महाराष्ट्राचे राजकारण घडवणाऱ्या नेत्यांच्या जिल्ह्य़ांतील १९ मतदारसंघांत आज मतदान होत असताना राज्यातील आजच्या नेतृत्वाचा चेहरा पुढल्या पिढीचा दिसतो खरा; पण महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने युवा नेतृत्व नाही.. परिस्थितीशी झगडणारे नेतृत्व फार तर आदल्या पिढीचे.. आज आहे, ते राजकारणाचे गल्लीकरण.
प्रत्येक निवडणूक जन्माला येताना आपला चेहरा घेऊन येत असते आणि २०१४ची लोकसभा निवडणूक ही त्यास अपवाद नाही. आज, गुरुवारी १२१ लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून त्यात महाराष्ट्रातील १९ मतदारसंघ आहेत. नवे सरकार निवडण्यासाठी होत असलेल्या निवडणुकांतील हा सर्वात मोठा टप्पा. अन्य १२ राज्यांसह प. महाराष्ट्र, मराठवाडा आदी विविध विभागांत आज मतदान होत असून या सर्वातील समान धागा म्हणजे निवडणुकीच्या मैदानात असलेली विद्यमान प्रस्थापित नेत्यांची पुढची पिढी. महाराष्ट्रात सुप्रिया सुळे, विश्वजीत कदम, नीलेश राणे आदी अनेक जण आज मतदानास सामोरे जातील. असे अनेक नवे-जुने खासदार नेतृत्वाचा वडिलोपार्जित मिळालेला वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आज होणाऱ्या मतदानांत पुन्हा एकदा जनसमर्थनाचा वारसा पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याचा आणखी एक प्रयत्न होईल. परंतु होत असलेला हा खांदेपालट सरसकटपणे अभिमानास्पद आहे, असे म्हणता येणार नाही.
यास अनेक कारणे आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे राजकारणातील पुढील पिढीने मागच्यापेक्षा काही वेगळे केले असा अनुभव राज्यातील जनतेस अद्याप तरी नाही. उद्योग स्थापन करणाऱ्याप्रमाणे राजकारणातही पहिली पिढी अतोनात कष्ट करते. मग ते शरद पवार असोत किंवा पतंगराव कदम वा गोपीनाथ मुंडे. या सर्वाचे प्रयत्न प्रामाणिक होते आणि आहे त्या स्थानी पोहोचण्यासाठी या सर्वानाच रक्ताचे पाणी करावे लागले होते. पवार यांच्या घराण्यात कृषीसंबंधित उद्यमशीलता होती परंतु थेट राजकारणात कोणी नव्हते. भल्याबुऱ्या मार्गानी भारती विद्यापीठाचा साम्राज्य विस्तार करणारे पतंगराव हे तर त्यांच्या सांगलीनजीकच्या खेडय़ातून मॅट्रिक होणारे पहिलेच. गोपीनाथ मुंडे यांची पाश्र्वभूमी तर वंजारी या इतर मागास जमातीची. तरीही या सर्वानी परिस्थितीशी दोन हात करीत आपापला मार्ग काढला आणि स्वत:ला सिद्ध केले. परंतु या नेत्यांच्या पुढच्या पिढीने वाडवडिलांच्या पुण्याईची बेरीज वा गुणाकार केला असे झाले नाही. या नेत्यांच्या साधनेचे तबक सर्वार्थाने हात जोडून समोर असताना त्यांच्या पुढच्या पिढीने डोळे दिपतील अशी काही कामगिरी केल्याची नोंद नाही. वाडवडिलांनी तयार केलेल्या मळवाटेवरूनच त्यांच्या पुढच्या पिढीची पायवाट जाताना दिसते. केवळ वय या दृष्टिकोनातून पाहू गेल्यास यातील सर्वच नेत्यांच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधी ठरतात. परंतु स्वतंत्र निकष लावल्यास आज महाराष्ट्रात पूर्णपणे, खऱ्या अर्थाने युवा नेतृत्व नाही, असेच म्हणावे लागेल. जे काही युवा म्हणवून घेणारे नेते आहेत ते त्या क्षेत्रात आहेत ते वाडवडिलांच्या पुण्याईमुळे. यातील काहींनी वारशात कित्त्याबरोबर त्यांचा अडकित्ताही घेतल्याचे जाणवते. या संदर्भात रत्नागिरी मतदारसंघात जे काही सुरू आहे, त्याचा दाखला देता येईल. त्या मतदारसंघातील विद्यमान खासदार नीलेश राणे यांच्यापेक्षा त्यांचे तीर्थरूप उद्योगमंत्री नारायण राणे हेच निवडणुकीत अधिक घाम गाळताना दिसतात. तेथील तणाव लक्षात घेता रत्नागिरी मतदारसंघातील लढाई ही काँग्रेससाठी कमी आणि नारायण राणे यांच्यासाठी अधिक महत्त्वाची झाल्याचे निश्चितपणे जाणवते. यशाच्या मार्गावर येणारे सर्व अडथळे साम, दाम, दंड आणि भेद अशा विविध मार्गानी दूर करणे हे राणे यांचे वैशिष्टय़ राहिलेले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळवताना त्यांना याच मार्गाचा आधार होता. वडिलांचा अनुभव नीलेश यांच्या निवडणुकीसाठी नक्कीच कामी येत असेल. त्याचमुळे नीलेश यांचा विजय हा नारायण राणे यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा झाला आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात जे काही झाले आहे त्याचे हे लक्षण. राज्यात सर्वत्र मान्य होईल असे एकही नेतृत्व शिल्लक नसल्यामुळे राज्यांचे गल्लीकरण झाले असून प्रत्येक गल्ली ही एकेका नेत्यास जणू आंदणच दिल्यासारखी परिस्थिती आहे. यातील प्रत्येक गल्ली ही स्वयंभू आहे आणि तिचे नेते स्वायत्त आहेत. परिणामी राज्यभर ज्याचा दरारा आहे वा ज्याचा शब्द खाली पडू दिला जाणार नाही, अशी व्यक्ती महाराष्ट्रात उरलेली नाही. याचा थेट फटका औद्योगिक आणि आर्थिक विकासाला बसत असून मुंबईत राज्य सरकारच्या स्तरावर एखादा प्रकल्प मंजूर झाला तरी तो पुढे उभा राहीलच याची शाश्वती नसते. याचे कारण स्थानिक ग्रामदैवतांची शांत करणे हे प्रत्येक प्रकल्प उभारणाऱ्यासाठी आवश्यक ठरते. परिणामी नमनालाच इतके घडाभर तेल जात असल्यामुळे पुढे प्रकल्प उभारणी आदींत गुंतवण्यासाठी अल्प ऊर्जा प्रवर्तकाच्या अंगी राहते. हा मुद्दा सर्वच पक्षांना लागू होतो. त्यामुळे महाराष्ट्राची गती आणि मती कुंठित झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
परंतु यातील खेदाची बाब ही की यातील एकही मुद्दा या मंडळींच्या प्रचारात नव्हता. पुण्यासारख्या शहरात प्रयत्न झाला तो मतदारांना पैसे वाटून वश करण्याचा. असे काही पहिल्यांदाच घडल्याचा दावा कोणी करणार नाही. परंतु विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरांत विद्यापीठ चालवणाऱ्यांवरच असा आरोप व्हावा हे काही त्या शहरास, विद्यमान व्यवस्थेस आणि राजकारणास भूषणास्पद आहे असे म्हणता येणार नाही. अर्थात पुण्यासारख्या शहराचे प्रतिनिधित्व राष्ट्रकुलदीपक सुरेश कलमाडी यांनी केल्यानंतर काहीही झाले आणि कोणीही आले तरी मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही.. असेच म्हणायची पाळी पुणेकरांवर येण्याची शक्यता अधिक. तिकडे मराठवाडय़ात अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांचे नशीबदेखील या निवडणुकीत ठरेल. भ्रष्टाचार हा विषय उच्चरवाने मांडत नैतिकतेचे एकमुखी प्रवक्ते राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांना उमेदवारी देऊन निवडणुकीतील यशापेक्षा नीतिमत्ता मोठी नसते असा ‘आदर्श’ संदेश दिलाच आहे. शेजारील उस्मानाबाद मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जाणारे डॉ. पद्मसिंह पाटील हे रिंगणात आहेत. वैद्यकीय क्षेत्राखेरीज अन्य अनेक वादग्रस्त विषयांत पद्मसिंहांनी आपली डॉक्टरकी आतापर्यंत अनेकदा सिद्ध केली आहे. विविध प्रकरणांत वादग्रस्त ठरल्यामुळे त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा त्याग करावा लागला होता. या सर्व वादंगांकडे डोळेझाक करीत त्यांनाच उमेदवारी देऊन पवार यांनी राजकारणात महत्त्व कशाला असते ते दाखवून दिले आहे. उस्मानाबाद मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारही यास महत्त्व देतात किंवा काय हेदेखील या निवडणुकीच्या निमित्ताने कळून येऊ शकेल. या सर्व वादग्रस्त मुद्दय़ांना मतदार गांभीर्याने घेतात का हे पाहणे महत्त्वाचे आणि उद्बोधक ठरेल. महाराष्ट्रवगळता माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या पत्नीच्या संपत्तीचा तपशील दिला नाही म्हणून चर्चेत आलेले त्यांचे चिरंजीव कुमारस्वामी, खाणकाम सम्राट येडियुरप्पा, भाजपबहिष्कृत जसवंतसिंग, राजघराणेदार ज्योतिरादित्य शिंदे, नेमबाज राजवर्धन राठोड, राजकारणातील पर्यावरणप्रेमी मनेका गांधी आदी अन्यांच्या मतदारसंघातही गुरुवारी मतदान होत आहे.
शालेय वयात प्रत्येकास घोडा का अडला आणि भाकरी का करपली या प्रश्नास सामोरे जावे लागलेले असते. त्या प्रश्नाचे ‘न फिरवल्यामुळे’ हे उत्तर मतदान करताना अनेकांना आजही दिशादर्शक वाटू शकेल.
घोडा का अडला?
महाराष्ट्राचे राजकारण घडवणाऱ्या नेत्यांच्या जिल्ह्य़ांतील १९ मतदारसंघांत आज मतदान होत असताना राज्यातील आजच्या नेतृत्वाचा चेहरा पुढल्या पिढीचा दिसतो खरा; पण महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने युवा नेतृत्व नाही..
First published on: 17-04-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra set for 2nd phase of lok sabha polls