मानवाने स्वत:च घडविलेला व त्याला विनाशाकडे नेणारा ‘प्रदूषणातिरेक’ हा (जनसंख्यातिरेक व धर्मातिरेकानंतर) तिसरा महाभयंकर अतिरेक होय. निसर्गाला प्रदूषित करून त्याची वाट लावल्याने येणाऱ्या पिढय़ांना या शतकात सुखाचे जीवन जगता येईल असे वाटत नाही..
झाडे किंवा वृक्ष हे पृथ्वीवरील अत्यंत महत्त्वाचे व ठळक सजीव प्रकार आहेत. अलीकडेच अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीने आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या टीमच्या साहाय्याने, सॅटेलाइट वापरून केलेल्या एका संशोधनात असा शास्त्रीय अंदाज बांधला आहे की, जगात आता फक्त तीन ट्रिलियन (म्हणजे तीन हजार अब्ज) झाडे उरली आहेत. यासमोर जगाच्या मनुष्यसंख्येचा अंदाज सात अब्ज आहे हे आपण आधीच्या लेखांत पाहिलेले आहे. याचा अर्थ असा होतो की, पृथ्वीवर आज दर माणशी सुमारे ४२५ झाडे आहेत. म्हणून तर आपल्या हवेच्या आवरणात पुरेसा प्राणवायू (ऑक्सिजन) आहे व म्हणून तर आपण सर्व जण अजूनपर्यंत जिवंत आहोत. मी काही कुणी वैज्ञानिक वगैरे नाही, पण एक सामान्य माणूस म्हणून माझी अशी माहिती आहे की, आपल्या वातावरणात ‘ऑक्सिजनचा पुरवठा करणारा एकमेव सोर्स’, ‘झाडे आणि वनस्पती’ हाच आहे; परंतु आता अशी अडचण येत आहे की, लोकसंख्या वाढत असताना जगभरातील झाडांची संख्या कमी कमी होत आहे. त्याची कारणे अशी आहेत-
(१) अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत जगभर अनेक ठिकाणी आगी लागून वारंवार हजारो, लाखो एकर जंगले जळत आहेत व आपण या आगी रोखू शकत नाही. (२) खनिजे, लाकडे व इतर वनसंपत्तींसाठी आणि अन्नोत्पादन व निवासासाठी मनुष्यप्राणी हजारो वर्षे जंगले उद्ध्वस्त करीत आला आहे व नवीन जंगलाची तो फारशी लागवड करीत नाही. (३) अलीकडच्या काळात औद्योगिकीकरण व शहरीकरणासाठीही जंगले उद्ध्वस्त केली जात आहेत. म्हणजे आज जगात एकूण जी वनस्पतीसंपत्ती आहे ती एका बाजूला सतत कमी होताना, जगाची मनुष्यसंख्या मात्र सतत वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दशकांतच (म्हणजे आपल्या मुलानातवंडांच्या जीवनकाळातच) अशी वेळ येईल की, जगात दर माणशी इतकी कमी झाडे उरतील, की वातावरणात सजीव प्राण्यांना पुरेसा ऑक्सिजन ती देऊच शकणार नाहीत. ‘आतापर्यंत जग जसे चालू राहिले, तसेच यापुढेही चालू राहील’ असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे गृहीत कसे चुकीचे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. प्राणवायूशिवाय या पृथ्वीवर सजीव प्राणी आणि माणूस काही मिनिटे तरी जगू शकतील काय?
तशी वेळ आलीच तर, मनुष्यजात मंगळावर किंवा प्रचंड विश्वातल्या इतर कुठल्या ग्रहावर जाऊन वस्ती करील, असे तुम्हाला वाटते का? उगाच खोटी स्वप्ने बघू नका. अब्जावधी लोकसंख्येने असे जाणे हे शक्य तरी आहे का? आणि तिथे तरी पाणी, झाडे व प्राणवायू आहे हे कशावरून? आणि असा ग्रह आहे तरी कुठे? आणि तिथे पोहोचायला किती हजार वर्षे लागतील? आणि खरेच ते प्रत्यक्ष घडू शकेल काय? माणसाने स्वत:ची फसवणूक करण्यात काही अर्थ नाही. म्हणून तर ‘मानव-विजयाची गाथा’ सांगता सांगता, आता जवळ आलेली ‘मानव-विनाशा’ची शक्यता सांगून ठेवणे, मला अनिवार्य वाटत आहे.
मानवाने स्वत:च घडविलेला व त्याला विनाशाकडे नेणारा ‘प्रदूषणातिरेक’ हा (जनसंख्यातिरेक व धर्मातिरेकानंतर) तिसरा महाभयंकर अतिरेक होय. पृथ्वीवर प्रदूषण सतत वाढत आहे. कारण जगभर सर्वत्र व सतत मोटारी धावत आहेत, ऊर्जाचलित साधने व त्यासाठी ऊर्जा उत्पादनाकरिता वीज केंद्रे सतत धडधडत आहेत; विविध उद्योग व बांधकामे वाढत आहेत आणि शेतीत व इतरत्रही घातक रसायनांचा वापर वाढत आहे आणि अशा प्रकारे वातावरणातील कार्बन आपण सतत वाढवीत आहोत.
अमेरिकेच्या ‘नासा’मधील ‘गोडार्ड इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस स्टडीज’चे संचालक व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जेम्स हॅनसेन हे त्यांच्या ‘स्टॉम्र्स ऑफ माय ग्रॅण्डचिल्ड्रेन’ या प्रकाशित ग्रंथात व इतरत्र असे दाखवून देतात की, ‘पृथ्वीवरील वातावरणात माणसांच्या कृतींमुळे दर वर्षी एक हजार कोटी टन कार्बन डायऑक्साइड व तत्सम वायूंची भर टाकण्यात येत आहे. त्यापैकी चारशे कोटी टन कार्बन वनस्पतींकडून म्हणजे उरलेल्या जंगलांकडून व महासागरातील हरितद्रव्यांकडून शोषला जात आहे. म्हणजे दर वर्षी सहाशे कोटी टन कार्बनची ‘निव्वळ भर’ पडत आहे. वातावरणातील कार्बनच्या वाढीचा हा वेग, पूर्वी येऊन गेलेल्या सर्वात वेगवान उष्णयुगातील वाढीपेक्षा ‘वीस हजार पट’ जास्त आहे, असे ते म्हणतात. त्यांच्या अभ्यासानुसार, हवेत कार्बन उत्सर्जन असेच चालू राहिल्यास, येत्या दोन-चार दशकांतच तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिग) ‘अनियंत्रित’ होणार आहे. म्हणजे वातावरणातील अतिकार्बनमुळे आपली पृथ्वी अध्र्या वयातच दूषित हवेने म्हातारी होऊन तिला ताप चढणार आहे. याचा अनुभव आपण सध्यासुद्धा घेत आहोत असे वाटते. उत्तर भारतात काही ठिकाणी व जगात इतरत्रही काही भागांत उन्हाळ्याच्या दिवसांत ‘शेकडो माणसे उष्माघाताने मेली’ असे आपण वृत्तपत्रांत वाचतोच नाही का? परंतु तो परिणाम तेवढाच नाही. ‘ग्लोबल वॉर्मिग’ ही ‘अतिरंजित भीती’ किंवा ‘दूरवरची शक्यता’ नसून, त्याचे प्रत्यक्ष परिणाम आताच कसे दिसू लागले आहेत, ते पाहा. (१) अलीकडेच हिमालयावरील बर्फ वितळून नद्यांचे व हिमनद्यांचे ओघ घटून आणि ढगफुटी, डोंगर फाटणे वगैरे अनेक कारणे एकत्र येऊन उत्तराखंडात केवढी भीषण दुर्घटना घडली ते आपण अनुभवले आहे. आता अमरनाथला बर्फाचे शिवलिंग बनत नाही, तेथील डोंगर बर्फाच्छादित नसतात आणि ‘बियास’सारखी मोठी नदीसुद्धा, काही भागांत फक्त पावसाळ्यातच वाहते, असे म्हणतात. तर श्रीनगर शहरातसुद्धा महापूर प्रत्यक्ष येऊन गेला. (२) उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळून जगभर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असून त्यामुळे लवकरच जगातील बहुतेक किनारपट्टय़ा बुडणार आहेत. येत्या काही दशकांतच न्यूयॉर्क, टोकियो, मुंबईसारखी समुद्रकाठची महानगरे, समुद्राची जलपातळी वाढून बुडणार आहेत; तिथे माणसे राहू शकणार नाहीत. (३) आपल्याकडे मोठी वादळे फारशी येत नाहीत; परंतु जगात अनेक ठिकाणी वादळे व त्यांची विध्वंसकता वाढत आहे. (४) पावसाचे चक्र बिघडून अनियमित झाले असून, कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ असे अनुभवास येत आहे. (५) शेवटी हेही लक्षात घेऊ या की, यापुढे आपण लगेच नूतनीकरणक्षम वा अकार्बनी ऊर्जास्रोत वापरले तरी, आपण गेल्या दोन-अडीच शतकांतील औद्योगिकीकरणाने वातावरणात आधीच भरून ठेवलेला कार्बन येती हजार वर्षे तसाच राहणार आहे.
प्रदूषण हवेचे, आवाजाचे, पाण्याचे, किरणोत्सर्गाचे किंवा नष्ट होऊ न शकणाऱ्या कचऱ्याचे किंवा प्रकाशाचेसुद्धा, अशा अनेक प्रकारचे असू शकते. रासायनिक कारखान्यांनी वापरलेले पाणी नदी-नाल्यांत सोडून त्या प्रदूषणाने तेथील जीव-जाती नष्ट होत आहेत. पूर्वीच्या अनेक स्वच्छ नद्या आता गटारे बनत आहेत. आपण दूषित केलेली गंगा आपल्यालाच शुद्ध करणे आता अशक्य होत आहे. समुद्रातील तेलविहिरींची गळती, टँकरमधून तेलगळती, शहरांचे सांडपाणी वगैरे कारणांनी समुद्र दूषित होऊन त्यातील जलचरांचे जीवन साफ उद्ध्वस्त होत आहे. समुद्रातील हरितद्रव्य व पाण्यावरील समुद्रपक्षीसुद्धा नष्ट होत आहेत. आपल्या अणुभट्टय़ांमधील किरणोत्सारी कचरा हाही आणखी एक भयानक विषय आहे. सध्या हा कचरा, समुद्रातील खोल चरांमध्ये सोडला जातो; पण असे हे किती दिवस करता येईल? क्लोरोफ्लुरोकार्बनमुळे वातावरणाच्या वरच्या ओझोनच्या थराला खिंडारे पडली आहेत व त्यातून सूर्यकिरणातील घातक किरणे वातावरणात शिरून त्यात सजीवांना सुखाने जगणेच अशक्य होईल. आताच शहरी जीवनात प्रदूषणजन्य आजार वाढत आहेत. थोडक्यात असे की, माणसाने पृथ्वीवरील निसर्गाला प्रदूषित करून त्याची वाट लावलेली आहे. आपल्या मुला-नातवंडांना चालू एकविसावे शतकभर तरी या निसर्गात सुखाचे जीवन जगता येईल असे वाटत नाही.
मानवजातीचा अतोनात ‘हव्यास व लोभ’ हीच प्रदूषणातिरेकाची मूळ कारणे आहेत. लाकडांसाठी जंगलतोड, खनिजांसाठी खाणी उत्खनन, अमाप ऊर्जा वापर, अनैसर्गिक शेती, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि आज आपण सर्व जण ज्याच्या पाठी लागलो आहोत तो आपला ‘विकास’ या सर्व गोष्टी वातावरणाचा समतोल सांभाळून व त्याला भकास न बनविता करता येणे अशक्य आहे. या विषयाची चर्चा एका लेखात तर राहोच, पण डझनभर लेखांतसुद्धा करणे कठीण आहे, पण आता हे वर्ष तर संपले आहे. म्हणून आता मी हा लेख व त्याद्वारे ही लेखमाला आटोपत आहे.
(या लेखातील पुष्कळ माहिती ‘महाविस्फोटक तापमान वाढ- सृष्टीसह मानवजात विनाशाच्या उंबरठय़ावर’ या माहीम (मुंबई) येथील अ‍ॅड्. गिरीश राऊत या कार्यकुशल, विचारवंत समाजकार्यकर्त्यांने लिहून विनामूल्य प्रसारित पुस्तिकेतून त्यांच्या परवानगीने घेतली आहे. त्यांचे आभार.)
कुठल्याही विषयाचा तज्ज्ञ नसलेल्या आणि सामान्य नोकरदार म्हणून जीवन जगलेल्या (पण मला वाटते चिंतनशील असलेल्या) माझ्यासारख्या एका साध्या लेखकाने गतवर्षभरात ‘लोकसत्ता’त लिहिलेली ही लेखमाला जी अनेक वाचकांनी आवडीने वाचली व काहींनी अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादही दिला, तिला मी आता पूर्णविराम देत आहे. ‘लोकसत्ता’चे आणि तुम्हा सर्वाचे आभार मानतो व तुमचा निरोप घेतो.
(समाप्त)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा