धर्मतत्त्वे आणि धर्मशिक्षणांतून ‘स्वधर्माभिमान’, त्यातून इतर धर्मपंथीयांचा दुष्टावा हा ‘धर्मातिरेक’ व त्यातून ‘भयानक हिंसा’ अशी अलिखित साखळी आहे. चालू शतकात तर ही साखळी विविध मूलतत्त्ववादी, असहिष्णू संघटनांच्या बळांवर मोठाच वेग घेत आहे. हे दुष्टचक्र आपण कुठेतरी थांबविले पाहिजे..
मानवजात उत्क्रांत होऊन विजयाच्या दिशेने काही टप्पे चालली खरी, परंतु अलीकडच्या काळात तिने ‘विनाशकारी अतिरेकांच्या काही घोडचुका’ केलेल्या असून, त्यातील पहिला अतिरेक, ‘लोकसंख्या वाढीचा’ आहे. हे आपण गेल्या सोमवारच्या ‘पोरांची लेंढारे’ या लेखात पाहिले. आता या लेखात मानवजातीने स्वत:च चांगल्या हेतूंनी निर्माण केलेले विविध धर्म, तिची कशी दिशाभूल करीत आहेत आणि तिला कसे विनाशाकडे नेत आहेत, ते आपण पाहणार आहोत. तसे जगभरातील सर्वच लहानमोठय़ा धर्मपंथातील अनेक श्रद्धा व अंधश्रद्धा, माणसांची सतत दिशाभूल करीत आल्या व अजूनही करीत आहेत. याचे आपल्या देशांतील उदाहरण हे की पूर्वी यज्ञ, मंत्रपठण व नंतर गुरूंचे अंगारे, गंडेदोरे वगैरे धार्मिक उपायांनी फसून त्यात आनंद मानणारी माणसे आधुनिक काळात अंगारे व गंडेदोऱ्यांबरोबरच श्रीयंत्रे, कवचे, सुरक्षाकवचे, एकमुखी रुद्राक्ष, पंचमुखी रुद्राक्ष, भविष्य कथन, वास्तुशास्त्र, फेंग शुई, रेकी, अमूल्य रत्ने, पिरॅमिडची पॉझिटिव्ह एनर्जी अशा जाहिरातीय, वैयक्तिक, मूर्ख उपायांसाठी आपला कष्टाचा पैसा खर्च करणारी माणसे स्वत:ला धार्मिक समजून, वेळेचा अपव्यय व स्वत:ची दिशाभूल करून घेत आहेत.
सर्व धर्म व त्यांच्यातील सर्व पंथ हे वेगवेगळ्या काळी, वेगवेगळ्या परिस्थितीत व परंपरेत निर्माण झालेले असल्यामुळे त्यांच्यात दर एका साम्याबरोबर पाचदहा लहानमोठय़ा बाबतीत ‘वेगळेपण’ असते. त्यामुळे प्रत्येक धर्म, पंथ एकूण ‘वेगळाच’ ठरतो. शिवाय धार्मिक लोकांच्या दृष्टीने त्यांचा ‘स्वत:चा धर्म, इतर धर्माहून श्रेष्ठ असतो’ आणि त्याचे वेगळेपण हे धर्माधर्मातील साम्यापेक्षा महत्त्वाचे व वैशिष्टय़पूर्ण असते. वेगळेपणाच्या त्या आधारावरच त्यांच्या मनात स्वधर्माभिमान, पंथाभिमान निर्माण होतो, रुजतो, वाढतो आणि त्याचीच परिणती पुढे दुसऱ्या धर्मपंथाविषयी ‘सामूहिक शत्रुत्वभावना’ निर्माण होण्यात होते. हा प्रस्तुत लेखाचा मुख्य मुद्दा आहे. सर्व धर्म वरकरणी जरी प्रेम, बंधुभाव इत्यादी शिकवतात, तरी त्यांचे अनुयायी मात्र एका धर्माचे लोक दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या जीवावर उठून त्यांच्यावर युद्धे व अत्याचार लादतात. आजपर्यंतच्या ज्ञात मानवी इतिहासात जास्तीत जास्त युद्धे, दंगेधोपे, अत्याचार व रक्तपात, धर्म किंवा पंथ या एकाच कारणाने झालेले आहेत असे दिसते.
जुन्या इतिहासात न शिरता, आपण फक्त विसाव्या शतकापासून घडलेल्या महत्त्वाच्या घटनांवर नजर टाकू या. जागतिक महायुद्धे जरी धर्मावर आधारित नव्हती तरी दुसऱ्या महायुद्धात, ख्रिस्ती धर्माभिमानी हिटलरच्या नाझी सैन्याने, अनेक युरोपीय देशांतील ज्यू धर्मीय नागरिकांना घराघरांतून शोधून पकडून आणून ठार मारले. पूर्वेकडे नजर टाकली तर चीन, जपान, कंबोडिया वगैरे बौद्ध धर्माचा प्रभाव असलेल्या राष्ट्रांनीसुद्धा आक्रमणे, विध्वंस व नागरिकांवरील क्रौर्याची अगणित उदाहरणे नोंदविली आहेत. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी लक्षावधी निष्पाप नागरिकांवर कोसळलेला हिंसेचा आगडोंब हाही केवळ धर्मकारणेच होता. महात्मा गांधींची व इंदिरा गांधींची हत्यासुद्धा धर्मभावनेने झपाटलेल्या लोकांकडून झाल्या व तद्नंतर दिल्लीत हजारो शीख नागरिकांवर झालेला अत्याचारही अर्थातच धर्मभावनांमुळेच झाला. अलीकडेच श्रीलंकेत तामिळ विरुद्ध बौद्ध धर्मीय सिंहली भाषिकांचे यादवी युद्ध होऊन गेले आणि अगदी आजसुद्धा जगभर सगळीकडे तेच चालले आहे. इस्रायल व पॅलेस्टाइनमधला हिंसाचार ही आज दैनंदिन बाब आहे. ज्यूंचे इस्रायल हे राष्ट्र व आजूबाजूची कडवी मुसलमान धर्मीय अरब राष्ट्रे हे दोन धार्मिक गट, एक दुसऱ्यांचा नाश करायला टपून बसलेले आहेत व त्यांच्या संघर्षांत सबंध जगाचा नाश होणार असेल तरी त्यांना त्याची पर्वा नाही.
असे संघर्ष व हिंसाचार दोन वेगवेगळ्या धर्मातच होतात असेही नसून, एकाच धर्माच्या दोन पंथातही तेच घडते. इतिहासात ख्रिस्ती धर्माच्या कॅथॉलिक व प्रोटेस्टंट पंथीयांनी एक दुसऱ्यांच्या कत्तली केलेल्या आहेत. आज ते होत नाही हे खरे. तरी मुसलमान धर्मातील सुन्नी व शिया पंथीय लोक अल्लाच्याच कृपेने एक दुसऱ्यांच्या मशिदित व वस्तीत (भारताव्यतिरिक्त देशात) मोठाले बॉम्बस्फोट घडवीत आहेत. आज इराक, सीरिया, लिबिया वगैरे इस्लामिक देशांत तर धार्मिक यादवीमुळे, नेमके काय घडत आहे ते कळणेही कठीण झाले आहे. तसेच सध्या आफ्रिका खंडातील अनेक देशांतही धर्माधारित अत्याचारांचा कहर चालू आहे. काही महिन्यांपूर्वी नायजेरियन अतिरेक्यानी मुलींच्या एका शाळेतील अडीचशे शाळकरी मुलींना शाळेतून पळवून नेले! शिवाय अरब आणि जगांतील इतर अनेक राष्ट्रांत तालीबान, अल् कायदा, बोको हराम, आयसिस (म्हणजे इस्लामिक स्टेट) वगैरे कट्टर इस्लामधर्मीय, असहिष्णू, मूलतत्त्ववादी (सनातन धर्मीय) संघटना, श्रीमंत अरब राष्ट्रांच्या आर्थिक मदतीने जगभर हिंसाचार घडवून आणण्यासाठी तत्पर आहेतच. एवढेच काय, पण प्रगत पाश्चात्त्य राष्ट्रांतील लोकांचा धर्माभिमानही काही कमी होत आहे, असे दिसत नाही.
सध्या इराक, सीरिया, लिबिया वगैरे राष्ट्रांतील धर्मपंथजन्य हिंसाचारामुळे, आपापले घरदार व सर्वस्व सोडून परागंदा झालेले, बायकापोरांना घेऊन लपतछपत पळत सुटलेले, दशलक्षावधी लोक ‘आश्रयार्थी’ म्हणून तुर्कस्तान व कित्येक युरोपीय राष्ट्रांत शिरून, जिवंत राहण्यासाठी आधार शोधीत आहेत. असे म्हणतात की आजमितीला धर्मपंथच्छल या एकाच कारणाने ‘विस्थापित’ झालेल्या निरपराध नागरिकांची जगभरांतील एकूण संख्या सहा कोटी आहे आणि इतक्या लोकांना आधार मिळाला नाही तर ते ‘अन्नपाण्यावाचून तडफडून मरणार आहेत’. थांबा जरा श्वास घ्या. ही माणसे आणि त्यांची दुर्दैवी बायकापोरे ही आपली कुणी नातेवाईक वगैरे नाहीत हे खरे; पण तरीही ‘मानव’ या नात्याने ते आपले बहीणभाऊ व मुलेबाळे नाहीत का? आता विचार करा की भारतासह जगात अनेक राष्ट्रांत, जिथे जिथे वेगवेगळ्या धर्मपंथाचे लोक एकत्र राहतात, तिथे सगळीकडे, बहुसंख्याकांनी व अल्पसंख्याकांनी एकमेकांना ठार मारायचे ठरविले तर जगभर केवढा हलकल्लोळ माजेल आणि रक्ताच्या नद्या वाहतील. परंतु बहुतेक धर्माभिमानी लोकांना हे कळतच नाही व ते आपापला धर्माभिमान कमी करीतच नाहीत, याला काय करावे?
थोडक्यात असे की ईश्वराने निर्मिलेले असे मानलेले सर्व धर्म मूलत: जरी कितीही चांगल्या हेतूंनी निर्माण झालेले असले आणि प्रत्येकाला स्वत:चा धर्म जरी कितीही श्रेष्ठ वाटत असला, तरीही आपल्या या असल्या धर्माचा जगावरील प्रत्यक्ष परिणाम ‘दहशतवाद आणि अतोनात हिंसाचार’ हाच आहे. धर्मतत्त्वे आणि धर्मशिक्षणांतून ‘स्वधर्माभिमान’, त्यातून इतर धर्मपंथीयांचा दुष्टावा हा ‘धर्मातिरेक’ व त्यातून ‘भयानक हिंसा’ अशीच ही अलिखित साखळी आहे. आणि चालू शतकात तर ही साखळी विविध मूलतत्त्ववादी, असहिष्णू संघटनांच्या बळांवर मोठाच वेग घेत आहे. हे दुष्टचक्र आपण कुठेतरी थांबविले नाही तर काय होईल? मानवी मनात रुजलेल्या व आता वाढत असलेल्या धर्मजन्य असहिष्णुतेचे, दुष्टाव्याचे हे दुष्टचक्र ही एकच बाब जगांतील अब्जावधी माणसांचा नाश व्हायला पुरी पडेल असे वाटते.
बरे, आजकाल धर्मविद्वेषाच्या मदतीला अण्वस्त्रेसुद्धा उपलब्ध आहेत. धर्मवेडय़ा राष्ट्रांकडेही ती आहेत. जगात जर धर्मद्वेषाकारणे मोठे अणुयुद्ध झाले, तर या पृथ्वीवरील संपूर्ण मानवजात नष्ट व्हायला कितीसे दिवस लागतील?
कृपया या माझ्या लेखनाचा असा अर्थ लावू नका की मी वाचकांच्या मनात अनाठायी भीती निर्माण करीत आहे. मी निरीश्वरवादी अवश्य आहे, पण निराशावादी मात्र नाही. एक सामान्य माणूस म्हणून मला अशी आशा आहे की मनुष्यजात, या धर्मपंथसमस्येचा समंजसपणे विचार करील. जगांतील आजचे सर्व धर्मपंथ हे मानवी बुद्धीची फसवणूक आहेत हे समजून घेईल आणि आपापला स्वधर्माभिमान, पंथाभिमान सोडून देईल. निदान कमी करील व मानवधर्म स्वीकारील; आजच्या आधुनिक प्रगत जगाला, सध्याच्या एवढय़ा व अशा धर्माची काही जरुरी नाही आणि ‘धर्म व ईश्वर’ या आपल्या संकल्पनांची ‘सामाजिक उपयुक्तता’ आता संपलेली आहे हे ती समजून घेईल. या जगांतील सबंध मानवजातीचा विध्वंस होण्याची वेळ आली तर कुठल्याही धर्मग्रंथातील ईश्वरअल्ला इथे येऊन तिला वाचविण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे त्यासाठी जे काही करायचे ते आपणच करायचे आहे हे तिला उमगेल व ते ती करील.
गेल्या सोमवारच्या (१४ डिसेंबर) लेखात आपण चर्चिलेला ‘लोकसंख्यातिरेक’ या घोडचुकीचे मूळ कारणसुद्धा ‘धर्म’ हेच आहे. कारण सगळे धार्मिक लोक ‘मुले ही देवाची देणगी मानतात.’ भारतीय लोकांना तर मृत्यूनंतर स्वर्गमोक्ष मिळावा म्हणून ‘मुलानेच’ प्रेताला अग्नी देणे जरूर असते. अशा या हानीकारक धार्मिक कल्पना सोडून, मानवजातीने विवेकाच्या साहाय्याने जगभर गंभीरतेने ‘लोकसंख्या नियोजन’ करून ‘लोकसंख्येचा विस्फोट’ रोखणे आणि निरीश्वरवाद व मानवधर्म स्वीकारणे आवश्यक आहे.