लोकानुनयी घोषणा, आक्रस्ताळी टीका, टाळ्याखाऊ भाषणे या जोरावर लोकप्रियता मिळवता येते. सत्ताही प्राप्त करता येते, परंतु राज्यकारभार चांगला करता येतोच असे नाही. त्यासाठी अभ्यास, समस्यांची समज, संवेदनशीलता, सहिष्णुता अशा काही गुणांची गरज असते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात नेमका त्याचाच अभाव आहे आणि ते सिद्ध करण्याचा विडाच जणू त्यांनी उचलला आहे. प. बंगालमधील डाव्यांची साडेतीन दशकांची सत्ता उलथवून लावण्याचा महापराक्रम केल्यानंतर ममतांमध्ये अनेकांना कालीमाता दिसली होती. आज मात्र त्यांची ती लोकप्रियता राहिलेली नाही. ममतांबद्दल आज तेथील मध्यमवर्गात अपेक्षाभंगाचीच भावना आहे आणि याला सर्वस्वी ममतांचा वाचाळपणा जबाबदार आहे. दोन वर्षांपूर्वी ममतांच्या तृणमूल फौजेने डाव्या आघाडीचा दणदणीत पराभव केला. त्या फटक्यातून आता कुठे सावरू पाहत असलेले डावे नेते तृणमूल काँग्रेसवर काही फुले उधळीत बसणार नाहीत. ते जमेल तिथे, जमेल त्या प्रकारे ममतांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे, हे स्पष्ट आहे. पण ममतांची समस्या अशी, की त्यांचा अहंगंड आता इतक्या उंचीवर गेला आहे की त्यांना साधी टीकाही सहन होत नाही. समाजमाध्यमातील एखादे व्यंगचित्र, सामान्य मतदाराने प्रचारसभेदरम्यान विचारलेला साधा प्रश्न अशा गोष्टीही त्यांना आकांडतांडव करण्यास पुरेशा ठरू लागल्या आहेत. आता तर त्यांनी त्याचेही शिखर गाठले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात बंगालमध्ये महिलांवरील गुन्हय़ांची तब्बल ३० हजार ९४२ प्रकरणे नोंदली गेली. एक महिला मुख्यमंत्रिपदी असताना असे गुन्हे रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जातील, अशी सर्वाचीच अपेक्षा होती. पण ते दूरच, ममतांनी बलात्काराची प्रकरणे म्हणजे आपल्या विरोधातील कुभांडेच, असा पवित्रा घेतला. परवा तर त्यांनी, वृत्तवाहिन्यांवरील चर्चेच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ अश्लीलतेचा प्रचार करतात, असा आरोप केला. हे कमीच की काय म्हणून, त्यांनी थेटच ‘बलात्कार काय मी केला?’ अशा आशयाचे विधान करून सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. अशी विधाने म्हणजे मानसिक तोल ढळल्याचेच लक्षण. ते तृणमूल कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नसले, तरी बुद्धिवादाचा वारसा सांगणाऱ्या वंगसमाजास ते दिसणारच. सरकारच्या प्रत्येक अपयशाचे खापर कम्युनिस्टांवर, प्रसारमाध्यमांवर, केंद्र सरकारवर फोडून फार फार तर पक्षकार्यकर्त्यांना बनवता येईल, पण बुद्धिजीवी वर्गास कसा गंडा घालणार? डाव्यांविरोधात लढण्यासाठी ज्या महाश्वेतादेवींनी ममतांना आशीर्वाद दिला होता, त्याच आज त्यांच्यावर नाराज आहेत. सुप्रतिष्ठित चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांनी गेल्या शुक्रवारी कोलकात्यात कलावंत आणि प्राध्यापकांचा मोठा मोर्चा काढला. हे सर्व ममतांविरोधात नागरी समाजात किती प्रक्षोभ आहे याचेच द्योतक आहे. याचा आणखीही एक वेगळा अर्थ असा, की बंगाली कलावंत आणि लेखक यांची संवेदनशीलता अजूनही जागी आहे आणि त्यांच्यात सरकारविरोधात जाण्याचे धाडसही आहे. वस्तुत: ममतांचे सरकार अगदीच अपयशी ठरले आहे असे नाही. डोक्यावर दोन लाख कोटींचे कर्ज घेऊन चाललेल्या या राज्याच्या जीडीपीचा वृद्धीदर आज राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. शेती, सेवा आदी क्षेत्रांचीही वाढ होत असल्याची सरकारी आकडेवारी आहे. परंतु या सर्व गोष्टी ममतांच्या नैतिक दर्प असलेल्या कार्यशैलीमुळे, आक्रस्ताळ्या वक्तव्यांनी झाकल्या गेल्या आहेत. लढून कमावले आणि बोलून गमावले अशीच आज तरी त्यांची अवस्था आहे.
तोल सुटला..
लोकानुनयी घोषणा, आक्रस्ताळी टीका, टाळ्याखाऊ भाषणे या जोरावर लोकप्रियता मिळवता येते. सत्ताही प्राप्त करता येते, परंतु राज्यकारभार चांगला करता येतोच असे नाही. त्यासाठी अभ्यास, समस्यांची समज, संवेदनशीलता, सहिष्णुता अशा काही गुणांची गरज असते.
First published on: 26-06-2013 at 12:16 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamatas contrived remark on rape