खेळ आणि क्रीडा प्रकार यांच्यातील फरक भले काहीही असोत, राजकारणाने मात्र त्यांना एका पातळीवर आणून ठेवले आहे. राजमान्यता किंवा राजाश्रय नाही, असा एखादा खेळ- म्हणजे क्रीडा प्रकार- महाराष्ट्राच्या मदानावर अभावानेच आढळत असेल.
दहीहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात करावा या मागणीसाठी उठलेला राजकीय गदारोळ शमण्याआधीच, क्रिकेटच्या मदानात सुरू झालेल्या राजकीय मोच्रेबांधणीमुळे राजकारण आणि क्रीडा यांचे नाते स्पष्ट होऊ लागले आहे. मुळात, ‘खेळ’ आणि ‘क्रीडा’ यांमध्ये फरक आहे, हे अनेकांना माहीतच नसते. सगळे क्रीडा प्रकार ‘खेळ’ या संज्ञेत समाविष्ट होत असले, तरी सगळे खेळ ‘क्रीडा प्रकार’ नसतात. त्यामुळे हा फरक माहीत नसलेले अनेक जण चक्रावून जातात आणि सूक्ष्म अभ्यासानंतर, खेळ आणि क्रीडा प्रकार यांच्यातील फरकाचे पदर उलगडू लागतात. मग, पहिल्यांदा एक फरक ठळकपणे समोर येतो. तो म्हणजे, राजकारण हा क्रीडा प्रकार नाही.. तरीही, राजकारण हा एक खेळ आहे. या खेळाला काही नियमही आहेत. तरीही, नियम गुंडाळूनच या खेळाच्या मदानात उतरणारा कुणीही या खेळाचा मुरब्बी खेळाडू ठरतो. महाराष्ट्रात राजकारणाच्या मदानावर नजर टाकली की असे अनेक मुरब्बी खेळाडू नजरेसमोर येऊ लागतात. काही खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करतात, तर काही राष्ट्रीय स्तरावर नाव कमावतात. राज्यस्तरीय खेळात नाव कमावून, राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या सर्वानाच तेथे आपल्या कौशल्याची चमक दाखविता येतेच असे नाही. पण काही मुरलेले खेळाडू मात्र, या खेळात आपल्याला डावलताच येणार नाही, अशा रीतीने आपले अस्तित्व सिद्ध करतात.
कारण, हा खेळ म्हणजे, असंख्य क्रीडा प्रकारांच्या अनुभवाचे एकत्रीकरण असते. राजकारणाच्या खेळात, कुस्तीमधील ‘धोबीपछाडी’चा डावही यावा लागतो, क्रिकेटमधील ‘गुगली’ गोलंदाजी, चौकार- षटकारांची फलंदाजी आणि गतिमान क्षेत्ररक्षणही जमावे लागते. बुद्धिबळाच्या पटावरील सोंगटय़ांच्या नेमक्या चाली आणि प्रतिस्पध्र्याच्या पुढच्या चाली ओळखून त्यानुसार आपल्या मोहऱ्यांच्या चाली करण्याचे कसब साधावे लागते, तर प्रसंगी फुटबॉलमधील चेंडूच्या अवस्थेचाही अनुभव असावा लागतो. असे सर्व क्रीडा प्रकारांचे मिश्रण असलेला राजकारण हा अस्सल खेळ असला, तरी तो क्रीडा प्रकार ठरत नाही. कारण सर्व क्रीडा प्रकार हे खेळ असले, तरी सर्व खेळ क्रीडा प्रकार नसतात. तरीही क्रीडा प्रकारांमध्ये काही खेळ वरचढ ठरतात, तर काही खेळांना दुय्यम स्थान मिळते. याचे कारण त्या खेळांना मिळणारा राजाश्रय आणि लोकाश्रय. पण असा लोकाश्रय सहज मिळत नसतो. त्यासाठी जाणीवपूर्वक, आखीव प्रयत्नही करावे लागतात. त्यासाठी आपल्या सर्व क्रीडा प्रकारांतील अनुभवांचे बेमालूम मिश्रण असलेल्या राजकारणाच्या खेळातील अनुभवांची सारी शिदोरी पणाला लावावी लागते. हे साध्य झाले, की क्रीडा प्रकारांत मोडणाऱ्या एखाद्या प्रकाराला लोकाश्रय मिळतो. सध्या क्रिकेटच्या बाबतीत असे दिसू लागले आहे. क्रिकेटला मिळालेला भरघोस लोकाश्रय हे राजकारणाच्या खेळातील मुरब्बी लोकांनी पणाला लावलेल्या आपल्या ‘सर्वक्रीडानुभवा’चे फलित आहे, असे मानावयास हरकत नाही.
राजकारणामुळेच क्रीडा प्रकारांतील अनेक खेळांना बरे दिवस येतात, अशी समजूत यामुळे अलीकडच्या काळात ठाम होऊ लागली आहे. हा विचार इतका खोलवर रुजू लागला आहे, की राजकारणाचा आधार नसलेला क्रीडा प्रकार आता अस्तित्वातच नाही. कॅरमपासून क्रिकेटपर्यंत आणि कुस्तीपासून कबड्डीपर्यंत सारे देशीविदेशी खेळ राजकारणाच्या आश्रयामुळेच तग धरून राहिले आहेत. हे चित्र साऱ्या देशात दिसत असल्यामुळे, महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक मुरब्बी खेळाडूच देशाच्या क्रीडा प्रकारांच्या नाडय़ा आपल्या हाती राखण्यासाठी धडपडताना दिसतात. कधीकधी, त्यांचा प्राधान्यक्रम कोणता, असाही प्रश्न त्यामुळे पडू शकतो. एखाद्या क्रीडा संघटनेचा अध्यक्ष किंवा पदाधिकारी असलेला राजकीय नेता किंवा केंद्रीय मंत्री जनतेमध्ये कोणत्या पदावरून परिचित आहे, यावरून त्या खेळाचे किंवा क्रीडा प्रकाराचे महत्त्व अधोरेखित होऊ लागले आहे.
केवळ याच कारणामुळे, दहीहंडीचा खेळ क्रीडा प्रकारात समाविष्ट करण्याचा हट्ट महाराष्ट्राच्या राजकारणाच्या खेळात ‘लिंबूटिंबू’चे स्थान असलेल्या काही बाळगोपाळांनी धरला असावा का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आल्यावाचून राहणार नाही. एकदा या खेळाचा क्रीडा प्रकारात समावेश झाला, की क्रीडा प्रकारांना मिळणारा ‘सरकारी राजाश्रय’ या खेळासही मिळेल आणि आजवर सक्तीच्या लोकवर्गणीतून ‘खेळविल्या’ जाणाऱ्या या खेळास सरकारी तिजोरीतूनही धनलाभ होऊ शकेल, पण त्याशिवाय, आपापल्या बाळगोपाळ मित्रमंडळांतील मर्जीधारकांच्या डोक्यावर राष्ट्रीय खेळाडूपणाचे शिरपेच खोवून त्यांना बरे दिवस आणण्याची संधीदेखील साधता येऊ शकेल. आजवर केवळ निखळ मनोरंजन करणारा हा खेळ ‘क्रीडा प्रकार’ म्हणून नोंदला गेला, की लाखोंच्या बक्षिसांनी सजविलेल्या हंडय़ा सरकारी कृपेच्या लोण्यानेही भरता येतील. दहीहंडीला क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याची मागणी कालांतराने जोर धरेल आणि अनेक क्रीडा प्रकारांतील चाली आणि डावांच्या अनुभवाने समृद्ध झालेल्या राजकारणाच्या खेळातील बुजुर्गाचा अनुभव पणाला लावून त्याला राजमान्यता मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू होईल. दहीहंडीचा भविष्यकाळ लिहिला जाण्याची आता कुठे सुरुवात झाली आहे..
राजमान्यता किंवा राजाश्रय नाही, असा एखादा खेळ- म्हणजे क्रीडा प्रकार- महाराष्ट्राच्या मदानावर अभावानेच आढळत असेल. दिल्लीतील कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धावर महाराष्ट्राच्या पुण्यनगरीतील काँग्रेसी नेते सुरेश कलमाडी यांच्या नावाची अमिट मोहोर उमटून राहिली आहे, तर महाराष्ट्राच्या अॅथलेटिक्स संघटनेवर कलमाडी समर्थक असलेल्या अतुल चोरडिया, अभय छाजेड, प्रल्हाद सावंत आदींचा पगडा आहे. कबड्डी हा मराठी मातीत, शहरांपासून ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र खेळला जाणारा क्रीडा प्रकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याने त्यालादेखील राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. साहजिकच, या क्रीडा प्रकारावर आपले वर्चस्व राहावे यासाठी राजकारणी खेळाडूंनी कसब पणाला लावणे ओघानेच येते. या खेळात प्रतिस्पध्र्याच्या पकडीतून सफाईने निसटण्याचे कसब आवश्यक असते. तसा अनुभव असलेल्याला या खेळावरही पकड साधता येते. सध्या या क्रीडा प्रकारावर राष्ट्रवादीची पकड आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्याच पक्षाचे नानासाहेब शितोळे हे संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. कुस्ती या क्रीडा प्रकाराला तर, महाराष्ट्रात आगळे राजकीय महत्त्व आहे. कारण, या क्रीडा प्रकारातील धोबीपछाड हा डाव राजकारणात कुस्तीपेक्षाही प्रभावीपणाने वापरला जातो. यामध्ये निष्णात असलेल्यांचाच या क्रीडा प्रकारावर वर्चस्व गाजविण्याचा अधिकार असणार, हे त्यामुळे ओघानेच येते. महाराष्ट्रात कुस्ती संघटनेचे अध्यक्षपद शरद पवार व अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे बाळासाहेब लांडगे यांच्याकडे आहे.
राजकारण आणि क्रिकेट यांचे नाते अलीकडच्या काळात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि अगदी स्थानिक स्तरापर्यंत सर्वत्र कमालीचे घट्ट होऊ लागले आहे. राजकारणाच्या खेळात परस्परांचे प्रतिस्पर्धी असलेले नेते क्रिकेटच्या मदानावरील वर्चस्वाकरिता एकमेकांच्या हातात हात घालतात, हे महाराष्ट्राच्या क्रीडाविश्वाने अनेकदा अनुभवलेच आहे. महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील सख्य जगजाहीर आहे. पवार यांच्या महाराष्ट्रातील राजकीय कारकिर्दीत, त्यांच्या राजकीय कुंडलीतील उपद्रवी उपग्रह म्हणून विलासरावांचे नाव घेतले जायचे. पण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र, विलासरावांना शरद पवारांचे समर्थन लाभले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या खेळातील हा मुरब्बी खेळाडू मुंबई क्रिकेट असोसिएशनचाही अध्यक्ष झाला.
महाराष्ट्राच्या क्रिकेटविश्वावर तर राजकारणाची शाश्वत सावली आहे. याचा इतिहास खूप जुना आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी शेषराव वानखेडे यांनी मुंबईत वानखेडे स्टेडियम उभारले तेव्हापासून क्रिकेट आणि राजकारण हातात हात घालून महाराष्ट्रात वाटचाल करीत आहेत. स्वत: वानखेडे, शरद पवार यांच्याप्रमाणेच, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख यांची नावेही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांच्या नामफलकावर झळकलेली दिसतात.
खेळ आणि क्रीडा प्रकार यांच्यातील असे नाते दिवसागणिक दृढ करण्याच्या राजकीय प्रयत्नांचा नवा अध्याय आता महाराष्ट्रात रंगणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असलेल्या सर्व लहानमोठय़ा क्रिकेट क्लब्जनी असोसिएशनवर प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्रातील मुरब्बी राजकीय नेत्यांची निवड केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आहेत, काँग्रेसचेच नारायण राणेही आहेत, शिवसेनेचे सुभाष देसाई आणि युवा नेते आदित्य ठाकरेही आहेत, भाजपचे गोपीनाथ मुंडेही आहेत आणि आशीष शेलारही आहेत. इतकेच नव्हे, तर गोिवदा पथकांचे प्रणेते आणि दहीहंडीला क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्यास अनुकूल असलेले बाळगोपाळांचे नेते, ‘संघर्ष’चे, राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड व वरळीच्या मदानावर ‘संकल्प’च्या दहीकाल्याचा डाव मांडून अवघ्या महाराष्ट्राला त्याचे ‘दूरदर्शन’ घडविणारे राज्यमंत्री सचिन अहिर हेदेखील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मदानात दाखल झाले आहेत.
आता मुंबई क्रिकेट असोसिएशनवर कोणत्या राजकीय पक्षाचा झेंडा लागतो, याकडे क्रीडाविश्वाचे लक्ष लागलेले असल्याने, राजकारणाच्या खेळातील सारे डावपेच आता या मदानावर खेळले जातील. त्यामुळे ही स्पर्धा गंभीर तर असेलच, पण गमतीदारदेखील ठरणार आहे..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा