मनोहर जोशी यांना दसरा मेळाव्यासाठी निमंत्रित करून त्यांचा अपमान ठरवून केला गेला आणि सेना नेतृत्वास त्याची पूर्ण कल्पना होती. उद्धव ठाकरे यांनी यातून काय साधले ? ज्येष्ठाची जाहीर अवहेलना करणे हे उद्धव यांचे संस्कार काय?
व्यक्ती असो वा संघटना. जन्माला येताना प्रत्येकाच्या जनुकात व्यक्तिमत्त्व वा स्वभावधर्माचे गुणधर्म लिहिलेलेच असतात आणि त्यात बदल होत नाहीत. एखाद्याचे केस, चेहेऱ्याची ठेवण, उंची, चण विशिष्टच का असते याचे उत्तर जनुकांत असते. हल्ली सौंदर्यशल्यक त्यात बदल करतात. पण ते सर्वच तात्पुरते आणि वरवरचे. त्यामुळे अंतरंगात बदल होत नाही. तसा बदल करणारे तंत्रज्ञान अद्याप जन्माला यायचे आहे. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना याची कल्पना नसावी. त्यांच्या विजयादशमीच्या पारंपरिक मेळाव्यात जे काही घडले त्यावरून याची खात्री पटते. या मेळाव्यात मनोहर जोशी यांची शोभा होणार याचा अंदाज येण्यास राजकीय तज्ज्ञ असण्याची गरज नव्हती. तसेच झाले आणि तेच अपेक्षित होते. ही आफत मनोहरपंतांनीच ओढवून घेतली आणि त्याचा समाचार सोमवारच्या संपादकीयांत आम्ही घेतलेलाच आहे. त्याच्या पुनरुक्तीची काहीच गरज नाही. परंतु त्याखेरीज दसऱ्याच्या मेळाव्यात जे काही घडले ते शिवसेनेच्या नेतृत्वशैलीविषयी प्रश्न निर्माण करणारे होते.
मराठीच्या मुद्दय़ावर काही फारसे हाती न लागलेल्या शिवसेनेने पुढे हिंदुत्वाची झूल पांघरली त्याला आता बराच काळ लोटला. त्यानंतर उद्धव ठाकरे हे स्वत:ला या धर्माचे पाईक म्हणवतात आणि आपली संघटना फक्त हिंदू हिताचा विचार करते, असा त्यांचा दावा असतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ही कथित थोर संस्कृती अंगी मुरवली असणार. तेव्हा प्रश्न असा की उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना जी काही वागणूक दिली, ती या उदात्त वगैरे हिंदू संस्कृतीचाच भाग होती असे मानावयाचे काय? मनोहर जोशी यांचे चुकले याबद्दल कोणाच्याही मनात शंका असणार नाही. इतके सगळे मिळाल्यावर वयाच्या या टप्प्यावर त्यांनी आणखी पदाची अभिलाषा बाळगायची काहीही गरज नव्हती. परंतु भारतीय राजकारणात हे असे नवीन नाही. शिवसेना ज्या भाजपबरोबर नांदायचा प्रयत्न करीत आहे, त्या भाजपमध्येही हेच चित्र आहे. वयाच्या नव्वदीकडे झपाटय़ाने निघालेल्या लालकृष्ण अडवाणी यांना अजूनही मुंडावळय़ा बांधून निवडणुकीतील वरातीच्या घोडय़ावर बसण्याची इच्छा आहे. तेही हिंदू संस्कृतीचेच पाईक. त्या संस्कृतीत सांगितल्यानुसार वानप्रस्थाश्रमाचा विचारदेखील त्यांच्या मनास या वयातही शिवत नाही. अखेर भाजपचे नवे नेतृत्व असलेल्या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांना हाताने धरवून खाली बसवले. पण म्हणून नंतर मोदी यांनी अडवाणी यांचा जाहीर पाणउतारा करण्याचा असभ्यपणा केला नाही की अडवाणी यांचा अपमान होईल अशी कोणतीही कृती केली नाही. उलट भारतीय संस्कृतीतील पुरेपूर नाटकीपणाचा अवलंब करीत त्यांनी जाहीरपणे अडवाणी यांचे पाय धरण्याचे चातुर्य दाखवले. अलीकडे मोदीप्रेमाचे भरते आलेल्या उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्याकडून हाही धडा घेण्यास हरकत नाही. कितीही मतभेद असले तरी आपल्यातील ज्येष्ठाचा जाहीर अपमान करू नये, हे प्रचलित राजकारणाचे तत्त्व. ते शिवाजी पार्कवर उद्धव यांनी जाहीरपणे पायदळी तुडवले. याची काहीही गरज नव्हती. परंतु उद्धव ठाकरे यांच्या या कृतीतून त्यांच्या राजकारणाची दिशा सूचित होते. त्यामुळेच झाल्या प्रकाराचे विश्लेषण करावयास हवे.
ते केल्यास ठसठशीतपणे समोर येणारी बाब म्हणजे जोशी यांचा अपमान ठरवून केला गेला आणि सेना नेतृत्वास त्याची पूर्ण कल्पना होती. जे काही झाले त्यात उत्स्फूर्तता होती असे मुळीच म्हणता येणार नाही. थेट व्यासपीठाच्या समोर जमलेले मूठभर कार्यकर्ते जोशी यांच्या विरोधाच्या घोषणा देत होते आणि त्यांना नेतृत्वाची पूर्ण चिथावणी होती, हे स्पष्ट होते. उद्धव यांनी मनात आणले असते तर या मूठभरांना आवरणे त्यांना सहज शक्य होते. पण त्यांना ते करावयाचे नव्हते. कारण संघटना आपल्या बरोबर आहे, हे दाखवून देण्याची संधी त्यांना सोडायची नव्हती. वस्तुत: त्याची गरजच काय? उद्धव यांच्या नेतृत्वाला सेनेतून आव्हान निर्माण झाले आहे, अशी परिस्थिती नाही. वादासाठी तसे ते आहे असे जरी मान्य केले तरी त्या वादळास तोंड देण्याचा अंत:पुरी मार्ग शिवसेनेसारख्या पक्षाच्या नेत्याने अवलंबिणे हे सर्वथा अशोभनीय आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी उद्धव यांना मनोहर जोशी यांच्यावर जाहीर तोफ डागता आली असती आणि पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल कारवाई देखील करण्याचा वा इशारा देण्याचा पर्याय त्यांना उपलब्ध होता. हे काहीही न करता मनोहर जोशी यांना दसरा मेळाव्यासाठी निमंत्रित करावयाचे आणि ते आल्यावर अपमान करायचा यात काय हंशील? यातून काय साधले गेले? वस्तुत: उद्धव हे जोशी यांच्यावर नाराज असण्यात काहीही गैर नाही. उद्धव यांचे नेतृत्व मवाळ आहे, अशी टीका जोशी यांनी केल्याने ही नाराजी समर्थनीयही ठरते. अशा वेळी जोशी यांना तंबी देऊन आपला अधिकार गाजवणे हे अधिक सयुक्तिक आणि शोभनीय ठरले असते. जोशी हे उद्धव यांचे तीर्थरूप बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने शिवसेनेचे संस्थापक. बाळासाहेबांच्या अत्यंत जवळच्या सल्लागारांपैकी एक. वयानेही ज्येष्ठ. तेव्हा अशा ज्येष्ठाची जाहीर अवहेलना करणे हे उद्धव यांचे संस्कार काय?
यातील दुसरा विरोधाभास हा की उद्धव यांच्यावर अशी टीका करणारे मनोहर जोशी हे काही पहिलेच नाहीत. शेवटचे तर नक्कीच असणार नाहीत. या आधी सदा सरवणकर, जयवंत परब वा श्रीकांत सरमळकर अशा.. एकास झाकावा आणि दुसऱ्यास काढावा अशा.. नामांकित नेत्यांनी उद्धव यांचे जाहीर वाभाडे काढलेले आहेत. ही मंडळी अर्थातच पक्ष सोडून गेली. परंतु गरज लागल्यामुळे वा यांच्यापेक्षा अधिक गुणी नेते न मिळाल्यामुळे यातील सर्वाना सेनेत परत घेण्याची वेळ उद्धव यांच्यावर आली. म्हणजे त्यावेळी उद्धव यांनी या सर्वाच्या टीकेकडे दुर्लक्ष केले आणि अत्यंत अश्लाघ्य टीका करणाऱ्यांना पुन्हा पक्षात सामावून घेतले, हा इतिहास आहे. त्यांच्या तुलनेत मनोहर जोशी यांच्या वाग्बाणांना काहीही धार नव्हती. तरीही ते सेना नेतृत्वाचे हृदय विदीर्ण करून गेले असतील तर नेतृत्वाची राजकीय प्रकृती फारच तोळामासा झाली असे म्हणावयास हवे. पक्षप्रमुख या नात्याने उद्धव यांनी मनोहर जोशी यांची फजिती होताना मजा घेणे चुकीचे होते. उलट उत्तराधिकारी चि. आदित्य यासही ते या मूठभरांना शांत करण्यापासून रोखत होते.     
जे झाले ते अगदीच बालिश आणि पोरकट. हल्ली टीव्हीवरील मालिकांत नात्यांतील महिलांच्या रुसव्याफुगव्याचे आणि घरातील राजकारणाचे बटबटीत आणि हास्यास्पद चित्रण असते. शिवसेनेच्या मेळाव्यात त्याचेच प्रतिबिंब दिसले. त्यामुळे हा विजयादशमीचा विचार शिलंगण करणारा मेळावा आहे की हळदीकुंकू असा प्रश्न पडल्यास ते साहजिकच म्हणावयास हवे.

ex cm prithviraj chavan refuse to accept congress state president post
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच कायम;पृथ्वीराज चव्हाणांचा नकार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Sanjay Raut Answer to Eknath Shinde
Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर
Eknath Shinde Shivsena Demand
Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
Gulabrao Patil insta
जळगावचं पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांकडेच? घोषणेआधीच मोठं वक्तव्य; विरोधकांना दमबाजी करत म्हणाले…
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Income Tax raid on BJP MLA Harvansh Singh Rathore
भाजपाच्या माजी आमदाराच्या घरात आढळल्या मगरी; भ्रष्टाचार प्रकरणात प्राप्तीकर विभागाने धाड टाकताच अधिकारीही चक्रावले
Story img Loader