ज्योतिषाने सांगितले तसेच घडले तर तो साधक अनुभव आणि त्याच्या विरुद्ध घडले तर तो बाधक अनुभव. प्रत्येक श्रद्धावान मनुष्य त्याच्या आयुष्यात आलेले साधक अनुभव जमा करून ठेवतो व इतरांना उत्साहाने सांगतो आणि बाधक अनुभव मात्र काही जुजबी कारणे, पळवाटा शोधून तो बाजूला सारतो आणि विसरून जातो..

‘ईश्वराचे अस्तित्व आणि त्याचे कर्तृत्व’ मानणारे लोक जगात बहुसंख्य आहेत व ते नाकारणारे लोक जगभरात ‘अल्पसंख्य’ किंवा ‘फारच अल्पसंख्य’ असावेत. वास्तविक जन्माला येणारे प्रत्येक बालक जन्मत: नास्तिकच असते. ईश्वर कोण आहे, कुठे आहे व तो काय करतो, हे त्याला कुठे ठाऊक असते? त्याचे आई-वडील व इतर मोठी मोठी माणसे ते त्याला सांगतात. मग प्रत्येक मनुष्य बालपणापासूनच ईश्वर मानू लागतो, कारण सर्वाच्याच मनावर त्यांच्या बालपणापासून ‘ईश्वराचे अस्तित्व व कर्तृत्व’ बिंबविलेले असल्यामुळे त्या प्रश्नाचा नि:पक्षपाती विचार बहुधा कुणीच करू शकत नाहीत; पण याबाबत कधी चर्चा करण्याची वेळ आलीच, तर मात्र ते म्हणतात की, ईश्वराच्या ‘अस्तित्व आणि कर्तृत्वाचा’ त्याला ‘स्वत:ला प्रत्यक्ष अनुभव’ (स्वानुभव) आलेला आहे व म्हणून ते ईश्वरावर विश्वास (श्रद्धा) ठेवतात. तसे पाहता मानव जातीचे विश्वास व सर्वच ज्ञान, मानवजातीने स्वत: घेतलेल्या अनुभवांतूनच जमलेले असते व त्यामुळे ‘एकूणच सर्व ज्ञानांचा व मतांचा उगम व विस्तार स्वानुभवजन्यच असतो, असावा’ हे म्हणणे सर्वसाधारणपणे बरोबरच आहे.
परंतु तसे म्हणण्यात एक मेख आहे व ती त्या अनुभवांचा अर्थ लावण्यामध्ये आहे. आपले मन जर ‘मोकळे मन’ (डस्र्ील्ल ्रेल्ल)ि असेल, तर आलेल्या अनुभवांचा योग्य अर्थ लावला जाण्याची शक्यता जास्त असते. जर मन पूर्वग्रहदूषित असेल (जसे बहुधा सर्वाचे असते) तर आलेल्या अनुभवाचा अर्थ पूर्वग्रहानुसार लावला जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे अगदी एकाच अनुभवाचा अर्थ वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळा लावू शकतात, लावतात.
आता एक साधे उदाहरण घ्या. एका कुटुंबातील एक मुलगा एस.एस.सी.साठी पुष्कळ अभ्यास करूनही परीक्षेत नापास झाला. पुढच्या वर्षी त्याच परीक्षेसाठी अभ्यास करून तो पुन्हा बसला व चांगला पास झाला. आता त्याच्या आईचे म्हणणे असे की, दुसऱ्या वर्षी तो बसण्यापूर्वी तिने दादरच्या सिद्धिविनायकाला नवस केला होता आणि वडिलांचे म्हणणे असे की, या वर्षी मुलगा नक्की पास होईल, असा ‘आशीर्वाद’ त्यांच्या गुरूने दिला होता. यंदा मुलगा पास झाला याचा आनंद सर्वाना झालाच, पण त्याचे सारे श्रेय दिले गेले ते नवसाला व गुरुबाबांच्या आशीर्वादाला. आधीच्या वर्षी तो नापास झाला, तेव्हा काही विषयांचा त्याने पुरेसा अभ्यास केला नसेल किंवा ते विषय तेव्हा त्याला नीट समजले नसतील किंवा त्या वर्षी फार अनपेक्षित वेगळेच प्रश्न आले असतील किंवा आणखी काही कुठे चुकले असेल, उणे राहिले असेल आणि पुढील वर्षी, त्या परिस्थितीत बदल होऊन तो चांगला पास झाला असेल, अशा शक्यता कुणी लक्षात घेत नाही. खोलात जाऊन खरे कारण शोधण्याची, योग्य अर्थ लावण्याची बहुधा कुणाची तयारी नसते. त्यापेक्षा देवाच्या कृपेने किंवा गुरुबाबाच्या आशीर्वादाने हे घडले, असा निष्कर्ष काढणे फार सोपे असते. अनुभव एकच आहे, पण त्यातून निघालेले अर्थ वेगवेगळे आहेत.
जे परीक्षेबाबत खरे आहे तेच नोकरी-व्यवसायाबाबत, लग्नाबाबत, सांसारिक अडचणी, आजार, शरीर प्रकृती आणि आयुष्यातील अगदी मृत्यूपर्यंतच्या सर्व बाबतीत खरे आहे. आपल्याला आलेल्या अडचणी व झाले असले तर त्यांचे निराकरण या सगळ्यांचे अर्थ आपण आपल्या पूर्वग्रहांनुसार लावतो. तुमच्या आयुष्यातील समस्यांना व यशापयशाला, आकाशातील ग्रह कारणीभूत आहेत, अशी जर तुमची समजूत असेल, तर तुम्ही कुणा ज्योतिषाकडे जाल किंवा जगातील काही सुष्ट, दुष्ट गूढ (आध्यात्मिक) शक्ती तुम्हाला अपकारक, हानीकारक ठरत आहेत, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखादा बुवा-बाबा किंवा सद्गुरू (पुरुष किंवा स्त्री) शोधून काढाल व असले लोक त्या घटनांचे गूढार्थ तुम्हाला समजावून सांगतील, तुम्ही त्यांचे मार्गदर्शन घ्याल, खोटेच समाधान मिळवाल, पण तुम्ही लुटले जाल हे निश्चित.
सर्वाच्या आयुष्यातील बरे-वाईट सर्वच अनुभव ढोबळपणे दोन भागांत विभागता येतात. एक ‘साधक’ व दुसरे ‘बाधक’. काही अनुभव ज्योतिषी, गुरू, ईश्वर, दैवी किंवा गूढ शक्ती इत्यादींवरील विश्वासाला स्पष्टपणे ‘साधक’ असतात तर दुसरे काही अनुभव स्पष्टपणे ‘बाधक’ असतात. गुरूने, ज्योतिषाने सांगितले तसेच घडले तर तो साधक अनुभव आणि त्याच्या विरुद्ध घडले तर तो बाधक अनुभव. प्रत्येक श्रद्धावान मनुष्य त्याच्या आयुष्यात आलेले साधक अनुभव जमा करून ठेवतो व इतरांना उत्साहाने सांगतो आणि बाधक अनुभव मात्र काही जुजबी कारणे, पळवाटा शोधून तो बाजूला सारतो आणि विसरून जातो. देवाची नियमित पूजा-प्रार्थना करीत असल्यामुळे त्याच्यावर आलेली संकटे कशी टळली ते तो मोठय़ा उत्साहाने सांगतो, पण मुळात ते संकट आले कसे व त्यामुळे कमी-जास्त नुकसान झाले ते झाले कसे, याचे त्याच्याजवळ काही उत्तर नसते किंवा पूर्वजन्मींचे ‘संचित कर्म’ आपला कर्मविपाक सिद्धान्त किंवा ‘सैतानाचे दुष्कर्म’ अशी उत्तरे सर्वच ठिकाणी लागू पडतात. दैवी शक्तींवरील विश्वास, गुरूच्या अतिनैसर्गिक सामर्थ्यांवरील विश्वास, तसेच ज्योतिष, मुहूर्त पत्रिका पाहणे, जुळविणे वगैरेंवरील विश्वास या कशालाही पूर्ण ‘बाधक’ असे कितीही प्रत्यक्ष अनुभव, श्रद्धावंताच्या जीवनात आले तरी तो आपली श्रद्धा सोडत नाही, कारण त्याच्या पूर्वजन्मींची कर्मे त्याला ठाऊक नाहीत, असे तो म्हणतो, तसेच ईश्वराची इच्छा काय आहे तेही त्याला माहीत नाही, असे तो म्हणतो. थोडक्यात असे की, तो सगळे साधक अनुभव जमा करतो व सगळे बाधक अनुभव बाजूला सारतो. कुठल्याही घटनेचा योग्य अर्थ समजण्यासाठी पूर्वग्रहविरहित मोकळे मन म्हणजे जे विवेकी मन हवे असते ते फारच थोडय़ांपाशी असते व ते त्यांनी प्रयत्नपूर्वक मिळविलेले असते. सर्व घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनांतून बघण्याची व तर्कबुद्धी वापरण्याची सवय त्यांनी स्वत:ला लावून घेतलेली असते.
दंगे, युद्धे, वाहनांचे, घरांचे अपघात, आगी, जत्रेत झालेली चेंगराचेंगरी व त्यात होणारे स्त्रिया व बालकांचे मृत्यू इत्यादी सर्व मानवनिर्मित दुर्घटनांचे अनुभव हे मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण अशा आपत्तीतून काही जण वाचत असले तरी कित्येक जण त्यात आपले जीवनसर्वस्व गमावून बसतात. अशा दुर्घटनांमध्ये मरणारे का मरतात आणि वाचणारे का वाचतात याचा विश्वासार्ह शोध गूढ दैवी शक्तींचे अस्तित्व किंवा कर्मफलसिद्धान्त मानून, आपण कधीच घेऊ शकणार नाही.
तसेच नैसर्गिक आपत्तींची उदाहरणे घ्या. अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी अशा नैसर्गिक आपत्ती केव्हा, कुठे येतील आणि केवढा हलकल्लोळ माजवतील, हे कुठल्याही सद्गुरूला, बुवा, बाबा, ज्योतिषी यांना कधीच माहीत नसते. या आपत्तीसुद्धा अचानक येतात व त्यात हजारो निष्पाप माणसांना आपले सर्वस्व आणि प्राणसुद्धा गमवावे लागतात. वादळाने, पुराने हजारोंच्या आयुष्याची वाताहत होऊ शकते आणि त्सुनामी आली तर ती किती लाखांचे जीवन उद्ध्वस्त करील याचा काही पत्तासुद्धा लागत नाही. शिवाय सर्वच आपत्ती हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती किंवा धार्मिक, अधार्मिक असा काहीही भेद करीत नाहीत. मग अशा आपत्तींमध्ये सापडून मरणारे सर्व लोक काय पापी असतात? आणि त्यातून वाचणारे सर्व लोक काय पुण्यवान असतात? जे सहीसलामत वाचतात ते म्हणतात आम्ही गुरुकृपेने किंवा ईश्वरकृपेने वाचलो; पण ज्यांचा जीव जातो त्यांच्यावर तो परमदयाळू ईश्वर का बरे कृपा करीत नाही? त्यांचे मागे राहिलेले नातेवाईक मग म्हणतात की, त्यांच्या नशिबात अपमृत्यू होता.
सारांश असा की, हे सर्व घटना घडून गेल्यावर समजूत घालण्याचे विचार आहेत. खरे तर या अगणित आपत्तींच्या कटू अनुभवांचा पूर्वग्रह विसरून मोकळ्या मनाने एकत्रित आढावा घेतला, तर ते सर्व अनुभव ईश्वरावरील श्रद्धेला स्पष्टपणे बाधक असतात. का म्हणून तो ईश्वर, अशा लाखो संसार उद्ध्वस्त करण्याऱ्या दुर्घटना घडवून आणतो? का म्हणून त्याच्याच दर्शनासाठी, उत्सवासाठी गेलेल्यांच्या चेंगराचेंगरीत हजारो निष्पाप लोक पायदळी तुडविले जातात? परंतु असे अनेक बाधक अनुभव पचविण्याची कला आपल्याला अवगत असते. सर्व दुर्घटनांचे स्पष्टीकरण आपण सैतानाच्या दुष्टपणावर किंवा पूर्वजन्मीच्या पापांवर ढकलतो. आपले ईश्वरवादी मत टिकवून ठेवतो आणि आपल्या पुढील पिढय़ांना, त्यांच्या बालपणापासूनच त्या मताची दीक्षा देतो. सुरुवातीपासून माणसांच्या शेकडो पिढय़ा असेच घडत आलेले असल्यामुळे, हजारो वर्षांचा दीर्घ काळ, ‘ईश्वरवादी मत’ माणूस जातीच्या सामाईक मनात टिकून राहते. त्यात काही आश्चर्य नाही.