निरीश्वरवादी माणूस ‘वैश्विक-भौतिक शक्तीचे अस्तित्व’ काही नाकारीत नाही. परंतु ईश्वरवादी लोक वैश्विक शक्तींचे वरच्यासारखे जे इतर कर्तृत्व मानतात, ते मात्र तो अवश्य नाकारतो.
साक्षात्कार, चमत्कार, ईश्वर, देव, देवदूत, देवधर्म, स्वर्ग, नरक, परलोक इत्यादी ईश्वरवादाच्या सर्व घटकांना तर्कबुद्धीची कसोटी लावून ते घटक त्या कसोटीस उतरत नाहीत म्हणून त्यांना विचारांनी स्पष्टपणे नाकारणे म्हणजेच निरीश्वरवादी असणे होय.
अशा प्रकारच्या विचारांनी निरीश्वरवादी बनलेला प्रत्येक मनुष्य बुद्धिप्रामाण्यवादी, इहवादी, विज्ञानवादी, वास्तववादी आणि विवेकवादी असतोच असतो; परंतु प्रत्येक बुद्धिवादी मनुष्य निरीश्वरवादी असेलच असे मात्र म्हणता येत नाही. कारण असे बुद्धिवादी लोक असणे शक्य आहे की जे व्यवहारात सर्वत्र तर्कबुद्धी वापरतात; परंतु तीच तर्कबुद्धी ते ईश्वर-चिकित्सेसाठी मात्र वापरत नाहीत. परंतु ‘मी ईश्वराला मानीत नाही, त्याला काही किंमत देत नाही, किंवा माझा ईश्वरावर राग आहे,’ असे काही तरी म्हणतो म्हणून काही तो माणूस निरीश्वरवादी ठरत नाही. निरीश्वरवादी माणसाला इतरेजन मानतात तशा ईश्वराचे अस्तित्वच मुळी मान्य नसल्यामुळे, त्याने ईश्वरावर राग धरण्याचा किंवा त्याला मान न देण्याचा काही प्रश्नच येत नाही. निरीश्वरवादी माणसाचे ईश्वराशी काहीही भांडण नसते व त्याला देवाचा काही रागद्वेष नसतो. कारण ईश्वर अस्तित्वात नाही असे तो म्हणतो; मग जे अस्तित्वातच नाही, त्याच्यावर त्याचा राग कसा असेल?
विश्वाची काही एक परमसत्ता असून, ती मनबुद्धीइच्छायुक्त आहे असे ज्यांना वाटते, त्यांनी ती सत्ता अस्तित्वात आहे आणि ती तशा स्वरूपाची आहे याचे पुरावे दिले पाहिजेत. नाही तर ती शक्ती दगडधोंडे, रसायने किंवा वीज, गुरुत्वाकर्षणासारखी फक्त ‘भौतिक शक्ती’ आहे असे म्हणावे लागेल. म्हणजे ती ‘आध्यात्मिक शक्ती’ नव्हे. निरीश्वरवादाचे हेच म्हणणे आहे. ‘आध्यात्मिक ईश्वर शक्तीचे अस्तित्व’ तर्कबुद्धीने कधीही कुणालाही सिद्ध करता आलेले नाही आणि म्हणूनच निरीश्वरवाद तसले अस्तित्व नाकारतो, म्हणजे ‘तसला कुणी ईश्वर अस्तित्वातच नाही,’ असे म्हणतो.
काही थोडे लोक असे मानतात की, विविध धर्माच्या व पंथांच्या वेगवेगळ्या उपासनापद्धती हे ‘एकाच ईश्वराकडे पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.’ परंतु दुसरे अनेक लोक असे मानतात की, फक्त त्यांच्या स्वत:च्या धर्मातील ईश्वर व त्याची उपासनापद्धतीच खरी असून, इतर धर्मातील, पंथांतील ईश्वर व उपासनापद्धती खोटय़ा आहेत. एवढेच नव्हे तर त्या इतर धर्माच्या लोकांना ते ‘नास्तिक’ मानतात. निरीश्वरवादासाठी ही कसोटी वापरणे हास्यास्पद आहे. ‘आपण ज्या धर्मात जन्मलो त्या धर्मात सांगितलेला ईश्वर जो नाकारतो तो नास्तिक’ अशी नास्तिकतेची व्याख्या होऊ शकत नाही. नास्तिक किंवा निरीश्वरवादी तो जो ‘सर्व’ ईश्वरवादी धर्मातील ईश्वरकल्पना नाकारतो. अरबस्तान व युरोपमध्ये ‘अद्वैत मत’ सांगणाऱ्या काही संतांना नास्तिक ठरवून इतिहासकाळी त्यांचा मोठाच छळ झालेला आहे. त्यांच्या तेथील धर्मामध्ये ईश्वर आणि मनुष्य हे ‘निर्माता व निर्मिती’ असे ‘पूर्ण द्वैत’ सांगितलेले असल्यामुळे माणसाचा आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे हे अद्वैत मत त्यांनी ‘नास्तिक मत’ ठरविले, जे अर्थातच चूक आहे. अद्वैत मतसुद्धा पूर्णत: ईश्वरवादी मतच आहे.
‘भौतिक शक्तींहून ‘अधिक’ अशी काही ईश्वरी शक्ती अस्तित्वात आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर निरीश्वरवाद्याने ‘नाही’ असेच दिले पाहिजे. या बाबतीत १७ ऑगस्टच्या ‘लोकसत्ता’त ‘श्रद्धा’ या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या माझ्या लेखात मी असे म्हटले होते की, ‘प्रत्यक्षात कुणी ईश्वर नसूनही लोकांनी ईश्वराच्या फक्त अस्तित्वावर श्रद्धा ठेवली तर मोठे काही बिघडत नाही. आम्हा बुद्धिप्रामाण्यवाद्यांचा जास्त आक्षेप आहे तो ईश्वराच्या कर्तृत्वावरील श्रद्धेला.’ इत्यादी. आता असे पाहा की ‘आंधळा, बहिरा, मुका, नासमज, ध्येयशून्य व कर्तृत्वशून्य’ असा ईश्वर काही कुणी आस्तिक मानीत असणे शक्य नाही; परंतु जर कुणाला ‘काही तरी अज्ञात शक्ती अस्तित्वात आहे’ असे म्हणायचे असेल आणि तरीही आपण विज्ञानवादी, वास्तववादी वा विवेकवादी आहोत असे म्हणायचे असेल तर त्याला एवढे तरी मानावेच लागेल की (१) त्या शक्तीला इच्छा, मन, बुद्धी व भावना नाहीत. (२) ती शक्ती माणसाचे किंवा मानवसमूहाचे भाग्य ठरवीत नाही. (३) ती शक्ती मानवी जीवनात हस्तक्षेप करू इच्छित/ शकत नाही. (४) ती मानवाकडून पूजा, प्रार्थना, उपासना यांची अपेक्षा करीत नाही. (५) ती कुणालाही साक्षात्कार देत नाही. चमत्कार करीत नाही. (६) तिचे स्वर्ग, नरक किंवा असे काहीही परलोक नाहीत व ती कुणा सजीवाला पुनर्जन्मही देत नाही.
जर कुणी माणूस स्वत:ला निरीश्वरवादी समजत असेल आणि तरीही ‘काही अज्ञात शक्ती अस्तित्वात असू शकेल,’ असे तो म्हणत असेल तर त्याने वर नोंदवलेले कर्तृत्व ईश्वराजवळ नाही, एवढे तरी मानावेच लागेल. अर्थात ईश्वरवाद्यांनासुद्धा असा कर्तृत्वशून्य ईश्वर नको असतो. त्यांना असा ईश्वर हवा असतो, जो त्यांना मानसिक आधार देईल, संकटसमयी धावून येऊन संकट निवारण करील. निरीश्वरवादी माणूस ‘वैश्विक-भौतिक शक्तीचे अस्तित्व’ काही नाकारीत नाही. परंतु ईश्वरवादी लोक वैश्विक शक्तींचे वरच्यासारखे जे इतर कर्तृत्व मानतात, ते मात्र तो अवश्य नाकारतो.
सर्वसाधारणपणे ईश्वर हा सर्वज्ञ, सर्वसमर्थ व सर्वकल्याणकारी (म्हणजे प्रेमळ व दयाळू) आहे असे मानले जाते; परंतु हे तीनही गुण एकत्र असलेला ईश्वर संभवतच नाही, असे आम्हाला वाटते. कसे ते पाहा. ईश्वर ‘सर्वज्ञ’ असेल तर त्याला सर्वाची दु:खे, त्यांच्यावर झालेले अन्याय, अत्याचार वगैरे माहीत असणार. बरोबर? आता तो ‘सर्वसमर्थ’सुद्धा असल्यामुळे त्याला उलटसुलट अगदी काहीही करता येत असणार. बरोबर आहे ना? शेवटी त्याचे प्रेम व त्याची दया सर्वासाठी असल्यामुळे त्याच्या या जगात, सर्व जण सुखी व आनंदी असले पाहिजेत; परंतु प्रत्यक्ष जगात सर्व माणसे सुखी नसून, बहुतेक माणसे दु:खी आढळतात. यावरून असे दिसते की, तो सर्वज्ञ तरी नसेल किंवा सर्वसमर्थ तरी नसेल, किंवा त्याचे प्रेम व दया तो सर्वाना नि:पक्षपातीपणे देत नसेल. खरे तर ईश्वराचे सर्वावर प्रेम आहे असे काही जगात दिसून येतच नाही. मग साधारणपणे मानला जातो, तसा ईश्वर कुठे आहे?
पुढील विधाने अशी आहेत की, ईश्वरवाद्यांना व निरीश्वरवाद्यांना दोघांनाही ती मान्य होतील असे वाटते. (१) विश्वात एक अतिप्रचंड चैतन्य आहे. (२) ते चैतन्य विश्वाच्या प्रत्येक कणात भरलेले आहे. (३) ते सतत कार्यरत आहे (४) ते प्रवाही (गतिमान) आहे. (५) ते नियमबद्ध आहे. (६) ते नवनिर्मितीक्षम आहे. (७) मनुष्य व त्याचा प्राण (सजीवता) ही मूलत: त्याच चैतन्यातून निर्माण झालेली असावी. (८) व ती त्या चैतन्याच्या तुलनेत अतिक्षुद्र आहे. अशा या वैश्विक चैतन्यालाच जर कुणी ईश्वर म्हटले तर ‘तेवढा तो ईश्वर’ सर्वानाच मान्य होईल असे वाटते. मात्र अशा त्या चैतन्याला, ईश्वरवादी लोक इतर अनेक गुण किंवा मानवी गुण जोडतात ते होता कामा नये. आता असे बघा की, हे चैतन्य वैश्विक, अतिप्रचंड व सर्वव्यापी आहे हे खरे, पण ते ‘सजीव’ नव्हे. तसेच ते चैतन्य कणाकणात आहे व सतत कार्यरत आहे हेही खरे; पण त्याला मन, बुद्धी, इच्छा व भावना नाहीत. ते नवनिर्मितीक्षमसुद्धा आहे, पण ते नियमांनी बांधलेले आहे व ते नियम ते मोडू शकत नाही, तसेच त्याला जाणीव, दया-माया, प्रेम वगैरे काही नाही. मग ते ईश्वर कसे? ते तर केवळ भौतिक-वैश्विक चैतन्य आहे.
अशा या भौतिक-वैश्विक चैतन्याविषयी आपल्याला प्रेम व आदर वाटणे मात्र शक्यच नव्हे तर साहजिकही आहे. कारण प्रेम करणे हा ‘मानवी मनाचा गुणधर्म’ आहे. आपली सजीवता आणि मनबुद्धी हे आपल्या बाबतीत कोटय़वधी वर्षांच्या उत्क्रांतीने घडून आलेले चमत्कार आहेत. त्यामुळे आपले मन प्रेम करण्यास समर्थ बनलेले आहे. त्यामुळेच आपण अगदी डोंगर, नदी, समुद्र एवढेच काय, पण आपल्याशी संबंधित लहानसहान वस्तूंवरही प्रेम करतो. मग विश्वचैतन्य ही तर अशी माती आहे की, जिच्यातून आपला जन्म झालेला आहे व म्हणून तिच्याविषयी आपल्याला प्रेमादर वाटणे साहजिक आहे. आपण त्या चैतन्याची लेखन, काव्य, संगीत इत्यादी साधनांद्वारे स्तुती, सन्मान, सत्कार करणे हेही स्वाभाविक आहे. सद्भाव व्यक्त करणे हा मानवी सद्गुण असून, तो माणसाला आनंददायक आहे. अशा आनंदाचा आपल्या मनावर व त्याद्वारे शरीरावर सुपरिणामही होतो; परंतु त्याचा अर्थ आपण जर असा लावला की, त्या चैतन्याने आपण केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन आपल्याला ते सुपरिणाम दिलेले आहेत तर ते चुकीचे म्हणावे लागेल. कारण ते चैतन्य काही देऊ शकत नाही (आशीर्वादही नाही) व कुणाशीही काहीही देण्याघेण्याचा व्यवहारही करू शकत नाही.
अशा प्रकारच्या ‘वैश्विक-भौतिक चैतन्याला’ कुणा माणसाने ‘ईश्वर-ब्रह्म’ किंवा असेच काही नाव दिले व प्रेमादरापोटी त्याची स्तुती करून त्याला नमस्कार केला. तरी इतर लोक त्या चैतन्याला ‘ईश्वर’ मानतील का? बहुधा नाहीच! कारण तो ईश्वर आध्यात्मिक नाही, प्रार्थनेने तो प्रसन्न होत नाही. नवसाला पावत नाही वगैरे. म्हणजे सर्व धार्मिक मानतात तसला तो ईश्वर नव्हेच, पण त्याच कारणांनी अशा केवळ भौतिक शक्तीवर प्रेम करणारा असूनही जर तो तिच्याकडे काहीच मागत नसेल तर मात्र तो माणूस ‘निरीश्वरवादी’ म्हणता येईल, असे मला वाटते.