रूपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘तन्वीर सन्मान’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश कार्नाड यांना तर ‘तन्वीर नाटय़धर्मी’ पुरस्कार प्रदीप वैद्य यांना जाहीर झाला असून आज, रविवारी पुण्यात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. त्यानिमित्त..
आपला देश १९४७ मध्ये स्वतंत्र झाला आणि नव्या उमेदीने भविष्याकडे पाहू लागला. वसाहतवादाच्या विळख्यातून मुक्त झालेल्या देशाला स्वत:चीच ओळख आता नव्याने करून घ्यायची होती. १९७०च्या दशकात भारतीय रंगभूमीवर एक उधाण आले. बादल सरकार, विजय तेंडुलकर, मोहन राकेश आणि गिरीश कार्नाड (कर्नाड नव्हे) यांच्या नाटकांनी रंगभूमीला नवचैतन्य प्राप्त झाले. पैकी बादल सरकार, तेंडुलकर आणि मोहन राकेश यांनी राजकीय-सामाजिक आणि कौटुंबिक पर्यावरणाच्या संदर्भामध्ये पारंपरिक मूल्यव्यवस्थेला प्रश्न केले. कार्नाडांची वाट वेगळी होती. प्राप्त वर्तमानकाळातील वास्तवाचे थेट चित्रण करण्यामध्ये त्यांना स्वारस्य नसावे. त्याला कारण होते. वर्ष १९६०. कीर्तिनाथ कुर्तकोटी यांचे एक पुस्तक कर्नाडांच्या वाचनात आले. इतिहासाच्या संदर्भात आजचे प्रश्न विचारणारे नाटक कन्नडमध्ये नसल्याची खंत कुर्तकोटी यांनी व्यक्त केली होती. ती खंत एक सत्य अधोरेखित करीत होती. नाटक पौराणिक असो की ऐतिहासिक असो, त्याने वर्तमानातील संदर्भ जागे केले पाहिजेत. एरव्ही मिथके, मिथ्यकथा आणि ऐतिहासिक घटनांना संग्रहालयातील पुराण वस्तूंपलीकडे महत्त्व असणार नाही.
बाराव्या शतकामध्ये कर्नाटकात बसवण्णा आणि त्यांच्या अनुयायांनी जातीयतेविरुद्ध आवाज उठवला म्हणून त्यांना ठार करण्यात आले. अशी इतिहासाची साक्ष काढून, वर्तमानकाळातील वास्तवाकडे तलेदंड नाटकात कार्नाड  लक्ष वेधले. ऐतिहासिक नाटकांचा एक स्वतंत्र प्रवाह तसा तर भारतीय रंगभूमीवर होताच. पण इतिहासाचे उदात्तीकरण करणारे ऐतिहासिक नाटक त्यांना नको होते. पुस्तकांमध्ये मृत होऊन पडलेला इतिहास सांगणारे नाटक त्यांना अभिप्रेत नव्हते. त्यांना लिहायचे होते, आजही आपल्या राजकीय-सामाजिक पटलावर जिवंतपणे अस्तित्वात असणारा इतिहास दाखविणारे नाटक. म्हणून त्यांनी ‘तुघलक’ लिहिले.
भव्य स्वप्ने पाहणाऱ्या राज्यकर्त्यांची, त्याच्याच सहकाऱ्यांनी व नोकरशाहीने घडवून जाणलेली एक शोकात्मिका. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकातील आणि या नंतरच्याही राजकीय परिस्थितीचे अवघे संदर्भ ‘तुघलक’चा प्रयोग पाहताना प्रेक्षकांना कसे जाणवत होते, ते कार्नाडांनी  एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
नाटककार म्हणून कार्नाडांच्या वाटचालीमध्ये त्यांना पडलेला एक प्रश्न महत्त्वाचा आणि निर्णायक ठरला. ‘आपल्या रंगभूमीचे आपल्या सांस्कृतिक भूतकाळाशी कोणते नाते आहे?’ – लहानपणी यक्षगानाचे प्रयोग पाहिल्यावर त्यांची काहीशी हेटाळणीच करणारे कार्नाड आता लोकरंगभूमीचा गंभीरपणाने विचार करू लागले. संस्कृत रंगभूमीच्या गुणविशेषांनीही त्यांना खुणावले- त्यांना एक शक्यता लख्खपणे जाणवली. आधुनिक संवेदना हा आशय आणि लोकरंगभूमीची द्रव्ये हा रूपबंध यांचा मेळ जमविणे एक तर शक्य आहे आणि नाटकामध्ये व प्रयोगामध्ये तो मेळ जमला तर खऱ्या अर्थाने आधुनिक भारतीय रंगभूमी अस्तित्वात येणार आहे. लोकरंगभूमी पारंपरिक मूल्यांचा पुरस्कार करते असे दिसत असले, तरी त्या मूल्यव्यवस्थेला प्रश्न करण्याचे मार्गही लोकरंगभूमी जाणते या विश्वासाने कार्नाडांनी ‘हयवदन’ लिहिले, तसे ‘नागमंडल’ही. ती नाटके लिहिताना, कार्नाडांनी मिथ्यकथांच्या अंगभूत गुणधर्माचा मुक्तपणे वापर केला. मिथ्यकथा जशाच्या तशा राहात नाहीत. त्या आपले रूप बदलतात हे लक्षात घेऊन कर्नाडांनीही स्वातंत्र्य घेतले.
मानवी जीवनातील अपूर्णतेचे शल्य, परात्मभाव, व्यक्तिमत्त्वाचे द्विभाजन या आणि यासारख्या आधुनिक संवेदनांना न्याहाळताना, कार्नाडांनी मुखवटे, बाहुल्या, गोष्टीमधून निर्माण होणारी आणखी एक गोष्ट, यवनिका हा पडदा आणि मुख्य म्हणजे अल्प सायासाने कोणतेही वास्तव साकारण्याची लोकरंगभूमीची लवचिकता- असा रूपबंध कौशल्याने वापरला. त्यानंतर कार्नाडांच्या नाटय़लेखनाचे रूप बदलले.
 इंग्लंडमधील दीर्घ वास्तव्यानंतर आपल्या घरी- बंगळुरूला परतल्यावर त्यांनी पाहिले, की इलेक्ट्रॉनिक माध्यमाने नागरीच काय, नागरी जीवनही आक्रमिले आहे. तसेच आधुनिक संवेदनांचा- तुटलेपणाचा, द्विभाजनाचा धागा पकडून त्यांनी आता इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा रूपबंध कौशल्याने वापरला. आजही ‘इडिअम’ आहे-आजचा रूपबंध आहे .रंगभूमीने वर्तमानकाळाशी संधान ठेवले पाहिजे, याबद्दल  गिरीश कार्नाड नेहमीच आग्रही राहिले आहेत.

loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar reached in Nepal for movie shooting
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरचा येणार नवा चित्रपट, चित्रीकरणासाठी पोहोचला ‘या’ देशात
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम