ईश्वरचिकित्सा करण्यात एक जी मोठी अडचण आहे ती अशी की, तपासलेला प्रत्येक पुरावा, ईश्वराचे अस्तित्व-दर्शक नसून त्याच्या विरोधी म्हणजे नास्तिक-दर्शक आहे असे आढळून आले तर अखेरीस ईश्वर नाकारावा लागतो आणि त्यामुळे अनेकांची मोठी पंचाईत होते. ‘आपल्या मनबुद्धीला पटण्याजोगा सार्वत्रिक पुरावा उपलब्ध नाही, त्याअर्थी ईश्वर अस्तित्वात नसावा, नाही’ असे म्हणण्याची अनेकांची तयारी नसते.

काही लोक ‘देव’ आणि ‘ईश्वर’ हे शब्द समानार्थी वापरतात, तर काही लोक ईश्वर ही सर्वश्रेष्ठ शक्ती असून देव ही ईश्वराच्या अधिकार परंपरेतील लहान, स्थानीय किंवा विभागीय शक्ती आहे असे मानतात. या संकल्पनेप्रमाणे ईश्वराच्या अधिकार परंपरेत अनेक साहाय्यकही असू शकतात व त्या साहाय्यकांना काही धर्मामध्ये ‘देवदूत’ असे मानून (म्हणजे काल्पनिकच) त्यांचाही ते जणू देव आहेत असा मान राखला जातो. त्यानंतर ज्यांना प्रेषित, ऋषी, मुनी, संत वगैरे मानले जाते ते मात्र गूढ शक्तींच्या अधिकार परंपरेतील दुसरी गूढ शक्ती नसून, ती आपल्यासारखी माणसेच असतात. परंतु ईश्वराने त्या काही निवडक माणसांवर काही अनुग्रह (कृपा) केलेली असते असे मानले जाते. पण हिंदू धर्मात अशा काही ऋषी, मुनी, संतांपैकी काहींच्यात थोडासा ‘ईश्वरी अंश’ असतो असे मानून त्यांना खास मान दिला जातो. तसेच हिंदू धर्मात ईश्वर स्वत: मनुष्य अवतारही घेऊ शकतो. ख्रिस्ती धर्मात येशू हा ईश्वराचा (एकमेव) पुत्र आहे असे मानले जाते.
देव, ईश्वर किंवा परमेश्वर या शब्दांच्या अनेक व्याख्या असून त्याचे ‘नेमके स्वरूप’ सांगणारे, शेकडो ग्रंथ जगातील अनेक धर्मामध्ये लिहिले गेले आहेत. त्या सर्व ग्रंथांमध्ये आपापसात प्रचंड मतभेद आहेत तरी त्यांच्यात ईश्वराबाबत ‘एक समान सूत्र’सुद्धा आहे व त्यालाच आपण ईश्वर म्हणू या.
या पद्धतीने, विश्वामागील एकमेव सर्वश्रेष्ठ शक्ती किंवा विश्वाची एकमेव परमसत्ता म्हणजे ईश्वर होय. अशी ही एकमेव परमसत्ता अमर म्हणजे कालातीत आहे. अदृश्य आहे आणि साधारणत: न्यायी, चांगली व प्रेमळ आहे असे मानले जाते. अदृश्य असूनही ही सर्वश्रेष्ठ शक्ती (शरीरधारी, अशरीरी किंवा ब्रह्मस्वरूप)प्रत्यक्ष अस्तित्वात आहे व ती मानवी जीवनात दखल घेते (लक्ष ठेवते) असे मानले जाते व तिलाच ईश्वर म्हणतात.
अशा सत्ताधीश, सर्वसमर्थ ईश्वराचे अस्तित्व मानले की तो कुठे राहतो, कसा दिसतो व तो करतो काय, असे प्रश्न निर्माण होतात. त्यापैकी तो करतो काय या प्रश्नाचे सर्वसाधारण उत्तर असे आहे की, तो हे विश्व, त्यात आपला सूर्य, आपली पृथ्वी व तीवरील जीवन निर्माण करतो, त्यांचा सांभाळ करतो व शेवटी केव्हातरी तो विश्वाचा विनाशही करणार आहे. या बाबतचे वेगवेगळ्या धर्मातील तपशील मात्र अगदी वेगवेगळे आहेत. तसेच तो राहतो कुठे या प्रश्नाचे उत्तरसुद्धा तो आकाशात राहतो. तीर्थक्षेत्रात राहतो, मंदिरात राहतो, तो सर्वत्र असतो किंवा तो माणसाच्या हृदयात (अंतर्यामी) असतो अशी मतभेदग्रस्तच आहेत. म्हणजे या सर्वश्रेष्ठ शक्तीचे स्वरूप, पत्ता, तिच्या इच्छाभावना, उद्दिष्टे व कार्यपद्धती वगैरे आम्हाला माहीत नसल्या तरी, अशी एक वैश्विक परमसत्ता अस्तित्वात आहे व आपण तिची प्रार्थना केली तर ती तिला ऐकू जाते, समजते व आपल्या प्रार्थनेने ती प्रसन्न होऊ शकते आणि ती आपली मदत करते. असे मात्र सर्वत्र मानले जाते.
अशा या सर्वश्रेष्ठ शक्तीच्या मानाने मनुष्य अगदीच क्षुद्र असल्यामुळे माणसांनी ‘ईश्वराची चिकित्सा’ करूच नये असे पुष्कळ लोक मानतात. माणसांचे सर्व धर्मग्रंथही तसेच सांगतात. कारण स्वतंत्र तर्काने होणारा विरोध त्यांना नको असतो.
आता हे खरेच आहे की विश्वाच्या प्रचंड पसाऱ्यात, आकाराने मनुष्य क्षुद्रच नव्हे तर नगण्य आहे आणि सर्वश्रेष्ठ वैश्विक शक्तीच्या तुलनेत माणसाची शक्ती तर अगदीच नगण्य आहे. तरीसुद्धा हा दुर्बल, नगण्य मनुष्य त्याला निसर्गत: व उत्क्रांतीने प्राप्त झालेल्या अजब मेंदू-बुद्धीचा वापर करून, जशी त्याने स्वत:च निर्माण केलेल्या, त्याच्या ‘विज्ञान’ या साधनाद्वारे, अतिप्रचंड भौतिक विश्वाची व भौतिक नियमांची चिकित्सा करतो, त्याचप्रमाणे त्याला (म्हणजे माणसाला) त्या सर्वश्रेष्ठ परमसत्तेची चिकित्सा करण्याला काहीही हरकत असू नये, असे आमचे म्हणणे आहे. गतिशील आणि शक्तिमय विश्वाचे संचलन कुठल्या शक्तींनी व नियमांनी होते याचा शोध विज्ञान अवश्य घेते. परंतु त्या शक्ती व ते नियम ‘भौतिक’ असतात. त्यांच्या मागे काही गूढ, अतिभौतिक (म्हणजे भौतिकापलीकडील किंवा आध्यात्मिक म्हणा हवे तर) शक्तींचे अस्तित्व मानण्याची किंवा नाकारण्याची विज्ञानाला काहीच आवश्यकता नाही, किंवा तो कसा आहे हे प्रश्न विज्ञान कधी विचारीत नाही. परंतु विज्ञान अशी चिकित्सा जरी थेटपणे करीत नाही तरी आपण (म्हणजे सामान्य जिज्ञासू माणसाने) तशी चिकित्सा करण्याला कुणाचा आक्षेप का असावा?
अनेक ईश्वरवादी म्हणजे ‘आस्तिक’ लोक असे मान्य करतात की, ईश्वराला कुणी कधी पाहिलेले नाही. परंतु जगात जे अनेक चमत्कार दिसतात, त्यांच्यामागचे कारण म्हणून त्यांना ईश्वर मानावा लागतो. आता प्रत्यक्षात घडते ते असे की विज्ञान संशोधनाने एखाद्या चमत्कारामागची भौतिक कारणपरंपरा कळली की त्या भोवतीचे ‘गूढ वलय’ नाहीसे होते. परंतु त्याच्याही मागे एखादे कारण उरते व त्याच्यामागे कसला तरी ईश्वर असू शकेल असे वाटू लागते. असे करत करत अंतिमत: काय हाती लागेल ते माहीत नसले तरी सगळे चमत्कार, साक्षात्कार आणि त्यांच्यामागे आपण उभा केलेला ईश्वर, अशा सर्व घटकांनी ‘चिकित्सेच्या कसोटीला’ तोंड दिलेच पाहिजे, असे आम्हाला वाटते. शिवाय ईश्वर जर खरोखरच अस्तित्वात असेल तर केव्हा तरी तो चिकित्सकांच्या कसोटीत पास होईलच की! मग अज्ञेयवाद्यांनी किंवा नास्तिकांनी त्यांच्या तर्कबुद्धीच्या सहाय्याने केलेल्या उलटतपासणीला ईश्वरवाद्यांनी घाबरून जाण्याचे किंवा आक्षेप घेण्याचे कारणच काय?
हिंदू धर्मात (मनुष्याला सर्वच सजीवांना) ईश्वराचा अंश मानलेले आहे; म्हणजे ईश्वर व मनुष्य यात अद्वैत लेखले गेले आहे. आता मनुष्य जर खरेच ईश्वराचा अंश असेल तर त्याने म्हणजे ईश्वराने स्वत:ची चिकित्सा करायला का हरकत असावी?
पण ईश्वरचिकित्सा करण्यात एक जी मोठी अडचण आहे ती अशी की, तपासलेला प्रत्येक पुरावा, ईश्वराचे अस्तित्व-दर्शक नसून त्याच्या विरोधी म्हणजे नास्तिक-दर्शक आहे असे आढळून आले तर अखेरीस ईश्वर नाकारावा लागतो आणि त्यामुळे अनेकांची मोठी पंचाईत होते. ‘आपल्या मनबुद्धीला पटण्याजोगा सार्वत्रिक पुरावा उपलब्ध नाही, त्याअर्थी ईश्वर अस्तित्वात नसावा, नाही’ असे म्हणण्याची अनेकांची तयारी नसते. कारण त्यामुळे ‘आपण समाजात नास्तिक ठरू’ अशी भीती त्यांना वाटत असते. दुसऱ्या काही जणांना अशी भीती वाटते की जर कसला तरी ईश्वर खरोखरच अस्तित्वात असेल आणि आपल्या चिकित्सेतील चुकीमुळे, आपण त्याला नाकारू तर तो आपल्याला कडक शिक्षा करील. आणखी काही जणांना असेही वाटत असते की, ईश्वरकल्पना जनमनात जागृत ठेवणे, हे त्यांचे पवित्र कर्तव्य आहे. त्यामुळे ते कुठल्या तरी कथापुराणात वर्णिलेला किंवा कुणी तरी केव्हातरी सांगितलेला गूढ अनुभवच खरा मानतात. तर्कबुद्धीला ते नकार देतात आणि ‘ईश्वर तर आहेच’ असे म्हणत, ईश्वर अस्तित्वाचा व त्याच्या कर्तृत्वाचा प्रचार करीत राहतात.
ईश्वरचिकित्सा करणे मान्य ठरविले तर एक ‘गृहीतकृत्य’ म्हणून आपणाला ‘ईश्वर आहे व तोच अंतिम सत्य आहे’ असे मानता येईल. पण त्यानंतर असे काही अंतिम सत्य अस्तित्वात आहे की नाही हे आपल्या तर्कबुद्धीने आपल्याला तपासावे लागेल. जगात अनुभवास येणाऱ्या अगणित सत्य घटनांच्या आधारावर तर्काच्या सहाय्याने हा शोध करायचा आहे. सर्व घटना ही विभागीय सत्ये आहेत. ही सत्ये सुंदर असतील किंवा असुंदर असतील; सुखकारक असतील किंवा दु:खदायक असतील; न्याय्य असतील किंवा अन्यायकारक असतील; पण ती जशी असतील तशीच आपण समजून घ्यायची आहेत. कसलाही अभिनिवेश न बाळगता समजून घ्यायची आहेत आणि त्यावर तर्कबुद्धीचे हत्यार वापरून त्यांतील तथ्य शोधायचे आहे. अशाप्रकारे आपण चिकित्सेद्वारे सत्यशोध करू शकतो. ईश्वरचिकित्सेची आवश्यकता आहे ती अशा सत्यशोधासाठीच होय. चिकित्सकाने आपल्या प्रतिपादनात जर सांभाळून शब्दयोजना केली असेल आणि तरीही, अशी ईश्वरचिकित्सा केल्यामुळे, कुणाच्या भावना जर दुखावल्या गेल्या असतील तर ‘माझ्या भावना दुखविल्या गेल्या’ असे म्हणणाऱ्याचेच, काही तरी चुकत आहे, असे म्हणावे लागेल. तशी आपल्याकडे आस्तिक, धार्मिक भावनांचे अती लाड करण्याची रीतच आहे असे मला वाटते.
(प्रस्तुत लेखकाच्या ‘समग्र निरीश्वरवाद’ या लोकवाङ्मयगृह प्रकाशित (मे २०१२) पुस्तकात अशा ११० चिकित्सा दिलेल्या आहेत. म्हणजे आस्तिकांना ‘ईश्वर आहे’ असे कशावरून वाटते ते सांगणारे ११० ‘प्रातिनिधिक युक्तिवाद’ व प्रत्येक पानावर ‘त्याचा प्रतिवाद’ असे दिलेले आहेत. ज्यांना या तपशिलात रस असेल त्यांनी ते पुस्तक वाचावे.)

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”
Balasaheb-Thorat
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांची सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन सरकारवर टीका, “सरकारची मानसिकता…”
Story img Loader