एचआयव्हीबाधित मुलांचे संगोपन, शिक्षण आणि वैद्यकीय उपचार या क्षेत्रामध्ये गेले दीड शतक ‘मानव्य’ ही संस्था कार्यरत आहे. यासाठी मिळणारे अनुदान तोकडे असून वाढत्या खर्चाला कसे सामोरे जायचे हाच संस्थाचालकांपुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. या मुलांवर उपचारांसाठी आवश्यक निधी संकलित करून त्यांनाही सुखाने जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी ‘मानव्य’ला हवा आहे दातृत्वाचा हात.
एड्स या रोगाचा तीव्र गतीने होणारा प्रसार आणि लहान मुलांमध्ये होणारा प्रादुर्भाव ध्यानात घेऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विजयाताई लवाटे यांनी १८ जून १९९७ रोजी ‘मानव्य’ या संस्थेचे रोपटे लावले. गेल्या १५ वर्षांत संस्थेने या मुलांचा केवळ सांभाळ केला असे नाही तर, या मुलांना शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देऊन समाजामध्ये ताठ मानेने जगण्यासाठी आत्मविश्वास दिला आहे. सध्या संस्थेमध्ये ३४ मुले आणि २९ मुली अशा एचआयव्हीबाधित ६३ मुलांचे संगोपन केले जात आहे. विजयाताई यांच्या निधनानंतर पुत्र शिरीष लवाटे आणि स्नूषा उज्ज्वला लवाटे हे दांपत्य त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेत आहेत. राज्य सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागातर्फे दरमहा एका मुलामागे ११०० रुपये अनुदान मिळते. मात्र, संस्थेचा एका मुलावरील खर्च हा साडेतीन हजार रुपये आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आधुनिक औषधांचा शोध लागला असून त्याद्वारे एचआयव्हीबाधित मुलांचे आयुर्मान वाढले आहे ही आनंदाची गोष्ट आहे. पण, या महागडय़ा औषधांसाठी पैसे जमा करणे हेदेखील तितकेच जिकिरीचे झाले आहे. एचआयव्हीबाधित मुलांना सुरुवातीला ‘फर्स्ट लाइन ट्रीटमेंट’ दिली जाते. काही दिवसांनी या औषधांचा उपयोग होत नाही. अशावेळी या मुलांना ‘सेकंड लाइन ट्रीटमेंट’ दिली जाते. सहा महिन्यांपूर्वी या उपचारांसाठी एका मुलामागे साडेसात हजार रुपये खर्च अपेक्षित होता. दर महिन्याला किमान पाच मुलांना मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटल येथे घेऊन जावे लागत होते. मात्र, ही सुविधा आता ससून रुग्णालयामध्ये उपलब्ध झाली आहे. या आधुनिक औषधांमुळे ‘सुखाने मरण देणारी’ अशी पूर्वीची ओळख बदलून आता ‘सुखाने जगणं देणारी संस्था’ अशी ‘मानव्य’ची नवी ओळख प्रस्थापित झाली आहे. इच्छुकांनी मानव्य या नावाने धनादेश काढावेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा