेणारे एखादे हेलिकॉप्टर नंतर भरकटत जाते अशीच काही अवस्था ‘मनसे’ची झाली आहे. अगदी पहिल्याच विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आणण्याचा चमत्कार राज यांच्या करिष्म्याने करून दाखविला. परंतु विधानसभेत अबू आझमी यांना श्रीमुखात भडकविण्याचे ‘कर्तब’ सोडून बाकी मनसेच्या १२ ‘वीरांची’ विधानसभेतली कामगिरी अगदी नगण्य आहे. तसेच नाशिक आणि पुणे महानगर पालिकांमधील मनसे नगरसेवकांची कामगिरी काय, हा तर संशोधनाचा विषय ठरेल.
आज राज ठाकरेसारखे प्रभावी वक्तृत्व आणि करिश्मा कोणाकडेच नाही याबाबत दुमत नाही. पण सात वष्रे जुन्या असलेल्या ‘मनसे’ला यशाचे सत्र सुरू ठेवायचे असेल तर राजना आपले सर्वोत्कृष्ट वक्तृत्व कौशल्य नीट वापरावे लागेल. सत्ताधारी काँग्रेसच्या नाकत्रेपणामुळे आपल्याकडे येणारी तरुणाईची शक्ती केवळ ‘खळ्ळऽऽखटॅक’न करता पक्षबांधणी आणि सरकारचे अपयश प्रगल्भ पद्धतीने वेशीवर टांगणे यासाठी वापरावी लागेल. केवळ भाजपशासित राज्यांची तारीफ न करत बसता महाराष्ट्राचा एक समर्थ विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागेल. त्यांचा दौरा आताच सुरू झाला असल्याने यापुढे दुष्काळ आणि त्याचे निवारण याविषयीसुद्धा राज यांना आपली भूमिका मांडावी लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा