दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रात रामचंद्र हेजीब १९६१ पासून होते, त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या गेल्या ५० वर्षांच्या सांस्कृतिक वाटचालीचे साक्षीदार होता आले.. पण त्यानंतरही ‘बृहन्महाराष्ट्रातील गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्र उत्सव’ हे सूत्र त्यांनी दिल्लीत केले. आता त्यांना आशा आहे, हे सांस्कृतिक काम कायम ठेवण्यासाठी सरकारसह इतरांनीही पुढे येण्याची..
दिल्लीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संवर्धनाची जबाबदारी रा. मो. हेजीब यांच्या ललाटीच लिहिली असावी. दिल्लीत १९६१ साली साजरा झालेला पहिला महाराष्ट्र दिन ते २०११ साली महाराष्ट्र राज्याचा साजरा झालेला सुवर्णमहोत्सव अशा दीर्घ सांस्कृतिक वाटचालीत सक्रिय सहभाग असलेले हेजीब गेल्या ५० वर्षांपासून राजधानीतील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीचे केवळ साक्षीदारच नव्हे तर बऱ्याच अंशी कर्तेकरवितेही ठरले आहेत. ‘महाराष्ट्र पाहिलेला माणूस’ असेच त्यांचे वर्णन करावे लागेल.
रामकृष्ण हेजीब यांचा जन्म पुण्यातला. २३ मार्च १९४३ चा. दिल्लीतील इंटेलिजन्स ब्यूरोची १९४९ साली पुनर्रचना झाली तेव्हा वडील मोरेश्वर हेजीब महाराष्ट्रातील पोलीस खात्यातून प्रतिनियुक्तीवर कुटुंबासह आले आणि १९६१ साली दिल्लीतच निवृत्त झाले. घरात थोरले असलेले रामकृष्ण हेजीब चार भाऊ आणि एक बहीण अशा कुटुंबासह ३० वर्षे करोलबागेत वास्तव्याला होते आणि त्याच भागातील सलवान स्कूल, नूतन मराठी आणि रामजस शाळेत शिकले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना नोकरी व व्यवसायातून अर्थार्जन करून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणे भाग पडले. बालपणापासून दिल्लीत राहिल्याने शिक्षण घेताना मराठीशी त्यांचा संबंध तसा घरात बोलण्यापुरताच आला. पण मराठीनेच त्यांना बालवयात अर्थार्जनाचा मार्ग दाखवला आणि पुढे जाऊन दिल्लीतील मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनात वाटा उचलून त्यांनी लौकिक यशही कमावले. नववी-दहावीत असताना हेजीबांनी मराठी नियतकालिके आणि दिवाळी अंकांचे फिरते ग्रंथालय सुरू केले. अंक असलेली पिशवी सायकलला लटकवून वर्गणीदार सदस्यांना घरपोच सेवा द्यायची, असे त्याचे स्वरूप होते. त्यातून नकळत जनसंपर्काचे धडेही मिळाले. त्याच सुमाराला दिल्लीत महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र परिचय केंद्र स्थापन झाले. हीकल्पना मूळची यशवंतराव चव्हाण, लक्ष्मणशास्त्री जोशी आणि भा. कृ. केळकर यांची. नोव्हेंबर १९६१ साली परिचय केंद्रात हेजीब यांना साहाय्यक म्हणून संधी मिळाली. या कालखंडात त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बी.ए.ची पदवी, रौप्यपदकासह पत्रकारितेतील डिप्लोमा आणि ग्रंथपालाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रंथपाल म्हणून बढती मिळाल्यावर मराठी साहित्याचे आकर्षण वाढून हेजीब यांना समृद्ध मराठीचा खऱ्या अर्थाने ‘परिचय’ घडला. १ मेचा महाराष्ट्र दिन, मराठी रंगभूमी दिन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, येणाऱ्या-जाणाऱ्या मोठय़ा साहित्यिकांच्या अनौपचारिक बैठका, महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या गाठीभेटी, अन्य समविचारी राज्यांच्या खासदारांच्या बैठका अशा कार्यक्रमांची जबाबदारी केळकर हेजीबांवर टाकायचे. केळकर महाराष्ट्रात गेल्यानंतर हेजीब आणि माहिती अधिकारी श्रीपाद वाघ यांनी परिचय केंद्राची धुरा सांभाळली. दिल्ली दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात दिल्लीत वास्तव्याला असलेले पु. ल. देशपांडे, पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्यासह प्रशांत पांडे, नगरकर, मा. कृ. पारधी, काशीनाथ पोतदार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पं महादेवशास्त्री जोशी यांच्या सहकार्याने दिल्लीत अनेक दर्जेदार साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटय़महोत्सव, चित्रपट महोत्सवांचे आयोजन करण्याचा धडाकाच लावला. चार वर्षे साहाय्यक माहिती अधिकारी, १३ वर्षे जनसंपर्क अधिकारी, चार वर्षे साहाय्यक विशेष आयुक्त, दोन वर्षे उपविशेष आयुक्त, १९८१ ते १९९२ दरम्यान ११ वर्षे महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक, १९९२ ते २००० माहिती संचालक अशी वाटचाल करीत हेजीब यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. हेजीब यांचे बंधू विजय नुकतेच केंद्रीय जलआयोगातून संचालक म्हणून निवृत्त झाले. तिसरे बंधू श्याम औरंगाबादमध्ये गरवारेमध्ये सुरक्षा संचालक म्हणून कार्यरत आहेत, तर सर्वात धाकटे मिलिंद दिल्लीतच एअर इंडियाच्या संपर्क विभागात आहेत. भगिनी पुष्पाही दिल्लीत. हेजीब यांच्या पत्नी नीना (चांदोरकर) ग्वाल्हेरच्या. तनुजा ही त्यांची एकुलती एक कन्या, नागपूरचे मनोज डबीर त्यांचे जावई. सध्या कॅनडात व्हँकुव्हर येथे राहतात. मुंबईत आहेत ते रवी आणि उल्हास हे चुलत भाऊ. आतेभाऊ अरविंद मालेगावकर वा पत्नीकडच्या नातेवाईकांमुळे पुण्याशी संपर्क आहे. निवृत्तीनंतर रामकृष्ण हेजीब यांनी माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहिले. काही कंपन्यांच्या सल्लागारपदीही ते होते, आहेत. वयाच्या ७०व्या वर्षीही दिल्लीतील सांस्कृतिक वर्तुळात त्यांचा सक्रिय सहभाग कायम आहे.
ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांच्या पत्नी सुनीती जैन परिचय केंद्रात हेजीब यांच्या सहकारी होत्या. विविध लेखकांशी संपर्क करून त्यांच्याकडून सुनीती जैन यांनी वेगवेगळ्या विषयांवर पुस्तिका काढण्यासाठी पुढाकार घेतला. दत्तोपंत पोतदारांचे ‘इनसाइड महाराष्ट्र’, श्रीपाद टीकेकरांचे ‘महाराष्ट्र, लॅण्ड अ‍ॅण्ड इट्स पीपल’, ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे रंगभूमीवरील पुस्तक, इसाक मुजावर यांचे ‘बर्थप्लेस ऑफ इंडियन सिनेमा’, ‘टेम्पल्स ऑफ महाराष्ट्र’, ‘फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र’ अशा पुस्तिकांतून दिल्लीपुढे महाराष्ट्राचे वैशिष्टय़ मांडले गेले. ही पुस्तके राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांना फार आवडली. सन २००० साली हेजीब यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करल्यानंतर हे सर्वच उपक्रम बंद पडले. शासनाची उदासीनता आणि महाराष्ट्र परिचय केंद्राने पुढाकार घेऊन पाठपुरावा करण्यासाठी असावी लागणारी वेगळ्या प्रकारची जिद्द पुढच्या काळात कमी पडली, असे त्यांना वाटते.
इंग्रजी, हिंदूी व मराठीवरील पकड, उत्तम जनसंपर्क, आकर्षक, लाघवी व्यक्तिमत्त्व आणि आयोजनकौशल्याच्या जोरावर हेजीब यांनी मराठी साहित्य, संस्कृती, नाटय़, संगीत आणि कलेच्या प्रांतासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील तमाम बडय़ा व्यक्तींशी केवळ उत्तम वैयक्तिक संबंधच प्रस्थापित केले नाहीत तर त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रापासून सांस्कृतिकदृष्टय़ा दुरावलेल्या दिल्लीकर मराठी माणसाचा मराठी बाणा टिकवून ठेवण्यात सिंहाचा वाटा उचलला. हेजीब यांचा महाराष्ट्रातील सांस्कृतिक गोतावळा भल्याभल्यांना हेवा वाटेल असाच आहे. डॉ. श्रीराम लागू, सई परांजपे, सुलभा देशपांडे, महेश एलकुंचवार, गो. पु. देशपांडे या आजच्या ज्येष्ठांपासून व्ही. शांताराम, पु. ल. देशपांडे,  वि. स खांडेकर, वि. वा. शिरवाडकर,  ह. रा. महाजनी, व्यंकटेश माडगूळकर, विजय तेंडुलकर, राजा परांजपे, सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर, सेतू माधवराव पगडी, गो. नी. दांडेकर, सी. रामचंद्र, दादा कोंडके, सतीश दुभाषी, वसंत कानेटकर, काशीनाथ घाणेकर, दामू केंकरे, धुमाळ, बेबी नंदा, यशवंत दत्त, लक्ष्मीकांत बेर्डे या दिवंगतांपर्यंत आणि जयश्री गडकर, सुधा करमरकर, मोहन आगाशे, श्रुती सडोलीकर, आरती अंकलीकर, लालन सारंग, नाना पाटेकर, सचिन पिळगावकर, सुलोचना, नीना कुलकर्णी, अमृता सुभाष, निशिगंधा वाड,  प्रशांत दामले, यशवंत देव, संजीव अभ्यंकर, सुरेश वाडकर, लावणी क्षेत्रातील गुलाब संगमनेरकर, लीला गांधी, कौशल्याबाई कोपरगावकर, माया जाधव, सुरेखा पुणेकर, श्रीलता नगरकपर्यंत त्यांचे व्यक्तिगत सांस्कृतिक मैत्र महाराष्ट्रभर विखुरलेले आहे.
निवृत्तीनंतरही हेजीब यांनी सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा सुरू ठेवली. यशवंतरावांच्या पुढाकाराने १९६३ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र सांस्कृतिक समितीचे १९९३ साली दिवंगत वसंत साठे आणि केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या संमतीने सार्वजनिक उत्सव समितीत रूपांतर झाले. दिल्लीत महाराष्ट्र दिन, लोकमान्यांची पुण्यतिथी, गणेशोत्सवातील महाराष्ट्र महोत्सव, छत्रपती शिवाजी जयंती, कोजागरीचा कार्यक्रम, मराठी रंगभूमी दिन, यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह, मराठी भाषा दिन अशा कार्यक्रमांचे ‘सार्वजनिकउत्सव समिती’तर्फे आयोजन करण्यात हेजीब वर्षभर व्यग्र असतात. याच समितीमार्फत १९९९ पासून गणेशोत्सवाच्या काळात दिल्लीत महाराष्ट्र महोत्सव मोठय़ा प्रमाणावर करायला सुरुवात झाली. गणेशोत्सवात दिल्लीत दहा दिवस महाराष्ट्र महोत्सवादरम्यान सिरी फोर्ट, कमानी, श्रीराम सेंटर, दोन्ही दिल्ली हाट, इंडिया हॅबिटाट सेंटरसारख्या नावाजलेल्या ठिकाणी  २५ ते ३० लाख रुपये खर्चून  महाराष्ट्रातील नावाजलेल्या कलावंतांच्या सहभागाने ३० कार्यक्रम होतात.  मुख्यमंत्री असताना दहा लाख रुपयांचा निधी देऊन मनोहर जोशींनी या उपक्रमाला चालना दिली. मुंबईला मुख्यमंत्री म्हणून जाण्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण या समितीचे कार्याध्यक्ष होते; पण ते मुंबईला गेल्यावर महाराष्ट्र शासनाची देणगी बंद झाली. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्याविषयी अनेक वेळा चव्हाण यांना पत्रे लिहिली. यात आपण जातीने लक्ष घालत असल्याचे त्यांचे उत्तर यायचे. रक्कम वाढवून देऊ, असे आश्वासन द्यायचे. पण घडले मात्र काहीच नाही, अशी खंत हेजीब व्यक्त करतात. ऊर्जामंत्री असताना शिंदे यांनी नवरत्न कंपन्यांकडून भरपूर अर्थसाह्य मिळवून दिल्याचाही ते आवर्जून उल्लेख करतात. त्यांची मदत पाहून अनेक सरकारी उपक्रम, विविध बँका, ललित कलापीठाच्या माध्यमातून दिल्ली सरकारचीही या महोत्सवाला मदत होत असल्याचे सांगतात. महाराष्ट्रातील नेत्यांबरोबरच राम प्रधान, बी. जी. देशमुख, अजित वर्टी, के. जी. परांजपे, प्रमोद माने, जनार्दन जाधव, शांताराम सगणे, मालती तांबे वैद्य, अरुण पाटणकर यांच्यासारख्या नोकरशहांनी दिल्लीच्या या सांस्कृतिक संवर्धनात मोठाच हातभार लावल्याची कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असते.
देशभर ४०० बृहन्महाराष्ट्र मंडळे आहेत. तिथे दरवर्षी गणेशोत्सव म्हणजेच महाराष्ट्र महोत्सव असे समीकरण व्हावे, असा त्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र शासनात काम करताना वेगळाच आनंद मिळाला, नेतृत्व करण्याचे भाग्य लाभले. दिल्लीतील सार्वजनिक उत्सव समिती वाढली पाहिजे. हेजीब आणि चार लोकांपुरती मर्यादित राहायला नको, अशी गेल्या सहा दशकांपासून महाराष्ट्राची सांस्कृतिक वाटचाल दिल्लीतून पाहणाऱ्या हेजीबांची अपेक्षा आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा