म. गांधी यांच्याविषयी आजवर अनेक लेखकांनी अनेक अंगांनी लिहिलेले आहे. पण गांधीजींच्या बरोबर स्वातंत्र्य चळवळीतल्या असलेल्या गांधीवादी स्त्रियांविषयी मात्र फारशी पुस्तके नाहीत. ‘मीरा आणि महात्मा’ हे एक पुस्तक असले तरी त्यात गांधीवादी महिला कार्यकर्त्यांविषयी फारसे काही नाही.
महाराष्ट्रात गांधीवादी महिलांपैकी एक ठळक नाव म्हणजे प्रेमा कंटक. ‘सत्याग्रही महाराष्ट्र’ हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक त्यांच्यावरील गांधीप्रभावाची साक्ष देते. येत्या गांधी जयंतीच्या (२ ऑक्टोबर) निमित्ताने प्रा. मीरा कोसंबी यांनी संपादित केलेले ‘महात्मा गांधी अँड प्रेमा कंटक- एक्सप्लोरिंग अ रिलेशनशिप, एक्सप्लोरिंग हिस्ट्री’ हे महत्त्वाचे पुस्तक ऑक्सफर्ड प्रकाशित करते आहे.
यात प्रेमा कंटक आणि गांधीजींचा पत्रव्यवहार, त्यांच्या ललित-ललितेतर साहित्यातील भाग, गांधी तत्त्वज्ञानाची गुंतागुंत आणि गांधीचे स्वातंत्र्यलढय़ातील स्त्रियांच्या भूमिकेविषयीचे मत, यांचा सविस्तर ऊहापोह केला आहे.
या पुस्तकातून प्रेमा कंटक-म. गांधी यांच्याबरोबरच गांधींच्या अनुयायी असलेल्या महिलांसोबतचाही अनुबंध उलगडतो. प्रेमाताई कडव्या गांधीवादी म्हणून परिचित होत्या, पण अशा अनेक कडव्या गांधीवादी महिलांचा इतिहास या पुस्तकातून मांडला आहे, जो आजवर काहीसा दुर्लक्षित राहिला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा