महाराष्ट्र सरकारचं सगळंच कसं निवांत आणि बेफिकीर चालू असतं याचा आणखी एक नमुना :
२०१३ची अमरनाथ यात्रा २८ जूनपासून सुरू होणार असल्याने त्यासाठी नोंदणी १८ मार्च पासून करावी लागणार आहे. यंदा त्याकरिता आरोग्य प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र कुठल्या संस्थांमधून मिळेल याची यादी प्रत्येक राज्य सरकारने अमरनाथ श्राइन बोर्डाला कळवायची आहे. इतर सर्व राज्यांनी आपापली यादी कळवली आहे.. फक्त महाराष्ट्र सरकार सोडून!
अमरनाथ बोर्डाकडे चौकशी केली तर, ‘तुमच्या राज्याला दोन वेळा स्मरणपत्रे पाठवली आहेत पण काहीच प्रतिसाद नाही. तुम्हीच आरोग्य खात्याकडे चौकशी करा,’ असे सांगितले गेले. आरोग्य खात्याकडे चौकशी करावी तर त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकांपैकी एक नंबर लागेल तर शपथ.
वेळेत नोंदणी झाली नाही तर काढलेली रेल्वे व विमानाची तिकिटे वाया जातात. नोंदणीसाठी थांबावे तर तिकिटे हाताबाहेर जातात. खरं तर अमरनाथ यात्रेसाठी दर वर्षी लाखांपेक्षा अधिक यात्रेकरू महाराष्ट्रातून जातात; पण सरकारला बहुधा टोल व धरणे यापुढे यात्रांसारख्या चिल्लीपिल्ली गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
यंदाच्या दुष्काळामुळे महाराष्ट्र सरकारला राज्यातून यात्रेकरूंना अमरनाथला पाठवयाचे नसेल, तर तसे जाहीर करावे. आमचाही चौकशी करायचा मनस्ताप वाचेल.
प्रसाद नाईक, लालबाग, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा