सर्व एक वेळ सोडता येईल, पण शेवटच्या श्वासापर्यंत ‘स्व’ सुटणार नाही म्हणजेच ‘माझे’ची आसक्ती एक वेळ कमी होईल, पण ‘मी’ची आसक्ती कणमात्रही कमी होणार नाही, अशा मला सद्गुरू प्रभू रामांचाच सल्ला देतात! घर-दार सुटत नाही ना? अरे, ते सोडावंच लागत नाही. फक्त तुझं जे ‘मी’ आणि ‘माझं’ आहे ना, ते सारं माझंच आहे, हे लक्षात ठेव आणि खुशाल त्यात राहा! एकदा सद्गुरू कोणाला तरी म्हणाले, ‘‘उद्या दुपारी दोन वाजता या.’’ तो म्हणाला, ‘‘गुरुजी, थोडं उशिरा आलं तर चालेल का? एक महत्त्वाचं काम होतं.’’ गुरुजींनी अनुमती दिली. तो गेल्यावर म्हणाले, ‘‘मृत्यू आला तर अशी क्षणाची तरी सूट मिळते का हो? एवढं काम करतो, मग उद्या-परवा ये, असं सांगता येतं का? नाही ना? तो आला की त्याच क्षणी सर्व आहे तिथे टाकूनच जावं लागतं ना? मग जे कधी तरी सोडावंच लागणार आहे, ते आत्ता मनानं का सोडत नाही हो? शरीरानं रहा की त्यात. करा काय हवं ते, पण मन त्यात गुंतवू नका.’’ तर असं साधतात सद्गुरू. शरीरानं त्यातच राहून मनानं कसं अलिप्त व्हावं, ही कला, हे ज्ञान ते मला अनंत काळ अत्यंत चिकाटीनं, अत्यंत प्रेमानं, अत्यंत आत्मीयतेनं शिकवत राहातात. अशा या सद्गुरूंबद्दल अभंगानुवादात स्वामी स्वरूपानंद म्हणतात, ‘‘तरी सर्वभावें। भजावें संतांसी। माहेर ज्ञानासी। होती जे का।।’’ ज्ञानेश्वरीत पुढील ओवीत या ‘माहेर ज्ञानासी’चा संकेत आहे बरं! कशी हृदयाला भिडणारी प्रतिमा आहे! सद्गुरू म्हणजे ज्ञानाचं माहेर आहेत! माहेरचा आधार, त्या आधाराचं मोल, त्यातली अतुलनीयता, ओढ केवळ स्त्रीमनालाच खरेपणानं कळेल. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे आज ‘संबंध आहेत, पण त्यातलं प्रेम गेलं आहे’, हे खरं. व्यवहाराचा, पैशाचा इतका प्रभाव वाढत चालला आहे की, नात्या-नात्यातलं प्रेम आणि सहजता आक्रसून जात आहे, हे खरं. तरी आई-मुलीचं नातं मूळची ओढ बरीचशी टिकवून आहे. जगातल्या निस्वार्थ प्रेमाचं उदाहरण म्हणून आईचं प्रेम दाखवता येईल. मग सद्गुरूंच्या प्रेमाची व्यापकता काय सांगावी! ‘‘त्वमेव माता च पिता त्वमेव। त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव। त्वमेव र्सव मम देव देव।।’’ एवढं सांगून शब्दही जिथं मौनावतात त्या सद्गुरूंच्या प्रेमाचं, वात्सल्याचं, कृपेचं आकलन कधीच यथार्थतेनं होऊ शकत नाही. माहेर जसं लेकीच्या पाठीशी अखेपर्यंत असतं तसे हे ज्ञानाचं माहेर असलेले सद्गुरू जिवाच्या पाठीशी अखंड असतात. मग असा हा सद्गुरू लाभला आणि त्याचं सर्वस्वभावे भजन केलं पाहिजे हेसुद्धा समजलं, तरी ते साधावं कसं? त्याचा उपाय काय? त्यासाठी सद्गुरू कोणता आधार निर्माण करतात? स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ओवी हेच सांगते! ही ओवी अशी : ‘‘जे ज्ञानाचा कुरुठा। तेथ सेवा हा दारवंटा। तो स्वाधीन करीं सुभटा। वोळ गोनी।।’’ अरे अर्जुना, सद्गुरू हे ज्ञानाचं घर आहेत आणि त्या घरात शिरायचा उंबरठा म्हणजे त्यांची सेवा आहे. त्यांच्या सेवेत सतत राहाणं हेच मुख्य भजन आहे! या सेवेचं विशाल अंतरंग या ओवीपासून पाहू.
२०३. मुख्य भजन
सर्व एक वेळ सोडता येईल, पण शेवटच्या श्वासापर्यंत ‘स्व’ सुटणार नाही म्हणजेच ‘माझे’ची आसक्ती एक वेळ कमी होईल, पण ‘मी’ची आसक्ती कणमात्रही कमी होणार नाही,
आणखी वाचा
First published on: 15-10-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Main praises