प्रतिभावंत नाटककार महेश एलकुंचवार आज वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण करीत आहेत. वाढदिवसाच्या आधी दोनच दिवस त्यांच्या आजवरच्या रंगभूमीवरील योगदानाचा गौरव करणारा प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे. आधुनिक मराठी रंगभूमीचे प्रणेते असलेले कै. विष्णुदास भावे यांच्या नावे दिला जाणारा हा पुरस्कार रंगभूमीला सातत्याने आधुनिक संवेदनेची नाटके देणाऱ्या एलकुंचवारांना जाहीर व्हावा, हा एक दुग्धशर्करायोग होय. मराठी नाटय़क्षेत्रातील हा सर्वोच्च बहुमान यापूर्वी बालगंधर्व, केशवराव दाते, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, विजया मेहता आदींना दिला गेला आहे. त्यात आता महेश एलकुंचवारांची भर पडली आहे. नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये शिकत असताना एकदा चित्रपट पाहावयास गेले असता सिनेमाचे तिकीट न मिळाल्याने एलकुंचवारांनी विजय तेंडुलकरांचे ‘मी जिंकलो, मी हरलो’ हे नाटक सहज म्हणून पाहिले आणि या नाटकाने प्रभावित झालेल्या एलकुंचवारांना असेही नाटक असते, याचा साक्षात्कार झाला. येथेच त्यांच्या नाटय़लेखनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. समाजाचा आरसा दाखविणाऱ्या तेंडुलकरांच्या या नाटकाने त्यांना आपले जीवितध्येय सापडले.
१९६७ साली ‘सुलतान’ या ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या एकांकिकेमुळे विजया मेहता यांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले, आणि इथूनच त्यांचा रंगभूमीवरचा झळाळता प्रवास सुरू झाला. ‘होळी’, ‘रक्तपुष्प’, ‘पार्टी’, ‘यातनाघर’, ‘विरासत’, ‘आत्मकथा’, ‘वासनाकांड’, ‘प्रतिबिंब’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ (ही त्रिनाटय़धारा चांगलीच गाजली!), ‘सोनाटा’, ‘एका नटाचा मृत्यू’ अशी एकापेक्षा एक आशय, विषय, मांडणी, लेखनशैली यांत वैविध्यपूर्ण प्रयोग करणारी नाटके त्यांनी लिहिली. ती अनेक भाषांतूनही अनुवादित झाली. त्यांचे जगभरात विविधभाषी रंगभूमींवर प्रयोग झाले. केतन मेहतांनी ‘होळी’ आणि गोविंद निहलानी यांनी ‘पार्टी’ हे चित्रपट त्यांच्या नाटकांवर बनविले. विजय तेंडुलकरांनंतर भारतीय पातळीवर पोहोचलेला नाटककार म्हणून त्यांचा सन्मानाने उल्लेख होतो. एलकुंचवारांचा ‘मौनराग’ हा ललितबंध म्हणजे त्यांच्या संवेदनशील प्रतिभेचा आणखीन एक आविष्कार होय. ‘नेक्रोपोलीस’ने त्यावर कळस चढवला. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक असूनही इंग्रजीत नाटके लिहिणे शक्य असताना त्यांनी मराठीवरील गाढ प्रेमाने मातृभाषेतून लेखन करणेच पसंत केले. त्यांच्या या योगदानामुळे आजवर होमी भाभा फेलोशिप, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, सरस्वती सन्मान, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, जनस्थान पुरस्कारासह अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. परंतु पुरस्कारांचे एलकुंचवारांना कधीही अप्रूप वाटले नाही. घसघशीत रकमेचा एक पुरस्कार त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेला कोणताही गाजावाजा न करता देणगीदाखल दिला. एलकुंचवार नावाचे एक महान नाटय़पर्व आज पंचाहत्तरीत पदार्पण करीत आहे. ‘यात विशेष ते काय?’ असा उलट प्रश्न त्यांच्याकडून येणे स्वाभाविकच आणि अपेक्षेप्रमाणे तो आलाही. अमृतमहोत्सवी वर्षांतील पदार्पणाचे त्यांच्या चाहत्यांना अप्रूप असले तरी एलकुंचवारांच्या दृष्टीने ही एक सामान्य घटना आहे. वैदर्भीय मातीतील एका नाटककाराची ही प्रचंड झेप केवळ वैदर्भीयांनाच नाही, तर अखिल महाराष्ट्राला भूषणास्पद आहे यात शंका नाही.
प्रतिभावंताची पंचाहत्तरी..
प्रतिभावंत नाटककार महेश एलकुंचवार आज वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण करीत आहेत. वाढदिवसाच्या आधी दोनच दिवस त्यांच्या आजवरच्या रंगभूमीवरील
आणखी वाचा
First published on: 09-10-2013 at 12:42 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh elkunchwar declared vishnudas bhave award